पक्षात परिवर्तन हवे; २३ नेत्यांचे सोनियांना पत्र

पक्षात परिवर्तन हवे; २३ नेत्यांचे सोनियांना पत्र

नवी दिल्लीः गेले सहा वर्षांत दोन लोकसभा व अनेक राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस पक्षामध्ये परिवर्तन आणावे,

काँग्रेसला संरचनात्मक दुरुस्त्यांची गरज
नेतृत्व राहुल गांधी करू शकत नाहीत
वंचितांची काँग्रेस आणि काँग्रेसमधले वंचित

नवी दिल्लीः गेले सहा वर्षांत दोन लोकसभा व अनेक राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस पक्षामध्ये परिवर्तन आणावे, पक्षाची मजबूत बांधणी करावी, जबाबदारीत्व द्यावे, नियुक्त प्रक्रियेला मजबूत करावे व पराभवाचे वस्तुनिष्ठ आकलन करावे अशा मागण्या असलेले पत्र काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवले आहे.

सोमवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होत असून या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पाठवले गेले आहे.

दरम्यान सोमवारच्या बैठकीत पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आपल्या पदाचा राजीनामा देतील असे एनडीटीव्हीला मिळालेल्या माहितीत म्हटले आहे. पक्षाने आपला नेता निवडावा, अशी त्यांची भूमिका असल्याचे समजते.

या पत्रात पक्षात वरून खालीपर्यंत सर्व स्तरांवर बदल करावेत, देशातील तरुण वर्ग मोदींना मतदान करत आहे, या वर्गाशी काँग्रेस संवाद साधू शकत नाहीये, देशातील काँग्रेसचा जनाधार वेगाने कमी होत आहे असे मुद्दे मांडण्यात आले आहेत.

या पत्रावर स्वाक्षरी करणार्यांमध्ये राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, विवेक तन्खा, मुकेल वासनिक, जितीन प्रसाद, भूपिंदर हुड्डा, राजेंदर कौर भट्टल, वीरप्पा मोईली, पृथ्वीराज चव्हाण, पीजे कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी, मिलिंद देवरा, राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह ठाकूर, अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, संदीप दीक्षित आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

काँग्रेसचे पुनरुज्जीवन हे देशासाठी अनिर्वाय असून ते लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असा या पत्रात तर्क देण्यात आला आहे. देशापुढे भय, असुरक्षितता, बेरोजगारी, महासाथीमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट, सीमा संरक्षण, वाढती धर्मांधता असे प्रश्न निर्माण झाले असून त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पक्षाला आपल्या रचनेत आतून परिवर्तन व बदल करावे लागणार आहेत, त्यासाठी सत्तेतील विकेंद्रीकरण, प्रत्येक राज्यातील काँग्रेस पक्षाला सशक्त करणे यावर पक्षाला काम करावे लागणार आहे. यासाठी काँग्रेस पक्षात सर्व पातळीवर निवडणुका आवश्यक असून पक्षाच्या संसदीय मंडळाचीही तत्काळ स्थापना करणे गरजेचे असल्याचे मत या पत्रात व्यक्त करण्यात आले आहे.

काँग्रेस नेतृत्वाबद्दल असलेली अनिश्चितता, पक्षातील अंतर्गत संघर्ष यामुळे सामान्य कार्यकर्ता पक्षावर नाराज असून तो दूर होत असल्याची खंत या पत्रात मांडली गेली आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजपाशी दोन हात करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला जात नाही, पक्षातील नेते स्वतःच्या व पक्षाच्या पराभव करण्याच्या मनःस्थितीत नाहीत, त्यामुळे पक्ष कमजोर होत असून एक पूर्णकालिक व प्रभावी नेतृत्व पक्षाला मिळाल्यास पक्ष बांधणीला वेग येईल, सर्व राज्यांमध्ये असे नवे नेतृत्व आणावे, असे मुद्देही यात नोंदवले गेले आहेत.

या पत्रात गांधी-नेहरु घराणे हे पक्षाचे अभिन्न अंग असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0