दिवाळी अंकांतली चार मोठी माणसं

दिवाळी अंकांतली चार मोठी माणसं

यंदाच्या दिवाळी अंकात माणसाला समृद्ध करणाऱ्या युवाल हरारी, नोम चॉम्सकी, सिमोर हर्श आणि जॉर्ज फर्नांडिस या चार माणसांची प्रोफाईल्स आहेत.

भारतीय राष्ट्रवादाची ओळख : भारत अमुचि माता
व्हिलेज डायरी – भाग ६
अर्थ अभिकेंद्री -‘खेळ खेळत राहतो उंबरा’ विषयीची एक नोंद 

परिवर्तनाचा वाटसरू या अंकात नोम चॉम्सकी आहेत.
चॉम्सकीनी आता नव्वदीत प्रवेश केला आहे.
त्यांनी भाषा या विषयावर संशोधन केलं आहे. भाषा आत्मसात करण्याची क्षमता माणसाच्या मेंदूत जन्मतः असते, मूल परिसरातून मिळणाऱ्या अनुभवातून भाषेचं सोयिस्कर व्याकरण शिकतं, जीवसृष्टीत माणूस या एकाच जीवाकडं भाषा नावाची गोष्ट आहे, हा चॉम्सकी यांचा सिद्धांत. हा सिद्धांत त्यांनी राजकारणात सर्व माणसं मूलतः सारखीच असतात हे सांगण्यासाठीही वापरला.

नोम चॉम्सकी

नोम चॉम्सकी

चॉम्सकी गाजले आणि आजही चर्चेत असतात ते त्यांच्या राजकीय भूमिकांमुळं. सत्ता, नागरीकांचं- वैचारिकांचं स्वातंत्र्य, सत्तेची नैतिकता हे मुद्दे त्यानी लावून धरले. जनरल फ्रॅंकोच्या फॅसिझमला विरोध करत चॉम्सकी यांचे राजकीय विचार आकारत गेले. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं हिरोशिमा-नागासाकी या शहरांवर अणुबाँब टाकले हे कृत्य अमानुष आहे, युद्ध हे दोन सैन्यामधे असतं, युद्धात नागरिकांना मारायचं नसतं हा मुद्दा त्यांनी लावून धरला.

अमेरिकेनं वियेतनामवर केलेलं आक्रमण आणि तिथे केलेली अमानवी कृत्यं यावर त्यांनी झोड उठवली. त्यानंतर वेळोवेळी अमेरिकेनं जगातल्या इतर देशांत घुसणं, तिथली सरकारं पाडणं असे उद्योग केले. अमेरिका हा एक एक्सेप्शनल देश आहे असं अमेरिकन जनतेला वाटतं आणि त्यावरच अमेरिकेचं परदेश धोरण आणि युद्धखोरी आधारलेली आहे असं चॉम्सकी यांनी मांडलं.

ओसामा बिन लादेनला मारलं हा खून होता, ओसामाला पकडून त्याच्यावर खटला भरायला हवा होता, न्यूरेंबर्ग खटल्यासारखा, त्याद्वारे दहशतवाद्यांचे सर्व उद्योग जगासमोर आणायला हवे होते, त्यातून  अमेरिका हा देश कायद्यानुसार वागतो असं  सिद्ध झालं असतं, असं चॉम्सकी म्हणत होते.

चॉम्सकींची वैचारिक बंडखोरी अमेरिकन सरकारं, राजकारण आणि अमेरिकन जनतेला आवडत नाही, चॉम्सकी कायम टीकेचे धनी होत असतात.

बहुतेक वेळा अमेरिकेतले पुढारी चॉम्सकी यांना देशद्रोही असं म्हणतात.

मौजेच्या अंकात सिमोर हर्श आहेत.
सिमोर हर्शनी ऐंशीत  प्रवेश केलाय, ते पत्रकार आहेत.

सिमोर हर्श

सिमोर हर्श

सत्य लोकांसमोर मांडलं पाहिजे, मग ते सरकारला आणि जनतेला आवडो वा न आवडलो. प्रत्येक माहिती व विधान तपासलं पाहिजे; आई म्हणाली की तिचं तुमच्यावर प्रेम आहे तर ते विधानही प्रत्यक्ष घटनांमधून तपासून पाहिलं पाहिजे. अशी दोन दणदणीत विधानं हर्श करतात, पत्रकारांचं कर्तव्य काय आहे ते सांगण्यासाठी.

वियेतनाममधे माय लाय या गावात अमेरिकन सैनिकांनी निष्पाप नागरिकांना संगिनी, गोळ्या, हातगोळे, तोफा इत्यादींचा वापर करून ठार मारलं. मेलेल्यांत मुलं होती, म्हातारे पुरुष होते, म्हाताऱ्या आणि मुलांना अंगावर पाजण्याच्या वयातल्या स्त्रिया होत्या. जखमी, अर्धवट मेलेल्या, मेलेल्या स्त्रियांवर   बलात्कार झाला. संगिनीच्या टोकावर मुलाला नाचवलं गेलं. समोरच्या खंदकात माणसं मरून पडलेली असताना सैनिक शांतपणे खात पीत होते. देवळात प्रार्थना करत असताना वाकलेल्या माणसांना, प्रार्थना करवून घेत असलेल्या पुरोहिताना सैनिकांनी गोळ्या घालून मारलं. वियेतनामी म्हणजे माणसंच नसतात अशी श्रद्धा-विचार बाळगून अमेरिकन सैनिकांनी लोकांना मारलं.

हा सारा प्रकार हर्श यांनी शोधून काढला आणि त्यावर वार्तापत्रं लिहिलं. तिथून अमेरिका उघडी पडली. आधी विद्यार्थी आणि नंतर जनता रस्त्यावर उतरली, अमेरिकेच्या वियेतनाम आक्रमणाला विरोध करू लागली. यथावकाश अमेरिकेनं वियेतनाममधून माघार घेतली.

निक्सन यांनी वॉटरगेट प्रकरण दाबून टाकण्यासाठी केलेला सरकारी यंत्रणेचा वापर हर्श यांनी उघडा पाडला. वॉटरगेट खणलं बॉब वुडवर्ड आणि कार्ल बर्नस्टीन यांनी. हर्श यांनी स्वतंत्रपणे त्यातला काही भाग शोधून काढला होता आणि वुडवर्डनी ते मान्य केलं होतं.

सरकार, राष्ट्रपती यांनी केलेले उपद्व्याप, बेकायदेशीर कृत्यं हर्श खणतात. सरकार आणि संसदेतल्या नीतीमान माणसांना बोलतं करणं हे हर्श यांचं वैशिष्ट्यं. माणसं धोका पत्करून सरकारी-प्रेसिडेंटी दुष्कृत्यं त्यांच्यासमोर उघड करतात. हा उद्योग हर्श कोणा व्यक्तीसाठी, पक्षासाठी किंवा व्यक्तिगत स्वार्थासाठी करत नाहीत हे पटत असल्यामुळंच माणसं त्याना माहिती द्यायला आपणहून तयार होतात.

वेळोवेळी राष्ट्रपतींनी-पुढाऱ्यांनी हर्श यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला.

अनुभवच्या अंकात युवाल हरारी आहेत.

युवाल हरारी

युवाल हरारी

युवाल हरारी हे सध्याचे गाजणारे इतिहासकार आहेत.  मध्य युगीन लष्कर हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. पीएचडी झाल्यानंतर त्यांनी जेरुसलेमच्या हिब्रू युनिवर्सिटीत इतिहास शिकवायला सुरवात केली. नंतर त्यांनी आपला अभासाचा विषय विस्तारला आणि एकूणच मानवी इतिहासाचा अभ्यास  आरंभला.  अभ्यासादरम्यान हरारी यांनी नजीकचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ असे टप्पे कल्पून तीन पुस्तकं लिहिली.

हरारी हे अभ्यासू संशोधक असल्यानं त्यांचा मजकूर पुराव्यासहीत आहे, विचारपूर्वक मांडलेला आहे. दुसरं म्हणजे त्यांनी खूप विविध अंगानी माणसाचा इतिहास मांडला आहे. फुकुयामा राज्यशास्त्रातून इतिहास मांडतात, जेरेड डायमंड समाजशास्त्रातून अभ्यास मांडतात, हरारी विज्ञान, तंत्रज्ञान, राज्यकारभार, अर्थव्यवहार, भाषा, धर्म, संस्कृती अशा विविध अंगांनी इतिहास मांडतात. अलीकडं अकॅडमिक माणसं प्रासादिक भाषेत विषय मांडू लागले आहेत. जेफ्रेलॉट यांची पुस्तक त्या प्रकारची आहेत. हरारींची पुस्तकंही प्रवाही आणि सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत लिहिलेली आहेत. जवळ बाळगावीत आणि वेळोवेळी त्यातून आपल्याला हवे ते संदर्भ घ्यावेत असं त्यांच्या पुस्तकांचं स्वरूप आहे.

अक्षरच्या दिवाळी अंकात जॉर्ज फर्नांडिस आहेत. राजहंस प्रकाशन प्रकाशित करत असलेलं सुसाट जॉर्ज हे पुस्तक कसं उभं राहिलं याची गोष्ट अक्षरच्या दिवाळी अंकात आहे.

जॉर्ज फर्नांडिस मुंबईत वाढले. लढाऊ कामगार नेते ही त्यांची प्रतिमा मुंबईकरांवर ठसलेली आहे. यथावकाश जॉर्ज दिल्लीत गेले, बिहारमधे गेले आणि देशपातळीवरचे नेते झाले.

मुंबई हे पोटापाण्यासाठी स्थलांतरीत झालेल्या लोकांचं शहर. पैसा आणि काम यामागं मुंबईचा माणूस लागलेला असतो. मुंबईचा माणूस घड्याळ्याच्या काट्यावर लक्ष ठेवून असतो. मुंबईकर झोपतो पण मुंबई झोपत नाही. मुंबई चोविस तास अखंड चालत असते. रात्रीच्या कोणत्याही प्रहरी मुंबईत अन्न, दारू, शरीर, उपलब्ध असतात.

जॉर्जनी मुंबईतल्या कामगारांना संघटित केलं. जगात पहिल्या प्रथमच हॉटेलातले कामगार जॉर्जनी संघटित केले. हे अजब संघटना कौशल्य आहे तरी काय ते पहायला जगातले पत्रकार आणि कामगार कार्यकर्ते मुंबईत जॉर्जना भेटायला आले होते. मुंबई शहरासारखंच जॉर्जही जवळजवळ चोविस तास काम करत असत. हॉटेल कामगारांच्या बैठकी आणि मोर्चे हॉटेलं बंद झाल्यानंतर म्हणजे रात्री बारा नंतर सुरु होत, पहाटेपर्यंत चालत. एकाद दोन तास झोप घेऊन जॉर्ज मग दिवसा कामात असणाऱ्या कामगारांना संघटित करण्यात मग्न होत. चोविस तास कामात असणारी मुंबई आणि जॉर्ज.

जॉर्जनी १९६७ साली निवडणुक लढवली तेव्हांही त्यांच्या अनेक सभा मध्य रात्र उलटल्यानंतर दोन वाजता सुरु होत आणि पहाटे दूधवाले सायकलीवर दुधाचे हंडे घेऊन फिरू लागेपर्यंत चालत.

गंमत म्हणजे अशी चोविस तास चालणारी मुंबई जॉर्जनी संघटीत केली आणि तिला चोविस तास बंद व्हायलाही शिकवलं. जॉर्जनी मुंबई बंद केली. मुंबईतली माणसं बंदच्या काळात रस्त्यावर क्रिकेट खेळू लागली. जॉर्ज बंद सम्राट म्हणून प्रसिद्ध झाले.

मुंबईतली भाषा मुंबईसारखीच. हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ असे शब्द मुंबईच्या भाषेत एकत्र नांदतात. वाट लागली, पतावी नाको, अन्ना आणि तंबी, खालीपिली, कायकू असे शब्द मुंबईत सर्रास वापरले जातात. गुजरात्यांचं मराठी आणि पारशांचं मराठी. मुंबईतले पारशी आचार्य अत्रे यांचा मराठा आपल्या घरगड्याकडून वाचवून घेत. पारशांच्या शिव्या मुंबईकरांना ओवीसारख्या वाटतात.

जॉर्जनी मुंबईला लढायला शिकवलं. अर्थात हे त्यांनी एकट्यानंच केलं असं म्हणता येणार नाही. डांगे आणि आंबेडकरही त्यात सामिल होते. पण जॉर्ज याना त्याचं पितृत्व द्यायला डांगे आणि आंबेडकरही तयार होते.

चॉम्सकी भाषा शास्त्रज्ञ आणि विचारवंत. हर्श पत्रकार. हरारी इतिहासकार. जॉर्ज कामगार नेते. पहिल्या तिघांनी एकूणच जगाला समृद्ध केलं आणि जॉर्जनी मुंबईला, मराठी माणसाला.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0