रोजगारनिर्मितीत समाजमनाचा अभाव

रोजगारनिर्मितीत समाजमनाचा अभाव

पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळविण्यासाठी अनेक महिने प्रयत्न करावे लागतात व झगडावे लागते, तर इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कुशल सुतार यांसारख्यांना तुलनेने कमी प्रयत्न आणि वेळेत नोकरी मिळू शकते, याचे सर्वदूर प्रत्यंतर येते.

‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’चा फज्जा !
चिनी विकासाचे तैवान मॉडेल
जम्मू-काश्मीर आणि लडाख : दुभाजनानंतरची आव्हाने

शिक्षणाचा रोजगार आणि व्यवसायाशी थेट संबंध लावला जातो व तसे होणे पूर्वी स्वाभाविकदेखील समजले जात असे. मात्र, बदलत्या आर्थिक-औद्योगिक स्थितीनुसार या परिस्थितीत लक्षणीय स्वरुपात बदल झाल्याचे जाणवून येते. परिणामी, सर्वसाधारण विषयासह पदवीधारक उमेदवारांना नोकरी-रोजगारासाठी भटकंतीचा मार्ग चोखाळावा लागतो, तर याउलट एखाद्या इलेक्ट्रिशियन-प्लंबरला काम पूर्ण करण्याची लगबग असते.

या संदर्भात उदाहरणासह सांगायचे झाल्यास, साधारण दशकभरापूर्वी दहावी-आयटीआय अथवा बारावी व्होकेशनलसह उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपेक्षा इंग्रजी, समाजशास्त्र, भाषा वा तत्सम विषयांसह पदवीधर उमेदवारांना व त्यांच्या ‘पदवीधर’ असण्यालाच घरी, नोकरीच्या ठिकाणीच नव्हे, तर सामाजिक-विवाह संबंधांच्या संदर्भात पसंती, प्राधान्य दिले जात असे. मात्र, आज ही स्थिती पूर्णपणे बदललेली दिसून येते.

शिक्षण-पात्रता व रोजगारक्षमता आणि वेतनश्रेणी यांची तुलनात्मक पडताळणी केली असता, सद्यस्थितीत असे आढळून येते की, सध्या साधारण विषयातील उमेदवाराला विविध शहरांमध्ये सुमारे १० हजार रु. मासिक वेतन मिळते, तर याच शहरांमधील इलेक्ट्रिशियन वा तत्सम काम करणार्‍यांना महिना सुमारे ३० हजार रुपयेही मिळू शकतात. हीच तफावत वरीलप्रमाणे पात्रताधारकांना नोकरी-निवड इत्यादीच्या संदर्भातही अनुभवास येते. पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळविण्यासाठी अनेक महिने प्रयत्न करावे लागतात व झगडावे लागते, तर इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कुशल सुतार यांसारख्यांना तुलनेने कमी प्रयत्न आणि वेळेत नोकरी मिळू शकते, याचे सर्वदूर प्रत्यंतर येते.

नोकरी-रोजगार, वेतन-कमाई याची वरीलप्रमाणे असणारी वस्तुस्थिती सर्वमान्य असली, तरी इतर सामाजिक संदर्भात विचार करता, त्यांची तुलना पदवीधर व्यक्तीशी केली जाते. तेव्हा बहुतांश जणांची सर्वसाधारण पसंती ही पदवीधरांनाच असलेली आढळून येते. या तुलनात्मक पसंतीच्या मागे कारण असते ते तथाकथित पात्रता-प्रतिष्ठेचे!

याच तथाकथित प्रतिष्ठेच्या आड खोट्या व तकलादू प्रतिष्ठेच्या भावना व कल्पना दडलेल्या असतात व असे पिढ्यान्पिढ्या होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, आपली शिक्षण व रोजगाराच्या संदर्भात असणारी सामाजिक मानसिकता. परिणामी, पात्रता-पैसा, पद-प्रतिष्ठा यावर चर्चा करून त्यानुसार नीती-धोरण ठरविताना, समाजमनाच्या मानसिकतेनुसार धोरणांची आखणी केली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे.

या मानसिकतेचे मूळ आपल्या ‘शैक्षणिक पात्रता’ या समाज संकल्पनेत आढळते. त्यामुळेच युवा-विद्यार्थी आपल्या उमेदीच्या काळातील तीन वर्षे परंपरागत शिक्षणपद्धती व प्रसंगी कालबाह्य झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित चाकोरीबद्ध विषयातील पदवी अभ्यासक्रम पूर्ण करतात. असा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍यांची संख्या दरवर्षी सुमारे कोटीपर्यंत सहज जाऊ शकेल.

मात्र, आपल्यासारख्या देशात युवकांना नेहमीच आवश्यक असणार्‍या रोजगारांची गरज लक्षात घेता, केवळ पदवी-पात्रता या युवकांच्या कामी येऊ शकत नाही, याचा अनुभव नेहमीच येतो. याच अनुभवातून या उमेदवारांकडे समाजातील सर्वांचा दृष्टिकोन ‘शिक्षित-पदवीधारक’ अथवा ‘पात्रताधारक’ म्हणून विकसित झालेला दिसतो. या मर्यादित स्वरुपाच्या दृष्टिकोनामागे समाजाची मानसिक धारणा हेच महत्त्वाचे कारण ठरते.

पदवीधर युवकांच्या करिअर नियोजनाच्या संदर्भात सांगायचे म्हणजे, काही निवडक व प्रतिष्ठित संस्था वा विद्यापीठांचा अपवाद सोडल्यास, या पदवी पात्रताधारकांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या क्षेत्रातील वा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातच रोजगार मिळण्याची फारशी खात्रीही नसते. उदाहरणार्थ – समाजशास्त्र वा समाजविज्ञान यांसारख्या विषयासह बीएसारखी पदवी पात्रता घेणारे किती जण समाजविज्ञान वा समाजकल्याण क्षेत्रात आपली नोकरी-रोजगार मिळवू शकतात? हीच बाब अर्थशास्त्र वा तत्सम विषयातील किती पदवीधरांना बँकिंग वा आर्थिक सेवा क्षेत्रात संधी मिळू शकते? म्हणूनच पदवीधर, त्यांचे पालक व इतर संबंधितांसाठी रोजगार हा शिक्षणानंतर काळजीचा विषय ठरतो.

याउलट कौशल्यावर आधारित इतर पात्रता-अभ्यासक्रम सकृतदर्शनी आकर्षक वाटत नसले, तरी रोजगार-पगाराच्या संदर्भात व सद्यस्थितीत युवकांना अधिक लाभदायी ठरतात. ही वस्तुस्थिती मान्य करण्यास आपले समाजमन आजही धजावत नाही. याचाच सरळ परिणाम पिढीजात स्वरुपात आपले युवा-विद्यार्थी यांच्यावर मनात कुठे तरी खोलवर होताना दिसतो. ते कधी रोजगारक्षम वा प्रसंगी बेकारीत लोटणार्‍या सर्वसाधारण पदवी अभ्यासक्रमांचीच कास धरताना दिसतात.

सामाजिक संदर्भात या विचारसरणीचा कानोसा घेता असे स्पष्ट होते की, आज विशेषतः शहरी व निमशहरी भागातील प्रचलित समाजानुसार प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतार-गवंडी यांच्यापेक्षा बीए पदवीधराला अधिक पसंती-प्रतिष्ठा दिली जाते. याच काल्पनिक प्रतिष्ठेपोटी पदवीधरांना त्यांची राहणी, संवाद-बोलणे, आत्मविश्वास इ. बाबींच्या जोरावर व ते शहरी मंडळींसारखी जीवनशैली सहजगत्या आत्मसात करीत असल्याने, त्यांच्याकडे पाहण्याचा शहरी मंडळींचा दृष्टिकोन वेगळा असतो. मात्र, व्यावहारिक वस्तुस्थिती वेगळी असते.

त्यामुळे या परिस्थितीत जनसामान्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यापक स्तरावर शैक्षणिक अभ्यासक्रम, त्याचा तपशील, रोजगाराच्या वा व्यावसायिक संदर्भात त्याचा उपयोग याचा विचार झाला पाहिजे. तसेच विविध अभ्यासक्रमांसाठी लागणारी वर्ष-कालावधी, शैक्षणिक खर्च व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना नोकरी-रोजगारासाठी लागणारा कालावधी व मिळणारे वेतन-पगार इत्यादींचा तुलनात्मक विचार करणे आजघडीला अत्यंत आवश्यक आहे.

गेल्या पाच वर्षांत शैक्षणिक अभ्यासक्रम व कौशल्य विकास यासंदर्भात देशांतर्गत बरीच जागृती झालेली दिसून येते. सरकारने ‘कौशल्य विकास योजने’ची घोषणा केली. याच योजनेच्या पाठोपाठ राष्ट्रीय स्तरावर ‘प्रधानमंत्री कौशल विकास योजना’ व ‘कौशल्य विकास कार्य योजना’ यांसारख्या योजनांची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमांच्या जोडीला कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. थोडक्यात, शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी-रोजगार मिळण्यासाठी लागणारा कालावधी, त्याचे विद्यार्थी-उमेदवार, कुटुंबीयांवर होणारे परिणाम याचा व्यावहारिक आणि वस्तुनिष्ठ विचार करणे आवश्यक आहे. यासाठी युवकांबरोबरच त्यांच्या पालकांची, समाजाची मानसिकता बदलण्याची आज नितांत गरज आहे.

दत्तात्रय आंबुलकर, एचआर व्यवस्थापन सल्लागार आहेत. (9822847886)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0