दिनू रणदिवे : निष्ठावान व हाडाचा पत्रकार !

दिनू रणदिवे : निष्ठावान व हाडाचा पत्रकार !

समाजवादी विचारसरणी अक्षरशः जगलेल्या दिनू रणदिवे यांनी कोणत्याही प्रकारचा शासकीय मानमरातब स्वीकारला नाही की अगदी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आजवरच्या सर्वच मुख्यमंत्री यांना चांगल्या प्रकारे ओळखणाऱ्या दिनू रणदिवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारातून मिळणाऱ्या सदनिका घेतल्या नाहीत अथवा त्या घेऊन लाखो करोडो रुपये कमाई करून विकल्या नाहीत.

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची खूर्ची जाण्याचे वृत्त दिल्याने संपादकांवर गुन्हा
डॅनी अमेरिकेत परतला !
हाथरस वृत्तांकनः मल्याळी पत्रकारावर देशद्रोहाचा गुन्हा

दिनू रणदिवे गेले! मागच्याच महिन्यात त्यांच्या पत्नींचे देहावसान झाले. रणदिवे यांची बातमी समजताच डोळ्यातून आपोआप आसवांच्या धारा लागल्या. मन सुन्न झाले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह ८६५ मराठी भाषिक गावे कर्नाटकच्या जुलमी राजवटीतून सोडवून महाराष्ट्रात सामील करण्यासाठी १९५६ साली आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी, सेनापती बापट, श्रीपाद अमृत डांगे, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शेख जैनू चांद अशा असंख्य लोकांनी जोरदार लढा उभारला. एका बाजूला आचार्य अत्रे यांनी ‘मराठा’मधून सरकारवर टीकेची झोड उठवली तर दुसरीकडे दिनू रणदिवे आणि अशोक पडबिद्री यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिका’ ही संयुक्त महाराष्ट्र समितीची धडाडती तोफ सुरू केली. या धडधडणाऱ्या तोफेत अस्सल दारुगोळा भरण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे हे शीर्षके देत असत तर त्यांचे चिरंजीव बाळ ठाकरे हे आंतरराष्ट्रीय कीर्तिचे व्यंगचित्रकार ‘मावळा’ या नांवाने व्यंगचित्र काढीत असत.

पंडित जवाहरलाल नेहरु यांना मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र देण्याची इच्छा नव्हती. १९५७ च्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीला बहुमत मिळाले होते. मुंबई इलाख्यावरून मुंबई द्विभाषिक राज्य बनविण्याचा मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. फाझल अली, कुंझरु आणि पणिक्कर या समितीच्या अहवालानुसार हा निर्णय झाला होता. तेव्हा आचार्य अत्रे ‘फाकुंपा’ कंपनी असे संबोधित असत.

दिनू रणदिवे हे हाडाचे पत्रकार. वामनमूर्ती असलेले दिनू रणदिवे अक्षरशः ज्वालाग्राही पण संयमी लिखाण करीत आणि सरकारला धारेवर धरीत असत. हीच १९५६ सालची त्यांची पत्रकारितेची सुरुवात होती. मूळचा चळवळ्या स्वभाव असल्याने संयुक्त महाराष्ट्र लढ्याआधी १९५५ साली त्यांनी गोवा मुक्ती संग्राममध्येही भाग घेतला होता. घर आणि तुरुंग यात त्यांना तेव्हा काही वाटत नसे. डहाणू जवळच्या आदिवासी पट्ट्यात १९२५ साली जन्मलेल्या दिनू रणदिवे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये नोकरी पत्करली. मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी जबाबदारी अत्यंत चोखपणे सांभाळली. १५ सप्टेंबर १९८५ रोजी ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी घटनास्थळी जाऊन वृत्तांकन कसे करायचे ? विधायक पत्रकारिता कशी करायची? याचा वस्तुपाठ घालून दिला.

१९७१ साली बांगला देशची निर्मिती झाली पण त्यासाठी भारतीय सैन्याने जे युद्ध प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली केले त्या बांगलादेश मुक्ती लढ्याचे वार्तांकन दिनू रणदिवे यांनी केले होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी ‘लोकमित्र’ नियतकालिकाचे संपादन केले होते. समाजवादी विचारसरणी अक्षरशः जगलेल्या दिनू रणदिवे यांनी कोणत्याही प्रकारचा शासकीय मानमरातब स्वीकारला नाही की अगदी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आजवरच्या सर्वच मुख्यमंत्री यांना चांगल्या प्रकारे ओळखणाऱ्या दिनू रणदिवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारातून मिळणाऱ्या सदनिका घेतल्या नाहीत अथवा त्या घेऊन लाखो करोडो रुपये कमाई करून त्या विकल्या नाहीत.

दादरच्या पश्चिम रेल्वेच्या स्थानकाजवळ घामट टेरेसच्या एका छोट्याशा खोलीत दिनू आणि सविता रणदिवे यांनी आपला संसार केला. लोकांच्या घरात वर्तमानपत्र येतात पण रणदिवे पतीपत्नी वर्तमानपत्र आणि कात्रणांच्या गठ्ठ्यांत अक्षरशः राहात होते. बाळासाहेब ठाकरे यांनी ‘शिवसेने’ची १९ जून १९६६ रोजी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनेची स्थापना केली. समाजवादी विचारसरणीच्या रणदिवे यांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे मतभेद झाले पण त्यांच्या मैत्रीमध्ये कधीही कटुता आली नाही. बाळासाहेब ठाकरे यांना बाळ म्हणून हाक मारणारे जे मोजके लोक होते त्यात दिनू रणदिवे, मधू शेट्ये, जॉर्ज फर्नांडिस यांचा समावेश वरच्या क्रमांकावर होता. माझे वडील वसंतराव त्रिवेदी हे एकेकाळी दिनू रणदिवे यांचे सहकारी. दोघेही समाजवादी. पण याच रणदिवे यांचे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील सहकारी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे मित्र अशोक पडबिद्री हे १९८८ साली बाळासाहेब ठाकरे यांच्या दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक होते आणि त्याचवेळेस ‘सामना’चे मुख्य संपादक बाळासाहेब ठाकरे यांनी मुलाखत (ओळखपरेड) घेऊन १५ डिसेंबर १९८८ रोजी माझी ‘सामना’च्या उपसंपादक/वार्ताहर पदावर नियुक्ती केली. वसंतराव त्रिवेदी यांना सुरुवातीला माझा निर्णय पटलेला नव्हता. पण दिनू रणदिवे माझे नेहमीच कौतुक करीत असत. चांगली बातमी वाचली की ते मुद्दाम दूरध्वनी करून शाबासकी देत. अरे, एवढी चांगली बातमी मग त्याला ‘बायलाईन’ का रे नाही ? असा प्रश्न ते विचारीत असत. ‘महानगर’ आणि ‘आज दिनांक’ या वर्तमानपत्रांवर हल्ला झाला त्यावेळी ‘बीयुजे’ या पत्रकारांच्या संघटनेने निषेध सभा बोलावली त्या सभेत सुकृत खांडेकर, अजय वैद्य आणि मी अशा आमच्या तिघांची भाषणे पत्रकारांना अंतर्मुख होण्याचा सल्ला देणारी होती. जी बातमी ‘सांज लोकसत्ता’, ‘संध्याकाळ’ने छापली, तीच बातमी ‘महानगर’ आणि ‘दिनांक’ने छापली. मग ‘सांज लोकसत्ता’ आणि ‘संध्याकाळ’वर हल्ला का झाला नाही ? असा सवाल मी माझ्या वक्तव्यातून केला होता. दिनू रणदिवे आणि मधू शेट्ये या दोन दिग्गज पत्रकारांनी माझे अभिनंदन केले. ‘दिनांक’चे तत्कालिन संपादक (आता आमदार) कपिल पाटील यांनीही प्रशंसा केली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने देण्यात येणारे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार साधारण दोन तीन वर्षे देण्यात आले नव्हते. मी ‘सामना’मध्ये बातमी दिली. दिनू रणदिवे यांना ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला होता पण तो रखडला होता. मनीषा पाटणकर म्हैसकर या महासंचालक होत्या. महासंचालक या नात्याने त्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना नेहमीप्रमाणे ब्रिफिंग करायला गेल्या होत्या. विलासराव देशमुख यांनी शासकीय काम आटोपताच महासंचालक यांना विचारले, “अहो मनीषाताई, आजचा ‘सामना’ वाचलात काय ? नसेल तर वाचा आणि माझी वेळ घेऊन कार्यक्रम निश्चित करा. पत्रकारांचे दोन वर्षांचे पुरस्कार रखडलेत. असे पुरस्कार रखडणे योग्य नाही.” आणि मग तो रखडलेला पुरस्कार वितरण सोहोळा झाला. दिनू रणदिवे यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देत, “योगेश, तुझ्या मुळेच हे पुरस्कार लवकर दिले गेले”, असे सांगितले. मित्रवर्य प्रकाश सावंत यांनाही तेव्हा एक पुरस्कार मिळाला होता. ज्येष्ठ पत्रकार देवदास मटाले हे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष असतांना कधी नव्हे तो मला उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला. ७ जानेवारी २०१३ रोजी पुरस्कार वितरण समारंभ होता. तेव्हा सविताताई रणदिवे दिनू रणदिवे यांना म्हणाल्या, “अहो, तो मुलगा तुमच्यासाठी एवढा धडपडत असतो. जा जरा त्याला आशीर्वाद द्यायला जाऊन या”. आणि खरोखरच दिनू रणदिवे हे मुंबई मराठी पत्रकार संघात आले आणि मला आशीर्वाद दिले. हीच तर माझी खरीखुरी संपत्ती आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघानेही दिनू रणदिवे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. खरंतर त्यांना पुरस्कार देऊन वार्ताहर संघ सन्मानित झाला, असेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्राला ५० वर्षे झाली तेव्हा महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव सर्वत्र विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी बहरून गेला होता. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे सर्वत्र कार्यक्रम होत होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि विजय वैद्य यांनी त्या झंझावाती लढ्याच्या स्मृती ताज्या करण्यासाठी विविध कार्यक्रम केले. दिनू रणदिवे खास या कार्यक्रमासाठी बोरीवली येथील जय महाराष्ट्र नगरात आले आणि रणदिवे-वैद्य या जोडीने १९५६चा तो संग्राम लोकांसमोर उभा केला.

स्वाभिमानाने आयुष्याची ९५ वर्ष पूर्ण करणारा आणि सर्वच प्रलोभनांना लाथाडणारा हा पत्रकारांचा खरा खुरा ‘बाप’ आज आपल्यातून निघून गेला. कोरोना विषाणूने साऱ्या जगात थैमान घातले आणि भारतात/महाराष्ट्रात टाळेबंदी लागली, अशावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी रणदिवे पतीपत्नी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि विचारपूस केली. पत्रकारिता करतांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांची नांवे घेण्यात येतात. ते तर लांब राहिले निदान दिनू रणदिवे आणि मधू शेट्ये यांचा जरी आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केले तर तीच खरी श्रद्धांजली रणदिवे -शेट्ये यांना अर्पण केली असे समजता येईल. नाही तर विशेष प्रतिनिधी, बातमीदार या ऐवजी “आत्ताच हाती आलेल्या पाकिटावरून” असे छापण्याची वेळ आली असेच खेदाने नमूद करावे लागेल. दिनू रणदिवे, आम्हाला माफ करा!

योगेश वसंत त्रिवेदी, ज्येष्ठ पत्रकारआहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: