काँग्रेसच फाळणीला जबाबदारः हरियाणाचे इतिहासाचे पुस्तक

काँग्रेसच फाळणीला जबाबदारः हरियाणाचे इतिहासाचे पुस्तक

चंडीगढः हरियाणाच्या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात १९४७मध्ये झालेल्या भारताच्या फाळणीला काँग्रेस पक्षाला जबाबदार धरले असून रा

विद्वेषी वारसा सांगणाऱ्या ट्रंका
लढवय्यी लोव्हलिना बोर्गोहेन
पिगॅससः हंगेरीतल्या पत्रकाराचा सरकारवर खटला

चंडीगढः हरियाणाच्या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात १९४७मध्ये झालेल्या भारताच्या फाळणीला काँग्रेस पक्षाला जबाबदार धरले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व पहिले सरसंघचालक हेगडेवार यांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे कौतुक करण्यात आले आहे. हे नवे पुस्तक येत्या २० मे रोजी प्रसिद्ध होत आहे.

असा इतिहास बदल ६ वी ते १० वीपर्यंतच्या सर्व इतिहासांच्या पुस्तकांमध्ये केला आहे.

भारताच्या फाळणीला काँग्रेस जबाबदार असल्याचा धडा नववीच्या इतिहास पुस्तकातील दुसऱ्या क्रमांकाचा असून काँग्रेसने सत्तेच्या हव्यासापोटी व अनुनयाच्या राजकारणासाठी फाळणी केल्याचे या धड्यात नमूद करण्यात आले आहे. या धड्यात मुस्लिम लीगने कट्टरवादाला प्रोत्साहन दिले, मोहम्मद अली जिना यांचा दुराग्रह व ब्रिटिशांची फोडा व राज्य करा ही नीती यावर भर देण्यात आला आहे.

१९४०साली काँग्रेसचे बहुसंख्य नेत्यांमधील जोश संपुष्टात आला होता त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ पुढे नेण्यास त्यांना स्वारस्य नव्हते. काही काँग्रेस नेत्यांना सत्तेसाठी लवकर स्वातंत्र्य हवे होते. महात्मा गांधींनी फाळणीला विरोध केला होता. काँग्रेस नेत्यांनाच स्वातंत्र्य चळवळीत रस नसल्याने गांधींनी फाळणी मान्य केली असे या पुस्तकात म्हणण्यात आले आहे.

स्वातंत्र्य लढ्यात अनेक मुद्द्यांवर मुस्लिम लीग सातत्याने काँग्रेसला विरोध करत होती पण ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी काँग्रेस मुस्लिम लीगशी संधान बांधून होती. १९१६चा लखनौ करार, १९१९ची खिलाफत चळवळ व १९४४ सालची जीना-गांधी यांच्यातील बैठक या घटना म्हणजे काँग्रेसचे मुस्लिम लांगूलचालन होत्या असे या धड्यात नमूद करण्यात आले आहे.

काँग्रेसने जीनांना अतिरिक्त महत्त्व दिले त्यामुळे देश कमजोर होत गेला, दंगली वाढू लागल्या. अखेर फाळणी करण्याशिवाय काँग्रेसपुढे पर्याय नव्हता असेही या पुस्तकात म्हटले आहे.

संघ परिवार, हेगडेवार यांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादावर भर

नववीच्या इतिहास पुस्तकात हेगडेवार यांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाने स्वातंत्र्य चळवळीला जोर आला, त्यामुळे भारतातील सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्र जागृत झाले असे नमूद करण्यात आले आहे. काँग्रेसला हेगडेवार यांची विचारसरणी पसंत नव्हती, हेगडेवार हे जातपात व अस्पृश्यता विरोधी होते असेही या पुस्तकात म्हणण्यात आले आहे.

दहावीच्या इतिहास पुस्तकात सिंधु संस्कृतीचे नामकरण सरस्वती-सिंधु संस्कृती असे बदलण्यात आले आहे. ही संस्कृती सरस्वती नदीच्या खोऱ्यात जन्मास आली असे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. या पुस्तकातील काही मजकूर कुरुक्षेत्र विद्यापीठातील भूगोलाचे प्रा. एम. एस. जग्लान यांनी फेसबुकवर प्रसिद्ध केला आहे. त्यांनीच हा धडा लिहिला आहे.

हा खरा इतिहास आहे! – शिक्षण मंडळाचा दावा

नववी इतिहासाचे हे पुस्तक ऑनलाइन प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेसने टीका करण्यास सुरूवात केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा यांनी भाजप इतिहासाचे भगवेकरण करण्याबरोबर मुलांचा-तरुणांचा बुद्धीभेद करत असून स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचे योगदान सगळ्या जगाला माहिती असल्याची प्रतिक्रिया दिली.

तर हरियाणा माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. जगबीर सिंग यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळत हा इतिहास तथ्यांवर व खरा असल्याचा दावा केला. या धडा तयार करताना ४० इतिहासतज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. आम्हाला कोणत्याही राजकारणात पडायचे नाही, तरुण पिढीपुढे योग्य माहिती देणे महत्त्वाचे असून त्या दृष्टीने प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया सिंग यांनी दिली.

नववीच्या पुस्तकाच्या सुमारे १० लाख प्रति छापण्यात आल्या असून ६ वी ते १० वी वर्गांसाठी इतिहासाचा नवा अभ्यासक्रम आखण्यात आला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0