गॉसिपिंगच्या अलीकडे.. पलीकडे…

गॉसिपिंगच्या अलीकडे.. पलीकडे…

एके ठिकाणी दिलीपकुमाने स्वतःविषयी सांगितलं होतं की 'दिलीपकुमार' या नावाभोवतीचं वलय आणि दुष्कीर्ती, या गोष्टींचा मला जेवढा त्रास होत असे, तेवढा इतर कशाने होत नसे. मला त्याची भीती वाटायची आणि मी माझ्या नावापासून दूर पळायचो, कारण प्रत्यक्षापेक्षा तुमची प्रतिमा किती अवाढव्य आहे, हे तुम्हाला माहीत असतंच.

दिलीप कुमारः अभिनयाचे व्याकरण….
शैलीदार आद्यनायक
राज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार

५ ऑगस्टला ‘मुग़ल-ए- आज़म’ या चित्रपटाने एकसष्ठीत पदार्पण केले. भारतीय चित्रपट सृष्टीतील हा एकमेव चित्रपट असेल की ज्याच्या सुरू होण्यापासून अगदी आतापर्यंत लोकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. काही केल्या त्याबद्दलचे औत्सुक्य काही कमी होत नाही. त्याचं रहस्य चित्रपटाच्या सुरवातीला काही वाक्य येतात, त्यात दडलं आहे.

ती अशी- “जब इतिहास और दंतकथा कला और कल्पना में एक दूसरे से घुलमिल जाते हैं और इस महान धरती की आत्मा अपने संपूर्ण वैभव और सौंदर्य के साथ इनमें निखर उठती है तो इन दोनों का हमारे अतीत से संबंध बन जाता है।”

भ्रमनिरास हा भ्रमापेक्षा जास्त काव्यात्मक असतो…

सलीम- अनारकलीच्या असफल प्रेमकहाणीला पडद्यावर भव्य-दिव्य पद्धतीने साकारत असतांना, त्याच्या अवती-भवतीच्या परीकथा, भ्रम आणि भ्रमनिराशेच्या अनेक सुरस कथा लोकांना आजही आकर्षित करतात. या सुरस-कथा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जरी वरदान ठरलेल्या असल्या तरी काहींसाठी मात्र त्या शाप ठरल्या…

सर्वात जास्त विचित्र आणि अवघडलेल्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं ते ‘युसुफ’ला. व्यवसायाने तो अभिनेता ‘दिलीपकुमार’ होता आणि त्याचा भाग म्हणून निभावत असलेली भूमिका प्रेमवीर, बंडखोर शहजादा सलीमची होती. ‘मुग़ल-ए-आज़म’चा सुरवातीचा काळ त्याच्यासाठी एखाद्या स्वप्ननगरीची सैर करणारा ठरला पण नंतर प्रचंड क्लेशदायक परिस्थितीतून जावं लागलं. केवळ मधुबाला व त्याचं असफल प्रेम इतकीच बाजू नव्हती. तर सतत तिहेरी पातळीवर त्याला झुंजावे लागले.. ‘युसूफ’ म्हणून, ‘दिलीपकुमार’ म्हणून आणि निभावत असलेला ‘प्रेमवीर’ सलीम म्हणून.

भूतकाळाच्या अनुभवाच्या आधारे माणूस वर्तमानाला प्रतिसाद देत असतो. आणि जर सुरक्षित वर्तमानात भविष्यकाळ उध्वस्त होऊ शकेल, अशी बीजे पेरली जात असतील तर व्यक्ती काय करेल? ती बीजे रुजली जाऊ नये, यासाठी जीवाचे रान करेल. वर्तमानात थोडे दुःखीकष्टी होत, पुढचे नऊ टाके उसविण्याआधीच एक टाका घालेलं.

बस्स युसूफही तेच करत होता. शुटिंगचे पॅकअप झाल्यावर उरलेला वेळतो युसूफ असे. एक साधा, चारचौघांसारखा माणूस. आयुष्य जगण्याबाबत, जोडीदाराबद्दल सर्वसामान्य कल्पना असलेला तरुण. पण रसिकांप्रमाणे त्याच्या जवळचे लोकं सदासर्वकाळ पडद्यावरचा दिलीपकुमार समजून वागत असे. पण हा फरक स्वतः युसुफने कायमस्वरूपी जपला. आपल्याला काय हवे, हे त्याला नेमकं माहिती होत आणि त्यापासून तो कधीही हटला नाही. त्यासाठी प्रत्येक वेळी मोजावी लागलेली किंमत ही जगासाठी चर्चेचा विषय ठरली तरी आपल्या आतल्या आवाजाशी कायम इमान राखण्यात तो यशस्वी ठरला.

‘मुग़ल-ए-आज़म’च्या निर्माण काळात चवीने ज्याची सर्वात जास्त चर्चा झाली, ती मधुबाला- दिलीपकुमार यांच्या प्रेमप्रकरण व प्रेमभंगाची, दिलीपकुमारने मधुबालाच्या विरुद्ध दिलेल्या साक्षीची आणि चित्रीकरणाच्यावेळी खरोखरचं थोबाडीत मारल्याबद्दलची… वरवर दिसणारे हे प्रसंग म्हणजे मनाच्या अंतर्भागातील वेदनांतून आलेल्या प्रतिक्रिया होत्या. भूतकाळातील ठेचेमुळे आलेलं शहाणपण होत. निदान त्याच्यापुरत तरी तेच खरं होत.

मधुबालाच्या आधी दिलीपकुमारचे कामिनी कौशल हिच्याशी भावनिक-बौद्धिक नातं जुळलं होतं. मोठ्या बहिणीच्या अपघाती निधनामुळे, कामिनी कौशल याचं वयाने मोठ्या असलेल्या मेव्हण्यासोबत घरच्यांच्या दबावामुळे आधीच लग्न झाले होते. चित्रीकरणाच्या वेळी दोन समवयस्क जीव एकमेकांत गुंतले. ही बातमी कामिनी कौशलच्या भावाच्या कानांवर गेली आणि घराण्याच्या इज्जतीचा प्रश्न सोडविण्याकरता तो पिस्तुल घेऊन दिलीप कुमारला मारण्यासाठी निघाला व दोघांनाही व्यवस्थित तंबी दिली. पुढे काही केल्या हे दोघे जुमानत नाहीत, हे बघून त्याने एके दिवशी स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा दोघांना इतका भयानक धक्का बसला की आपोआपच दोघे  दुरावले. (असा कयास आहे की बी. आर. चोप्रा याचा ‘गुमराह’ हा चित्रपट दिलीपकुमार, कामिनी कौशल आणि तिचे पती सूद यांच्यावर आधारित होता.)

त्याचाच परिणाम म्हणून मधुबालाच्या वडिलांचे सतत तिला आपल्या ताब्यात ठेवणे आणि प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणे ‘युसुफ’ला नामंजूर होते. घरच्यांच्या दबावामुळे, हस्तक्षेपामुळे काय फरफट होते, हे कामिनी कौशलच्या  प्रकरणामुळे चांगलंच समजलं होतं.

मधुबालाशी लग्न करण्याबाबत युसूफ एकदम गंभीर होता. आणि भविष्यातील काही धोके पोळलेल्या मनाला आधीच जाणवल्याने दोन अटी मधुबाला समोर त्याने ठेवल्या. एक लग्नानंतर आपल्या वडिलांशी कोणतेही संबंध ठेवायचा नाही आणि दुसरं म्हणजे लग्नानंतर चित्रपटसंन्यास घ्यायचा. मधूला वडील व प्रियकरामधील ही रस्सीखेच मानवणारी नव्हती. त्यात ‘नया दौर’च्या शूटिंगसाठी बाहेरगावी जाण्यासाठी अताउल्ला खान (मधुबालाचे वडील) यांनी परवानगी नाकारली. त्याला नंतर वेगवेगळी कारणं दिली पण आपल्यामुळे ते परवानगी देत नसावेत, असा समज दिलीप कुमारचा झाला. बी. आर. चोप्रा यांनी मधुबालावर अव्यावसायिक वागण्याबद्दल कोर्टात केस केली. त्या वेळी दिलीप कुमारने मधुबालाच्या विरुद्ध साक्ष दिली. आणि सर्व गोष्टी हाताबाहेर गेल्या.

रसिकजनांच्या ते फारसे पचनी पडलं नाही. कशाला उगाचच मधुबालाविरोधात दिलीपकुमारने साक्ष दिली? असा सूर उमटला. पण अनेकांना माहिती नसेल की आपल्या व्यवसायाच्या प्रति असलेली बांधिलकी जपणाऱ्या दिलीप कुमारने दिलेली ही पहिली कानूनी लढाई नव्हती. ‘मुग़ल-ए-आज़म’ सुरू होण्याची चिन्ह दिसत नाही म्हणून ‘अनारकली’ची कथा कमाल अमरोहींने ‘फिल्मीस्तान’ला परस्पर विकून टाकली होती. ती कथा काही एकट्या कमाल अमरोहींनी लिहिली नव्हती. कोणालाही विश्वासात न घेता केलेली ही कृती निषेधार्थ होती. या अन्यायाविरुद्ध दिलीप कुमारने आवाज उठवला. इतकेच नाही तर स्वामीत्व हक्काच्या कायद्याचा सखोल अभ्यास करून आपलं म्हणणं मांडलं. ‘हलचल’ चित्रपटातील नर्गिस-दिलीप कुमार यांचे नाट्यपूर्ण प्रसंग, प्रणयदृश्य याला सेन्सॉर बोर्डाने मस्तपैकी कात्री लावली आहे, हे समजल्यावर दिलीप कुमार आणि प्रेमनाथ दोघे लाक्षणिक संपावर गेले होते.

‘नया दौर’ साईन करतांना परगावी चित्रीकरण होणार, हे मधुबालाला ठाऊक होते. केवळ वडिलांना मी अजूनही तुमच्या शब्दाबाहेर नाही, हाविश्वास देण्याची केविलवाणी धडपड मधुबाला करत होती.

आणि ‘मुग़ल-ए-आज़म’च्या वेळी शापुरजीनी इतका खर्च होऊन चित्रपट पूर्ण होण्याचे नाव घेत नाही, म्हणून पुढील चित्रीकरण सुप्रसिद्ध दिग्दर्शक सोहराब मोदीकडे द्यायचे ठरविले. त्या वेळी याच मधुबालाने ठणकावून सांगितले होते की ‘माझा करार हा के. आसिफसोबतचा आहे. जर के. आसिफ नसेल तर मी या चित्रपटात काम करणार नाही. ‘दिलीपकुमारला मधूचे हे परस्पर विरोधी वागणं समजण्याच्या पलीकडचे होतं. पण वैयक्तिक दुखरेपणाला ओंजारत- गोंजारत न बसता, दिलीपकुमार सलीमच्या भूमिकेत जीव ओतत होता.

मेथड एक्टिंगमुळे प्रत्येक सीन अधिक चांगला कसा देता देईल, यासाठी दिलीपकुमार कायम मेहनत करत असे. जेव्हा बेवफाईबद्दल सलीम अनारकलीच्या थोबाडीत मारतो, तो प्रसंग अधिक परिणामकारक करण्यासाठी मधुबाला बरोबरचे सर्व ‘गिले शिकवे’ आठवून खरोखरीच थोबाडीत ठेवली. त्या नंतर सेटवर बराच काळासाठी पसरलेली शांतता के. आसिफच्या टाळ्यांनी भंगली. मेकअप रूममध्ये जाऊन के. आसिफ मधुबालाला म्हणाले, “तो तुझ्यावर अजूनही खूप प्रेम करतो.”

मात्र समज- गैरसमजाचा हा माहोल शेवटपर्यंत कायम राहिला.

चित्रीकरणात सलीम प्रेमासाठी बादशहाशी बगावत करत होता. पण वैयक्तिक आयुष्यात मधुबालापुढे टाकलेल्या अटी मागे घेऊ इच्छित नव्हता. आणि अनारकली ही ताठ मानेने अकबराला ‘जब प्यार किया तो डरना क्या’ म्हणत ललकारत होती. आणि वास्तविक जीवनात वडिलांच्या आज्ञेबाहेर जाण्याची हिंमत दाखवत नव्हती. या सुरसकथांनी शेवटी सेट सोडून घराला धडका द्यायला सुरुवात केली. आणि त्या वेळी युसुफला मोठा हादरा बसला. आणि त्याला अकबराचे रुद्र रूप धारण करावे लागले ते त्याच्या सर्वात लाडक्या लहान उच्चशिक्षित बहिणीसमोर.

अख्तर ही प्रचंड हुशार, परदेशी शिक्षण घेऊन आलेली. अख्तरबद्दल प्रचंड अभिमान युसुफला होता. वडिलांच्या माघारी आपल्या भावाबहिणीचे योग्य पालन-पोषण केलं याचे समाधान, बाहेरील जगात मिळणाऱ्या यशापेक्षा कांकणभर जास्त सुखावत असे. त्याला सुरुंग लावला तो के. आसिफ आणि अख्तरच्या पळून जाऊन केलेल्या निकाहमुळे. ज्यांची दोन लग्न आधीच झाली आहेत, अशा आपल्या जिवलग मित्राने वयाने लहान असलेल्या आपल्या बहिणीशी केलेल्या तिसऱ्या लग्नामुळे युसुफचे भावविश्व उध्वस्त झालं.

के. आसिफला दिलीप कुमार अंतर्बाह्य ओळखून होता. दिग्दर्शक म्हणून महान असलेला आपला मित्र बायकांच्या बाबत किती रंगेल आहे, हे जवळून बघितलं होतं. घाव वर्मी बसला होता. के. आसिफ आणि अख्तरशी सर्व संबंध तोडून टाकले. एकीकडे ‘मुग़ल-ए-आज़म’ यशाची शिखरं गाठत होता आणि युसूफने घरात स्वतःला कोंडून घेतले होते…

एके ठिकाणी दिलीपकुमाने स्वतःविषयी सांगितलं होतं की ‘दिलीपकुमार’ या नावाभोवतीचं वलय आणि दुष्कीर्ती, या गोष्टींचा मला जेवढा त्रास होत असे, तेवढा इतर कशाने होत नसे. मला त्याची  भीती वाटायची आणि मी माझ्या नावापासून दूर पळायचो, कारण प्रत्यक्षापेक्षा तुमची प्रतिमा किती अवाढव्य आहे, हे तुम्हाला माहीत असतंच. माझ्यात जे आहे ते अगदीच थोडं आहे. एक माणूस म्हणून तुम्ही अगदी लहान आहात आणि तुम्हाला मोठं करून दाखवलं जातं आणि लोकही तुम्हाला मोठंच मानून चालतात. तो एक सावळा गोंधळ असतो, कशाचा कशाला मेळ बसत नाही.’

परीकथा जेव्हा कल्पनेच्या जगात बागडत असतात, तेव्हा त्या हव्या हव्याशा वाटतात. त्यात जेव्हा वास्तवतेचे रंग भरायला सुरवात झाली की मानवी जगण्याचा तोकडेपणा अधिक तीव्रतेने जाणवतो. मनोरंजनासाठी लोकांना वास्तव आवडत नाही.. वास्तवाशी फारकत घेतलेल्या परीकथा जास्त भावतात. तशाच या ही कथा त्या मागील वेदना वगळून चघळल्या जाणाऱ्या… गॉसिपचे ग्लॅमर लाभलेल्या..

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0