जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डॉ. रखमाबाई राऊत यांचा संघर्षमय आणि दिशादर्शक जीवनपट उलगडून सांगण्याचा प्रयत्न!
१८६४ मध्ये मुंबईत जन्मलेल्या रखमाबाईंची ढोबळ ओळख अशी, की त्यांनी आधुनिक विवेकवादी विचारसरणीला साजेशी व्यक्तिस्वातंत्र्यवादी भूमिका घेऊन, नवऱ्याकडे मनाविरुद्ध नांदायला जाणं नाकारलं. त्यापायी झालेली अतोनात टीका आणि मानहानी सोसली आणि इंग्लंडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन परत भारतात येऊन इथल्या रुग्णांच्या आणि समाजाच्या सेवेत आयुष्य वेचलं. १९५५ मध्ये रखमाबाईंच्या ९१ वर्षांच्या जीवनाची सांगता झाली.
दोन वर्षांपूर्वी गूगलनं २२ नोव्हेंबर या त्यांच्या जन्मदिनी त्यांची प्रतिमा डूडलचित्राच्या स्वरूपात धारण केली. नवऱ्याशी घटस्फोट घेऊन आपलं करिअर उभारलेली स्त्री या ढोबळ प्रतिमेच्या बाहेर जाऊन त्यांचा विचार केला पाहिजे.
मुंबईत जनार्दन पांडुरंग सावे आणि जयंतीबाई यांच्या कुटुंबात १८६४ साली रखमाबाईंचा जन्म झाला. मात्र रखमाबाई दोन वर्षांच्या आणि त्यांची आई १७ वर्षांची असताना जनार्दन पांडुरंग यांचं निधन झालं. कालांतराने रखमाबाई ८ वर्षांच्या असताना जयंतीबाईंनी डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी विवाह केला. तत्कालीन प्रथेनुसार ११ वर्षांच्या रखमाबाईंचं लग्न १९ वर्षांच्या दादाजी भिकाजी यांच्याशी लावलं गेलं. रखमाबाईंचे सावत्र वडील डॉ. सखाराम अर्जुन राऊत हे उच्चशिक्षित व सुधारकी विचारांचे असल्याने त्यांनी लग्न करतानाच दादाजीने उत्तम शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे रहावे ही अपेक्षा स्पष्ट केली होती. परंतु दादाजीला कधीही सुशिक्षणाची आवड निर्माण झाली नाही. रखमाबाईंनी मात्र आपल्या वडिलांना आदर्शवत् मानून शिक्षण जारी ठेवले.
या वैचारिक अंतराचा परिणाम असा झाला की रखमाबाईंना दादाजीसोबत संसार करण्याची इच्छा राहिली नाही. १८८४ मध्ये दादाजीने रखमाबाईंना नांदायला पाठवावे असा अर्ज न्यायालयात दाखल केला. पती म्हणून पत्नीवर असणाऱ्या हक्कांची पुनर्स्थापना करावी यासाठी हा अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला. नवऱ्याचा हक्क त्याला बजावता यावा म्हणून रखमाबाईंना त्यांच्या मनाविरुद्ध सासरी पाठवता येणार नसल्याचं कोर्टानं मान्य केलं कारण हे लग्न करताना त्या अज्ञान असल्याने त्यांच्या संमतिशिवाय लग्न झाल्याचं कोर्टानं मान्य केलं. मात्र दादाजीने ताबडतोब अपील केलं आणि १८८७ मध्ये अपिलाचा निकाल रखमाबाईंच्या विरोधात लागला. “नवऱ्याकडे नांदायला जा, नाहीतर तुला ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा मिळेल असं न्यायाधीशांनी सांगितल्यावर रखमाबाईंनी ठामपणे आणि आनंदानं तुरुंगवास भोगण्याची तयारी दाखवली.
एकीकडे त्यांच्या विरोधात लोकमान्य टिळक मराठा वृत्तपत्रात लिहीत होते की भारतीयांच्या स्त्रियांचं नांदायला जाण्याचं वय काय असावं हे इंग्रजी कायद्यानुसार ठरवणं अयोग्य आहे. नेटिव्ह ओपिनियन या वृत्तपत्रातून विश्वनाथ नारायण मंडलिक रखमाबाईंवर टीका करत होते. केस चालू असतानाच टाइम्स ऑफ इंडियासाठी ‘अ हिंदू लेडी’ या टोपणनावानं रखमाबाईंनी पत्रं लिहून आपली बाजू स्पष्टपणे समाजासमोर मांडली होती. दादाजीनेही कोणाच्या तरी मदतीने वृत्तपत्रांत आपली बाजू मांडली. तर दुसरीकडे मॅक्स म्यूलर-पंडिता रमाबाई, यांनी उघडपणे रखमाबाईंच्या स्वातंत्र्याची भलावण केली. परंतु शेवटी २००० रुपयांच्या तडजोडीवर दादाजीने रखमाबाईंना काडीमोड दिला. रखमाबाईंनी आपल्या हक्कांसाठी, व्यक्तिस्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची परिणती या वैयक्तिक सुटकेमध्ये होते असं म्हणता येईल.
या काळात इंग्लंडमध्ये व्हिक्टोरिया राणी तिच्या काळाला सुसंगत अशा सुधारणांचा पुरस्कार करत होती. राणीला स्वत:ला गर्भाशयाचं दुखणं होतं पण पुरुष डॉक्टरांकडून तपासून घेण्याच्या लाजेपायी तिनं कधीही पुरुष डॉक्टरांकडून तपासून घेतलं नाही. स्त्रियांनी वैद्यकीय शिक्षण घेणं हा राणी व्हिक्टोरियाच्या सुधारणावादी कार्यक्रमाशी जुळणारा विषय होता. रखमाबाईंना आपल्या वडिलांसारखं वैद्यकीय शिक्षण घ्यायचं आहे हे कळल्याबरोबर इंग्लंडमधील त्यांच्या हितचिंतकांनी लगेचच आवश्यक ती रक्कम गोळा केली आणि रखमाबाई वैद्यकीय शिक्षणासाठी दूर निघून गेल्या.
१८८९ ते १८९४ या काळात लंडनमधील ‘स्कूल ऑफ मेडिसीन फॉर वूमेन’ मधून त्यांनी एम.डी.ची पदवी प्राप्त केली आणि त्या भारतात परतल्या. ज्या लेडी डफरिन फंडामधून रखमाबाईंना शिक्षण घेता आलं, त्याच फंडातून भारतात मुंबईतील कामा हॉस्पिटल आणि नंतर राजकोट, सूरत आदि ठिकाणी स्त्रिया व लहान मुलांची हॉस्पिटल कार्यरत होती. रखमाबाईंनी सूरत आणि राजकोटच्या हॉस्पिटलांमध्ये १८९५ पासून ते १९२९ साली सेवानिवृत्तीपर्यंत काम केलं. आणि निवृत्तीनंतरही त्या समाजात समता यावी, आरोग्य राखलं जावं आणि स्त्रीपुरुषांना मुक्तिदायी असं आयुष्य जगता यावं यासाठी कार्यरत राहिल्या.
रुग्णसेवा करताना लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे हे जाणून रखमाबाईंनी नव्या दवाखान्यात शेळीचं बाळंतपण करून, आणि त्याचे सविस्तर वृत्तांत टाइम्स ऑफ इंडियात छापले होते. स्त्रियांच्या व बालकांच्या जन्मजात आरोग्यासाठी त्यांनी दिलेलं हे योगदानही पथदर्शी आहे. रखमाबाईंनी संशोधनाच्या आणि वैद्यकीय ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रात दिलेलं योगदान ही फार मोठे आहे. रखमाबाईंनी मेजर बॅनेट यांच्या सहकार्यानं मिकसोमा नावाच्या ट्यूमर बाबत संशोधन करून त्याचा अहवाल १९०९ साली इंडियन मेडिकल गॅझेटमध्ये निबंधस्वरूपात मांडला होता. आसाबीबी नावाच्या मुस्लिम स्त्रीवर ट्यूमरसाठीची शस्त्रक्रिया व उपचारासंदर्भात तो होता. मुक्तिदायी अवकाश समाजाच्या सर्व घटकांना मिळावा यासाठी प्रबोधनमार्ग अवलंबला. तेवढ्यावर न थांबता ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रात वैद्यकीय संशोधनामध्ये भर घालून त्यांच्या काळापुरतंच नव्हे तर भविष्यातील मानवी जीवनही अधिक सुखाचं होईल यासाठी त्या कार्यरत राहिल्या असं लक्षात येतं.
उच्च जातीचं किंवा सांस्कृतिक भांडवल नसलेल्या रखमाबाईंसारख्या स्त्रीनं दाखवलेलं कर्तृत्व पाहिलं की त्या काळातील सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख, तानूबाई बिर्जे अशा सत्यशोधकी परंपरेतील पथदर्शी कामं करणाऱ्या स्त्रियांशी त्यांच्या कामाचं साधर्म्य नक्की जाणवतं. मुंबई प्रांतात न राहता राजकोट सारख्या संस्थानात राहिल्यामुळे कदाचित् रखमाबाईंच्या कार्याबाबत म्हणावी तशी स्मृतिपरंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली नसेल. परंतु जात, वर्ग, लिंगभाव, सामाजिक स्थान, या कशाचंही पाठबळ नसताना डॉ. रखमाबाईंनी दाखवलेलं कर्तृत्व हे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हेतूशी निश्चितच सुसंगत आहे.
श्रद्धा कुंभोजकर दक्षिण आशिया, स्मृति अभ्यास आणि महाराष्ट्रातील समकालीन जातीव्यवस्थेच्या अभ्यासिका असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापिका आहेत.
COMMENTS