नवी दिल्ली : वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात भाषण करताना भारताचा पूर्व भाग देशापासून तोडायला हवा, असे विधान करणारा जेएनयूतील पीएचडी क
नवी दिल्ली : वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात भाषण करताना भारताचा पूर्व भाग देशापासून तोडायला हवा, असे विधान करणारा जेएनयूतील पीएचडी करणारा विद्यार्थी शार्जिल इमाम मंगळवारी जेहानाबाद येथे दिल्ली पोलिसांना शरण गेला. त्याला दिल्लीत आणले असून आसाम, उ. प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणिपूर व दिल्ली अशा ५ राज्यांनी शार्जिलवर १६ जानेवारी रोजी त्याने अलिगड विद्यापीठात केलेल्या वादग्रस्त भाषणावरून देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
शार्जिलच्या अटकेबाबत दिल्ली पोलिस उपायुक्त राजेश देव यांनी शार्जिलला जेहानाबादहून अटक केली अशी माहिती दिली. शार्जिलला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी मुंबई, पाटणा, दिल्ली येथे काही ठिकाणी छापे टाकले होते. त्या अगोदर शार्जिलच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून माहिती मिळवली होती.
दरम्यान, शार्जिलवर लावण्यात आलेले देशद्रोहाचे गुन्हे चुकीचे असल्याचे मत त्याच्या वकिलांनी मांडले आहे. शार्जिलला देशातील न्यायव्यवस्थेवर विश्वास असून तो तपासयंत्रणेला सर्वते साहाय्य करत असल्याचे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे. तर दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक अपूर्वानंद यांनी केवळ भाषण किंवा लेखन करण्यावर पोलिस देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू शकत नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक खटल्यावर आपले मत व्यक्त निदर्शनास आणून दिले. एखाद्याच्या अशा कृतीने समाजात हिंसा निर्माण झाली तर पोलिस देशद्रोहाचा गुन्हा संबंधितांवर दाखल करू शकतात, पण शार्जिलबाबत असे काही झालेले नाही, असे मत प्रा. अपूर्वानंद यांनी व्यक्त केले आहे.
१६ जानेवारी रोजी अलिगड विद्यापीठातील आपल्या भाषणात सीएएच्या मुद्द्यावर बोलताना शार्जिल इमामने देशातील कोणतीही राजकीय आघाडी मुस्लिमांच्या बाजूने उभी राहणारी नाही. राज्यघटना मुस्लिमांची सुटका करू शकेल असे समजणेही आत्महत्या करण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत मुस्लिमांमध्ये निर्माण झालेला संताप वापरला गेला पाहिजे, अशी विधाने केली होती. इमामने असेही म्हटले की, आपल्यामागे पाच लाख लोक असतील तर आपण ईशान्येचा भाग कायमचा नाही तरी किमान एक-दोन महिने भारतापासून वेगळा करू शकतो. आसाम और इंडिया कटके अलग हो जाये, तभी ये हमारी बात सुनायेंगे. आसाम हा भारताला जोडणारा भाग आहे व तेथे आपली लोकसंख्या अधिक असल्याने आपण असे करू शकतो, असे विधान इमामने केले होते.
आपल्या विधानाबाबत ‘द संडे एक्स्प्रेस’ला स्पष्टीकरण देताना इमामने आपण रस्त्यांची नाकाबंदी करण्याबाबत बोललो होतो. ही नाकाबंदी आपण शांततामय मार्गाने करावी, चक्काजाम करावा असे आपले म्हणणे असल्याचा खुलासा केला होता.
इमाम हा जेएनयूमध्ये आधुनिक भारत या विषयात पीएचडी करणारा विद्यार्थी होता त्या अगोदर त्याने आयआयटी मुंबईतून कम्प्युटर सायन्स शाखेत पदवी घेतली आहे. इमाम दिल्लीतल्या शाहीनबाग आंदोलनातही काही काळ होता.
मूळ बातमी
COMMENTS