देर आए.. दुरुस्त आए!

देर आए.. दुरुस्त आए!

भारताचे माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांचे नाव वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टँडला देण्यात येणार आहे. तब्बल २८ वर्षांनी वेंगसरकर यांच्या कार्याची दखल बीसीसीआयला घ्यावीशी वाटली.

संकट काळात भारतीय स्टार क्रिकेटर आहेत कुठे?
दंतकथेतील राजाने केला प्राक्तनाचा स्वीकार!
झंझावात व फक्त झंझावात

अलिकडेच एक चांगली बातमी वाचली. भारताचे माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांचे नाव वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टँडला देण्यात येणार असल्याचे ते वृत्त होते. मुंबईच्या तमाम क्रिकेट रसिकांची त्यावर प्रतिक्रिया होती, एवढ्या उशिरा?

अशा प्रतिक्रिया येणे साहजिकच होते. कारण दिलीप खेळला तो कालखंड जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांचा होता. खेळपट्ट्या झाकून ठेवलेल्या नसायच्या. त्यामुळे वेगवान गोलंदाजीची आग त्यावर ओकली जायची. त्या वणव्यात उभे राहण्याची क्षमता फारच कमी फलंदाजांमध्ये होती. फक्त भारताच्याच नव्हे तर जगातील फलंदाजांना वेगवान गोलंदाजीसमोर उभे राहणे हे आव्हान वाटायचे. चेंडूची लकाकी असताना खेळपट्टीवर येणे म्हणजे अग्निदिव्यच. या अग्निदिव्यातून अनेकदा तावून सुलाखून निघालेल्या दिलीपच्या बावनकशी सोन्याच्या डावांनी भारताला विजयपथावर नेले होते.

ओल्या खेळपट्ट्यांमधील दमटपणा अतिशय विखारी असतो. चेंडू टप्पा पडल्यावर फक्त वेगातच येत नाही तर तो हवा तसा आणि विपरितपणे वळतो, स्वींग होतो. ते हलाहल पचवून दिलीप उभा राहिला.

लॉर्डस् क्रिकेट ग्राउंड म्हणजे क्रिकेटची काशी, मक्का वगैरे वगैरे. त्या लॉर्डसवर सलग तीन दौर्यांमधील सलग तीनही कसोटींमध्ये शतके झळकावणे आजवर जगातल्या कोणत्याही फलंदाजाला जमले नाही. त्यावर सलग तीन वेगवेगळ्या दौर्यांमध्ये शतके झळकावणारा दिलीप वेंगसरकर हा जगातला एकमेव फलंदाज आहे. भारताचा लिटल मास्टर सुनील गावस्कर व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोन्ही दिग्गजांना कारकिर्दीत याच लॉर्डसवर एकही शतक झळकावता आलेले नाही.

अशा लॉर्डसवर दिलीपने चक्क शतकांची हॅटट्रिक केली. दिलीपच्या या पराक्रमाची दखल भारतीयांच्या कामगिरीला फारशी किंमत न देणार्या ब्रिटिशांनी वेळीच घेतली. विस्डेनने १९८७च्या आपल्या पंचकामध्ये दिलीपला स्थान दिले होते. त्यावर ‘गोरे’ थांबले नाहीत, त्यांनी लॉर्डसवरील एका प्रेक्षक विभागाला दिलीप वेंगसरकर यांचे नाव दिले. एमसीसीने दिलीपचे तैलचित्र काढण्यासाठी एका नामवंत चित्रकारास मुंबईत पाठवले होते. ते चित्र लॉर्डसच्या विश्वविख्यात “लाँग रुम”मध्ये लावण्यात आले आहे. ही ‘लाँग रुम’ म्हणजे क्रिकेटच्या काशीतील विश्वेश्वरांचा गाभारा आहे. जगातील निवडक क्रिकेटपटूंचीच चित्रे तेथे आहेत, त्या पंक्तीत आपला दिलीप वेंगसरकर आहे.

दिलीप वेंगसरकर यांच्या पराक्रमाची दखल घेतलेल्या या सर्व घटनांना दशके होऊन गेलीत. ज्या मुंबईच्या मातीत तो खेळला, ज्या मुंबई संघासाठी तो खेळला, त्या त्याच्या पालक संघटनेला, मुंबई क्रिकेट असोसिएशनला तो निवृत्त झाल्यानंतर तब्बल २८ वर्षांनी आठवण यावी याचेच आश्चर्य वाटते.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या डुलक्या हेतुपुरस्सर होत्या. ज्या वेंगसरकरांनी फक्त क्रिकेट खेळूनच मुंबईची सेवा केली नाही तर त्यांनी निवृत्तीनंतर मुंबईचे भावी, नवोदित क्रिकेटपटू घडवण्यासाठी स्वखर्चाने अकॅडमी काढली व ती आजतागायत चालवली. निवृत्तीनंतर बहुतेक क्रिकेटपटूंनी माईक हाती घेतला किंवा प्रशिक्षक, व्यवस्थापक, पंच, स्तंभलेखक अशा विविध भूमिका केल्या.

वेंगसरकर यांनी त्यापैकी कोणताही मार्ग स्वीकारला नाही. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनची सेवा केली. त्या योगदानात मुंबईच्या क्रिकेटची निस्वार्थी सेवा होती. मानधन न घेता चालवलेला क्रिकेट विकासाच्या निस्सीम सेवेचा महामार्ग होता. कित्येक वर्षे वेंगसरकर यांनी सेवा केली. या निस्वार्थी सेवेची परतफेड करण्याचे शहाणपण मुंबई क्रिकेट असोसिएशनला उशिरा का होईना सूचले यातच समाधान मानायला हवे.

खरं तर यापूर्वीच वेंगसरकर यांचे नाव वानखेडे स्टेडियमवर एखाद्या स्टँडला द्यावे अशी सूचवा, ठराव संघटनेकडे आले होते. पण प्रत्येक वेळी राजकारणाची माशी शिंकायची. त्याच वेळी जगभरातील क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेंगसरकर यांच्या क्रिकेटला कुर्निसात करण्यासाठी मानसन्मान सोहळे होते. किताब दिली जात होती.

त्या मानमरातबांमध्ये आपल्या घरच्यांच्या कौतुकाची थाप पाठीवर पडत नाही ही त्यांची खंत होती. यापुढे तरी ते शल्य त्यांना सलणार नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारिणीने त्यांचे नाव ‘नॉर्थ स्टँड’च्या ‘आय ब्लॉक’ला देण्याचे ठरवले आहे. मुंबईच्या क्रिकेटपटूंमध्ये हा स्टँड मानाचा मानला जातो. आजचे आणि उद्याचे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय, रणजी व अन्य सामने तेथे बसून पाहणे गौरवाचे मानतात. अशा दर्दी क्रिकेटरसिक आणि क्रिकेट खेळणार्या आणि समजणार्यांच्या जागेला वेंगसरकर यांचे नाव देण्याच्या सूज्ञपणाही वेळीच दाखवण्यात आला आहे.

जगाने कौतुक केले तरीही घरच्यांची कौतुकाची थाप अधिक आनंद देणारी असते. वेंगसरकर यांना यामुळे आता अधिक समाधान मिळाले असेल.

बीसीसीआयच्या बाबतीत असेच म्हणावे लागेल. कारण प्रत्येक वेळी वेंगसरकर यांना डावलले गेले. वेंगसरकर यांनी भारतभर फिरून केलेल्या क्रिकेट शोधमोहिमेला लागलेली यशाची फळे म्हणजे विराट कोहली, पार्थिव पटेल, इशांत शर्मा, रोहित शर्मा आदी क्रिकेटपटू आहेत. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपदही त्यांनी विना मानधन भूषवले. मात्र आपला अमुल्य वेळ आणि ज्ञान खर्च करण्याच्या मोबदल्यात त्यांनी मानधनाची मागणी केल्यानंतर ती फेटाळली गेली. एवढेच नव्हे तर त्यानंतर त्यांनी निवड समितीच्या कार्यकाळाची मुदतही वाढवून दिली गेली नाही. मात्र त्यांच्या जागी निवडण्यात आलेल्यांवर मानधनाची बरसात केली गेली. हा दैवदुर्विलासच नाहीतर काय?

जगातील अन्य क्रिकेट संघटना वेंगसरकर यांचा गौरव करत असताना बीसीसीआयची भूमिका मात्र संदिग्धतेची राहिली आहे. पैशाच्या मोबदल्यात समीक्षण करणार्यांचा गौरव केला गेला. पण वेंगसरकर यांचा मात्र यथोचित सन्मान केला गेला नाही. कधीतरी तो बर्फही वितळेल अशी आशा आता बाळगण्यास हरकत नाही. कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनने तब्बल २८ वर्षांनी वेंगसरकर यांच्या योगदानाचा सन्मान केला आहे.

देर आए.. दुरुस्त आए!

विनायक दळवी, हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व क्रिकेटचे अभ्यासक आहेत.

(छायाचित्र – युट्यूब साभार )

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: