व्हिलेज डायरी – भाग ६

बिनपायडलीची सायकल एका हातानं वढत स्वतासंग बडबडत, तिथं अजूनबी खंदिल हाय कुडाच्या भाईर लावलेला; म्हातारी अजूनबी ठिगळं लागलेल्या लुगड्याच्या पदरानं काच पुसती त्येची काळी पडलेली, लेकी नातवाची मेलेल्या म्हाताऱ्याची आठवण काढत..

व्हिलेज डायरी भाग नऊ : आणि कैफीयती
शेतकरी आंदोलन आणि वर्ग संघर्ष
व्हिलेज डायरी भाग ४ तिथून इथपर्यंत

शहरांनी बरोबर असण्याच्या अट्टाहसाला जन्म दिला, चांगलं वाईट ही अर्धी अर्धी विभागणी शहरांनी केली. ग्रामीण पर्सपेक्टीव्ह या दोन्हीच्या हॉरीझॉन वर विसवणारा होता आणि आहे. रावण वाईट राम चांगला, ही विभागणी शहरांची. शहरी मानसिकतेची देण, या आणि अशा कित्येक.
ग्रामीण लोकगीतांमध्ये ओव्यांमध्ये जे वर्णन चित्रण लिखाण आढळतं ते दोन्ही बाजूच्या नजरेतून मांडलेलं, अगदी इंद्रजिताला मारल्या नंतर त्याच्या पत्नीने केलेला शोक आणित्याशोकात विचारलेले प्रश्न…
“सुलोचना मातेच्या सपनात आई वैऱ्यानं अन आई वैऱ्यानं वं केला घात!!” इथे वैरी हा तिचा की ओव्या गाणाऱ्या लिहून ठेवलेल्या आत्म्यांचा हा प्रश्न पडतो इतका त्यात ओलावा आहे..
अगदी रावण इंद्रजित नावं ठेवण्यापर्यंत.. इथला इतिहास त्याचा रंग आणि वास वेगळाय..
आत्यानं इंद्रजित ठेवलेलं माझंनाव..
त्याच्या वव्यात पहीलंच ऐकलं आणि मग आत घुसत गेलं.. वाड्याला पडली तशी भगदाडं काळजाला पाडत..
“मारिला इंद्रजित शीर पडलं झाडीत..
सुलोचना मातेच्या सपनात आई वैऱ्यानं अन आई वैऱ्यानं वं केला घात
सुलोचना मातेच्या सपनात आई वैऱ्यानं अन आई वैऱ्यानं वं केला घात..”

ग्रामीण जीवन, इथली संस्कृती आणि लोकं हि प्रचंड वेगळी आणि किचकट आहेत. झटक्यात समजणारी किंवा मग युगं वलांडली तरी अनोळखी असणारी. जात्यावरच्या ओव्या, देवदासी पोतराज्याची कथनं, म्हारवड्यातल्या वह्या त्याचे अर्थ आणि रुजलेल्या भावना वर दिसतात तशाच असतील असं नाही. रावण, इंद्रजित ते बळी पर्यंतची दानव ठरवलेली अमानुष जमात पण पोराबाळांना नावं ठेवलेली सापडतात इथं.
पोतराजानं रामायणावर ओव्या सुरु केल्या आणि इंद्रजितावर आला. गावी २/४ नावं पोराला ठेवायची पद्धत असतीय. आत्या मला इंद्रजित म्हणायची. का हा विचार तेव्हा कधी आला नाही, ती गेल्यावर विचारायचा प्रश्नच आला नाही. तिच्या आवाजात काही ऐकलेलं इंद्रजितावर पन आता आठवत नाही, घर करून राहिलेला आवाज मात्र आठवतो. त्याच्या आवाजात तीच आर्तता जाणवली. ओढणारी..

तो वतातनं चालत बांधावर आला, त्याच्या मागं वस्तीवरचं कुत्रं अन बारकी पोरं.. गंजी च्या बाजूला पसरलेल्या कडब्यावर चवाळ टाकून मी पसरलेलो. नमस्कार वगैरे घालून त्याच्या तयारीला लागला तो.
दोन एक गाणी म्हणून मग थांबला. तंबाकू मळत समोर बसल्यावर मग गप्पा सुरु झाल्या. शेजारच्या तालुक्यातला. चार पोरं आहेत म्हणाला. एक ड्रायव्हर म्हणून जातय, एक बिगारी, एक पोतराज अन धाकलं शिकतंय. मुली असतील पण सागंताना विचार आला नसावा. तो थकलेला.. पण समाधान होतं बोलण्यात. सरकार कडून ११०० रुपये भत्ता मिळतो म्हणाला, पण तो फक्त ६० वर्षाच्या वरच्याला असतो म्हणाला. त्याच्या अपेक्षाहीन जगण्याकड पाहत मी हरवत होतो..

तसा मी त्याला लहानपणापासून ओळखतो. माझ्या. त्याचा अवतार-वेश-भूषा, त्याची गाणी, त्याच बोलणं, त्याचं जगणं, त्याच मन, त्याचा या मातीशी अन इथल्या पिढ्यांशी असलेला संवाद सगळं सगळं तेच फक्त बदलत गेला तो त्या अवताराआडचा चेहरा.
भीती वाटायची त्याच्या त्या उग्र चेहऱ्याची, वाढलेल्या जटा दाढी मिशांची, भरलेल्या मळवटाची, थिरकणाऱ्या घुंगराचे तोडे बांधलेल्या त्याच्या कुंकवानं माखलेल्या अनवाणी पायांची अन त्यानं ओढून घेतलेल्या आसुडाची…
बऱ्याच काळानं कळायला लागलं तो उग्र चेहरा बंड केलेल्या पोराचा-बापाचा-भावाचा-नवऱ्याचा असतो. त्या डोळ्यांमधली आग त्याच्या जगण्याला टॅबु ठरवून टाकलेल्या समाजासाठी असते. त्या आसुडाचे फटके शिक्षा असते बाप मुलगा नवरा भाऊ म्हणून अपेक्षा पूर्ण करू न शकलेल्या पुरुषाची..स्वतःला..

प्रत्येकानं नोटा देऊन पाया पडल्यावर अंगारा लावून भरभरून आशीर्वाद देत तो उठला. मीही गावात सोडून यायला निघालो. गाडीत सोडतो म्हणल्यावर खुश झालेला बराच, पण समोरून दुसरा पाव्हना आला, चल तिकडचं चाललोय तुला सोडतो म्हणत गाडीवर बसवून घेऊन निघाला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जराही हलला नव्हता.

भौतिकतेला त्याच्या आसूडानं फटकारून टराटरा फाडून टाकलेलं आहे.

रेकॉर्ड केलेल्या त्याच्या ओव्या ऐकत मी त्या युगंयुगं प्रवास करणाऱ्या शब्दात हरवत निघालो…

“मारीला इंद्रजीत रक्ती भिजली पायरी
शेजची सुलोचना जाऊन माहेरी राहिली..
मारीला इंद्रजित शीर उडलं गंगणी
सुलोचना पतिव्रता कुंकू लाविते अंगणी..

मारीला इंद्रजीत शिर पडलं एकाऐकी
आस्तरी सुलोचना रडती मायलेकी..
मारीला इंद्रजीत भुज पडली दारामधी
एक वचनी सुलोचना नार झोपच्या भरामधी..

सुलोचनाबाई भुज बसली घेऊनी
कुणी मारीला माझा पती दयाव पुस्तकी लिहुनी..
इंद्रजिताची बाई राणी रामाच्या सभेमंदी
शीर मागती हो सादन्या अन पती सावध करण्या..

मारीला इंद्रजीत मेघा आडूनी फसविला
पतीव्रता सुलोचना शिर लावीते हसायाला..
इंद्रजिताचं शीर टाकलं कढईत
इंद्रजिताचं बाई शीर शीर शिजतंया कढईत..

शिजल्याच्या नंतर शीर काढून भाईर
सुलोचना त्याची राणी शीर दिलंया तिच्या हाती
इंद्रजिताची राणी बोलती रामाला
शिजलेल्या शिराचा उप्येग करू काही..?

इंद्रजिताची राणी बोलती चुलत्याला
अन जन्माचा ग बाई जोडा कुंकू पुसलं
अन कुंकू पुसलं व बापा ह्यांनी .. ”

बंद डोळ्यांमध्ये कित्येक वक्ती आवर्तनं जागा फिरायला लागल्या नैतिक अनैतिकतेला भगदाड पाडून अव्याहत वाहणाऱ्या..
….

द वायर मराठी घेऊन येत आहे वेब पोर्टल वर कधी न झालेला प्रयोग एक अस्सल, प्रदीर्घ लिखाण – दर सोमवारी सकाळी

द वायर मराठी घेऊन येत आहे वेब पोर्टल वर कधी न झालेला प्रयोग
एक अस्सल, प्रदीर्घ लिखाण – दर सोमवारी सकाळी

कॅनव्हास काळा पांढरा असा कधी विभागला नाही ग्रामीण संस्कृती ने, मधल्या अगणित शेड्स जन्मात पुरणार नाहीत ना समजणार नाहीत अशा रीतीने विस्तारलेला आहे तो..

मग अगदी देवक बांधण्यापासून ते उंबरा वलांडून आल्या नंतर बाहुली वटीत देऊन गायलेल्या लग्ना रात्रीच्या ओव्या अन जोडीनं लाथाडलेल्या भांड्यांपर्यंत इथला बाज घट्ट रुतून बसलेलाय..

धोतरातनं विजरीत अन विजरीतनं पँटीत आलेल्या पिढ्या गळ्यात टाळ अन डोक्यावर टोपी सोडत नाहीत, कधी सुटेल तुटेल बुझेल विझेल हा वारसा माहीत नाही पण पिढ्या येतील आणि शिक्षण शहर नोकरी उद्योगाचे सगळे सगळे सोपस्कार करून तिशी नंतर वारश्याला पुन्हा गोंजारतील !!चाळीशी नंतर वेस वलांडून गावाकडं येण्यासाठीतरी सातबारा नावानं काळा करून घ्यायलाच फायजेल..
शहरं आयुष्याची मावळती दुपार जन्मात ऐकू द्यायची न्हाईत..
वावटळीतली उडून आलेली फाटक्या लुगड्या धोताराची चिंधी पायाला कवटाळून खळ्यावरल्या उडायलेल्या पदरांची नाजूक कहाणी सांगणार नाहीत..
….
अगणित कथा दडल्यायत त्या सावल्यात..
प्रत्येक पानगळी सोबत वाहून नेल्या जातात..
भिरभिरत राहतात मग वाऱ्यावर..
वावटळीत
वादळात
त्या अधांतरिच होत्या तशा त्यांच्या अधांतरी आयुष्यांसारख्या..
त्या पोकळ होत्या अपेक्षाहीन होत्या त्यांच्या अपेक्षाहीन जगण्यासारख्या..
त्या सावल्या होत्या त्यांच्या मातीवर पडलेल्या पिढ्या पिढ्यांच्या मुरलेल्या सावलीतल्या अस्तिवासारख्या..

पण आता ती आयुष्य अन त्यांच्या कथा पानगळी आधीच सावल्यांसोबत उडवून नेली जाणार आहेत..
वादळं आयात केलीयत म्हणे फार मोठी, तिकडून पलीकडून..

या जमिनीत या सावल्यांसोबत गाडली जाणार आहेत ती सर्व ती सर्व ती सर्व

आठवणी उगवतील शतकांनी, त्या करोडो सांगाड्यांच्या शरीरांच्या विघटनातून तयार झालेल्या तेलाच्या साठ्यात..
त्या मातीवर मग लावा दिवा त्या तेलात
तुमच्या कथा उजळवुन टाकायला..
उत्क्रांतीत एक घटक संपवला शहरांच्या समृद्धीसाठी याची गोष्ट लिहायला उजेड मिळालेला असेल..
ती माती अन वरचं आकाश साक्षीला असेल..

तो पहुडलाय
तो कायमचा समाधिस्त व्हायला निघालाय
त्याला गदागदा हलवून सांगू वाटतंय मागून वादळ यायलंय तू काढलेलं तुझ्या लेकिसुना नातवंडांचं मळ्याचं तळ्याचं हिरीचं मोटारीचं चित्र नष्ट करणार आहे..

पण त्याची अखेरची समाधी मोडण्या इतका, त्या वादळं आयात केलेल्या समाजाईतका क्रूर मी कसा होऊ???
….
तिथं अजूनबी वाट हाय गवतातली मातीतली;
वतातनं अजूनबी तात्या येतो काळ्याढोम रातीत चिखलात पाय भरवत ईजार वर करून,
या बारीला बांधकाम काढायचंच म्हणत..

बिनपायडलीची सायकल एका हातानं वढत स्वतासंग बडबडत,
तिथं अजूनबी खंदिल हाय कुडाच्या भाईर लावलेला;
म्हातारी अजूनबी ठिगळं लागलेल्या लुगड्याच्या पदरानं काच पुसती त्येची काळी पडलेली,
लेकी नातवाची मेलेल्या म्हाताऱ्याची आठवण काढत..

अंधारायलेल्या आभातल्या सुर्व्याला थरथरायलेलं म्हातारं हात जोडत,
तिथं अजूनबी बाभळीला बांधल्याली साडी लुगड्या धोतराची झोळीय,
झोळीत अजूनबी लेकरू असतंय मायची वाट बघाल्यालं पाय झाडात रडून रडून घसा फाडत;
कधी तात्या हुता,
मग तात्या चं पोर,
आता म्हातारीची परतवंडं ..

पदराखाली धरून त्या लेकराला पाजालेली ती अजूनबी वढतेय संसाराचा गाडा लागणीला खुरपायला काढणी खळ्याला जाऊन..
त्येच्या मागं रातपाळीला दारं धरून..

क्रमशः

आकाश शिवदास चटके सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी आहेत. लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0