मार्च २००४ साली सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यापासून भारतात सर्वाधिक द्वेष, तिरस्कार, उपहास, कुचेष्टा आणि चारित्र्यहनन याचा अनुभव घेणारी राहुल गांधी यांच्या इतकी दुसरी कोणतीही व्यक्ती नसेल.
“There was no makeover, BJP used money to distort the reality of Rahul Gandhi… a lot of money was put in to this. They deployed a lot of people so that Rahul Gandhi’s image could be damaged. I believe in the truth. I speak the truth. Now the truth is coming out and they are not able to see it.” – Rahul Gandhi, 12 December 2017
राहुल गांधी यांचे वरील उद्गार ते काँग्रेस अध्यक्ष निवडले गेल्यानंतर गुजरात विधानसभा निवडणुकीच्या काळात एका गुजरात न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतील आहे. कोरोनाकाळातील असाधारण संकट काळात राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांशी संवाद साधत, व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकार परिषदा घेत तसेच ट्विटरच्या माध्यमातून सरकारला केलेल्या सूचना आणि सुचविलेले उपाय यामुळे त्यांची एक विधायक विरोधक, परिपक्व आणि समावेशी नेतृत्व म्हणून ओळख झाली असल्याची प्रचिती येऊ लागली आहे. पण खरेच राहुल गांधी हे बदललेले आहेत की मुळातच त्यांच्यात हे सर्व गुण होते का? गेली कित्येक वर्षे जाणीवपूर्वक प्रतिमा मलिन करण्याच्या एका व्यापक कटकारस्थानाद्वारे त्यांना सातत्याने बदनाम केले गेले आहे का? हे पाहावे लागेल.
मार्च २००४ साली सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यापासून भारतात सर्वाधिक द्वेष, तिरस्कार, उपहास, कुचेष्टा आणि चारित्र्यहनन याचा अनुभव घेणारी राहुल गांधी यांच्या इतकी दुसरी कोणतीही व्यक्ती नसेल. २००४ साली अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर होताच विश्व हिंदू परिषदेचे राम विलास वेदांती यांची भाजपने अमेठीत उमेदवारी जाहीर केली. अमेठीत राहुल यांच्या जाण्यापूर्वीच वेदांती यांनी राहुलविरोधी प्रचाराची राळ उडवायला सुरवात केली होती. त्यांनी राहुल यांना भारतीय नागरिक न मानता इटालियन संबोधण्यास सुरवात केली आणि त्यांची तथाकथित कोलंबियन गर्लफ्रेंड आणि कोलंबियन तरुणींचा ताफा आता अमेठीत प्रचाराला येणार असून अमेठीला इटालियन साम्राज्यापासून स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ही निवडणूक आपण लढत असल्याचे जाहीर केले होते. राहुल गांधी यांनी अमेठीत येताच पत्रकारांना सामोरे जाताना आपली एकही कोलंबियन गर्लफ्रेंड नाही तसेच आपली जी मैत्रीण आहे ती स्पॅनिश असल्याचे जाहीर केले. १९९९च्या क्रिकेट वर्ल्डकप मॅच वेळच्या एका फोटोवरून हा सारा बदनामीचा खेळ भाजप अद्याप खेळत आहे. भाजप आणि रामविलास वेदांती यांच्या या बदनामी मोहिमेला कोणतीही साथ न देता अमेठीतून राहुल गांधी हे २ लाख ९० हजार इतक्या प्रचंड बहुमतांनी विजयी झाले. वेदांती यांचे डिपॉझिट जप्त होताना ते तिसऱ्या क्रमांकावर गेले. राहुल गांधी यांची ही चारित्र्यहनन मोहीम ते राजकारणात येण्यापूर्वीपासून खूप काळ चालू आहे.
१९७७ च्या निवडणुकीत नेहरू – गांधी कुटुंबाची घराणेशाही लोकांच्या मनात बिंबविण्यासाठी ‘देश कि नेता इंदिरा गांधी, युवाओं का नेता संजय गांधी, बच्चों का नेता राहुल गांधी’, अशी उपहासात्मक टिंगल विरोधकांनी सुरू केली होती. जनता राजवटीत जाणीवपूर्वक शाळेतही राहुलला लक्ष बनविले जात होते. विशेष म्हणजे या वेळी राजीव, सोनिया गांधी हे राजकारणापासून पूर्णतः अलिप्त होते. इंदिरा हत्येनंतर राहुल गांधी यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव आपले शालेय शिक्षण बहिणीसह घरीच त्यांना पूर्ण करावे लागले. कोरोनाकाळातील लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असताना घरात ऑनलाइन किंवा घरून शिक्षण कसे असते याचा अनुभव राहुलच्या वयाच्या पालकांना आता येत असेल तर ते ज्या वेळी शाळेत जात होते त्यावेळी राहुल, प्रियंका यांची कशी मन:स्थिती असेल याची त्यांनी कल्पना करावी. सेंट स्टीफन कॉलेजमधला त्यांचा स्पोर्ट्स कोट्यातून झालेला प्रवेशही असाच त्याकाळात अभाविप (ABVP) सारख्या संघटनांनी जाणीवपूर्वक वादग्रस्त करण्याचा प्रयत्न केल्यावर राहुल गांधी यांनी अमेरिकेला जाऊन आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय केला.
राहुल हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना राजीव गांधींच्या हत्येनंतर त्यांना रोलिन्स कॉलेजमध्ये हलवण्यात आले आणि त्यावेळी त्यांचे नाव रॉल विन्सी असे बदलण्यात आले. विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणेलाच त्यांची ओळख माहीत होती. दहशतवादाच्या सावटाखाली आपले नाव बदलून राहावे लागण्याची वेदना काय असते, हे टिंगल टवाळी करणाऱ्यांना समजणार नाही. नेहरू-गांधी घराण्याचा द्वेष करण्यातच आपली कर्तबगारी मानणाऱ्यांना त्याग आणि वेदना काय असते, हे कधीच कळणार नाही. १९९५ मध्ये राहुल गांधी २५ वर्षे पूर्ण केल्यानंतर १९९६च्या लोकसभा निवडणुकीला उभा राहू शकतात, या कल्पनेनेच त्या काळात त्यांची काँग्रेस अंतर्गत आणि विरोधकाकडूनही राहुल गांधी हे परदेशात ड्रग, कोकेनच्या आहारी गेले आहेत. त्यांनी आपले नाव, धर्म बदलला असून ते आता परदेशातून परत येणार नाहीत अशा बातम्या पेरायला सुरवात केली होती. अशा बातम्या १९९५ ते २००४ पर्यंत सातत्याने हेतुपुरस्सर पसरविल्या जात होत्या. अशा बातम्यात सतत रॉल विन्सी या नावाचा संदर्भ दिला जात असे. या बदनामीकारक मोहिमेला काँग्रेसने कधीही प्रत्युत्तर दिले नाही.
१९९१ ते १९९७ या काळात गांधी परिवारातील कोणीही सक्रिय राजकारणात नव्हते. नरसिंहराव व सीताराम केसरी यांच्यामुळे आपण निवडणुका जिंकू शकत नाही हे लक्षात येताच काँग्रेस नेत्यांची पक्ष सोडून जाण्याची जणू स्पर्धाच लागली होती. ममता बॅनर्जी यांनी पक्ष सोडून तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. काँग्रेसचे होणारे हे अधःपतन शांतपणे पाहाणे हे काँग्रेसप्रेमी भारतीयाप्रमाणे गांधी परिवारालाही या काळात क्लेशदायक होते. तत्कालीन भाजप अध्यक्ष लालकृष्ण अडवाणींनी १९९८च्या निवडणुकीनंतर काँग्रेसची अवस्था कशी असेल हे सांगताना ‘सर्फ एक्सेल’ या वॉशिंग पावडरच्या जाहिरातीमधील ‘डाग ढूंडते रह जाओगे’, या संवादाप्रमाणे निवडणुकानंतर ‘काँग्रेस ढूंडते रह जाओगे’ अशी काँग्रेसची विदारक स्थिती होईल असे भाकित वर्तविले होते. काँग्रेसची होणारी ही वाताहात पाहूनच सोनिया गांधी यांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत पक्षाचा प्रचार करण्याचे घोषित केले. २९ डिसेंबर १९९७ ला त्यांनी आपला निर्णय एका प्रेस नोटद्वारे जाहीर केला. हा निर्णय जाहीर करताना सोनिया गांधी यांनी राहुल आणि प्रियंका यांच्यासह आपला या पाठीमागील हेतू स्पष्ट केला. ज्या राजकारणापासून सोनिया आपल्या पतीला व मुलांना कायम दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत होत्या. यावेळी त्या म्हणतात भारताला स्वातंत्र्य मिळवून देताना गांधी, नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत ज्या मूल्यांसाठी (स्वातंत्र्य, लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता) संघर्ष केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. याच मूल्यांच्या रक्षणासाठी महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी बलिदान दिले. त्या मूल्यांना सध्या धर्मांध शक्तींकडून मोठा धोका निर्माण झाला असून, त्या मूल्यसंवर्धनासाठीच आपण राजकारणात येत आहोत. राजकीय क्षेत्रात येत असलो तरी सत्तेचे सर्वोच्चपद आपण घेणार नाही हे त्यांनी याच वेळी स्पष्ट केले होते. सोनिया गांधी यांनी राजकारणात प्रवेश करताना आपल्या राजकीय उद्देश्यांचा वरीलप्रमाणे स्पष्ट उल्लेख केवळ केला नाही तर त्या उद्देश्यानुरूप आजपर्यंतची त्यांची राजकीय वाटचालही तशीच राहिली आहे. भारतीय राजकीय क्षेत्रात आपल्या राजकीय उद्देश्याचा इतका स्पष्ट उल्लेख क्वचितच इतर नेत्यांनी केला असावा व त्यानुरूप वाटचाल केली असावी.
राहुल गांधी यांचीही राजकीय प्रेरणा अशीच असल्याचे आपणाला दिसून येईल. २००४ साली अमेठीत राहुल गांधी यांनी विजय मिळवत राजकारणात पदार्पण केले. सोनिया गांधी पंतप्रधान बनणार असे या विजयानंतर गृहित धरले जाऊ लागले. कॉंग्रेस पक्षाच्या संसदीय नेतेपदी सोनिया गांधी यांची निवडही झाली होती. केवळ शपथविधीची औपचारिकता बाकी असतानाच सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला. आपला अंतरात्मा आपणाला हे पद स्वीकारू देत नाही आणि आपल्या अंतरात्म्याच्या आवाजावरून हे पद आपण स्वतः न स्वीकारता इतर कोणीतरी सक्षम काँग्रेस नेत्याने स्वीकारावे असे सुचविले. डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव त्यांनी स्वतः या पदासाठी पुढे करताना त्यांना आपले सर्व सहकार्य राहील याचा विश्वासही त्यांना दिला. सोनिया गांधी यांची ही कृती त्यांनी राजकारणात प्रवेश करताना २९ डिसेंबर १९९७ ला केलेल्या निश्चियाशी अनुरूप अशीच होती. याचवेळी काही खासदारांनी सोनिया गांधी नसतील तर राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावे अशी मोहीम हाती घेतली होती, मात्र त्यास सोनिया आणि राहुल यांनीच चाप बसविला होता. राहुल गांधी यांनी मनात आणले असते तर ते २००४ सालीच ते पंतप्रधान झाले असते. २००४ ते २०१४ या काळात कधीही त्यांना पंतप्रधान होता आले असते किंवा सत्तेचे महत्त्वाचे एखादे पद घेता आले असते. सत्ता हे समाजपरिवर्तन करण्याचे महत्वाचे साधन असले तरी ते एकमेव साधन आहे असे नाही, असे राहुल यांचे मत त्यांनी काही वेळा व्यक्त केले आहे.
२००४च्या पराभवानंतर भाजप आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या छोट्या-मोठ्या संघटनानी आपल्या सर्व प्रचार यंत्रणांना काँग्रेस पक्षापेक्षा नेहरू – गांधी परिवारास लक्ष करून आपली रणनीती आखायला सुरवात केली. पंतप्रधान मनमोहनसिंग किंवा काँग्रेस सरकारमधील मंत्र्यापेक्षा राहुल गांधी यांची बदनामी हा एककलमी कार्यक्रम २००४ ते २०१४ या काळात राबवला जात होता. लोकांमध्ये थेट मिसळणे त्यांच्याशी बोलण्याचा स्वतः असुरक्षिततेच्या सावटाखाली असतानाही राहुल गांधी या काळात सातत्याने प्रयत्न करीत राहिले. राहुलची ही प्रत्येक कृती जोखमीची असूनही अधिकाधिक जनतेत जाऊन त्यांच्या समस्या शक्य तितक्या समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहुलनी केला. कुणी त्याला स्टंट किंवा पब्लिसिटी स्टंट म्हणत असेल पण पब्लिसिटी स्टंटसाठी कधी कोण जिवाची बाजी लावत नाही. आणि तेही ज्या राहुलने आजी आणि वडिलांचा दहशतवादी हल्ल्यात झालेला मृत्यू पाहिला आहे, हेही इथं लक्षात घेण्याची गरज आहे. राहुलनी युवकांशी संवादावर भर ठेवला. त्यांनी दलिताच्या झोपडीत मुक्काम केला, त्यांच्याबरोबर जेवण घेतले. युवकांच्या श्रमदान शिबिरात ते सहभागी झाले. लोकल रेल्वेने प्रवास केला. यात त्यांची तळागाळातल्या माणसांचे जगणे समजून घेण्याची प्रामाणिक कृती दिसून येते. यातूनच २०१४ च्या निवडणुकीवेळी त्यांनी ‘मै नहीं हम’ अशी घोषणा देत भारताच्या लोकशाहीला व्यापक आणि अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न केले.
युवक काँग्रेसमध्ये निवडणुकांमार्फत लोकशाही पद्धतीने पदाधिकारी निवडण्याची त्यांचा प्रयत्न असेल किंवा पक्षाचे उमेदवार कार्यकर्त्यामधून निवडण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न हा पक्षांतर्गत ही निकोप, व्यापक आणि खुली लोकशाही पद्धत रूढ करण्याची त्यांची पराकाष्ठा होती. राहुल गांधी यांचे हे सर्व प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी काँग्रेसमधील स्थितीवादी, भाजप आणि संघ यांची अजस्त्र प्रचार यंत्रणा आणि याचकाळात अण्णा हजारे यांच्या तथाकथित लोकपाल प्रश्नावरील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून भारतभर विकोपाला गेलेला काँग्रेसविरोध यांनी देशभर काँग्रेस आणि पर्यायाने राहुल गांधी यांच्या विरोधात जबरदस्त माहोल बनविला गेला. भाजपने याचवेळी नरेंद्र मोदी यांच्या रूपाने फॅसिस्ट विचाराच्या नेतृत्वाला आपले पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले.
२०१० नंतर देशभरात सोशल मिडियाने मोठ्या प्रमाणावर समाजाच्या सर्व स्तराना प्रभावित करायला सुरवात केली. फेसबुक, व्हॉटसअॅप, ट्वीटर, इन्स्टाग्राम या माध्यमाबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाने देशात वेगाने आपला व्यापक प्रभाव दाखवायला सुरवात केली. २०१४च्या लोकसभा निवडणुकापूर्वीचे अण्णा हजारे यांचे लोकपाल प्रश्नावरील तथाकथित भ्रष्टाचारविरोधी आंदोलन हे सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने व्यापक केले. या आंदोलनाला यश मिळवून देण्यासाठी संघ परिवाराने आपली सर्व यंत्रणा पडद्यामागून वापरली. गांधी-नेहरूवादाला शत्रू मानणारी विचारयंत्रणा वेगवेगळ्या प्रकारचे कुजबुज तंत्र, बदनामी सत्र, अपप्रचार, धार्मिक आणि जातीय उन्माद याद्वारे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते २०११ पर्यंत काम करतच होती. या विचारप्रवाहाला दिल्लीतल्या केंद्रसत्तेची मिळालेली पहिली संधी ही त्यांना समाजवाद्यांमार्फत १९७७च्या आणीबाणीनंतर प्राप्त झाली.
१९६९ आणि १९७८ मध्ये काँग्रेसने इंदिरा गांधी यांना पक्षातून काढून टाकले होते. १९९८ मध्ये काँग्रेसच्या अस्तित्वाची चर्चा होत होती. १९६९, १९७८ आणि २००४ या काळात इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांनी काँग्रेसला केवळ आपले नेतृत्व दिले नाही तर त्यास सत्तेवरही आणून दाखविले. या त्यांच्या यशात त्यांना स्वातंत्र्य चळवळीचा आणि गांधी – नेहरू यांच्या अलौकिक वैचारिक वारशाचे एक प्रतिरूप म्हणून जनता गांधी- नेहरू परिवाराकडे पाहते हे एक महत्त्वाचे कारण आहे. असा अलौकिक वारसा इतर कोणत्याही संघटनेकडे किंवा राजकीय परिवाराकडे नाही. यामुळेच गांधी-नेहरूंच्या नावाचं अस्तित्व नष्ट केल्याशिवाय संघ आणि भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निर्णायक विजय मिळवू शकत नाही हे वास्तव सत्य मोदी आणि भाजप यांच्या लक्षात आले आहे. यातूनच या परिवारातील प्रत्येक सदस्याला अगदी मोतीलाल नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत बदनाम करत राहायचे ही सरळ सरळ रणनीती आहे. २०१४ आणि २०१९ ला मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षासमोर काँग्रेस संपूर्णपणे पराभूत झाली; भाजप-संघाच्या सर्व यंत्रणांनी नेहरू आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध एकाच वेळी सर्व प्रकारच्या प्रचारमाध्यमांतून बदनामी युद्ध छेडलेले असतानाही सातत्याने राहुल गांधी एकाकीपणे या सर्वासमोर उभे राहिले आहेत.
१८८५मध्ये स्थापना झालेला काँग्रेस आपल्या १३५ वर्षाच्या इतिहासात सर्वात कठीण अस्तित्वाच्या संघर्षातून प्रवास करीत आहे. ६२ वर्षे ब्रिटीश सत्तेशी लढताना काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ७३ पैकी ५६ वर्षे काँग्रेस केंद्रात सत्तेत राहिली आहे. उपरोधिकपणे मोदी काँग्रेसच्या राजवटीचा कधी ६० साल तर कधी ७० साल असा उल्लेख करीत असतात. मोदींचे हे गणित पाहता ते बिगर काँग्रेस तसेच अगदी वाजपेयी यांच्या कार्यकाळातही काही प्रगती झालेली नाही असे प्रतित करीत असल्याचे दिसते. मोदींच्या ५६ इंची छातीच्या कारभाराला काँग्रेसच्या ५६ सालच्या राजवटीशी सतत तुलनेतून मात्र जावेच लागेल. १९७८ -१९८० याकाळात काँग्रेसने कात टाकताना सर्व स्तरावर नवे नेतृत्व पुढे आणले. त्या नेतृत्वाची फळी अजूनही काँग्रेसमध्ये सक्रिय आहे. यातूनच उत्तरोत्तर काँग्रेस सरंजामदारीने ग्रस्त होत गेली आणि तिला जडत्व प्राप्त झालं. नेहरूंच्या प्रागतिक आणि पुरोगामी असलेल्या परंपरेचा काँग्रेसला उत्तरोत्तर विसर पडत गेला. २००४ नंतर काँग्रेसमधील निष्ठावंत म्हणजे ‘शोले’ चित्रपटातील असरानीच्या एका संवादाची आठवण करून देतात. ज्यात असरानी ‘हम अंग्रेजों के जमाने के जेलर है’, असे म्हणतो तसे हे निष्ठावंत ‘ हम इंदिराजी के जमाने के वफादार है’ असे म्हणत सोनिया गांधींनी प्रयत्न करून मिळविलेल्या सत्तेच्या पदावर दावा सांगताना आढळतात.
काँग्रेस पक्ष हा एक वटवृक्ष आहे असे काँग्रेसजन सतत म्हणत असतात. काँग्रेस हा जरी वटवृक्ष असला तरी या वटवृक्षाला फुलण्याचे खाद्य हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील वैचारिक, नैतिक, मूल्याधिष्ठित अशा वैश्विक संस्काराचे आहे. ही अलौकिक वैचारिक आणि नैतिक परंपरा स्वातंत्र्य चळवळीत विकसित झालेली आहे. या स्वातंत्र्य चळवळीतील जडणघडणीचे संचित म्हणजे जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व आणि भारतीय संविधान आहे. नेहरूंच्या सर्वव्यापक नेतृत्व कौशल्यामुळे आणि त्यांच्या देशाच्या प्रगती संदर्भातील दूरदृष्टीमुळेच त्यांच्यावर देशाच्या पहिल्या पंतप्रधानपदाची जबाबदारी आली. महात्मा गांधी यांनी सुद्धा त्यांना अधिकृतपणे आपले उत्तराधिकारी घोषित केले होते. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी या परंपरेला न्याय देण्याचा सर्वोपरी प्रयत्न केला आहे. १९९८मध्ये राजकारणात प्रवेश करताना आपल्या दुसऱ्याच जाहीर सभेत सोनिया गांधी यांनी आपल्या कुटुंबावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना आव्हान दिले होते. या आव्हानानंतर सुद्धा गेल्या कित्येक वर्षात गांधी परिवारावरील एकही भ्रष्टाचाराचा आरोप विरोधक आजतागायत सिद्ध करू शकले नाहीत. मात्र बदनामीची अव्याहत मोहीम सुरू आहे. काँग्रेस हा वटवृक्ष असला तरी त्याचे वैचारिक बीज हे स्वातंत्र्य चळवळीतील विकसित वैचारिक परंपरा आणि त्याचे गांधी परिवार हे प्रतीक आहे. या परंपरेचा पाईक म्हणून गांधी परिवार आजही लोकांत स्थान प्राप्त करून आहे. याच मुळे आजही भारतीय जनता गांधी परिवाराकडे पुनःपुन्हा आकर्षित होते.
कॉंग्रेस या वटवृक्षाचे जैविक बीज हे गांधी कुटुंब पर्यायाने राहुल गांधी आहेत. काँग्रेस हा वटवृक्ष देशातील समस्त जनतेला गेली १३५ वर्षे दिशादर्शक राहिला आहे. हे त्याचे प्रबळ विरोधकही मान्य करतात. या वटवृक्षाच्या सावलीत असंख्य नेतृत्वाचा उदय आणि विस्तार झाला आहे. या वटवृक्षाच्या संघर्षातून असंख्य काँग्रेस जनांनी या वटवृक्षाला लागणाऱ्या सत्तेच्या फळाची गोडी अनुभवली आहे. हे काँग्रेसजन म्हणजे मुख्यत: या विशालकाय वटवृक्षावर राहुन सत्तेची ऊब अनुभवणारे पक्षी राहिले आहेत. या पक्षातील कित्येकांनी या वटवृक्षावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. मात्र हा वटवृक्ष स्वातंत्र्यानंतर सातत्याने नेहरू, गांधी कुटुंबाच्या त्यागावरच उभा राहिला आहे. पण सत्ता आणि संपत्ती अशी लोभी काँग्रेस जनांची वाळवी या वटवृक्षाला सातत्याने लागत राहिली आहे. ही वाळवीच काँग्रेसला आतून पोखरून कमजोर आणि शक्तिहीन बनविते. मात्र गांधी परिवाराच्या जैविक बीजात या वटवृक्षाला परत पालवी फुटण्याची शक्ती आहे. राहुल गांधी या परंपरेचे पाईक असल्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे. यामुळेच संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीचा वारसा मुळासकट नष्ट करण्याचे प्रयत्न होत आहेत. नियोजन आयोग संपुष्टात आणणे, तीन मूर्ती भवनची संरचना बदंलणे, ३७० कलम रद्द करणे, CAAद्वारे १९४७ च्या फाळणीचे भूत परत जन्माला घालणे हे त्या व्यापक प्रयत्नांचा भाग आहे. हे ही प्रयत्न कमी ठरल्यास गांधी परिवाराची SPG सुरक्षा कमी करण्यात आली. जर नेहरू – गांधी परिवार बदनाम करूनही संपुष्टात आणता आला नाही तर त्यांना फॅसिस्ट शक्ती जीवानिशी संपवू शकतात. महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या देशातील सांप्रदायिक शक्तींनीच केल्या आहेत. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या करणाऱ्या शक्तींचे गांधी परिवाराशी आद्य शत्रुत्व आहे.
भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या विषारी प्रचार यंत्रणा यांनी निर्माण केलेली मोदींच्या नेतृत्वाची काल्पनिक प्रतिमा आणि त्याच वेळी त्यांनी मलिन केलेली राहुल गांधी यांची प्रतिमा या सर्वांच्या दुष्टचक्रात राहुल गांधी यांची खरी ओळख पूर्ण नष्ट झाली आहे. भाजपच्या प्रभावी प्रचार आणि बदनामी मोहिमेपुढे राहुल गांधी आणि काँग्रेसचा निभाव लागणं अशक्य होते. भाजपच्या आयटी सेलने सोशल मीडियाद्वारे या अपप्रचाराला व्यापक स्वरूप दिले. २०१४ नंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सत्तेच्या प्रभावाने गोदी मीडियात झालेले परिवर्तन राहुल गांधी आणि नेहरू यांची प्रतिमा मलिन करण्याच्या मोहिमेला अधिक गती देत राहिले. राहुल गांधी हे एक बुद्धू, पप्पू, राज्य करायला योग्य नसलेले, भारतातील राजकीय घराणेशाहीचे प्रतीक नेतृत्व आहे हे लोकांवर सतत बिंबविण्यात आले.
नरेंद्र मोदींनी २०१४ व २०१९ मध्ये लोकसभेत एकहाती प्रचंड बहुमत मिळविले. नरेंद्र मोदी यांनी २०१२ पासूनच अत्यंत हायटेक प्रचारतंत्राचा वापर केला. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपने घोषित करताच मोदींनी स्वतःला वेळोवेळी नमो, चायवाला, फकिर, चौकीदार, माँ गंगा का बेटा, यु.पी. का गोद लिया बेटा, स्वयंसेवक, प्रधानसेवक, माँ भारती का लाल, पठाण का बच्चा, पिछडी जात का, आज का सरदार, विकासपुरुष, गरीब माँ का बेटा, ५६ इंच का सीनेवाला, कामदार यासह गुजरात का बब्बर शेर अशा असंख्य विशेषणांनी स्वतःला जनतेसमोर प्रस्थापित करायला सुरवात केली. यातील असंख्य विशेषणे त्यांनी स्वतःच स्वतःसाठी प्रथम वापरल्याचे दिसून येते. हे करतानाच त्यांनी आपल्या विरोधातील राहुल गांधीचा उल्लेख शहजादा, पप्पू, युवराज, आपण कामदार व ते नामदार, राहुलबाबा, सोने की चमच लेकर पैदा हुआ, खानदानी, माँ का लाडला, विदेशी नस्ल का अशारितीने सातत्याने करीत सामान्य जनतेत राहुलची प्रतिमा मलिन करण्याचा व स्वतःची प्रतिमा अधिक उठावदार करण्याचा प्रयत्न केला.
मात्र राहुल गांधी यांनी प्रमुख विरोधी पक्षनेत्याच्या प्रतिमेला साजेसे वर्तन करत त्यांचा उल्लेख कायम मोदीजी असा केला. (केवळ राफेल भ्रष्टाचारावरून चौकीदार चोर है ही घोषणा दिली व ती सिद्ध करण्याची तयारी दाखविली). मोदींच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या मणिशंकर अय्यर, सॅम पित्रोदा यांसारख्या आपल्या पक्षातील नेत्यांना असे न करण्याची समजही दिली.
लोकांना सत्य बोलणारा आणि समस्येच खरं स्वरूप सांगणारा नेता नको असतो. याउलट भुलवणारा सातत्याने अच्छे दिन, सब चंगासी है, भारत जागतिक महासत्ता, विश्वगुरु बननेवाला है असे म्हणत काल्पनिक इतिहासात रममाण करणारा फॅसिस्ट मानसिकतेचा समाजाला धार्मिक आणि आर्थिक स्तरावर विभागणारा मसीहा हवाहवासा वाटतो. मात्र वास्तवाचे चटके बसल्यावर खरा समाजाभिमुख आणि जनतेची तळमळ असणारा नेताच उपयोगी पडतो. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसचा साधा कार्यकर्ता असलेला राहुल गांधी यांना भारतातील समस्येवर एखादे ट्विट केले, पत्रकार परिषद घेतली, मुलाखत दिली तर मोदींची प्रशासकीय यंत्रणा, पीएमओ कार्यालय, भाजपचा आयटी सेल, सर्व मंत्रिगणांना त्याविरोधात मैदानात उतरावे लागते. पंतप्रधानांना नाव न घेता लोकसभेत केवळ राहुल गांधीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ९० मिनिटाच्या आपल्या भाषणातील ४० मिनिटे खर्ची करावी लागतात.
नेहरू हे खरे समाज क्रांतिकारक होते, त्यांच्या विचारात सामान्य माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवण्याची ताकद होती. नेहरूंमुळे भारत स्वातंत्र्यानंतर वैज्ञानिक दृष्टीकोन घेऊन एक आर्थिक, लष्करी आणि सामारिक शक्ती म्हणून पुढे आला. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानविरूद्ध झालेल्या युद्धात तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. राहुल गांधी आणि त्यांच्या पूर्वजांविरोधात केलेला प्रचार हा आता आपल्यावर उलटेल याची संघसत्तेला भीती आहे. म्हणून राहुल गांधींना खोडत राहणे ही त्यांची अपरिहार्य गरज बनली आहे. राहुल गांधी मजबूत होणे, कॉंग्रेसमधील स्थितिवादी कमजोर होणे आणि इतर विरोधक नामोहरण होणे ही आज देशाची गरज आहे.
राहुल गांधी कितीही बदनामी झाली तरी ते जसे आहेत तसेच लोकांना सामोरे जातात. हा त्यांचा पारदर्शीपणा आहे. राहुल हे नेहरू-गांधी घराण्याचे आहेत, मात्र त्या घराण्याच्या महान अशा वैचारिक, त्यागी आणि अलौकिक परंपरेचे पाईकही आहेत. २०१९च्या निवडणुकात राहुल यांचा अमेठी या गांधी परिवाराच्या पारंपरिक मतदारसंघातही पराभव झाला. हा पराभव २००४ मधील रामविलास वेदान्ती यांच्यापासून अमेठीत त्यांच्याविरोधात भाजप करीत असलेल्या सर्वंकष बदनामी मोहिमेचा परिपाक आहे. याचवेळी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून ते चार लाखपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले. आज राजसत्ता निरंकुश, निर्दयी आणि नैतिकदृष्ट्याही बेलगाम झाली आहे. सत्तेच्या या विषारीपणाची दाहकता जनतेला आज सतावत असताना सत्ता हे एक विष आहे, त्यापासून दूर राहून या सत्तेचा कायम समाजाभिमुख राहून लोककल्याणासाठी वापर करण्याचा आपली आई सोनिया गांधी यांचा मूलमंत्र स्वीकारत राहुल गांधी यांचा राजकीय प्रवास सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांना सोनिया गांधी यांनी दिलेला ‘सत्ता हे विष आहे’ याचा विपर्यास करीत सत्ता हे जर विष असेल तर ते आम्हाला ही प्राशन करायचे आहे असे म्हणून समाजात धर्म, जात, भाषा आणि प्रांत यांच्यावरून एक विषारी दरी निर्माण करणारी व्यवस्था आज सत्तेत आली आहे. सत्तेपासून दूर राहण्याचा राहुलचा विरक्त स्वभाव आणि सत्तापिपासू फॅसिस्ट विचारधारा यांच्यातील हा संघर्ष राहुलच्या पराभवा नंतरही संपत नाही. राहुलचा राजकीय पराभव झाला असला तरी अद्यापही नैतिक आणि वैचारिक पराभव आपण करू शकलो नाही याचे शल्य मोदी आणि संघ सत्तेला आहे. आपला झालेला विजय हा आपल्या विचारधारेचा नसून आपण जो धार्मिक उन्माद तयार केला आहे तसेच काँग्रेस आणि राहुल यांची प्रतिमा मलिन केली आहे त्याचा तो विजय आहे याची जाणीव मोदी आणि भाजपला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची व्यापक आणि सतत बदनामी करणे, त्यांचा सर्वस्तरावर द्वेष करणे, त्यांना सतत अपमानित करणे, दूषणे देणे, उपहासात्मक बोलणे याचा वापर सत्तेला करावा लागत आहे. यातच राहुल गांधी यांचे यश आहे.
डॉ. प्रा. प्रमोदकुमार ओलेकर, हे आष्टा येथील आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज येथे इतिहास विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.
COMMENTS