लीलाताईंची शाळा…

लीलाताईंची शाळा…

प्रयोगशील, नाविन्यपूर्ण शिक्षण चळवळीच्या प्रणेत्या आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू मार्गदर्शक लीलाताई पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी निवृत्ती नंतर १९८५ साली त्यांनी कोल्हापूर येथे ‘सृजन आनंद विद्यालय’ व ‘सृजन आनंद शिक्षण केंद्र’ या शैक्षणिक उपक्रमाची सुरवात केली. या शाळेविषयी आणि लीलाताई यांच्या प्रयोगांविषयी 'दै. सकाळ'च्या सप्तरंग पुरवणीमध्ये जुलै २०१७ मध्ये प्रसिद्ध झालेला लेख.

उदारमतवादाचा लेखाजोखा
रजनीकांत यांचा राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय
कश्मीरमधील शांतता प्रस्थापनाचा दावा खोटा

स्थळ – स्मशानभूमी कोल्हापूर. जळणारी प्रेत आणि समोर ४ थीच्या वर्गातील मुले उभी. ही मुले मेलेल्या व्यक्तीची नातेवाईक नाहीत. ती आहे एका शाळेची मुले.

मुलांची भीती इतकी जाते की भांडी घासायला इथली राख घ्यायची का ?असं विचारतात

मुलांच्या मनातली भूतांची भीती घालवायला शाळेने थेट स्मशानात सहल काढली होती

शाळेचे नाव सृजन आनंद विद्यालय कोल्हापूर. लीलाताई आज ८८ व्या वर्षी  पैलतीराकडे डोळे लावून बसललेल्या पण वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत  शाळेत येवून शिकवत होत्या याची तुलना वृद्धपणी मुलांच्या नाटकात काम करणार्‍या टागोरांशीच फक्त होऊ शकते.

आज उपक्रमशील शाळा ठिकठिकाणी निर्माण होताहेत. पण बरोबर ३० वर्षापूर्वी शिक्षणातील  प्र्योगांची कुठेच चर्चा नसताना लीलाताई पाटील यांनी या प्रयोगशीलतेची मुहुर्तमेढ रोवली .महाराष्ट्रातील या उपक्रमशीलतेच्या ज्या काही पूर्वसूरी आहेत त्यात प्रमुख एक नाव लीलाताई आहेत.

शिक्षण सहसंचालक या पदावरून निवृत्त झाल्यावर पेन्शन  आणि पुरस्कारांच्या रकमा घालून १९८६ ला कोल्हापूरला सृजन आनंद शाळा सुरू केली. प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य राहावं म्हणून हेतुत:अनुदान घेतलं नाही..सृजनाचा शोध घ्यायचा होता.शिकण्यात आनंदाच्या शक्यता त्यांना शोधायच्या होत्या.

या शाळेत सगळं आगळे वेगळे. शिक्षकांच्या पहिल्या नावाला ताई दादा लावून मुलं हाका मारणारं.

मला लीलाताईंचे मोठेपण हे वाटते की अनेक तज्ञ आजचे अभ्यासक्रम टाकावू, व्यवस्थेला मजबूत करणारे मानतात आणि ही शिक्षणपद्धती फेकून नवी आणली पाहिजे असे मानतात. ती विद्रोही मांडणी आकर्षक असते पण ही व्यवस्था बदलेपर्यंत काय करायचं याच उत्तर ते देत नाहीत. त्याच उत्तर लीलाताई आहेत. त्यांनी आहे त्याच अभ्यासक्रमात भर घातली. आपल्याला जो सामाजिक आशय मुलांपर्यंत पोहोचवायचाय ना तो त्यांनी पाठांना जोडून शिकवला व मुलांना समाजवास्तवाचा परिचय करून दिला. ‘गोरी गोरी पण फुलासारखी छान’ ही कविता भेदभाव करणारी आहे आणि यामुळे मुले आपल्या घरातल्या काळ्या माणसांविषयी नकारर्थी होतील अशी लीलाताईंनी त्यावर टीका केली आणि तिथेच न थांबता पर्यायी कविता बनवली ‘हसरी खेळकर असणारी छान दादा मला एक वाहिनी आण” हे लीलाताईंचे वेगळेपण आहे. ‘कमावणे’ या  क्रियापदाचा प्रसिद्धी कमावणे,पैसा कमावणे हा अर्थ सगळ्याच शाळा शिकवतात पण कमावणेचा एक अर्थ ‘कातडे कमावणे’ असा आहे हे सांगायला लीलाताई नाक्यावर चपला शिवणार्‍या च्या चर्मकार बंधूला शाळेत सन्मानाने बोलावतात आणि कातडे कमावण्याची प्रक्रिया समाजवून सांगन्याची विनंती करतात. निवारा वर्ष साजरे होताना मुलांना रस्त्यावर बरणी विकणारी माणसे कशी राहतात हे त्यांची वस्ती दाखवायला नेतात.

आज प्रकल्प शाळेत केले जातात पण ही पद्धती लीलाताई ३० वर्षे अमलात आणताहेत. एकदा मुलांनी वर्तमानपत्र बनविले.आयोडीनयुक्त मिठाची सक्ती केली गेली तेव्हा साधे मीठ त्याचे फायदे. दांडी यात्रेपासून तर आयोडीनची कमतरता यावर अभ्यास मुलांनी केला…पाण्याचे महत्व कळावे म्हणून पाणी प्रकल्प केला. त्यात पानी तयार कसे होते याचे प्रयोगशाळेतील प्रयोग,छतावरील पाण्याचा पुन्हा वापर,गळणार्‍या नळांचे एका मिनिटात इतके तर वर्षात किती पाणी वाया जात असेल ? असे गणित मुले मांडतात. २७२ कुटुंबाचे सर्वेक्षण करतात. इथेच प्रकल्प थांबत नाही तर नर्मदा घाटीत पाण्यात जी गावे बुडाली त्या गावातील मुलांना शाळेत बोलावून मुले त्यांची वेदना समजाऊन घेतात आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात.पाण्यावरच्या कविता गोळा करतात.

 शाळेतील अध्यापनपद्धती ही आज आपण चर्चा करतो त्या ज्ञानरचनावादी पद्धतीची आहे…शिक्षक सतत मुलामधील जिज्ञासा जागी करतात.त्यातून मुले खूप बोलकी झाली आहेत. शाळेत प्रश्न विचारा ?असा प्रत्येक विषयात उपक्रम असतो. फळ्यावर झाडाचे चित्र काढले जाते आणि मुले १२५ प्रश्न विचारतात. झाडाचे पान जसे वाळते तसा माणूस वाळत का नाही?असा प्रश्न असतो तर सापाला दूसरा साप चवतो का ?सगळ्या म्हशी काळ्या रंगाच्याच का असतात ?असे निरुत्तर करणारे प्रश्न मुले गोठा दाखवायला नेल्यावर विचारतात. मराठी भाषा शिकवण्यात या शाळेने जे रचनावादी उप्क्र्म केले ते थक्क करणारे आहेत. या विषयावर ‘लिहिणं वाचणं मुलाचं’ असं त्यांचं छान पुस्तक च आहे. ‘ग’ अक्षरापासून  जास्तीत जास्त शब्द सांगा असले खेळ. लीलाताई पहिला शब्द आणि शेवटचे क्रियापद सांगणार आणि मधले ७ शब्द जोडत वाक्य पूर्ण करायचे. असे बिनखर्चिक आनंद त्यांच्याकडे खूप आहेत. मुलांना रुमाल दिला तर मुले त्याच्या साठ वस्तू बनवून दाखवितात. हे बिनखर्चीक आनंद या शाळेकडून शिकले पाहिजेत.

आज परीक्षा  बंद करून आपण आनंददायी मूल्यमापन करतो आहोत. लीलाताईंची शाळा हे सारे ३० वर्षे करते आहे. त्यांचे या विषयावर ‘अर्थपूर्ण आनंद शिक्षणासाठी (उन्मेष प्रकाशन)एक पुस्तकच आहे. भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेत महाराष्ट्रातील काना,वेलांटी,उकार नसणार्‍या जिल्हयांची नावे लिहा. तर विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेत पाण्याचे रंगदर्शक,चवदर्शक,तापमानदर्शक,शब्द लिहा असे प्रश्न असतात. मराठीत ‘स्म’ ने सुरू होणारे शब्द लिहा. (आपल्याला फक्त स्मशान आठवते पण ही मुले खूप शब्द लिहितात)

गणित विषयात दिलेल्या संख्येचे ५ वाक्यात वर्णन करा यासोबत वर्तमानपत्रात जसे शब्दकोडे असते तसे गणिताचे शब्दकोडे बघितले की शिक्षकांच्या प्रतिभेचे कौतुक वाटते. असहकार चळवळ सुरू झाल्याचे वर्ष म्हणजे ती संख्या तिथे लिहायची. एकाचवेळी इतिहास व गणिताचा अभ्यास. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या प्रश्नपत्रिकेत चिकटवून त्यावर मुलांना व्यक्त व्हायला सांगीतले जाते. ‘एका आश्रमशाळेत लहानग्या मुलीला दिलेला चटका’ ही बातमी  प्रश्नपत्रिकेत देवून त्यावर मुलांना विचारलं जात

शाळेचे स्नेहसंमेलन असेच वेगळे. महागडी ड्रेपरी गरीब मुले आणू शकत नाही म्हणून शाळेच्या गणवेशातच मुले स्टेजवर असतात आणि गरज असेल तिथे कागदाचे मुखवटे,कपडे केले जातात. रेकॉर्ड डान्सपेक्षा आगलेवेगळे कार्यक्रमा असतात

मुले वाढदिवसाला खूप खर्च करतात. गरीब मुले तो करू शकत नाहीत. यातून एकाच दिवशी शाळेतल्या सर्व मुलांचा वाढदिवस साजरा केला जातो. मी पासून आम्ही आणि आपण असा स्वत:चा विस्तार शिकवला जातो..आणि पुन्हा हे सामुदायिक वाढदिवस अंधशाळा.आश्रमशाळा,साखरशाळा अशा मुलांसोबत केले जातात. तिथे सर्व मुलांना औक्षण केले जाते. लीलाताई सांगतात “आत्मकेंद्रितता कमी होऊन सामुदायित्वाच्या स्पर्शाने आपल्यातील माणूसपण उजळते’

डी एड नसलेल्या अनेक गृहिणी आणि  शिक्षणात रुचि असणार्‍यांना लीलाताईंनी शिक्षक बनविले. जून महिन्यात सलग ६ तासांची वार्षिक नियोजनाची मीटिंग होते. दर शुक्रवारी आठवड्याच्या नियोजनाची मीटिंग होते. यात लीलाताई शिक्षक सक्षमीकरण करायच्या . एखादा लेख कवीता चित्रपट यावर बोलायच्या. शिक्षकांच्या स्वयंमूल्यमापनाच्या अनेक पद्धती विकसित केल्या. ‘मी आणि पुढील वर्ष’ असे लिहून घेत शिक्षकांना विविध उपक्रम करायला त्या प्रेरित करत. आत्मशोध घेणार्‍या प्रश्नावल्या देत. शिक्षकांनी एकमेकांचे गुण दोष सांगत एकमेकांच्या विकासाला मदत करायची असं खूप काही.

राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आवर्जून लीलाताईंना भेटायला बोलावले. केंद्रीय शिक्षण सचिवांनी त्यांना दिल्लीला बोलावले.१९८६ च्या धोरणाबाबत चर्चा केली .शाळेला आर्थिक मदतीचा हात देवू केला पण नोकरशाहीने तो पर्यटन हाणून कसा पाडला हे लीलाताईंनी ‘प्रवास ध्यासाचा –आनंद सृजनाचा ‘ या पुस्तकात सविस्तर सांगितलाय. ते वाचून कुणालाही क्लेश होतात आणि आपले शिक्षण वेगाने पुढे का जात नाही याची उत्तरे मिळतात.

अशा या लीलाताई आज ८८ वर्षाच्या झाल्यात. अनेकदा शिक्षणतज्ञ शिक्षनातल्या प्रश्नांना खूप अमूर्त उत्तरे देतात पण लीलाताई देशातील सर्व प्रश्नांची उत्तरे ही वर्गखोलीत शोधतात.देशाचे भवितव्य भारताच्या वर्गखोलीत घडते आहे या वाक्याचा साक्षात्कार लीलाताई च्या शाळेत येतो.लीलाताई या प्रयोगशील शिक्षणातील शास्त्रज्ञ आहेत . त्यांनी विजेचा शोध लावला आता पुढे खेड्यापर्यंत वीज नेण्याची जबाबदारी आपली आहे .  प्रयोगशील शिक्षणाची पायवाट निर्माण केली शासनाने त्या पायवाटेचा हाय वे आता करायला हवा.

लीलाताई आता शाळेत येत नाही पण सुचेता पडळकर आणि त्यांच्या १६ सहकारी १४८ मुलासह शाळा त्याच लीलाताईंच्या मार्गाने त्याच जोमाने चालवत आहेत.

हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0