शिक्षित व श्रीमंत कुटुंबात घटस्फोट जास्त – सरसंघचालक

शिक्षित व श्रीमंत कुटुंबात घटस्फोट जास्त – सरसंघचालक

अहमदाबाद : अधिक शिक्षणाने व पैशाने अहंकार येतो आणि त्यामुळे शिक्षित व सधनसंपन्न कुटुंबात घटस्फोटाचे प्रमाण अधिक असल्याचे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमामध्ये व्यक्त केले. ते अहमदाबाद येथे संघस्वयंसेवकांना संबोधित करत होते. त्यांच्या भाषणाचे एक पत्रक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जाहीर केले आहे.

स्वयंसेवकांसमोर हिंदू समाजाविषयी मते मांडताना भागवतांनी हिंदू समाजात वाढत्या घटस्फोटांच्या संख्येबाबत काळजी व्यक्त केली. समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले असून सधनवर्गही वाढला आहे, त्यामुळे या वर्गात अहंकार दिसून येतो. काही गोष्टींमुळे कुटुंबात वाद निर्माण होतात आणि त्यातून घटस्फोट घडून येतो. हे प्रमाण शिक्षित व सधन वर्गात आलेल्या अहंकारामुळे अधिक दिसून येत असले तरी त्याचे परिणाम उर्वरित समाजावर होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

भारताला हिंदू समाजाशिवाय पर्याय नाही आणि हिंदू समाजाला कुटुंबासारखे राहण्याशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले.

घटस्फोटाच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर भागवतांनी संघस्वयंसेवकांना संघात आपण काय कार्य करतोय याची माहिती कुटुंबियांना द्यावी असाही सल्ला दिला. आपल्या कुटुंबातील स्त्रीयांना पुरुषांपेक्षा अधिक काम करावे लागते. आजच्या समाजाची जी स्थिती दिसत आहे, त्यामागे एक कारण स्त्रीयांना घरात बसून ठेवणे हे आहे, असेही ते म्हणाले.

हिंदू समाजाने सर्व सद्गुण अंगिकारले पाहिजे व त्याने संघटीत राहिले पाहिजे. हा समाज केवळ पुरुषांचा नको तर त्यात स्त्रियांही असण्याची गरज आहे. मी हिंदू आहे पण मी अन्य पंथांच्या श्रद्धांचाही आदर करतो. पण माझ्या श्रद्धांवर माझा विश्वास असून माझ्यावर संस्कार माझ्या आईकडून झाले आहे. ही मातृशक्ती आपल्याला संस्कार देते असे ते म्हणाले.

समाज हा कुटुंबांनी निर्माण होतो आणि समाजाचा अर्धा भाग हा स्त्रियांचा असतो. त्यांच्याशिवाय कुटुंब संस्था अपूर्ण असून स्त्रियांना अज्ञानापासून मुक्त करणे ही आजची गरज आहे. जर आपण समाजाची कदर करत नसू तर समाजच नव्हे तर कुटुंबव्यवस्थाही तगू शकणार नाही, असेही भागवत म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS