चेन्नई कसोटीच्या दोन्ही डावात भारताने चांगल्या धावा फळ्यावर लावल्या. खेळपट्टीचा फायदा इंग्लंडचे गोलंदाज चांगल्या प्रकारे घेऊ शकले नाहीत. याउलट भारताच्या फिरकीने इंग्लंडला दोन्ही डावात केवळ १५० च्या आसपास बाद करून आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतातील उष्ण वातावरण आणि निर्जीव खेळपट्ट्या द्रुतगती गोलंदाजांची दमछाक करतात हे नक्की.
चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये भारत इंग्लंड ही दुसरी क्रिकेट कसोटी १३ फेब्रुवारीपासून खेळली गेली. नाणेफेक भारतीय कप्तान विराटने जिंकली आणि सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला. भारताने दुसरा कसोटी सामना ३१७ धावांनी जिंकला. मागील कसोटीत रूटने नाणेफेक जिंकली आणि इंग्लंड विजयी ठरला. नाणेफेक खरंच इतकी महत्त्वपूर्ण ठरावी की सामन्याचा निकाल आधीच समजून जावा. पहिल्या कसोटीत जे काही घडले त्याच्या उलट घडत गेले आणि भारताने एक मोठा विजय मिळविला. रूटने नाणेफेक जिंकली असती तर?
भारताचा पहिला डाव रोहितच्या आक्रमक शतकाने गाजला. त्याला दिलेली अजिंक्य आणि पंतची साथ महत्त्वपूर्ण ठरली. विराट कोहली भोपळा पण फोडू शकला नाही. मोईन अलीने त्याला सपशेल चकविले. चेपॉकची खेळपट्टी पहिल्या सत्रापासूनच फिरकी गोलंदाजांना मदत करू लागली. गिलला स्टोनने शून्यावर पायचीत करून खळबळ माजवली. मुख्य म्हणजे गिलने चेंडू सोडून दिला होता. पुजारा लवकर बाद झाल्यावर रोहित आणि अजिंक्य यांनी १६२ धावांची भागीदारी केल्याने भारताच्या धावसंख्येला आकार मिळाला. पंतने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन नाबाद ५८ धावा काढत भारताचा डाव ३२९ पर्यंत नेऊन पोहचवला. ओली स्टोनने द्रुतगती गोलंदाजांना फारशी साथ न देणाऱ्या खेळपट्टीवर तीन गडी बाद करून प्रभावित केले. पहिल्या सत्रात अली आणि लिचने टिच्चून गोलंदाजी केली आणि भारताचे सहा गडी बाद केले. रोहित शर्मा (१६१) आणि अजिंक्य रहाणे (६८) ने उत्तम खेळी करत भारताला कमी धावसंख्येत बाद करण्याचे इंग्लंडचे मनसुबे धुळीस मिळविले. यावेळी इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांची साथ भारतीय फलंदाजांना मिळाली. रोहित आणि अजिंक्यची खेळी निर्दोष जरी नसली तरी त्यांनी लीलया मारलेले फटके बहारदार होते. भारताच्या पहिल्या डावात इंग्लंडने एकही अतिरिक्त धाव दिली नाही हे विशेष. भारताच्या पहिल्या डावातील ३२९ धावा इंग्लंड संघावर अतिरिक्त दबाव आणण्यास पुरेशा ठरल्या.
खेळपट्टीची फिरत लक्षात घेता इंग्लंडला ३२९ धावांचे आव्हान सुद्धा पेलेल की नाही असे वाटू लागले. ईशांतने पहिल्याच षटकात बर्न्सला बाद करून इंग्लंडचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळायला सुरुवात केली. दुसऱ्या टोकास आश्विनने भेदक गोलंदाजीला सुरुवात केली. इंग्लंडचे एकामागे एक मोहरे गळायला लागले. अक्षरने रूटला बाद करून इंग्लंड १०० धावा करू शकेल की नाही अशी संदिग्धता निर्माण केली. कसोटीत रूट सारख्या पराक्रमी खेळाडूला पहिला बळी म्हणून बाद करायला मिळणे हे मोठे यश. कोहलीने सिराज आणि कुलदीपला बऱ्याच उशिरा गोलंदाजी करण्याची संधी दिली. सिराजने भारतात पहिल्या चेंडूवर पोपला बाद करून विक्रम नोंदविला. यष्टीरक्षक फोक्सच्या ४२ धावा सोडल्यास कोणीच इंग्लंडच्या धावसंख्येला आकार देऊ शकले नाही. आश्विनने इंग्लंडचे पांच गडी बाद करून भारतीय फिरकीचे वर्चस्व परत एकदा सिद्ध केले. ईशांत आणि अक्षरने त्याला उत्तम साथ दिली. १३४ धावांवर डाव संपुष्टात आल्याने इंग्लंडवर फॉलोऑनची नामुष्की आली नाही. महत्त्वाचे म्हणजे ऋषभने दोन झेल खूपच अप्रतिम घेतले. अपवाद वगळता भारताचे मैदानी आणि हवाई क्षेत्ररक्षण चांगले झाले.
भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात चाचपडत झाली. गिल, रोहित आणि पुजारा गोलंदाजीपेक्षा स्वतःच्या चुकीने बाद झाले. धावांना गती देण्यासाठी कोहलीने पंतला रहाणेच्या आधी फलंदाजीला पाठवून उपयोग झाला नाही. भारताचा दुसरा डाव कोहली आणि आश्विनच्या ९६ धावांच्या भागीदारीने सावरला गेला. कोहलीने काढलेल्या ६२ धावा बहुमूल्य ठरल्या. या डावाचे मुख्य आकर्षण ठरले ते आश्विनचे शतक. आश्विनने १०६ धावांपैकी ५० धावा तळाच्या फलंदाजांना बरोबर घेऊन काढल्या.
भारत दुसऱ्या डावात २८६ धावा फलकावर लावू शकला. लिच आणि अलीने प्रत्येकी ४ गडी बाद केले. इंग्लिश गोलंदाज भारतीय कर्णधार आणि आश्विनवर नियंत्रण ठेवू शकले नाही. विजयासाठी ४८२ धावांचे ओझे घेऊन चहापानानंतर इंग्लंड संघ फलंदाजीला उतरला. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने तीन गडी गमावून ५३ धावा जमविल्या. उरलेल्या दोन दिवसात इंग्लंड विजयासाठी आवश्यक असलेल्या ४२९ धावा काढू शकणे अशक्यप्रायच होते. रूट, स्टोक्स, फोक्स, लॉरेन्स वर सर्वकाही अवलंबून होते. भारताचे फिरकी गोलंदाज हावी असल्याने इंग्लंडचा पराभव निश्चितच होता. सामन्याचा शेवट अपेक्षेप्रमाणे झाला. अक्षर, आश्विन आणि कुलदीप यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. अक्षरने पदार्पणातच ५ गडी बाद केले. मोईन अलीने डावाच्या शेवटी ५ षटकार मारत सर्वोच्च ४३ धावा केल्या. रूट (३३) शिवाय कोणीही फलंदाज खेळपट्टीवर फार काळ टिकू शकला नाही. ही कसोटी रोहित, आश्विनचे शतक आणि आश्विन, अक्षरच्या गोलंदाजीसाठी लक्षात ठेवली जाईल.
खेळपट्टीबद्दल थोडेसे. कसोटीच्या दोन्ही डावात भारताने चांगल्या धावा फळ्यावर लावल्या. खेळपट्टीचा फायदा इंग्लंडचे गोलंदाज चांगल्या प्रकारे घेऊ शकले नाहीत. याउलट भारताच्या फिरकीने इंग्लंडला दोन्ही डावात केवळ १५० च्या आसपास बाद करून आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतातील उष्ण वातावरण आणि निर्जीव खेळपट्ट्या द्रुतगती गोलंदाजांची दमछाक करतात हे नक्की. फलंदाज, द्रुतगती आणि फिरकी गोलंदाजांना समान संधी देणाऱ्या खेळपट्ट्या सामन्यातील चुरस पाचव्या दिवशी पर्यंत कायम ठेवू शकतात आणि निकाल एकतर्फी लागणार नाहीत.
पुढील दोन कसोटी सामने अहमदाबादला होणार आहेत. त्यात एक दिवसरात्र खेळल्या जाणारी पिंक बॉल टेस्ट राहणार आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी स्पर्धेतील भारताचे आव्हान कायम आहे. भारताला पुढील कसोटी सामना सुद्धा जिंकणे अतिशय आवश्यक आहे. चेन्नईतील दुसरा कसोटी सामना जिंकून भारताने मालिकेतील रंगत पुनर्जीवित केली आहे हे नक्की.
COMMENTS