‘एक चूक म्हणजे साक्षात मृत्यूच’

‘एक चूक म्हणजे साक्षात मृत्यूच’

या उन्हाळी मोसमामध्ये एव्हरेस्ट शिखरावर मानवी ट्रॅफिक जाम झाल्याची छायाचित्रे आली आणि त्यापाठोपाठ शिखरावर काही गिर्यारोहक मृत्युमुखी पडल्याच्या बातम्याही आल्या. जगातील सर्वांत मोठी ७ शिखरे टीमने सर करण्याचा, अनेक जागतिक विक्रम नावावर असणारे आणि एव्हरेस्टचा उत्तम अनुभव असलेले गिर्यारोहक आणि गिर्यारोहकांचे मार्गदर्शक उमेश झिरपे यांच्याशी केलेली चर्चा.

प्रश्न– मध्यंतरी ‘एव्हरेस्ट’वर ट्रॅफिक जाम झाल्याची छायचित्रे आली आणि त्याचवेळी अपघात होऊन काही गिर्यारोहक मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या आल्या. हे असे अपघात का होतात?

उमेश झिरपे– एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये या मोसमात विविध देशांतील सुमारे ११ गिर्यारोहकांचा माउंट एव्हरेस्टवर मृत्यू झाला आहे. तसेच अशाच प्रकारच्या हिमालयातील इतर पर्वतांवर १० जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधून आलेला हा आकडा सुमारे २१ गिर्यारोहकांचा आहे. मनाला अस्वस्थ करणाऱ्या या बातम्या आहेत. दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. आम्ही काही गिर्यारोहकांनी एकत्र येऊन या घटनांचे विश्लेषण केले आहे. माध्यमांमध्ये आलेली छायाचित्रे पाहता, अपघातांचा सगळा दोष, हा ट्रॅफिक जामला दिला जात आहे. या ११ जण जाण्याची घटना चार ते पाच दिवसांमध्ये घडल्या आहेत.

त्यावेळी ‘वेदर विंडो’ होती आणि त्या काळात सुमारे ५०० गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट चढण्याचा करण्याचा प्रयत्न केला. जर आपण ट्रॅफिक जाम म्हणत असू, तर हा मृत्यूचा आकडा खूप मोठा झाला असता.

प्रश्न – मग नेमके काय झाले असावे?

उमेश झिरपे– एव्हरेस्टची उंची ८८४० मीटर आहे. २९ हजार फूट आहे. जेव्हा तुम्ही ७५०० मीटरच्या वर जाता, तेव्हा तुम्ही ‘डेथ झोन’(मृत्यूचे क्षेत्र)मध्ये जाता. त्यावेळी अनेक भयानक अडचणी असतात. त्या ठिकाणी हवेतील प्राणवायूचे प्रमाण अतिशय कमी होते. नेहमी सामान्य परिस्थितीमध्ये हवेमध्ये २१ टक्के प्राणवायू असतो, तर एव्हरेस्टवर ७५०० फुटावर एक ते दोन टक्के इतकाच प्राणवायू असतो. प्रचंड थंडी असते. तापमान उणे ४० अंश ते उणे ६० अंश इतके कमी असते. तसेच वर्षभर ‘जेट स्ट्रीम’ म्हणजेच ताशी १०० किमी वेगाचे वारे वाहत असतात. तसेच कोणताही प्राणी या मृत्यू क्षेत्रात जिवंत राहू शकत नाही, असे वैद्यकीय शास्त्र सांगते. मग जर या भागामध्ये एखाद्या गिर्यारोहकाने प्रवेश केला, तर त्याला किमान दोन रात्री आणि तीन दिवस काढावे लागतात. त्याला कृत्रिम प्राणवायूचा पुरवठा केला जातो. या ठिकाणी जाईपर्यंत एका सिलिंडरची किंमत खूप वाढते. आणि त्याला तो सिलिंडर स्वतः वाहवावा लागतो आणि एक शेर्पा वाहवत असतो. या क्षेत्रामध्ये पाच ते सहा ऑक्सिजनचे सिलेंडर लागतात. त्याचे पण वेळेचे गणित आणि व्यवस्थापन करावे लागते. एक सिलेंडर सात ते आठ तास चालतो. त्यावर एक मीटर असतो. आपण हळू चाललो तर सिलेंडर लवकर संपतो. मग त्याचे मध्यम स्तरावर व्यवस्थापन करावे लागते. लक्षात घ्या जर आयत्यावेळी सिलेंडर संपले, की १० मिनिटात तुमचा मृत्यू होणे अटळ असते. यामध्येही अनेक अडचणी निर्माण होतात. सिलेंडरचा दाब येतो. मास्कमध्ये गडबड होते. या क्षेत्रामध्ये प्रवेश केला, की एक एक अवयव निकामी व्हायला लागतो. शरीरातील पाणी कमी होऊ लागते. त्यामुळे थकवा येतो. त्यामुळे थोडा वेळ इकडे तिकडे झाला, की मृत्यू अटळ असतोच. त्याशिवाय हाय अिल्टट्यूडचे (अति उंचावरील क्षेत्र) आजार झपाट्याने २४ तासात होतात. जसे की छातीमध्ये पाणी होणे, मेंदूमध्ये भास-भ्रम होतात. त्यामुळेच त्याला मृत्यूचे क्षेत्र असे म्हटले जाते. त्यामुळे वेळेत वर जाऊन, वेळेत खाली यावे लागते.

जे ११ गिर्यारोहक एव्हरेस्टवर मृत्यू पावले, त्यांच्याबरोबर असणाऱ्या ११ शेर्पांच्या मुलाखती, नेपाळमधील ‘हिमालयीन टाइम्स’, या वृत्तपत्राने केल्या आहेत. अमेरिकन, आयरिश गिर्यारोहक का गेले, अशा प्रत्येकाची परिस्थिती जाणून घेतली. त्यामध्ये अनेकजण थकले होते. अनेकांना वेगवेगळे आजार झाले होते, अनेकांचा प्राणवायू संपला होता, हे लक्षात आले. एक अमेरिकन गिर्यारोहक होता. त्याने एव्हरेस्ट शिखर सर केले आणि नंतर तिथूनच खाली उडी मारली. त्याला भास झाले असावेत. अशी कारणे पुढे आली. त्यामुळे त्यात ट्रॅफिक जॅम होण्याचा काही संबंध नसल्याचे पुढे आले आहे.

सध्या प्रत्येकालाच एव्हरेस्टवर जायची घाई झाली आहे. एव्हरेस्ट चढायचाच, या वेडापायी अनेकजण एव्हरेस्टवर जात आहेत. त्यातील ७० टक्के गिर्यारोहक हे अप्रशिक्षित आहेत. एखादा बेसिक कोर्स आणि छोटी मोहीम केलेली असते. त्या जोरावर एव्हरेस्टवर जाणे, धोक्याचेच आहे. किमान ५ ते ६ वर्षांचा हिमालयातील मोहिमांचा अनुभव हवा. कोर्स फक्त माहिती देतो. प्रत्यक्ष अनुभव हवाच. परिस्थिती, थंडी, अचानक निर्णय कसे, घ्यायचे, हे मोहिमांतून कळते.

प्रश्न – परिस्थिती अशी बदलली?

उमेश झिरपे : १९९२ पर्यंत परिस्थिती वेगळी होती. तोपर्यंत नेपाळ सरकार दरवर्षी केवळ ४ ते ५ परवाने, म्हणजे ४० ते ५० लोकांना परवाने देत होते. किमान ४ ते ५ वर्षांची वेटिंग लिस्ट होती. शेर्पा तेव्हाही मदत करत होतेच. म्हणजे १९२० पासून ब्रिटीशांनी मोहिमा सुरू केल्या तेव्हापासून शेर्पा मदत करतात. पण तोपर्यंत जे गिर्यारोहक, या मोहिमा करायचे ते अतिशय समर्थ होते. एव्हरेस्टचे आव्हान पेलण्याची ताकद होती. कठीण परिस्थिती हाताळत होते.

आज जे मृत्यू झाले आहेत, त्यातील एकही मृत्यू असा नाही, की हिमवादळ झाले, कडा कोसळला, अशा नैसर्गिक आपत्ती आल्या नव्हत्या. म्हणजे मानवी चुका झाल्या आहेत.

प्रश्न –यावर उपाय काय ?

उमेश झिरपे : यावर उपाय म्हणजे परिस्थितीचा अंदाज घेऊन तातडीने उंची कमी करणे. यासाठी तुम्हाला परिस्थिती समजावी लागते, त्यासाठी अनेक मोहिमांचा अनुभव आणि प्रशिक्षण लागते. किंवा तुमच्याकडे उत्तम नेतृत्त्व लागते.

१९९२-९३ नंतर व्यावसायिक मोहीमा सुरू झाल्या. स्कॉट फिशर यांच्यासारख्या गिर्यारोहकांनी, पैसे द्या आम्ही तुम्हाला एव्हरेस्टवर नेतो, अशा योजना सुरू केल्या. यामुळे पैसे असलेल्यांची गर्दी झाली. एव्हरेस्टवर जाऊन आलो, असे नावामागे लावण्यासाठी अनेकजण आले. काही प्रशिक्षण नाही, अनुभव नाही, असे अनेक हौशी लोक आले आणि पुढे अपघात घडले.

एक लक्षात ठेवले पाहिजे, की एव्हरेस्ट जगातील सर्वांत उंच पर्वत आहे आणि तो तसाच राहणार आहे. प्रत्येकालाच त्याचे आकर्षण आहे आणि ते राहणार. एव्हरेस्टवर जाऊ नका, असे मी म्हणणार नाही. पण त्यासाठी कठोर तयारी करणे गरजेचे आहे. मानसिक, शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे.

नेपाळ सरकार आता हवे तेवढे परवाने वाटत आहे. ११ हजार अमेरिकन डॉलर दिले, की परवाना दिला जातो. त्यासाठी कोण किती सक्षम आहे, हे पाहिले जात नाही. या संख्येवर मर्यादा आली पाहिजे. १०, ११ मे नंतर ‘वेदर विंडो’ मिळते. २५ मेपर्यंत वाऱ्याचा वेग हा ताशी ४० किमीपेक्षा कमी असतो. हा काळ सलग, किंवा एक दोन दिवसांच्या अंतराने येतो.

प्रश्न – तुमच्या काही सूचना आहेत का?

उमेश झिरपे : ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण संघ’, या महाराष्ट्रातील सर्व गिर्यारोहकांच्या असोसिएशनतर्फे आम्ही भारतीय दूतावासाच्या माध्यमातून नेपाळ सरकारला काही सूचना केल्या आहेत. कारण खूप भारतीय गिर्यारोहक नेहमी एव्हरेस्टवर मोहिमा काढत असतात.

परवान्यांवर मर्यादा आणा. ज्यांना परवाने दिले जातात, त्यांची पात्रता तपासा, म्हणजे त्या गिर्यारोहकाने ७ हजार उंचीवर मोहीम केलेला अनुभव हवा. हिमालयात मोहीमा करण्याचा ५ वर्षांचा किमान अनुभव हवा. वैद्यकीयदृष्ट्या सक्षम हवा, अशा सूचना आम्ही केल्या आहेत.

नेपाळ सरकार ११ हजार अमेरिकन डॉलर, जी परवाना फी आकारते, त्यामध्ये कोणत्याही सुविधा देत नाही. त्यांनी २४ तास उपलब्ध असणारी शेर्पांची मदत टीम, हेलिकॉप्टर त्वरित उपलब्ध हवे, वैद्यकीय सुविधा मोफत मिळाली पाहिजे, अशा सूचना आम्ही केल्या आहेत.

एव्हरेस्ट मोहिमेसाठी खूप खर्च येतो. आपल्याकडे असे पैसे उपलब्ध नसल्याने, एकदा एव्हरेस्टच्या जवळपास गेले, की तो सर करण्यासाठी आटापिटा केला जातो, कारण परत असे पैसे जमवणे अवघड असते. त्यासाठी गिर्यारोहणविषयक जागृती करणे आवश्यक आहे. परदेशातील गिर्यारोहक शक्यतो जीवावर बेतेल असे काही करत नाहीत. पुन्हा पुन्हा येऊन प्रयत्न करतात. आपल्याकडे तशी होण्याची गरज आहे. आपण लक्षात घेतले पाहिजे, की पर्वत तिथेच राहणार आहे. आपल्यादृष्टीने मोहीम यशस्वी करून सुरक्षित परतणे, हे महत्त्वाचे आहे.

आम्ही २०१२ मध्ये सर्वात मोठी नागरी एव्हरेस्ट मोहीम केली होती. त्यावर्षी १९ मे ही उत्तम ‘वेदर विंडो’ होती. त्या दिवशी आमच्या टीममधील १० जण एव्हरेस्ट चढत होते. त्याचवेळी ७ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. पण आमची सगळी टीम सुरक्षित होती आणि सुरक्षित परतली. यावर्षी आम्ही जगातील सर्वात अवघड ‘कांचनजंगा’ ही मोहीम १० जणांना घेऊन भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम केली आणि यशस्वी केली.

 प्रश्न – काही वर्षी मोहीमा थांबवाव्यात का?

उमेश झिरपे : मला असे वाटत नाही आणि हे त्यावरील उत्तर नाही. तसेच त्याभोवती खूप मोठे अर्थकारण आहे. शेर्पा, अन्न पुरविणारे, नेपाळ सरकार, हॉटेल्स अशी मोठी साखळी आहे. पण काही उपाययोजना करणे नक्कीच गरजेचे आहे. बंदी हा उपाय नाही, तर प्रबोधन आणि सुरक्षा नियम याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कारण हा असा साहसी खेळ आहे, की इथे कोणत्याही चुकीला क्षमा नाही.

COMMENTS