शेतकरी आंदोलनाला पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने पाठींबा दिल्यानंतर तिला टूलकिट पुरविल्याचा आरोप करीत देशविरुद्ध कट केल्याचा आरोप ठेवत दिल्ली पोलिसांनी बंगळुरूच्या २२ वर्षांच्या दिशा रवी या पर्यावरण कार्यकर्तीला अटक केली. तिने तुरुंगाचा बाहेर आल्यावर नुकतीच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तिचा हा श्रीकांत घुले यांनी केलेला अनुवाद.
जे वास्तविक आहे ते फारच अवास्तव वाटतं. दिल्लीचं धुकं, सायबर पोलीस स्टेशन, दीनदयाळ रुग्णालय, पतीयाळा हाऊस कोर्ट आणि तिहार तुरुंग. वर्षभरात कोणी मला विचारलं असतं, की येणाऱ्या ५ वर्षात मी स्वत:ला कुठं पाहतं? तर, माझं उत्तर तुरुंग असं कधीचं राहिलं नसतं, मात्र मी इथं आहे. मला त्या ठराविक वेळी कसं वाटलं होतं, हे मी सतत स्वत:ला विचारत आहे. मात्र मला उत्तर मिळालं नाही. मला जर जिवंत राहायचं असेल, तर माझ्यासोबत असं काहीचं घडलं नाही, यावर मला स्वत:ला विश्वास ठेवावा लागेल. १३ फेब्रुवारी २०२१ ला पोलिसांनी माझ्या घराचा दरवाजा ठोठावलाच नाही, पोलिसांनी माझा मोबाईल आणि लॅपटॉप घेतलाच नाही, मला अटक झालीच नाही, पोलिसांनी मला पतीयाळा हाऊस कोर्टात हजर केलंच नाही, रुममध्ये घुसण्यासाठी मीडियाच्या लोकांनी प्रयत्न केलेच नाहीत.
जेंव्हा मी न्यायालयात उभी होते, तेंव्हा अधाशासारखी मी माझ्या वकिलांना शोधत होते. त्यानंतर मला वास्तव स्विकारणं अपेक्षित होतं, मला स्वत:लाच माझा बचाव करणं भाग होतं. मला न्यायिक मदत मिळणार आहे की नाही, याबाबत मला काहीच कल्पना नव्हती. जेंव्हा न्यायाधीश मला विचारतील तुम्हाला काही बोलायचं आहे का, तेव्हा मी माझ्या डोक्यात असलेलं सर्व काही सांगणार, असं मी ठरवलं. मात्र. त्यापूर्वीच माझी ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी झाली.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या स्वायत्ततेचं उल्लंघन केलं जात होतं, यात काहीच आश्चर्यजनक राहिलं नव्हतं. बातम्यांमध्ये माझी छायाचित्रं प्रसारित होत होती, मला आधीच दोषी ठरवून टाकण्यात आलं होतं, कायद्यांच्या न्यायालयांनी नव्हे तर टीआरपीसाठी झटणाऱ्या माध्यमांच्या स्क्रीन्सनी. मला विचलित करण्यासाठी काय केलं जात आहे, याची तिळमात्र कल्पना नसलेली मी तिथं बसून होते. ५ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर मला १९ फेब्रुवारी २०२१ रोजी आणखी ३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. तिहार तुरुंगातील प्रत्येक दिवसाच्या, प्रत्येक तासाच्या, प्रत्येक मिनिटातील, प्रत्येक सेकंदाची मला जाणीव होत होती. पृथ्वीवरील सर्वात मूलभूत अशा पर्यावरण या घटकाविषयी काम करणं गुन्हा आहे का, तुरुगांत असताना मला याचं आश्चर्य वाटत होतं. काही थोड्याफार लोकांच्या लालची वृत्तीची किंमत सर्वसामान्य करोडो लोकांनी का मोजावी? आणि या करोडो लोकांकडून त्या मोजक्या लोकांना फायदा होतोय का यावरच त्या करोडो लोकांच्या जिवाची किंमत ठरणार. आपण वेळीच या लालची वृत्तीला थांबवण्याचे प्रयत्न केले नाहीत, तर आपण आपल्या विनाशाकडे वाटचाल करू.
कोठडीत असताना मला हे प्रकर्षानं जाणवलं, की अनेक लोकांना पर्यावरण किंवा क्लायमेट अॅक्टिव्हिझमबद्दल थोडीफार माहिती आहे किंवा काहीच माहिती नाही. माझे आजोबा शेतकरी होते, त्यामुळे माझ्यात नैसर्गिकरित्या पर्यावरणवाद रुजलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईमुळे काय त्रास होतो याची मी साक्षीदार आहे. मात्र, वृक्षलागवड आणि क्लिनअप्सचं माझं काम काही प्रमाणात कमी झालं. ते महत्त्वाचंच होतं मात्र जगण्यासाठी संघर्ष करण्याइतकं नाही. क्लायमेट जस्टिस हे अंतर्गत समानतेशी निगडीत आहे. प्रत्येकाला स्वच्छ हवा, अन्न आणि पाणी सहज उपलब्ध होणं ही मूलभूत गोष्ट आहे. प्रिय मित्र नेहमी म्हणतो, पर्यावरणीय न्याय हा केवळ श्रीमंत किंवा गोऱ्या लोकांचा विषय नाही, तर ही पीडितांच्या बाजूची लढाई आहे. ज्यांच्या नद्या प्रदूषित झाल्यात, ज्यांच्या जमिनी हडप केल्यात, प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत ज्यांची घरं वाहून जातात आणि जे लोक आपल्या मूलभूत मानवी हक्कांसाठी न थकता लढा देत आहेत, त्यांची ही लढाई आहे. ज्यांना मोठ्या समूहानं दाबलंय आम्ही त्यांच्या बाजूने लढत आहोत. या सर्व पीडितांना व्हॉईसलेस ठरवणं हे सवर्णांना सोपं जातं.
लोकांकडून मिळणारं निस्वार्थ प्रेम मला शक्ती देतं. माझ्यासाठी उभे राहिलेल्या सर्वांची मी ऋणी आहे. गेले काही दिवस माझ्यासाठी अत्यंत त्रासदायक होते. पण आता मला कळतंय की मी एका विशेषाधिकार प्राप्त पार्श्वभूमीतून आहे. मला योग्यप्रकारे कायदेशीर मदत मिळाली पण त्यांचं काय ज्यांना अशी मदत मिळत नाही? ज्यांच्या कथा जगाला माहिती नाहीत अशा तुरुंगात असणाऱ्यांचं काय? जगभरात वेळोवेळी असमानतेची वागणूक मिळत असणाऱ्यांचं काय? आपल्या सर्वांच्या सामूहिक मौनामुळे हे सर्वजण आजही शारीरिकदृष्ट्या तुरुंगात आहेत. मात्र त्यांचे विचार आपल्याला एकत्रितपणे विरोध करण्यासाठी जिवंत आहेत. विचार कधीच मरत नाहीत आणि सत्य हे कितीही वेळ लागला तरी शेवटी बाहेर येतेच.
‘आपल्याला दररोज धमक्या येतील, दररोज आवाज दाबण्याचा प्रयत्न होईल, मात्र आपण ही लढाई अशीच सुरू ठेवणार’ – सोनी सोरी
पर्यावरण संरक्षणासाठी आजही लढणारी,
दिशा. ए. रवी.
अनुवाद – श्रीकांत घुले
COMMENTS