धगधगता, मूल्यचौकट मानणारा नि:संग पत्रकार

धगधगता, मूल्यचौकट मानणारा नि:संग पत्रकार

१९५५ ते १९८५ या ३० वर्षांच्या कालावधीत समाजात बदल झाले पाहिजेत असं मानणारा चळवळ्या ते सरकारच्या कारभारापासून लोकांच्या दैनंदिन जीवनापर्यंत बारकाईने तपशील टिपणारा हाडाचा पत्रकार म्हणून दिनू रणदिवे सतत धडपडत राहिले. आणि १९८५नंतरची पुढची ३०-३५ वर्षेही त्यांच्यातील चळवळ्या आणि पत्रकार सतत जागा राहिला.

छत्तीसगढमध्ये गावकऱ्यांनी घेतली मुस्लिमविरोधी शपथ
न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देणारी गदर चळवळ
‘असत्याचे राजकारण करणाऱ्यांना गांधी कसे समजणार?’

दिनू रणदिवे ज्या काळात वावरले, घडले त्या काळात ‘आयकॉन’ हा शब्द इंग्रजी शब्दकोशात मौजुद असला, तरी मराठी माणसांच्या लिहिण्याबोलण्याच्या व्यवहारात तो रुळला नव्हता. पण तो शब्द रणदिवेंना नक्कीच समर्पक होता. पत्रकारिता हा विशिष्ट तत्वांवर आणि पेशानिगडित निकषांवर उभी असण्याचा हा काळ होता. १९५५ ते १९८५ या ३० वर्षांच्या कालावधीत समाजात बदल झाले पाहिजेत असं मानणारा चळवळ्या ते सरकारच्या कारभारापासून लोकांच्या दैनंदिन जीवनापर्यंत बारकाईने तपशील टिपणारा हाडाचा पत्रकार सतत धडपडत राहिला. आणि १९८५नंतरची पुढची ३०-३५ वर्षेही त्यांच्यातील चळवळ्या आणि पत्रकार सतत जागा राहिला.

ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून निवृत्त झाले, तरी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात त्यांची शोधक नजर वेध घेत राहिली आणि जिथे शक्य तिथे टिपलेलं कागदावरही उतरवत राहिली.
रणदिवे वेगळ्या अर्थाने कधी म्हातारे झाले नाहीत. ते सतत पत्रकारितेत नवनवे काही करू पाहणाऱ्या तरुणांमध्ये उठत बसत राहिले, तरुण सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये रमत राहिले, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत राहिले आणि वेळोवेळी त्यांच्यावर काही मुद्द्यांवर बरसतही राहिले. त्यांना राग भारी येत असे. एखादा मुद्दा लावून धरला, की सोडायला अजिबात तयार नसत. कोणी दुसरी बाजू मांडली तर त्यांच्याकडे त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देणारे संदर्भ ठेवणीत ठेवलेले असत. हे मुद्दा लावून धरणं कधीकधी विवादाच्या पातळीवर जाऊन उभयपक्षी मनस्तापही होत असे. अशा वेळी, ‘जाऊ दे, तुला सांगून काही उपयोग नाही’, असे बोलून कटू प्रसंगातून ते बाहेर पडत; पण मग बरेचदा पुढे काही दिवस त्यांचा अबोला सत्याग्रह चालत असे. अर्थात त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांना याचा फार ताप नसे, पण समवयस्कांमध्ये नक्कीच असावा.
पत्रकारितेतील बेसिक नियमांबद्दल ते फार आग्रही असत. पत्रकाराने बोलावे कमी आणि ऐकावे, पाहावे, वाचावे आणि लिहावे जास्त असा त्यांचा पिंड होता. लोकशाही मूल्यांवर त्यांचा गाढ विश्वास होता. लोकशाही समाजवादी मंडळींत त्यांची उठबस अधिक होती. अशोक मेहतांबद्दल आत्मीयता. मेहतांची प्रचारमोहीम अनुभवण्यासाठी ते बिहारला गेले होते. १९५५ मध्ये समाजवादी पक्षाने छेडलेल्या गोवा मुक्ती संग्रामातही सक्रिय होते.

नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. या लढ्यात त्यांनी कम्युनिस्ट नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे यांच्या बरोबर कारावासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ साली ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिका’ नावाचे अनियतकालिक सुरू केले. रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात येथूनच झाली होती. पुढे १९५९च्या सुमारास समाजवादी नेते साथी एस. एम. जोशी यांनी ‘लोकमित्र’ हे नियतकालिक सुरू करण्याचे ठरवले. रणदिवे यांचा त्याच्या संपादनात मोठा वाटा होता. दीडएक वर्षे ते चालले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील घडामोडी त्यात असत. अनेक नामवंतांचे लेखही असत. त्यांच्या सोबत वि. वि. करमरकर, चंदू मेढेकर, श्रीरंग साबडे अशी टीम होती. माझे वडील अनंत जोशीही ‘लोकमित्र’च्या टीमचा भाग होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ रणदिवे अक्षरशः जगले असेच म्हणायला हवे. तो कालखंड त्यांच्यातील चळवळ्या आणि पत्रकार अशा दोघांनाही मुक्त वाव देणारा होता आणि रणदिवे यांनी तो पूर्णांशाने अनुभवला.

पुढे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रणदिवे रूजू झाले. त्यांचे वार्तांकन मुद्देसूद असे. किंचित तिरप्या जलद लिपीत त्यांची कॉपी तयार होई. शब्द कापायला अथवा भर टाकायला लागू नये अशी गोळीबंद कॉपी. प्रसंगाचे रोचक वर्णन तर असेच पण अन्य वार्ताहरांच्या नजरेतून सुटलेले बारकावे त्यांच्या बातमीत प्रकट होत आणि अन्य वर्तमानपत्रांपेक्षा रणदिवेंची बातमी चटकन वेगळी लक्षात येत असे. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. वार्तांकनात महत्त्वाचे मापदंड घालून दिले. १९७२ मध्ये रणदिवेंनी केलेले बांग्लादेश मुक्तिलढ्याचे वार्तांकन बहुचर्चित ठरले होते. १९७३ च्या रेल्वे संपाचे रणदिवेंचे वार्तांकन अतिशय वाचनीय असे. त्या काळात जॉर्ज फर्नांडिस या नावाची मोहिनी कामगारवर्गासोबतच मध्यमवर्गावरही होती. अलीकडच्या काळात संप आदी आंदोलनांना नाके मुरडण्यात आजचा मध्यमवर्ग आघाडीवर असतो, तशी स्थिती तेव्हा नव्हती. या दोन्ही वर्गांत रणदिवेंचे हे वार्तांकन लोकप्रिय होते.
माजी मुख्यमंत्री अंतुलेंचा सिमेंट भ्रष्टाचार इंग्रजी पत्रकार अरुण शौरी यांच्याआधी रणदिवेंनी चव्हाट्यावर आणला. पुढे अधिकृत निवृत्तीनंतर सात वर्षांनी १९९२ साली हर्षद मेहतांच्या शेअर घोटाळ्यावर त्यांनी लिहिले. त्यांच्यानंतर दोन दिवसांनी सुचेता दलाल यांनी इंग्रजी वर्तमानपत्रात या घोटाळ्याबद्दल बातमी दिली होती. या प्रकरणात सुचेता दलाल यांचे योगदान खचितच मोठे आहे, परंतु या विषयाला वाचा फोडण्याचे पहिले श्रेय वयाच्या सत्तरीजवळ आलेल्या रणदिवेंना द्यायला हवे.
गरिबांविषयी, शोषित समूहांविषयी त्यांना विशेष आस्था होती. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांवर त्यांनी पाहणी अभ्यास केला होता आणि याविषयी सविस्तर वृत्तमालिकाही केली होती. गिरणी संपात कामगारांची बाजू मांडण्याचे काम त्यांनी नेटाने केले होते. दत्ता सामंतांवर टीका होत असतानाही आणि सत्ताधाऱ्यांच्या धोरणांमुळे संपाची बांधणी पूर्णपणे विस्कळित होत चालली असताना अशी बाजू लावून धरणे हे बांधिलकी शिवाय अशक्यच आहे.
त्यांचे काही आक्षेप, रुसवेही असायचे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात दादर येथे एस. एम. जोशींवर गोळी चालता चालता थांबली, त्या ठिकाणी तत्कालिन महापालिका प्रशासनाने सार्वजनिक मुतारी बांधण्याचा प्रस्ताव आणला. हे घडत होते, तेव्हा रणदिवे निवृत्त होऊन वीसएक वर्षे उलटून गेली होती. या संदर्भात बातमी करावी म्हणून ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील तेव्हाच्या पत्रकारांशी सतत बोलत होते. त्यानुसार एक बातमी आलीही. पण तेवढ्याने प्रशासनाचे काही ढिम्म हालणार नाही असे त्यांना वाटे. ती बातमी पुन्हा पुन्हा लावण्याचा त्यांचा आग्रह नव्या रूपात निघणाऱ्या वृत्तपत्रात पुरा करणे अवघड होते. रणदिवे याबाबत इतके नाराज झाले, की त्यांनी काही पत्रकारांशी बोलणे टाकून दिले. अर्थात त्यांचे हे वागणे कोणी मनाला लावून घेत नसे, कारण त्यांचे हेतू प्रामाणिक तर होतेच, पण त्यांच्यात एक हट्टी निरागस मूल दडले आहे हे आम्हा सर्वांना ठाऊक होते.

‘महाराष्ट्र टाइम्स’ हा त्यांचा एकाच वेळी जिव्हाळ्याचा आणि रागाचाही विषय होता. राग व्यक्त करण्याची त्यांची एक विशिष्ट पद्धत होती. त्यांचा आवाज खोल होता. खूप मोठ्ठ्याने ते ओरडल्याचे स्मरत नाही. पण ते राग बराच काळ मनात मात्र ठेवत असत. अनेकांना ते त्रासदायक वाटत असू शकेल, पण ते आतून जिवंत असल्याची ती धगधगती खूण होती. खोटे हासणे, खोटी स्तुती त्यांना कधी जमली नाही.

या अशा रणदिवेंची साथ सविताकाकींनी केली. मूळच्या गुजराती भाषिक, पण संयुक्त महाराष्ट्र लढ्यात त्या सक्रीय होत्या. मुंबई महाराष्ट्राची हे त्यांनी गुजरातीत जाहीरपणे ठणकावून सांगितले. एकच महिन्यांपूर्वी काकी अकस्मात रणदिवेंची साथ सोडून गेल्या. नव्वदीजवळ आलेल्या काकींचे जाणे रणदिवेंना रिते करून गेले असणार… पण त्याही स्थितीत सविताताईंबद्दलच्या बातमीचा मजकूर (तपशील नव्हे, मजकूर) त्यांनी दीपा कदमला नेटका सांगितला. तिने लिहिल्यावर वाचून दाखवायला लावला आणि मगच तो प्रेसकडे गेला. हाडाचा पत्रकार असा असतो.
रणदिवे यांचे मूळ गाव डहाणू तालुक्यातील चिंचणी. ते माझ्या वडिलांचेही गाव. त्याबद्दल ते अधुनमधून बोलत. तिथे त्यांना घेऊन जाणे जमले नाही ही खंत राहील. त्यांचे अगदी गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत येणारे फोन आता कधीच येणार नाहीत हीही‌ सल राहील. फोनवरून संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा म्हणून दाखवणारे, गिरणीची लावणी आपल्या थरथरत्या आवाजात म्हणणारे रणदिवे हे एक अजब रसायन होते. सतत अस्वस्थ. अरुण साधू यांच्या लेखणीतून उतरलेले दिनू रणदिवे आणि जगन फडणीस यांचे कॉम्बिनेशन असलेले दिगू टिपणीस हे व्यक्तिमत्व मराठी साहित्यात आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात अजरामर आहे. अस्वस्थ, धगधगता, मूल्यचौकट मानणारा नि:संग पत्रकार. सच्चा हाडाचा पत्रकार….
मराठीच काय, एकूणच पत्रकारिता १९९०च्या दशकानंतर बदलली. बाजारकेंद्री अर्थव्यवस्था तिने अंगी मुरवली. तिचे स्वरूप बदलले. फंडे बदलले. चौकट बदलली. दिशाही बदलली.
९५ वर्षांचे पूर्ण आयुष्य जगून दिनू रणदिवे ज्या दिवशी गेले, त्याच दरम्यान डेड लाईन गाठता गाठता पन्नाशीतला एक पत्रकार कॉम्प्युटरवर असतानाच हे जग सोडून गेला. पत्रकारितेच्या बदलत्या जगाविषयी अधिक प्रखर भाष्य काय असू शकते याहून?

प्रतिमा जोशी, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0