स्वातंत्र्यलढ्यातले क्रिकेटपर्व !

स्वातंत्र्यलढ्यातले क्रिकेटपर्व !

१५ ऑगस्ट १९४७ भारत स्वतंत्र झाला. मात्र या स्वातंत्र्याची किंमत भारताला मोठ्या प्रमाणात मोजावी लागली. सर्वच स्तरावर आणि क्षेत्रात नाती गोती, जमीन जुमला, शेती, उद्योगधंदे आणि मने दुभंगली गेली. भाईचारा संपला. एकेकाळी गळ्यात गळा घालणारी माणसे एकमेकांचे गळे कापायला लागली. माणुसकीची शकले झाली. ब्रिटिशांनी स्वातंत्र्य देतानाच दुहीची बीजेही पेरली. त्या विषवृक्षाला धार्मिक तेढीचे खतपाणी मिळाले आणि त्या द्वेषाच्या वणव्यात अनेक क्षेत्रांप्रमाणे क्रिकेटही होरपळले. क्रिकेटची गुणवत्ता दुभंगली. १९४७ ला देशाचे दोन तुकडे झाले आणि क्रिकेटची रंगतदार मैफलही बेरंगी झाली. भारतासाठी एकदिलाने खेळलेले क्रिकेटपटू, भारताविरुद्ध उभे ठाकले...

दंतकथेतील राजाने केला प्राक्तनाचा स्वीकार!
न्यूझीलंड संघाचा दिमाखदार विजय…
भारत-पाक क्रिकेट- उन्माद निर्माण करण्यात काय अर्थ

सोटी क्रिकेटच्या क्षितिजावर स्वातंत्र्याआधीच म्हणजे, १९३२ मध्ये भारताचा उदय झाला होता. अनेक मुस्लिम धर्मीय क्रिकेटपटू भारतातर्फे खेळले होते. स्वातंत्र्यानंतर १९४७ मध्ये भारताचा संघ आकारास आला. पाच वर्षांनी पाकिस्तानचा क्रिकेट संघही कसोटी क्रिकेटमध्ये अवतरला. दरम्यानच्या काळात दुसऱ्या महायुद्धामुळे क्रिकेटला काही अंशी गतिरोध निर्माण झाला होता. मात्र तरीही त्याच काळात भारतात चौरंगी-पंचरंगी क्रिकेट जोमात सुरू होते.

१९५६मध्ये पाकिस्तानतर्फे एकमेव कसोटी खेळलेले गुल महंमद भारतासाठी मात्र ८ कसोटी सामने खेळले होते. पाकिस्तानला कसोटी क्रिकेटचा बाप्तिस्मा १९५२ मध्ये मिळाला. तरीही गुल महंमद यांना संधी मिळायला ४ वर्षे लागली. १९५६चा एकमेव कसोटी सामना त्यांचा पहिला आणि अखेरचा ठरला. अब्दुल कारदार १९४६च्या लॉडर्स कसोटीत भारताची कॅप डोक्यावर घालून खेळले. मात्र १९५२ला पाकिस्तानच्या पहिल्या वहिल्या कसोटी संघाचे नेतृत्व करण्याचे भाग्यही त्यांनाच लाभले. कारदार हे उत्तम फलंदाज आणि धूर्त कप्तान होते. मार्च १९५७लाच त्यांच्याही कसोटी कारकिर्दीचा अंत झाला.

भारतीय संघात १९४७ मध्ये आघाडीचे गोलंदाज म्हणून संघात दाखल झालेले अमिर इलाही त्यानंतर पाच कसोटी खेळले खरे; पण ते पाकिस्तानसाठी. कसोटी क्रिकेटचे असे मोजकेच दाखले असले तरीही राष्ट्रीय पातळीवर आणि पंचरंगी क्रिकेटमध्ये हिंदू-मुस्लिम क्रिकेटपटूंची रेलचेल होती. त्यातील काहीच जण पाकिस्तानात गेले. क्लब पातळी किंवा त्यापेक्षा वरच्या पातळीवरील क्रिकेटही गुणवत्तेच्या बाबतीत असेच दुभंगले होते. खरं तर फाळणीने आंतरराष्ट्रीय स्तरावरचे क्रिकेट मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले नसले तरीही देशांतर्गत क्रिकेटमध्ये न भरून निघणारी हानी झाली होती.

बहुढंगी भारतीय संघ

दोन देशांमधील संघर्ष किंवा क्रिकेट मैदानावरील कटुतेचे बीज स्वातंत्र्यानंतरच्या काळात वेगाने रुजले. त्याआधीचे भारतीय संघ, अगदी पहिल्या कसोटीआधी आणि नंतरही एकत्रितपणे गुण्यागोविंदाने नांदत होते. विविध धर्मांचे आणि अठरापगड जातीचे, विविध प्रांतातले क्रिकेटपटू एकजीव होऊन खेळायचे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचे संघ पाहिले तर कराचीपासून क्वालालंपूरपर्यंतचे खेळाडू भारतीय संघात होते हे लक्षात येतं.

१९३२च्या भारतीय संघाचे नेतृत्त्व पतियाळाच्या महाराजांकडे होते. त्यांनी ते सोडले आणि पोरबंदरच्या महाराजांकडे सुपूर्द केले. काठेवाडचे के. एस. घन:श्यामजी उपकप्तान होते. जुनागढहून अमरसिंग आले होते, गुलाम महंमद अहमदाबादचे होते, जोगींदरसिंग पंजाबहून आले होते. मुंबईचे (त्यावेळचे बॉम्बे) बी.ई. कपाडिया होते. मुंबईचाच मराठमोळा रांगडा गडी एस. गोडांबे संघात होता. लालसिंग थेट क्वालालंपूर येथून आले होते. कराचीहून जेऊमल नऊमल आले होते. नवलै ग्वाल्हेरचे होते. इंदूरचे सी. के. नायडू होते. नाझिर अली पतियाळाचे होते, महंमद निस्सार पंजाबचे होते. पालिया म्हैसूरचे, भोपाळचे वझीरअली भारतीय संघात होते.

१९३२ मध्ये पहिला कसोटी सामना खेळलेला संघ हा संपूर्णपणे भारतीयांचा होता. यामध्ये एकही ब्रिटिश खेळाडू नव्हता. १३ एप्रिल १९३२ रोजी, इग्लंडच्या भूमीवर पहिली वहिली कसोटी क्रिकेट मालिका खेळायला हा संघ अवतरला. या भारतीय संघांचा चेहरामोहरा पाहून ब्रिटिश मीडियाही काही काळ अचंबित झाला होता. सर्व धर्माचे-जातीचे हे लोक एकत्र कसे नांदतात, हाच सवाल त्यांच्या ओठांवर होता. चटपटीत आणि स्फोटक बातम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या इव्हिनिंग स्टँडर्डच्या प्रतिनिधींनाही आपले आश्‍चर्य त्यावेळी लपविता आले नव्हते. १९११ला भारताचा अनधिकृत क्रिकेट संघ ब्रिटनमध्ये दौऱ्यावर गेला होता. पतियाळाच्या महाराजांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी भारतीय संघांने इंग्लंड व प्रथम दर्जाच्या कौंटी संघांविरुद्ध आपले क्रिकेट कौशल्य आजमावले होते.

१९३२च्या संघाबाबत मात्र तसे नव्हते. ना जात ना धर्म ना राजकारण फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट हे १९३२ च्या या संघाचे अनधिकृत बोधवाक्य होते. जगातील कोणत्याही संघांमध्ये असे वैविध्य व विरोधाभास नव्हता. संघांतील १८ खेळाडूंच्या भाषा वेगवेगळ्या होत्या. भारतातील आठ ते दहा वेगवेगळ्या भाषा बोलणारे हे खेळाडू एकत्र नांदत होते. ४ ते ५ विविध धर्मांचे ते होते. त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडी-निवडी वेगळ्या होत्या. कुणी शाकाहारी होते तर कुणी मांसाहारी, त्यातही काही जण वेगळेपण जपत होते. काहींच्या धर्मांने त्यांना धूम्रपानास मुभा दिलेली नव्हती, तर काहींच्या धर्मांमध्ये अपेयपानास बंदी होती. संघात काही राजे-महाराजे होते, तर काही व्यापारी होते. काही राजदरबारी सेवेत होते. काही पठारी भागातले होते, तर काहीजण डोंगरदर्‍यांमध्ये वावरणारे होते. कडाक्याच्या थंडीत वावरलेले काही जण या संघात होते, तर काहींनी कडक उन्हाळ्यातच क्रिकेट साधना केली होती. हिंदूधर्मीय खेळाडू ‘बीफ’ खाणारे नव्हते, तर मुस्लिमांना डुकराचे मांस वर्ज्य होते. भोजनाच्यावेळी पेचप्रसंग टाळण्यासाठी म्हणूनच, शाकाहारी पदार्थांबरोबर चिकन, मटण, मासे असा एकसारखाच ‘मेनू’ असे. या संघात सहा हिंदू, पाच मुस्लिम, चार पारसी, दोन शिख खेळाडू होते. या सर्वांना क्रिकेट या एका धाग्याने सांधले होते, एकसंध ठेवले होते.

फाळणीआधीच दुहीची भावना

पण ही परिस्थिती फार काळ कायम राहिली नाही. खरं तर क्रिकेट संघातील दुफळी, द्वेष, भेदभाव हा फाळणीनंतरच उफाळून यायला हवा होता. परंतु संघांमधील बेबनाव स्वातंत्र्याआधी म्हणजे १९४५च्या आधीपासून वाढला. त्या अर्थाने, हिंदू-मुस्लिम क्रिकेटपटूंमधील द्वेषाची बीजे काही प्रमाणात स्वातंत्र्याआधीच पेरली गेली होती. पतौडीचे नबाब सिनियर यांच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघामधील हिंदू क्रिकेटपटूंवर अन्याय होऊ लागला होता. नव्हे ही गोष्ट जगजाहीर होऊ लागली होती. मुश्ताक अली या मुस्लिम क्रिकेटपटूनेच आपले गुरू कर्नल सी. के. नायडू यांना लिहिलेल्या पत्रातही या गोष्टीचा उल्लेख आढळतो. पतौडी हे खूपच बदलले आहेत. ते बऱ्याच खेळाडूंच्या विरुद्ध आहेत, असे त्या पत्रात नमूद केल्याचे आढळते.

१९३२च्या दरम्यानची मैत्री किंवा सामंजस्य १९३६च्या इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात नव्हते. दरम्यानच्या काळात आणि नंतरही भारतातील दोन प्रमुख धर्मांना एकत्र सांधणारा क्रिकेटचा धागा कमकुवत ठरत गेला. क्रिकेटची रंगत आणि संघर्ष, इर्ष्या वाढविण्यासाठी पंचरंगी क्रिकेट अवतरले खरे; पण त्यानंतर हेच क्रिकेट धर्मांमधील तेढ वाढवील की काय, अशी भीती वाटायला लागली. आज भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने असले की दोन्ही देशांच्या नागरीकांमधील संघर्ष आणि तणावपूर्ण वातावरण पहायला मिळते. त्याकाळी पंचरंगी क्रिकेटमध्येही तेच चित्र सतत पहावयास मिळाले. अन्य धर्मीयांच्या अनुयायांपेक्षाही हिंदू-मुस्लिम क्रिकेट रसिकांमध्येच हा संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे दिसले.

गुरु नायडू, शिष्य मुश्ताक अली

मात्र, मुश्ताक अली यांच्यासारखे खेळामध्ये धर्म आणत नव्हते. सी. के. नायडू यांना गुरू मानणारे मुश्ताक आपल्या हिंदू क्रिकेट गुरूपुढे नतमस्तक व्हायचे. त्यांच्या आदर्शांचे पालन करायचे. गुरूआज्ञा शिरसावंद्य मानायचे. उदाहरणच द्यायचे झाल्यास, धर्मांच्या नावावर संघ खेळायचे. त्यावेळच्या एका पंचरंगी सामन्यातील ही घटना सांगता येईल. मुस्लिम संघातर्फे खेळणारे मुश्ताक हिंदूच्या नेटमध्ये सराव करायचे. हिंदू संघाचे कप्तान सी. के. नायडू असल्याने मुश्ताक यांना त्या सरावाची मुभा होती. त्यावेळी हिंदू आणि मुस्लिम असा सामना होता. मुश्ताक अली त्या सामन्यात जायबंदी झाले होते. दुसऱ्या डावात मुश्ताक अली यांच्या फलंदाजीची संघाला गरज होती. त्यावेळी हिंदूचे कप्तान सी. के. यांनी मुश्ताक यांना विचारले, मुश्ताक तू खेळणार आहेस ना? त्यावर मुश्ताक म्हणाले, माझी इच्छा आहे. पण आमचा कप्तान म्हणतोय, तू जायबंदी आहेस, दुखापत बळावेल.

त्यावर प्रतिस्पर्धी हिंदू संघांचे कप्तान सी. के. हे मुश्ताक अली यांना म्हणाले, अरे वेडा आहेस की काय, जा. आणि खेळ. हिंदू संघाला हरविण्याची ही नामी संधी आहे. अशी संधी तुम्हाला फारवेळा मिळणार नाही. गुरु-शिष्यांचे नाते हे असे निर्मळ होते. स्वार्थी नव्हते. आश्‍चर्याची गोष्ट अशी की, गुरूंचा सल्ला मानून मुश्ताक अली खेळले, आणि त्यांनी तो सामना मुस्लिम संघाला अखेरच्या क्षणी जिंकून दिला.

त्यावेळी सी. के. नायडू यांच्यावर ना देशद्रोह किंवा धर्मद्रोहाचे आरोप झाले, ना हिंदू संघाच्या नेटमध्ये सराव करणाऱ्या मुश्ताकच्या सचोटीबाबत मुस्लिमांनी शंका उपस्थित केल्या. तो काळ वेगळाच होता.

मुश्ताक अली यांच्या सचोटीचे, प्रामाणिकपणाचे आणखी एक उदाहरण देता येईल. मुश्ताक अली यांची गोलंदाजीतील कामगिरी उत्तम होती. पण ते गाजले ते फलंदाज म्हणूनच. त्यांची आक्रमक शैली ब्रिटिशांनाही भुरळ घालणारी ठरली. त्यांचे फूटवर्क अप्रतिम होते. आघाडीला जाऊनही ते क्रीझबाहेर येऊन फटके मारायचे. आजच्या युगात ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये दिसणारे चित्र मुश्ताक अली खेळताना १९३२ च्या सुमारास दिसायचे.

असे मुश्ताक अली १९३६ च्या इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघात होते. त्या संघाचे कप्तान महाराजा ऑफ विजयनगरम, विझी होते. हे विझी कोत्या मनोवृत्तीचे होते. त्या दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्डवर होता. पहिल्या डावात मुश्ताक अली १३ धावांवर धावचीत झाले होते. कप्तान विझीने मुश्ताक अली यांचे मर्चंटविरुद्ध कान भरायला सुरुवात केली. विझी यांचे मुश्ताक अली यांच्यावर उपकार होते. त्यांनी त्यांना आपल्या पदरी ठेवले होते. अन्य मदतही केली होती. उपकाराच्या त्या ओझ्याखाली असल्यामुळे मुश्ताक अली यांनी सारं ऐकून घेतलं. विझी यांनी मुश्ताक अली यांचे कान भरताना सांगितले की, मर्चंटने तुला पहिल्या डावात धावचीत केले; आता तूसुद्धा मर्चंटना धावचीत करून बदला घे!

खरं तर मुश्ताक अली हे हाडाचे खेळाडू होते. खिलाडूवृत्ती जपणारे होते. त्यांनी विझीने सांगितलेली गोष्ट निरागसपणे मर्चंट यांना सांगितली. मर्चंट यांनी मुश्ताक यांना सांगितले; ठीक आहे, तू प्रयत्न करून पाहा. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही; कारण त्या कसोटीच्या दुसऱ्या डावात मर्चंट आणि मुश्ताक अली या दोघांनीही शतके झळकाविली. आणि सलामीच्या विकेटसाठीच्या २०३ धावांचा भागीदारीचा उच्चांकही नोंदविला. जो गावसकर-चौहान यांनी त्यानंतर इंग्लंडविरुद्ध खेळताना ओव्हल कसोटीत मोडला.

संघात संशयाचे वारे शिरले…

एका टप्प्यावर राजे महाराजे आणि नवाबांचे संघावरचे वर्चस्व संपले आणि संघात उघडपणे दुहीचे वारे वहायला लागले. देशाची फाळणी प्रत्यक्षात १९४७ मध्ये झाली, परंतु १९४५-४६ पासूनच क्रिकेटपटूंमधील फाळणीचे संकेत मिळायला सुरुवात झाली होती. हिंदुस्थानच्या क्रिकेट संघात हिंदूचाच अधिक भरणा असल्याने मुस्लिम क्रिकेटपटूंकडे अधिक संशयाने पाहिले जायचे. प्रत्यक्षात काही वेळा ते वैर धर्मापेक्षा खेळावरील वर्चस्वासाठी अधिक होते; हेही लक्षात येते. फाळणीनंतर मात्र क्रिकेट संघांतील किंवा ड्रेसिंग रुममधील हा शंकासूर क्रिकेटरसिकांवरही अधिराज्य गाजवायला लागला. प्रसिद्धी माध्यमांनीही काहीवेळा राईचा पर्वत केल्याचीही उदाहरणे आहेत.

विळ्या-भोपळ्याचे संबंध

भारत पाकिस्तान यांच्यातील फाळणीआधी म्हणजे १९४७ आधीच उभय देशांच्या क्रिकेटने आकार घ्यायला सुरुवात केली होती. हा आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे दोघेही लाहोरचे. त्यांच्यातला पहिला लाला अमरनाथ. भारताचा सर्वाधिक लाडका, पण तेवढाच वादग्रस्त क्रिकेटपटू. भारताचा कसोटी शतक झळकाविणारा पहिला भारतीय आणि दौऱ्यावरून परत मायदेशी पाठविण्यात आलेलाही पहिला क्रिकेटपटू. १९३६च्या इंग्लंड दौऱ्यात संघ व्यवस्थापकांबरोबरच्या वादानंतर त्याला परत भारतात पाठविण्यात आले होते.

दुसरा, पाकिस्तानच्या बाजूचा अब्दुल हफिज करदार. फाळणी आधी तो भारतातर्फे खेळला. १९४६च्या इंग्लंड दौऱ्यात लाला अमरनाथच्या संघातूनच खेळला. त्यावेळी उत्तर भारतातील, प्रामुख्याने पंजाबहून आलेल्या क्रिकेटपटूंचा भारतीय संघात अधिक भरणा होता. मुस्लिम क्रिकेटपटूंची संख्याही जास्त होती. फाळणी झाली आणि पंजाबचे दोन तुकडे झाले. लाहोर पाकिस्तानकडे राहिले. त्यामुळे अनेक मुस्लिम क्रिकेटपटू पाकिस्तानमध्ये गेले. हा वेगवान गोलंदाज करदार, कायदे-आझम महंमद अली जीना यांचा कट्टर समर्थक होता. धर्मावर आधारित दोन देशांची कल्पना त्यालाही मान्य होती. करदारने पाकिस्तान क्रिकेट संघ उभारणीत मोठी भूमिका बजावली. त्याने पाकिस्तानचे क्रिकेटही विकसित केले. तो पाकिस्तान क्रिकेट संघाचा पहिला कप्तान होता. एवढंच नव्हे तर नंतर तो क्रिकेट संघटकही बनला आणि त्यानंतर त्याने राजकारणातही उडी घेतली. क्रिकेट या खेळाची लोकप्रियता इम्रान खानलाही पाकिस्तानच्या सर्वोच्च राजकीय पदापर्यंत घेऊन गेली. करदारची झेप मात्र तेवढी नव्हती.

भारत-पाक आमनेसामने

योगायोगाची गोष्ट अशी की १९५२ मध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट संघ जेव्हा प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकले, तेव्हा भारताचे नेतृत्व लाला अमरनाथ यांच्याकडे तर पाकिस्तानचे अब्दुल करदार यांच्याकडे होते. दिल्ली व मुंबई येथील कसोटी जिंकून भारताने मालिका २-१ अशी जिंकली. लखनौची कसोटी पाकिस्तानने जिंकली. पाकने हीच परंपरा पुढे इंग्लंड व विंडिज दौऱ्यातली कायम ठेऊन दौऱ्यातील एक-एक कसोटी प्रथम प्रयत्नातच पराक्रम केला. खरं तर भारतीय क्रिकेट संघ अतिशय प्रबळ होता. तरीही लखनौ येथील कसोटी हरली.

विजय हजारे, हेमू अधिकारी आणि अष्टपैलू विनू मांकड यांनी दिल्ली कसोटी जिंकताना मोठे योगदान दिले होते. मात्र कप्तान लाला अमरनाथ यांच्या विरुद्धच्या शीतयुद्धामुळे तिघांनीही लखनौ कसोटीत न खेळणे पसंत केले. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप झाले. लखनौ कसोटीतील पराभव भारतीय प्रेक्षकांना आवडला नाही. त्यांनी भारतीय संघाच्या बसवर दगडफेक केली. आपल्या खेळाडूंच्या बचावासाठी कप्तान लाला अमरनाथ यांना लाठी घेऊन प्रेक्षकांपासून खेळाडूंची सुटका करावी लागली. मुंबईतील तिसरी कसोटी जिंकून भारताने मालिका जिंकली आणि संघातील शीतयुद्ध संपले.

दोन वर्षांनंतरच भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या पाकिस्तान दौऱ्यावर गेला. त्यावेळी लाला अमरनाथ कप्तान नव्हे तर व्यवस्थापक होते. अमरनाथ आणि करदार यांच्यातील संघर्ष सार्वजनिक झाला. लाहोरच्या हॉटेलमध्ये प्रकरण हातघाईवर आले. त्याआधीच्या बहावलपूर येथील व्यवस्थेवरून नाराज अमरनाथ यांनी भारतीय संघ मायदेशी परत नेण्याची धमकी दिली होती. एकूणच देशाला स्वातंत्र्य मिळून घटकाही सरल्या नव्हत्या, मैदानावरील लढती इतकेच मैदानाबाहेरचे संघर्षही गाजत होते.

भारतीय संघांचे कप्तान विनू मांकड एका पाकिस्तानी गायिकेच्या प्रेमात पडले आणि क्रिकेट लढतींच्यावेळी त्यांचे लक्ष विचलित झाले. अखेरच्या कसोटीआधी करदार यांनी अमरनाथ यांनी चहापानास बोलविले. त्या सामन्यावरील पंच इद्रिस बेग तेथे आले. अमरनाथ यांना त्यांनी पाहिलेच नाही; आणि अजाणतेपणी करदार यांना बोलून गेले, कप्तान (करदार) उद्याच्या सामन्यासाठी काय आदेश? अमरनाथ यांनी मग पंच इद्रिस बेग यांना हटविण्याची मागणी केली. बेग यांच्या जागी पंच मसूद यांची नियुक्ती झाली आणि एक होऊ घातलेला संघर्ष टळला.

फाळणीनंतर दोन्ही संघाचे मैदानावरील संबंध मित्रत्वाचे होण्याऐवजी बिघडत गेले. त्याच वेळी राजकीय क्षितिजावर भारताने रशियाशी जवळीक साधली तर पाकिस्तान अमेरिकेच्या कच्छपी लागला. राजकीय क्षेत्रातील बदलामुळे क्रिकेटचे संबंधही दुरावत गेले. पाकिस्तान संघ १९६०ला पाच कसोटींच्या भारत दौऱ्यावर आला खरा. पण या दौऱ्यालाही खिलाडूवृत्तीपेक्षा धार्मिक वर्चस्वाचे गालबोट लागले. राजकीय पटलांवरच्या घडामोडींची परिणाम भारत-पाक क्रिकेट संबंधांवरही झाले.

तेजतर्रार वेगवान जोडगोळीः अमरसिंग-निस्सार

भारतीय क्रिकेट संघांची गोलंदाजीची ताकद ही फिरकी गोलंदाज चौकडी होती. किमान हेच आपण गेली काही दशके पहात आलोय. कपिलदेव आला आणि आपल्याला वेगवान गोलंदाजही भारताला जिंकून देऊ शकतात असं हळूहळू वाटायला लागलं. त्यानंतर श्रीनाथ कपिलच्या साथीला आला, झहीर खान, पुढे नंतर अलिकडच्या काळात एका लांबलचक यादीच तयार झाली थेट आजच्या जसप्रीत बुमरापर्यंत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारताने कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यावेळी आपल्याकडे अप्रतिम वेगवान गोलंदाज होते. वेगवान गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये जोडीने शिकार करतात, असं म्हणतात. आपल्याकडे चक्क पहिल्याच कसोटीत अशी वेगवान गोलंदाजांची धडकी भरविणारी जोडगोळी होती. एक होता महंमद निस्सार. ज्याने भारताच्या वतीने कसोटीतला पहिला चेंडू पकडला. एवढेच नव्हे तर त्याने चक्क भारतासाठी पहिला बळी घेण्याचा मानही मिळविला. त्याचा जोडीदार होता, अमरसिंग. निस्सार-अमरसिंग या जोडगोळीनेच भारताच्या कसोटी क्रिकेटचा श्रीगणेशा केला होता. त्यांनी भारतासाठी अभूतपूर्व कामगिरी केली.

निस्सार-अमरसिंग या जोडीनंतर आपल्याकडे रमाकांत (टायनी) देसाई होता, रंगाचारी होते, फडकर होता, रांजणे होता. पण महंमद निस्सार हाच भारतातर्फे खेळलेला सर्वात वेगवान गोलंदाज होता, हे सत्य आत्ता कुणाला सांगूनही पटणारे नाही. त्याकाळी निस्सारचा सामना केलेल्या फलंदाजांनीच म्हटलंय, की प्रारंभीच्या षटकांमध्ये जोशात असताना, निस्सार हा ‘बॉडीलाइन’ मालिकेमुळे फलंदाजांवर दहशत निर्माण केलेल्या लारवूडपेक्षाही अधिक वेगात चेंडू टाकतो. १९३२ मध्ये पहिल्या कसोटीत निस्सारने ही गोष्ट सिद्ध केली. जेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची अवस्था त्याने ३ बाद १९ अशी केली. सर्वांनीच त्यावेळी आश्‍चर्याने भुवया उंचावल्या. कोण हा निस्सार, कुठून आला?

वलयांकित निस्सार-अमरसिंग

महंमद निस्सार पंजाबचा. लाहोरजवळचे पंजाब. धष्टपुष्ट देहाची निसर्गदत्त देणगी. गोलंदाजीच्यावेळी चेंडू सोडताना उंच उडी मारायचा. दोन्ही स्विंग उत्तम होते. दणकट देहयष्टी व धावतानाचा वेग चेंडूच्या वेगात परावर्तीत झाला होता. चेंडू कट करण्याची ‘लाहोरी’ कलाही त्याला अवगत होती. भारताचा १९३२ च्या सलामीचा सामना होता, लॉड्र्सवर. कप्तान जार्डिनने नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडकडून सलामीची जोडी मैदानात उतरली; सट्क्लीफ आणि होम्स. या जोडीने काही दिवसांपूर्वीच यॉर्कशायरकडून खेळताना सलामीच्या भागिदारीचा ५५५ धावांचा विक्रम केला होता. निस्सारने या जोडीचे त्रिफळे उद्ध्वस्त केले, त्यावेळी प्रेक्षकांनी आणि तमाम क्रिकेट विश्‍वाने भुवया उंचावून पाहिले कोण हा निस्सार? इंग्लंड २ बाद १३ आणि नंतर ३ बाद १९. निस्सारने इंग्लंडच्या पहिल्या डावात ९३ धावात ५ बळी घेतले. लॉड्र्सवर ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाचे आणि शतकवीरांचे नाव बोर्डावर कायम नोंदविले जाते. त्या श्रेय नामावलीमध्ये भारतीय गोलंदाजात निस्सारला सर्वप्रथम झळकण्याचा मान मिळाला.

त्या पहिल्याच कसोटीत भारताने बलाढ्य इंग्लंडचा पहिला डाव २५९ धावसंख्येवरच मर्यादित ठेवला. भारतीय फलंदाजांनी पहिल्याच कसोटीत कच खाल्ली. नाहीतर इंग्लंडची कोंडी झाली असती. निस्सारचा जोडीदार अमरसिंग याला गोलंदाजीत त्या कसोटीत काही यश मिळाले नाही. पण भारताच्या दुसऱ्या डावात अमरसिंगने ५१ धावा काढून भारताचा पराभव लांबविला होता.

मात्र गोलंदाजीच्या बाबतीत निस्सार-अमरसिंग जोडी गाजली. निस्सारने ६ कसोटीत २५ बळी घेतले तर अमरसिंगने ७ कसोटीत २८ बळी घेतले. ज्या काळात कसोटी सामने अगदीच अल्प संख्येत खेळले जायचे. त्या काळात बऱ्याच अंतराने मिळालेल्या ७-७ सामन्यातही या जोडगोळीने मैदानावर आपली दहशत निर्माण केली होती.

तीच गोष्ट मुश्ताक अली यांच्याबाबतीतही घडली होती. मुश्ताक अली आजच्या काळात खेळत असते, तर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ‘सुपरहिरो’ असते. कारण मुश्ताक अली कोणत्याही गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूचा टप्पा पडूच द्यायचे नाहीत. ‘स्टान्स’ घेताना फक्त ते क्रीझमध्ये दिसायचे. एरवी ते क्रीझ बाहेर धावत येत आणि चेंडू फटकावित. मुश्ताक अलीप्रमाणेच निस्सारदेखील असाच दुर्दैवी म्हणावा लागेल. तोदेखील चुकीच्या काळात जन्माला आला असेच म्हणावे लागेल. निस्सारला अवघ्या ६ कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. निस्सारची पंचरंगी, चौरंगी आणि रणजी स्पर्धेतील कारकीर्द मात्र देदिप्यमान होती. ९३ सामन्यात ३९६ बळी व सरासरी १७.७, ३२ वेळा ५ पेक्षा अधिक बळी घेण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर होता. ३ वेळा १० पेक्षा अधिक बळी सामन्यात. १९३६च्या मालिकेत इंग्लंडच्या डाव निस्सार-अमरसिंग जोडीने १३४ धावात गुंडाळला होता. त्यात अमरसिंगचे ६ तर निस्सारचे ३ बळी होते.

निस्सार नावाचे वादळ अकाली शमले

निस्सार फाळणीनंतर पाकिस्तानात गेले. पाकिस्तानात त्यांनी क्रिकेट प्रशिक्षणाच्या बळावर उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला. निस्सारला कसोटी क्रिकेट फारसे खेळायला मिळाले नाही. पण तो थांबला नाही. त्याने प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळणे कायम ठेवले. पाकिस्तानात गेल्यावर लाहोरमध्ये साध्या विद्यापीठ पातळीवरच्या संघातर्फे तो खेळला. मात्र, निस्सारला पाकिस्तानातर्फे राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करता आले नाही. तो वयाच्या अवघ्या ५२व्या वर्षी वारला. भारतीय कसोटी क्रिकेटच्या क्षितीजावरचे हे वेगवान वादळ पाकिस्तानात गेल्यानंतर मात्र आपली ओळख हरवून बसले.

कमनशिबी अमरसिंग

अमरसिंगकडे निस्सारचा वेग नव्हता; पण विलक्षण अचूकता होती. ७ कसोटीत २८ बळी आणि सर्व मिळून ९२ सामन्यात त्याने ५०८ बळी घेतले. अमरसिंग हा पहिला भारतीय क्रिकेटपटू होता; ज्याने प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये एक हजार धावा आणि शंभर बळी घेण्याचा पराक्रम सर्वप्रथम केला. अमरसिंगदेखील निस्सार प्रमाणेच दुर्दैवी, कमनशिबी गोलंदाज होता. तो वयाच्या २९व्या वर्षीच, टायफॉईडने वारला. अमरसिंग याच्या गोलंदाजीचे आणखी एक वैशिष्ट्य होते. तो आक्रमक क्षेत्रव्यूह लावायचा. दोन स्लीप, गली, थर्डमॅन, लॉंग लेग. तो शॉर्ट फाइन लेग, सिली-पॉइंट, सिली मिडऑफ फॉरवर्ड शार्ट लेगही लावायचा. सावज टिपण्यासाठी कसा सापळा लावायचा, याचे अमरसिंगला अचूक ज्ञान होते. त्यामुळे निस्सारपेक्षा वेग कमी असूनही तो प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये खोऱ्याने बळी घेऊ शकला. मात्र, निस्सार काय नि अमरसिंग काय, दोघांचाही जन्म चुकीच्या काळात झाला. ते क्रिकेट चुकीच्या काळात खेळले, ही भावना जाणकारांच्या मनातून कधी गेली नाही.

लाला अमरनाथ नावाचे वादळ

नानिक अमरनाथ भारद्वाज उर्फ लाला अमरनाथ हे स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय क्रिकेटमधील एक वादळी व्यक्तिमत्व. हजारे, मर्चंट, मांकड आदींची क्रिकेट गुणवत्ता एकवटलेला हा माणूस. मात्र ती गुणवत्ता स्कोअरबोर्डवर काही कारणांमुळे हवी तशी प्रतिबिंबित झाली नाही. क्रिकेटची बुद्धिमत्ताही अफाट होती. त्यामुळे हा माणूस भारतासाठी त्यांनी पहिले शतक ठोकले. १९५२च्या सलामीच्या पाकविरुद्ध मालिकेत विजय मिळविणारे ते पहिले कप्तान. निवड समिती अध्यक्षपदाची कारकीर्दही प्रभावी. लाला अमरनाथ मूळचे कपूरथलाचे. आई ते लहान असतानाच वारली. त्यामुळे आजोबांनी त्यांची रवानगी त्यांच्या आजोळी, लाहोर येथे केली. माजिद राणा नावाच्या पाकिस्तानी माणसाने ‘लाला’मधील गुणवत्ता पाहून प्रारंभी खूप मदत केली. पतियाळाच्या महाराजांनी मग लालास आपल्या पदरी ठेऊन घेतले. पतियाळात त्याकाळी अनेक ब्रिटिश क्रिकेटपटू महाराजांच्या क्रिकेट क्लबसाठी खेळायला यायचे. त्या सर्वांना पाहून लालांनी आपली क्रिकेट संपदा निर्माण केली. पदार्पणात आणि भारतासाठी पहिले कसोटी शतक त्यांनी इंग्लंडविरुद्ध बॉम्बे जिमखाना येथे १९३३ मध्ये झालेल्या मालिकेत ठोकले. जायबंदी सी. के. नायडूंसोबत भागिदारी करताना लालांनी ११८ धावा फटकाविल्या. लाला फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही उत्तम कामगिरी करीत होते. इंग्लंडच्या त्याकाळच्या क्रिकेटपटूंनी लालांचे अष्टपैलूत्व मान्य केले होते. अशी गुणवत्ता कप्तान विझींनी इंग्लंड दौऱ्यावरून परत पाठविल्यामुळे वाया गेली.

१९३६ ते १९४६ या काळात दशकातील क्रिकेटच महायुद्धामुळे गोठले होते. लालांची क्रिकेट कारकीर्द फुलण्याआधीच संपते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान चौरंगी-पंचरंगी व रणजी सामन्यात मात्र लाला अमरनाथ यांनी अष्टपैलुत्वाची प्रचिती दिली. त्याकाळी त्यांनी १० हजार धावा केल्या होत्या. १९४६ च्या दौऱ्यावर त्यांना प्रभाव पाडता आला नाही. १९४८ मध्ये मात्र ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर ते कप्तान म्हणून गेले. त्यांच्या नेतृत्वगुणाचे ऑस्ट्रेलियाचे त्यावेळचे कप्तान सर डॉन ब्रॅडमन यांनीही कौतुक केले. क्रिकेटमधील कावेबाजपणा, धूर्तपणा, आणि डावपेच लढविण्याची कला यामुळे ब्रॅडमनही प्रभावित झाले होते. तोच धूर्तपणा, कल्पकता लालांनी; जसू पटेल या विस्मृतीत गेलेल्या ऑफ स्पिनर्सला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कानपूर कसोटीत खेळवून दाखवून दिला होता. २४ कसोटीत २४ च्या सरासरीने धावा आणि ४५ बळी ही त्यांची कसोटी मिळकत होती. निवृत्तीनंतर ते क्रिकेटपासून दूर गेले नाहीत. त्यामुळे त्यांची क्रिकेटची दुसरी इनिंग्जही प्रभावी ठरली.

क्रिकेटला फाळणी वरदान?

१९३० सालापासून भारतीय क्रिकेटचा सुरू झालेला ‘सिलसिला’ आज सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचला आहे. फाळणीमुळे दोन्ही देशांची क्रिकेट गुणवत्ता दुभंगली असं काही काळ वाटणं साहजिकच होतं. मात्र क्रिकेटचा आजवरचा प्रवास पाहिला तर फाळणी क्रिकेटसाठी वरदानच ठरली असं म्हणावं लागेल. दोन्हीकडचे क्रिकेटपटू विभागले गेले. मात्र त्यामुळे विभागल्या गेलेल्या गुणवत्तेला अधिक संधी मिळाली. भारत-पाकिस्तानने आपापल्या वेगवेगळ्या क्रिकेट शैलीची ओळख निर्माण केली. आशियाई क्रिकेटचा सुगंध त्यामुळे क्रिकेट विश्‍वात दरवळत राहिला. पाकिस्तानचा हा क्रिकेटपटू आपल्याकडे असता तर किती बहार आली असती, तसं त्याकाळी वाटणं साहजिकच होतं. त्याचवेळी पाकिस्तानी क्रिकेट रसिकांनाही भारतीय क्रिकेटपटूंच्या कौशल्याचीही भुरळ पडायची. या दोन गुणवत्ता एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या की मैदानावर त्वेषाने एकमेकांसमोर उभ्या ठाकायच्या. त्यापेक्षाही रोष, राग आणि अंगार उभय देशांच्या क्रिकेटरसिकांमध्ये फुलायचा. त्याचेच प्रतिबिंब दोन्ही देशांच्या राजकीय संबंध सुधारण्यासाठीही क्रिकेटच मदतीला धावून यायचे. नवरा-बायकोमधल्या अबोल्यासारखं ते होतं. अनेकदा मालिका थांबल्या, बंद झाल्या, पण तेवढ्याच वाजतगाजत, आनंदात सुरूही झाल्या.

आज भारत आणि पाकिस्तान हे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव एक दिवसाच्या फरकाने साजरा करणार आहेत. मात्र, प्रगतीचा वेग आणि संधींची उपलब्धता याबाबतीत भारत तुलनेने खूपच भाग्यवान ठरला आहे. क्रिकेटच्या विकासाचा आणि समृद्धीचा आलेख भारताचा चढता राहिला आहे. हा केवळ नशिबीचा नव्हे, तर गांधी-नेहरू-पटेल आदी थोरामोठ्यांच्या उदारमतवादी दृष्टीचा आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय क्रिकेटला आकार देणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या कर्तृत्वाचा परिपाक ठरला आहे.

फाळणीआधीचा भारतीय संघ

विजय मर्चंट, विनू मांकड, लाला अमरनाथ, विजय हजारे, रूसी मोदी, इफ्तिखार अली खान पतौडी (कर्णधार), गुल महंमद, अब्दुल करदार, दत्ताराम हिंदळेकर, सी. एस. नायडू, सदू शिंदे, मुश्ताक अली, चंदू सरवटे, रावसाहेब निंबाळकर, शूटे बॅनर्जी, रंगा सोहोनी.

भारतातून इग्लंड तिथून थेट पाकिस्तानचा कप्तान

फाळणी आधीचा भारतीय क्रिकेटपटूंचा हा अखेरचा इंग्लंड दौरा होता. भारताच्या धार्मिक विविधतेचे दर्शन या संघातर्फे घडत होते. याच दौऱ्यादरम्यान अब्दुल हफीझ करदार यांना ऑक्सफोर्ड विद्यापीठात तत्वज्ञान, राजकारण व अर्थकारण या विषयाचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळाला होता. नियतीने करदारच्या बाबतीत वेगळेच भविष्य लिहून ठेवले होते. तो या दौऱ्यावर गेला भारतातून; पण अभ्यासक्रम संपवून परतला तो पाकिस्तान या नव्याने निर्माण झालेल्या देशात. १९५२ च्या पाकिस्तानच्या नव्या संघाच्या पहल्यावहिल्या कसोटीचे नेतृत्व करण्याची संधीही नशिबाने त्याला दिली…

स्वतंत्र भारताचा पहिला संघ

स्वतंत्र भारताचा पहिला संघ १९४७-४८च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सर्वप्रथम गेला. हा संघ असा होता. दत्तू फडकर, विजय हजारे, विनू मांकड, हेमू अधिकारी, लाला अमरनाथ (कर्णधार), गुल महंमद, के. राम सिंग, चंदू सरवटे, जी. किशनचंद, अमिर इलाही, पी. के. सेन, खंडू रांगणेकर, सी. एस. नायडू, रंगा सोहोनी, जेनी इराणी, सी. आर. रंगाचारी. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघांचा दारूण पराभव झाला. वर्षभरातच भारताने वेस्ट इंडिजचा दौरा केला. १९५१-५२ मध्ये इंग्लंडने भारताचा दौरा केला आणि त्यानंतर १९५२ मध्ये भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला. भारताने १९५२ मध्ये पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका जिंकून पाहिली कसोटी मालिका जिंकली (२-१) खरी; पण भारताला इंग्लंड व वेस्ट इंडीजविरुद्ध त्यांच्या देशातील मालिका जिंकण्यासाठी तब्बल १९७१ सालापर्यंत वाट पहावी लागली…

विनायक दळवी, विविध देशांतील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा तसेच महत्त्वाच्या क्रिकेट मालिकांचा वार्तांकनाचा दांडगा अनुभव असलेले ज्येष्ठ क्रीडापत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0