बरं झालं, डॉनल्ड ट्रम्प हरले!

बरं झालं, डॉनल्ड ट्रम्प हरले!

गेल्या ४ वर्षांत अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या विक्षिप्त व अहंकारी वर्तनाने जगाची रचना बदलली होती. त्यांनी अमेरिकेला अनेकदा मान खाली घालायलाही लावली. अगदी अध्यक्षीयपदाच्या निवडणुकांतही त्यांच्या अहंकाराचा फुगा फुगतच गेला आणि तो अखेर फुटला. ‘मुक्तसंवाद’ या नियतकालिकात १ नोव्हेंबर २०२० रोजी हा लेख प्रसिद्ध झाला होता. आता अमेरिकेचे राजकीय नेपथ्य बदलले आहे. ट्रम्प यांना पराभव पत्करावा लागला आहे. पण ट्रम्प का हरले पाहिजेत याचे विश्लेषण करणारा हा लेख ‘द वायर मराठी’च्या वाचकांसाठी ‘मुक्त संवाद’च्या सौजन्याने प्रसिद्ध करत आहोत.

अमेरिकेतील विषाणूचा उद्रेक
इसिसचा म्होरक्या अबू-बगदादी अमेरिकेच्या हल्ल्यात ठार
ट्रम्पना यमुना स्वच्छ दिसावी म्हणून गंगेचे पाणी सोडणार

इतर महत्त्वाच्या गोष्टींबरोबर लोकशाहीत जनतेला निवडीचा पर्याय असावा. यासाठी बहुपक्षीय पद्धत योग्य आहे. यात तुम्हाला पसंत असलेला उमेदवार जिंकत नसला, तरी दबावतंत्र, यथायोग्य तडजोड यामुळे सर्व जनतेच्या इच्छेचे थोडे फार प्रतिबिंब पडू शकते. द्विपक्षीय पद्धतीत जनतेला निवडीचे फारसे पर्याय उरत नाहीत. निवडीचा अवकाश संकुचित होतो. आताच्या अमेरिकेत काही ऐतिहासिक कारणांनी, बळकट असे फक्त दोनच पक्ष उरले आहेत. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट. त्यांच्या तुलनेत इतर पक्ष आणि स्वतंत्र उमेदवार बऱ्यापैकी क्षीण झाले आहेत. काँग्रेसमध्ये (अमेरिकी पार्लमेंट) तिसऱ्या पक्षाला आणि स्वतंत्र उमेदवाराला थोडीफार संधी असते. नाही असे नाही. याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे, सिनेटर बर्नी सँडर्स. हे सिनेटमध्ये स्वतंत्र उमेदवार म्हणून जिंकून येतात. मात्र अशी परिस्थिती राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत जवळपास अशक्य आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, इलेक्टोरल कॉलेज पद्धत. यात जनता थेट उमेदवाराला निवडत नाहीत. एखाद्या राज्यात जो उमेदवार, अगदी एका मतानेही जिंकतो, त्याला राज्याची सर्व इलेक्टोरल मते मिळतात. हे अन्याय्य आहे, (‘व्हाय डू वुइ स्टिल हॅव दी इलेक्टोरल कॉलेज’ या नावाचे पुस्तक लिहिणारे हार्वर्डचे इतिहासकार अलेक्झांडर केस्सार यांच्या मते, ही पद्धत, गुलामी आणि गौरवर्णीय वर्चस्वाचा वारसा सांगणारी आहे. तिचे उन्मूलन व्हावे यासाठी आजवर अनेकदा घटनादुरुस्ती सुचवली गेली आहे. परंतु अमेरिकी घटनेत बदल ही अशक्यप्राय गोष्ट आहे.) पण आहे खरे. सध्याच्या काळात इतर पक्ष एवढे बळकट झालेले नाहीत की एखाद्या राज्यात ते बहुमताने निवडून येऊन काही इलेक्टोरल मते मिळवून दबाव तंत्र, तडजोड वापरू शकत नाहीत. यामुळे जनतेला डेमोक्रॅट आणि रिपब्लिक उमेदवारातील त्यातल्या त्यात कमी घातक- lesser evil किंवा उडदामाजी काळा गोरा उमेदवार निवडावा लागतो. त्यामुळे हे पक्ष मतदारांना गृहीत धरतात. मनमानी करत राहतात.

तसे पाहायला गेले तर दोन्ही मुख्य पक्ष जवळपास सारखे आहेत. दोन्ही पक्षांना कॉर्पोरेशन्स, वॉल स्ट्रीटकडून जवळपास सारख्याच देणग्या मिळतात. आर्थिक धोरणांतही मूलभूत फरक नसतो. परदेश धोरणात मूलभूत फरक नसतो. अनेकदा भ्रमनिरास झालेली स्वतंत्र जनता इतर उमेदवारांना मते देऊन आपली नापसंती दर्शवून संख्याबळावर दबाब आणण्याचा प्रयत्न करते. २०१६च्या निवडणुकीत बर्नी सँडर्स पसंत असलेल्या मतदारांनी आणि उर्वरित कट्टर मतदारांनी इतर उमेदवाराला मते दिल्याने काही ठिकाणी अटीतटीची लढत असलेल्या राज्यांत हिलरी क्लिंटन हरल्या. अर्थात क्लिंटन यांच्या पराभवाला आमच्यासारखे स्वतंत्र मतदार हे मुख्य कारण नव्हते, तरीही थोडा फरक पडलाच. परिणामी तेव्हा डॉनल्ड ट्रम्प जिंकून आले.

परंतु, पुढील चार वर्षात याच विजयी ट्रम्प यांनी अमेरिकेचे प्रचंड वाटोळे केले आहे, हे जगापुढे आहे. यावेळची परिस्थिती वेगळी आहे. The stakes are very high. सर्व डेमोक्रॅट मतदार आणि विविध रंग असलेले पुरोगामी, जहाल डावे मतदार यांनी एकजुटीने डॉनल्ड ट्रम्प यांना हरवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. यावेळचे डेमोक्रॅट उमेदवार जो बायडन हे, कोणी कितीही कौतुकाचे इमले उभारले तरीही, वास्ववात सामान्य उमेदवार आहेत. तरीसुद्धा एका कमालीच्या स्वकेंद्रित, मर्जीनुसार मुर्खासारखे निर्णय घेणाऱ्या, सूडभावनेने पेटलेल्या, सुसंस्कृतपणाचा लवलेश नसलेल्या मुख्य म्हणजे, अमेरिकेला आणि जगाला घातक ठरलेल्या उमेदवाराला हरवण्याला आता पर्याय नाही.

पर्यावरणाचा पाचोळा

ग्लोबल वॉर्मिंगने मानव जातीच्या अस्तित्वाचा उभा केलेला प्रश्न ही एकविसाव्या शतकातली पहिल्या क्रमांकाची समस्या आहे. बाकी इतर समस्या असल्यातरी ‘सर सलामत तो पगडी पचास’ अशी परिस्थिती आता उद्भवलेली आहे. आर्थिक प्रश्न सोडवता येतील, पण मानवाचे अस्तित्वच धोक्यात असताना तो प्रश्न निदान सध्यातरी गौण ठरतो. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार सध्याची बेपर्वा वर्तणूक अशीच चालू ठेवली, तर वीस ते पंचवीस वर्षात पृथ्वीवरच्या पर्यावरणातील बदल हा irreversible-अपरिवर्तनीय, म्हणजेच उलटा न वळवता येणारा असेल. तापमान वाढ रोखता येणार नाही. हिमनगांचे वितळणे थांबवता येणार नाही. नद्यांना येणारे महापूर रोखता येणार नाहीत. समुद्रपातळीत होणारी वाढ रोखता येणार नाही. वातावरणातील कार्बनची पातळी कमी करता येणार नाही. परिस्थिती घसरगुंडीवरून अक्षरशः घसरत जाईल. मात्र, मानव जातीवर ही कयामत येऊ नये, यासाठी जगातील सर्व देश एकत्र येऊन प्रयत्न करत आहेत.

कोळसा आणि खनिज तेल जाळून वीज न बनवता वारा, सूर्यप्रकाश अशा प्रकारचे हरित तंत्रज्ञान वापरून वीज बनवू असा संकल्प करीत आहेत. यासाठी सर्व देशांच्या सहभागाची गरज असणार आहे. एकमेकांना मदत करण्याची गरज असणार आहे. यासंदर्भातली सर्वात शेवटची बैठक पॅरिस येथे झाली. त्यात सर्वांनी कोणती उचलायची यावर सहमती झाली होती. या ‘पॅरिस अॅकॉर्ड’मध्ये अमेरिका यात होती. मात्र, उद्दामपणा करत ट्रम्प हे त्यातून बाहेर पडले. नंतर त्यांनी शाळकरी पर्यावरणवादी ग्रेटा थन्बर्गचीही खिल्ली उडवली नि अखेरच्या प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये स्वतःला जबाबदारीतून मुक्त करत ‘फिल्दी एअर’साठी भारत, रशिया, चीन यांनाही झोडपले. खरे पाहता, पर्यावरण दूषित करण्यात अमेरिकेचा वाटा चांगलाच मोठा आहे. त्यामुळे अमेरिका पॅरिस अॅकॉर्डमधून बाहेर पडणे म्हणजे, पर्यावरण सुधारणेस मोठीच करण्यात खीळ बसणे. याचे परिणाम जगाला आणि पर्यायाने अमेरिकन जनतेला भोगावे लागणार आहेत.

पॅरिस अॅकॉर्डमधून अमेरिका बाहेर पडण्याची दोन मुख्य कारणे आहेत. एक, तंत्रज्ञात बदल करताना अमेरिकेला, विशेषतः कोळसा आणि खनिज तेल कंपन्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहेत. या कंपन्यांनी सरकारवर दबाव आणला आहे. परंतु आर्थिक नुकसान सर्व देशांचे होणार आहे. दोन, विज्ञानाला सपशेल नाकारणे. बरेच रिपब्लिकन आणि खुद्द ट्रम्प हे ग्लोबल वॉर्मिंगलाच नाकारतात. त्यांना Climate Change Deniers म्हणतात. या मंडळींच्यादृष्टीने ग्लोबल वॉर्मिंग असे काही नाहीच. जे आहे, ते सगळे थोतांड आहे. काही लोकांना तर वाटते, की अमेरिकेचे नुकसान व्हावे म्हणून जगाचा, डाव्यांचा, कम्युनिस्टांचा ग्लोबल वॉर्मिंग हा सूत्रबद्ध कट आहे. मुळात, हा समजच धोकादायक आहे. या उलट, बायडन यांनी पॅरिस अॅकॉर्डमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे या निवडणुकीत ट्रम्प यांना हरवून अशा ना-समज लोकांमध्ये सशक्त संदेश जाणे आवश्यक आहे.

कोविड महामारीतले ट्रम्पावतार 

विज्ञानाला नाकारणे हे कोविड महामारीत, आम्ही अनुभवत आहोत. रिपब्लिकन समर्थकांच्या म्हणण्यानुसार कोविड हा फ्लूसारखा किरकोळ आजार आहे. सरकार आणि जग उगाचच त्याचा बाऊ करत आहे. ट्रम्पही या ‘सर्वज्ञानी’ लोकांमध्ये मोडतात. या लोकांचा असा समज आहे की, कोविडमुळे झालेले मृत्यू फार नाहीत. हृदय बंद पडणे, कॅन्सरसारख्या इतर कारणांनी झालेले मृत्यू हे कोविडमुळे झाले असे दाखवले गेले आहे. हे लोक अमेरिकन स्वातंत्र्याच्या चुकीच्या कल्पना बाळगत, मी तोंडाला मास्क लावणार नाही, म्हणत सरकारी आदेश पाळत नाहीत. सोशल / फिजिकल डिस्टंन्सिंग पाळत नाहीत. हा अंधानुनय करणाऱ्या पंथासारखा प्रकार आहे. यात ट्रम्पना मोठे स्थान आहे. मिशिगनच्या गव्हर्नरने लॉकडाऊन उठवायला नकार दिला म्हणून, एक गोऱ्या लोकांची शस्त्रधारी संघटना (militia) विधानसभेत शस्त्र दाखवत घुसली. त्या नंतर काही आठवड्याने याच गव्हर्नरांचे अपहरण करण्याचा कट एफबीआयने उघडकीला आणला. अपहरणामागचे कारण काय, तर गव्हर्नरांनी मास्क आणि सोशल डिस्टंटसिंग पाळणे हे बंधनकारक केले. भारतात, युपी-बिहारमध्ये जसे एखाद्या बाहुबली नेता वा गुंडाचे हस्तक ‘उसको उठाके लाओ’ म्हटले की, कुणाचे सर्रास अपहरण करतात, तसलाच हा प्रकार. अशा विघातक लोकांना ट्रम्प आवडतात आणि ट्रम्प यांनादेखील असे लोक आवडतात.

अमेरिकेत अशा हायपर सेन्सिटिव्ह रिपब्लिकनांमध्ये अजून एक समाज आहे की, जग अमेरिकेच्या विरुद्ध आहे, अमेरिकेला लुटायला बसले आहे. कोविडसारख्या क्षुल्लक कारणासाठी डब्ल्यूएचओ अमेरिकेचे पैसे वाया घालवत आहे. म्हणून मग ट्रम्प यांनी अमेरिकेला आरोग्य संघटनेतून बाहेर काढले. त्यांच्या या निर्णयाला चीनद्वेषाची किनार होतीच, परंतु, असे हे विज्ञानाला नाकारणे, आरोग्य संघटनेशी सहकार्य न करणे, यामुळे अमेरिकेची शोभा झाली. त्यामुळे ट्रम्प हरलेच पाहिजेत.

 

मेडिकल इन्शुरन्सची व्यापक समस्या

अमेरिकेत मेडिकल इन्शुरन्स हा मोठाच प्रश्न आहे. इन्श्युरन्स नसेल तर डॉक्टर, औषधे आणि हॉस्पिटल्स या गोष्टी भल्याभल्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहेत. इन्शुरन्स कंपन्या मालकांना ग्रुप इन्श्युरन्स ऑफर करतात. कर्मचाऱ्यांच्या एखाद्या ग्रुपच्या इतिहासावरून डॉक्टर, हॉस्पिटल, औषधे यावर किती खर्च होणार आहे, याचा अंदाज असल्याने इन्श्युरन्स कंपनीला योग्य प्रीमियम ठरवता येतो. कर्मचाऱ्यांनाही थोडाफार परवडतो. पण नोकरी गेली तर काय? तासावर अगदी किरकोळ कामे करणाऱ्यांचे काय? त्यांना वैयक्तिक इन्शुरन्स काढावा लागतो. तो प्रचंड महाग असतो. शिवाय वैयक्तिक इन्शुरन्स मध्ये तुम्हाला अगोदरच विकार असेल तो गृहित धरला जात नाही प्रीमियम वाढतो. यामुळे निम्न स्तरातील लोक इन्शुरन्स नसल्याने आजार अंगावर काढतात.

यावर उपाय म्हणून ओबामा यांनी ‘ओबामा केअर’ ही सर्वांना परवडेल अशी इन्शुरन्स योजना आणली आहे. त्यात तुम्हाला नोकरी नसली तरी प्रीमियम परवडेल, असे काही प्लान्स आहेत, आधीचे विकारांवरही विमा मिळणार आहे. परंतु सरकारी पैसे वापरावा लागणार असल्याने, रिपब्लिकन लोकांचा विरोध आहे. शासनावर अजिबात विश्वास नाही. शिवाय इन्शुरन्स कंपन्यांनी पक्षांना देणग्या दिल्या असल्याने त्यांचा दबाव असतो. अशात ट्रम्प यांनी ओबामा केअर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले, तर तेथे ट्रम्प यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. तशी नाकाबंदी ट्रम्प यांनी केली आहे. यामुळे लाखो लोकांचा इन्शुरन्स निघून जाणार आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. सर्वांना क्वालिटी लाइफ मिळाले पाहिजे. त्यासाठी ट्रम्प हरलेच पाहिजेत.

फाटणारे सामाजिक वस्त्र (Social Fabric)

अमेरिकेत जनतेला शस्त्र बाळगणे, हा घटनेने दिलेला अधिकार आहे. त्याला वसाहत काळाच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे. त्या काळी वसाहतींचे संरक्षण, कायदा यासाठी शस्त्र बाळगणाऱ्या संघटना (militia ) होत्या. अर्थात त्या फक्त गोऱ्या लोकांच्या होत्या. वर्तमानकाळातही तसाच प्रकार कायम आहे. राज्यकर्त्यांविरोधात आपण सज्ज असले पाहिजे, ह्या भ्रमाने ते आजही ग्रस्त आहेत. आता या संघटना वंशवादीदेखील बनल्या आहेत. कृष्णवंशीय लोकांचा, मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यांचा त्या पराकोटीचा द्वेष करत आहेत. त्यांना घाबरवत आहेत. काही प्रसंगी या संघटना हिंसाचारही करत आहेत. खून पाडत आहेत. तरी त्या संघटनांना कोणी सहसा दहशतवादी म्हणत नाहीत, फक्त ‘मिलिशिया’-लढवय्ये म्हणतात. जणू, दहशतवादी हा शब्द मुस्लिमांसाठी आरक्षित आहे.

गेल्या चार वर्षांत ट्रम्प निवडून आल्यानंतर अशा संघटना उघडपणे दहशत माजवू लागल्या आहेत. ‘ब्लॅक लाइव्हस मॅटर’ निदर्शनात अशा संघटनेचे लोक बंदुका पाजळीत फिरत होते. प्रसंगी त्यांनी गोळीबारही केला. उघडपणे दहशत पसरवणारी अशी ही कृत्ये आहेत. यामुळे अमेरिकी समाजात दुफळी माजून समाजाचे बहुढंगी वस्त्र फाटण्यास सुरुवात झाली आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार हे सज्जन लोक आहेत! ट्रम्प यांचा या संघटनांमध्ये थेट सहभाग आहे, असे कोणाचेही म्हणणे नाही. परंतु त्यांची या अंधभक्तांना चिथावणी नक्कीच आहे. पहिल्याच डिबेटमध्ये जेव्हा ट्रम्पना, निवडणूक निकाल लांबले तर तुमच्या समर्थकांना संयमाचा सल्ला द्याल का, असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर, ‘मतदानस्थळी जा आणि डोळ्यांत तेल घालून परिस्थितीवर लक्ष ठेवा’, असे मी त्यांना सांगेन म्हणाले. ट्रम्प यांचा इशारा स्पष्ट आहे. या संघटना आता धीट झाल्या आहेत. ट्रम्प ही निवडणूक जिंकले, तर परिस्थिती अधिकच चिघळणार आहे. समाजात दुफळी माजणार आहे. हे सत्तापुरस्कृत काउण्टर प्रोटेस्टचे नवेच पेव जगभरात पाहायला मिळत आहे. म्हणजे, वैचारिक विरोधकांनी आंदोलने-निदर्शने केली की, सत्ताधारी एका बाजूला पोलिसी बळाचा निर्घृण वापर तर करतच आहेत, परंतु आपल्या अनुयायांकरवी हिंसक प्रतिआंदोलनेही घडवून आणतानाही दिसत आहेत. ट्रम्प नेतृत्व करत असलेल्या अमेरिकेत गेल्या काही महिन्यांत या भयावह वास्तवाचे वरचेवर दर्शन घडले आहे. आपल्यावर जगाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे, याचे भान न ठेवता, आपल्याच देशातल्या विरोधी पक्षीय गव्हर्नरांच्या नावे शंख करत जनतेच्या मनात द्वेष-विखार पेरण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करत आहेत.

अर्थात, अमेरिकन लोकशाही खंबीर आहे. कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे इथे फॅसिझम येईल असे नाही. पण, फॅसिस्ट धीट होतील. अल्पसंख्याकांना दहशतीत राहावे लागेल. अशा तणावाच्या वातावरणात, सर्वांना एकत्र आणून देशाला पुढे नेणे महत्वाचे आहे. त्यासाठी ट्रम्प या निवडणुकीत हरलेच पाहिजेत..

भेदाभेदाचा मुद्दा सध्या अमेरिकेत चर्चेत आहे. त्यात ट्रम्प कृष्णवर्णीयांना तुच्छ समजतात. त्यांना आळशी, हिंसाचारी म्हणतात. आधुनिक काळात एवढे उघडपणे वंशवादी दृष्टिकोन असलेले हे पहिलेच अध्यक्ष आहेत. ट्रम्प स्त्रियांना कमी लेखतात. त्यांनी खूप वेळा स्त्रियांशी अनुचित वर्तन केल्याचे पुरावे आहेत. ते अनुचित बोलले आहेत, हेही लपून राहिलेले नाही. अशा या ‘अनप्रेसिडेंशियल प्रेसिडेंट’ला हरवणे गरजेचे आहे.

ट्रम्प यांचे मानसिक संतुलन कसे आहे?

ट्रम्प कमालीचे स्वकेंद्रित आहेत. स्वतःला महान समजणारे आहेत. तेही ठीक आहे. हा व्यक्तिमत्वाचा भाग झाला. परंतु, मी महान आहे, मी फार छान काम करतो, मी प्रचंड हुशार आहे… असे सारखेसारखे म्हटल्यावर माणूस वास्तवाचे भान विसरतो. इथेही तसेच झाले आहे. अमेरिकेचे चांगले चालले आहे, असा त्यांचा भ्रम झाला आहे. तोच भ्रम त्यांच्या अंध भक्तात पसरला आहे. सर्व राजकारणी थोडे फार खोटे बोलतात. परंतु ट्रम्प ( ट्रम्प यांचे अधिक खोलातले मनोविश्लेषण जाणून घेण्यासाठी जिज्ञासूंनी २४ ऑक्टोबर २०१९ रोजीच्या ‘लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्स’मध्ये प्रकाशित ज्युडिथ बटलर यांचे  Genius or Suicide: Trump’s Death Drive हे  टिपणही जरुर वाचावे.) प्रचंड खोटे बोलतात. ते लहरी आहेत. एक दिवस एक बोलतात, तर दुसऱ्या दिवशी उलट बोलतात. त्यांच्या लहरीपणाने कित्येक सरकारी पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या मंत्र्यांना (secretary) त्यांनी छोट्या कारणांनी काढून टाकले आहे. राजकारण्यांवर, अधिकाऱ्यांवर हीन पातळीवर टीका करणे हा चांगल्या नेतृत्वाचा गुण खचितच नाही. अमेरिकेच्या अध्यक्षाला खूप अधिकार आहेत. पण तो ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ असा मतलबी नारा देत बेबंद राजासारखा वागू शकत नाही. ट्रम्प आता पुरते बेबंद झाले आहेत. त्यांचे आजवरचे वागणे स्टेटसमनला शोभणारे नव्हे, तर नीतिशून्य व्यापाऱ्याच्या पातळीवरचे राहिले आहे. आपण सहजासहजी अध्यक्षपदावरून पायउतार होणार नाही, याचे त्यांनी कितीवेळा तरी संकेत दिले आहेत. तशी मोर्चेबांधणी करण्यात ते एकही संधी सोडत नाहीयेत. सुप्रीम कोर्टात जज्ज म्हणून अॅमी कॉनी बॅरेट यांची झालेली निवड आणि तीही विजेच्या वेगाने सिनेटची मान्यता मिळवून झालेली निवड, ट्रम्प यांच्या व्यापक योजनेचा एक भाग आहे. तज्ज्ञ या सगळ्याचा निवडणूक पश्चात संभाव्य अनागोंदी आणि देशव्यापी क्राइसिसची संबंध जोडत आहेत. एकूणच, अध्यक्षीय निवडणुकीनंतर अमेरिकेला वेठीस धरण्याचा, एकप्रकारची अस्थिरता आणण्याचा ट्रम्प यांचा इरादा स्पष्ट दिसत असताना, त्यांचे राजकीय क्षितिजावर असणे-नसणे जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारे ठरणार आहे. योग्य कलाटणी मिळून अमेरिका आणि पर्यायाने हे जग योग्य मार्गावर जायचे, तर या उद्दाम अध्यक्ष महोदयांना ‘व्हाइट हाउस’बाहेर काढणे नितांत आवश्यक आहे, अशी आमची भावना आहे.

डॉ. प्रमोद चाफळकर, हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कन्सल्टन्सी करतात. ते अमेरिकेत मिशिगन राज्यात राहतात.

‘मुक्त संवाद’ (१नोव्हें २०२०) नियतकालिकातून साभार. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: