व्हिलेज डायरी – भाग २

व्हिलेज डायरी – भाग २

नाईलपासून सीनेपर्यंतच्या ४० हजार वर्षांच्या प्रवासाची बेरीज वजाबाकी.. व्हिलेज डायरी नोंदवही आहे ४० हजार वर्षाच्या माझ्या प्रवासाची. मी वाचून दाखवणार आहे ती सगळी पानं..

व्हिलेज डायरी भाग ४ तिथून इथपर्यंत
व्हिलेज डायरी – भाग ६
व्हिलेज डायरी भाग ७ : आणि न्याय
द वायर मराठी घेऊन येत आहे वेब पोर्टल वर कधी न झालेला प्रयोग एक अस्सल, प्रदीर्घ लिखाण – दर सोमवारी सकाळी

द वायर मराठी घेऊन येत आहे वेब पोर्टल वर कधी न झालेला प्रयोग! एक अस्सल, प्रदीर्घ लिखाण – दर सोमवारी सकाळी

१२ हजार वर्षांपूर्वी उत्तरेच्या नाईलच्या काठावर पश्चिम आशिया ते आफ्रिकेपर्यंतच्या चंद्रकोरीत, होमो ईरेक्ट्स चे वंशज सेपियन्सनी शेती सुरु केली, पण मध्ये शोध लागले ईरेक्ट्सचे वंशज काय फक्त सेपियन्सचं नव्हते तर निएंडरथाल सुद्धा त्यांचेच वंशज. आता निएंडरथाल शेती करायचे का नाही, त्याचं डोकं किती चालायचं हे शोधायलेयत पण मध्ये अमेरिकेतल्या ब्रुकलीन मधल्या एका रिसर्च सेंटर नं नवीन पूरावा शोधला ज्यात ते म्हणतेयत कि निएंडरथाल आणि सेपियन्स चा संबंध नाही, निएंडरथाल मॉर्डन(मॉडर्न) माणसाचे पूर्वज नाहीत. आता हे कशावरनं तर नाक वेगळंय दोघांचं, च्या आईला मी म्हणतो आमच्या गावात वारकाचे दोन सख्खे जुळे भाऊ आहेत त्यांच्यायला एक नकटाय म्हणून काय उद्या कोणतर त्यांना संबंध नसलेले म्हणणार का? तर ही लॅब अमेरिकेची आणि नियेंडरथाल आज जिथं आफ्रिका हाय तिथं जन्मले आणि आशिया मिडल ईस्ट फिरत फिरत युरोपात घुसले आणि ब्रिटन ला गेले त्यामुळं मला फुल डाऊट आहे अमेरिकेच्या रिसर्च वर. एका रात्रीत हे असं कसं सांगू शकतेत नियेंडरथालचा आणि माणसाचा संबंध नाही. उद्या म्हणतील सगळे काळे लोकं माणूस जमातीतले नाहीत. पण नियेंडरथाल लै हुशार होते असं वाटत नाही कारण त्यांच्यातल्या एखाद्या शिल्लक वंशजांनानं ब्रेग्झिटचा निर्णय घेतला असावा.

कॉलिन टज ब्रिटिश सायन्स रायटर त्याच्या ‘निएंडरथाल, बँडिट्स अँड फार्मर्स’ या पुस्तकात लिहितो शेती ६ वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्रपणे उदयास आली, त्याने आयुष्यभर शेतीच्या इतिहासावर संशोधन केलंय, त्याचं म्हणणं आहे १०-१२ हजार वर्षांपूर्वीच्या निओलिथीक रिव्होल्युशन ( ऍग्रीकल्चरल रिव्होल्युशन ) च्या फार पूर्वी शेती टप्प्या टप्प्यानं सुरु झाली, एका रात्रीत कोण शहाणं होत नाही, ४० हजार वर्ष आधीपासूनच माणसाने प्रोटो फार्मिंग म्हणजे शिकार ते शेती यामधला प्रवास असणारी एक स्टेज गाठलेली, किंबहुना अगदी सुरुवातीचे दोन पायांवर चालणारे सुद्धा पाहू शकत होते की रोपं ही  बियांपासून उगवतात आणि त्यातून दिसून आलं असेल की बाकीची रोपं झुडपं खाण्यायोग्य रोपांपासून दूर केली, काढूण टाकली तर खाण्यायोग्य रोपांची वाढ चांगली होते. युरोपात क्लायमेट शिफ्ट नंतर क्रो-मॉर्गन म्हणजे पहिले सेपियन्स तिथं पोचले आणि टज म्हणतो ते पहिले शेतकरी असावेत प्रोटो फार्मिंग करणारे. ते स्वतःचं अन्न स्वतः उगवू शकत होते पण निएंडरथाल क्लायमेट शिफ्ट मध्ये माती खाल्ले, त्यांना जमलं नाही हे ऍडॉप्ट करणं आणि हे इतिहासजमा झाले पण महान ख्रिस स्ट्रिंजर म्हणतो ४ लाख वर्ष निएंडरथाल क्लायमेट चेंज च्या मोठ्या चढ उतारात टिकले. क्लिव फिनलायसन त्याच्या पुस्तकात म्हणतो लक म्हणजे नशीब हा इवोल्युशन मधला मोठा फॅक्टर असू शकतो, जर नशिबाने नीएंडरथालला सर्वाईव्हल रेसचा विजेता बनवला असता तर आज औषधगोळ्या आणि मोबाईलचा शोध लागला नसता आणि हे जग एक सुंदर स्वर्ग बनलं असतं.

मार्क कोहेन आणि कॉलीन टज म्हणतात शेती ही कंबरतोड मेहनतीचं काम असल्यामुळे शिकार करून कमी कष्टात भरपूर फॅट /कॅलरीजचं खाणं मिळत असताना कुठल्या दुर्बुद्धीमधून माणूस शेतीकडे वळला असा प्रश्न उद्धभवतो. कोहेन आणि टज पुढं म्हणतात लोकांनी आनंदासाठी शेतीचा स्वीकार केला नाही तर क्लायमेट चेंज ते मोठी जनावरं नष्ट होण्यापर्यंतच्या गोष्टींमुळे या काबाड कष्टाच्या उद्योगाकडे माणूस वळाला, त्यामुळं क्रो-मॉर्गन नी ४०-४५ हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लावलेला असताना शेती मधील निओलिथीक क्रांती व्हायला ३० हजार वर्षे वाट पाहावी लागली कारण एवढं जनावरासारखं काम करायला माणूस तयार नव्हता.

मी कधी आफ्रिकेत गेलोच तर तिथं उत्खणन  ( उकरून, जमीन उकरून ) निएंडरथाल चा संबंध शेतीशी जोडणार.
१२ हजार वर्षांपूर्वी नाईलच्या खोऱ्यात गव्हासदृश्य पिकाचा शोध लागला तर ४-५ हजार वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेत मकेचा.

शेती मानवी उत्क्रांतीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य आहे. माणसाच्या सर्व्हाइव्हलचा पुरावा प्रेरणा आणि साधन आहे. शेती ऍडॉप्ट करू न शकलेल्या कित्येक मानवसदृश्य जमाती नष्ट झाल्या. मानवी इतिहास अरबो तुकड्यांचं कोडं आहे आणि त्यातील फक्त १०० तुकडे माणूस शोधू शकलाय पण ते १०० च्या १०० शेतीशी जोडतात मॉडर्न मानवी रेसला.

शेतकरी हा महत्वकांक्षी प्रचंड कष्ट करणारा आणि करवून घेणारा मानव प्रकार आहे. त्यांनी पर्यावरणावर ताबा मिळवत पेरणी प्रक्रिया डेव्हलप करत छोट्या कालखंडात घेता येणारी पिकं घेत अन्नसाठा करत मानवी सर्व्हाइव्हलचा अन्नाचा एकमेव आणि मुख्य प्रश्न सोडवला ज्यामुळे मानवी मेंदू इतर गोष्टींची उकल करण्यास प्रवृत्त होऊ शकला, किंबहुना तो वेळ मिळला.

ईंटरस्टेलर मधलं एक वाक्य नेहमी डोक्यात ठेवतो मी, “The world needs farmers. Good farmers.”
“शेतकरी हा मानवी संस्कृती चा पाया आहे.”

………….

माझी गोष्ट सुरु होते काही हजार लाख वगैरे वर्षांखाली..

मी अन्नासाठी माझ्या कुटुंबा सोबत भटकत होतो आफ्रिकेपासून यूरेशिया पतुर..

माझ्या लै लोकांना तिथल्या शिकार करणाऱ्या निएंडरथाल जातीय भूमिपुत्रांनी ठोकला.
आम्ही पळालो,
उत्तरेच्या वाटंनं..
नाईल च्या काठाला गेलो.
तिथं माझ्या त्या काळातल्या आज्ज्यानं म्हातारीला बी-बियाणं मागितलं..
म्हातारीला म्हणला तुज्या हातानं पेर..
तुझा वंश वाढलाय लै मोठा..
समृद्धी हाय तुझ्या हाताला..
तिनं सूनाशिंला घिऊन पहिला पेरा केला..
कष्ट पेरून सुखं उगवायची वाट बघायलेलं माझं कुटुंब सुखी होतं..
गुहेतलं..

नाईलपासनं सीनेकाठचा प्रवास मी केला.
मला समाजानं लुबाडला
मला उत्क्रांतीनं चिरडला
मला राज्यकर्त्यांनी नागवला
गुहेतला स्वतंत्र मी खेळणं झालो समाज उत्क्रांती आणि राज्यकर्त्यांचं

ढगाच्या कडालेल्या आवाजात माझी तंद्री निघाली.

समोरून आवाज येत होता “ताई माई आक्का विचार करा पक्का”..
डोळ्यावरचा गुहेतला अंधार बाजूला करत तोंडावर चाचाच्या kgn च्या हिरवट शेवाळलेल्या मगातनं पाणी मारलं आणि त्या प्रगतीच्या पुरस्कर्त्या लोंढ्याकडं निघालो.

त्यांनी विश्वास दिला इथला पिकवणारा सुखी असल्याचा,

ते म्हणले तू चिरडला गेला बे अन्नसुरक्षेच्या कायद्यात एफ.आर.पी अन पारंपारिक बियाण्यात.

चिडलेल्या मी पुन्हा वाट धरली आणि सीना गाठली. नाईलची ओल तिच्या उदरात होतं.

मी शोध घेतला त्या मातीत त्या पहिल्या पेरणीचं काय झालं म्हणून.
म्हातारी च्या सूनाशिंचा पेरा उगवला का नाही म्हणून.

तिनं पेरलं
उगवलेलं जनावरांनी तुडवलं
सम्राटांनी वसूल केलं
रझाकारानं हुतं नव्हतं ते वरबडलं
त्या नंतर सायबांनं
अन आता पंचवार्षिकच्या धोरणात पेरलेलं अडकलं म्हणली माती.

ढग कडकालेल्या आवाजानं दचकून उठलो.
फॅन बंद झालेला
सूर्य मावळाय लागलेला. सातवी आठवीत होतो. पुस्तकं समोर पडलेली. अंधारलेल्या घरात कोण दिसत नव्हतं. खुर्चीमागून वारा माती चढवत होता त्या पसाऱ्यावर. खिडकीची आदळाआपट तशीच ठेवून माणसं शोधत  मागच्या गॅलरीत गेलो. तिथं पावसाकडे दूरच्या उत्तरेच्या ढगांकडे डोळे लावून सगळी उभारलेली..
भिजवणारा पाऊस अंगावर घेत मी हसायला लागलो.
म्हणलं बरं झालं फार उकडत होतं !

गावाच्या दिशेचे काळेकुट्ट कोसळणारे ढग त्या दिवशी न हसता बापाच्या विषन्न नजरेनं सांगत होते,

अवकाळीय हा !
….

कागदावरल्या मातीचा वगुळ छपारातनं गळालेल्या पाण्यापर्यंत पोचला.

त्यात वाहत होता पूर्वजांचा इतिहास, मागच्या पिढीचा वर्तमान न माझं भविष्य.

कागदावरची माती सारली मी,
कागदावर मातीचं चित्र माती उमटवून गेली.
कदाचित गत पिढ्यांच्या डी.एन.ए. चा सिक्वेन्स?
कोमेजलेला कागद धरून मी पुन्हा पुन्हा अर्थ लावला त्या संदेशाचा..
फिल्टर वरच्या कागदालाही माती नं पोटात घेतलं..
फेल, ए.टी.के.टी. ते ऑल क्लिअर च्या मार्कलिस्टांलाही मातीनं एकरंगी केलं..

मातीचं रहस्य उमगलं
एक प्रवास केला परतीचा..
फिल्टर पासनं सर्टिफिकिट पर्यंत सगळं मातीत टाकून मी पुन्हा वाट धरली टेबल खुर्ची पासनं चवाळाची..
लॅब वर्कशॉप cnc च्या विंडो स्क्रीन मिरर मधल्या प्रतिबिंबापासून मातीतल्या सावलीपर्यंत..

त्या मातीधोंड्यातल्या माझ्या सावलीत मला दिसतो

सीनेपासून नाईल पर्यंतचा अगणित पिढ्यांचा उलटा प्रवास..

बंद डोळ्यांनी मी पाहतो शेकडो हाताच्या उंचीवरच्या त्याच्या अंधार्‍या गुहेच्या तोंडाशी अंगावर वारं घेत गवताची सरसर ऐकत तो पाठमोरा बसलेला..
तिनं केलेला पेरा उगवायची वाट बघत..
…….
माझ्या अगणित पिढ्यांचा, पूर्वजांचा मातीत जिरलेला हुंत्कार काळातीत चित्कार बनून लिहितोय मी. कर्कश्श आहे
झापडं उघडतील
आभाळ फाटेल
पडदे वितळून जातील त्या चित्काराच्या आगीत

हजारो वर्षांचा प्रवास आहे माझा
काळाचा काळातीत प्रवासी बनून दगडांतून वाहतोय मी मातीचे अणुरेणू बनून..

मागे पडतायत त्या सावल्या, झाडं, लाकडं, हाडं, सांगाडे..
मी चालतोय त्याला तुडवत,
शेवटच्या समर्पणापर्यंत शरणागती घेऊन.
अंतरात अविरत वाजतंय विझलेलं दहशतीचं संगीत..

त्या अगणित जीवांच्या अक्रोशाचा ऊर्जेने भरलेला गोळा बनून मी धडकणार आहे तुमच्या धारणांना..
अंगावर घ्यायचं, अडवायचं धाडस ठेऊन कितीही करा उपाय, मी धडकणार आहे तुमच्या वलयांना माझ्या त्या अगणित पिढ्यांचे गुहेपासून बांधापर्यंतचे हुंत्कार गगनभेदि चित्काराच्या रुपात घेऊन..

नाईलपासून सीनेपर्यंतच्या ४० हजार वर्षांच्या प्रवासाची बेरीज वजाबाकी..
व्हिलेज डायरी नोंदवही आहे ४० हजार वर्षाच्या माझ्या प्रवासाची.

मी वाचून दाखवणार  आहे ती सगळी सगळी सगळी पानं..

शोषित शोषक शोषण शोष सोस
……

क्रमशः

आकाश शिवदास चटके सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी आहेत. लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0