त्या कथांमध्ये आदिवासींच्या रोजच्या जीवनातून उमगलेलं तत्वज्ञान सापडतं, जीवनाचा सह-आनंद सापडतो, निसर्गावरचं - प्राणिमात्रांवरचं प्रेम आणि निसर्गाप्रती कृतज्ञता सापडते, एक विलक्षण मोकळेपणा सापडतो.
आदिवासी कला म्हटलं, की डोळ्यासमोर येतात ती वारली चित्रे; पण आज ही चित्रे त्यांच्या मूळ संदर्भापासून तोडली जाऊन वाढत्या व्यापारीकरणामुळे फक्त नक्षीकामापुरती राहिली आहेत. ही चित्रे मुळात कथाकथनांची साधने होती. गोष्ट सांगण्यासाठी आदिवासी स्त्रिया ती काढत. या कथांद्वारे आदिवासींची सारी जीवनपद्धती चित्रित होत होती. त्या कथांमध्ये आदिवासींच्या रोजच्या जीवनातून उमगलेलं तत्त्वज्ञान सापडतं, जीवनाचा सह-आनंद सापडतो, निसर्गावरचं – प्राणिमात्रांवरचं प्रेम आणि निसर्गाप्रती कृतज्ञता सापडते, एक विलक्षण मोकळेपणा सापडतो.
भारतीय संस्कृतीतला विविधपणा, चैतन्य अनुभवायचे असेल, तर उघड्या काना-डोळ्यांनी आणि मोकळ्या मनाने आपला भोवताल ऐकायची, पाहायची आणि सहृदयतेने विचार करायची गरज आहे. ही गरज कष्टकरी संघटनेच्या प्रदीप प्रभू आणि शिराझ बलसारा यांनी ओळखली. आदिवासी गावागावांतून फिरून त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वारली कथा गोळा केल्या. इंग्रजीत ‘विस्डम फ्रॉम द विल्डरनेस’ या पुस्तकातून पुढे आणल्या. त्यातील पंधरा निवडक कथांचे पुनर्कथन मराठी वाचकांसाठी सुहास परांजपे आणि स्वातीजा मनोरमा यांनी ‘जंगलाच्या सान्निध्यात उमलले ज्ञान- आदिवासी बोधकथा, एक पुनर्कथन’, या पुस्तकात केले आहे. अतिशय देखणे निर्मितीमूल्य असलेले हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रकशित केले आहे.
या पुनर्कथनात स्थूलमानाने कथांचे पाच प्रकार आहेत.
१. आदिवासींच्या जगण्यातून आलेले तत्त्वज्ञान सांगणाऱ्या कथा – ‘कहंकारक आणि अहंकारक’ही पहिली कथा याच प्रकारात मोडते. विलक्षण प्रेम, माणूसपण, देवपण, त्यांच्या मर्यादा, माणूस आणि निसर्ग यातला सहआनंद निरनिराळ्या प्रकारची नृत्ये, वाद्ये आणि संगीत यातून व्यक्त होताना दिसतो.
२. काही कथा एक ऐतिहासिक पट मांडून आदिवासेतर समाजाच्या वसाहतवादाबद्दलची वारली समाजाची, समज थोडक्यात आणि बांधीवपणे पुढे आणतात. वारली समाजाच्या दृष्टिकोनाबद्दल विचार करण्यास भाग पाडतात. आदिवासींच्या गरजांचा एक धूर्त रानउंदीर फायदा कसा करून घेतो? हे सांगणारी ‘रानउंदराचे पराक्रम’, ही या प्रकारातील कथा पुस्तकात येते.
एका रानउंदराच्या शेपटीत काटा रुततो. एक आदिवासी बाई त्याला मदत करते. पण काटा काढताना रानउंदराची शेपटी मोडते. त्यामुळे रानउंदीर नुकसानभरपाईची मागणी करतो. कांगावा करत, त्या आदिवासी बाईकडून शेपटीच्या बदल्यात कोयती मागून घेतो. कोयती मिळाल्यावर रानउंदीर खुश होतो. पुढे हा रानउंदीर कोयतीच्या बदल्यात टोपल्या, टोपल्यांच्या बदल्यात मडकी, मडक्याच्या बदल्यात भाजीपाला अशा अनेक गोष्टी आदिवासी लोकांकडून उकळतो.
कथेमध्ये म्हटले आहे, ‘…. रानउंदीर खुश होता, “आता मला हे चांगले जमू लागले आहे. आज काय मजा आली! कसा घाबरला तो टोपली विणणारा. पाहिजे तेव्हा गोड बोलणे, पाहिजे तेव्हा कांगावा करणे, आकांडतांडव करणे, मला आता जमू लागले आहे. आणि पाहा शेपटीतला काटा तर त्या आदिवासी बाईकडून मी काढून घेतलाच, वर तिच्याकडून कोयती मिळवली. आता कोयतीच्या मदतीने टोपल्याही मिळाल्या. असेच चालू राहिले तर माझा फायदाच फायदा आहे!’
रानउंदराकडून फसवले गेलेले शेतकरी गावात जाऊन वडिलधाऱ्यांना भेटतात. काही तरुण शेतकाऱ्यांना वाटत असते की रानउंदराला अडवून भाजीपाला परत आणावा. पण वडीलधारे त्यांना सल्ला देतात, “तुम्ही मडकी घ्यायच्या आधीच विचार करायला हवा होता. तुम्हाला तुमची मेहनत वाचवायची एव्हढी घाई झाली होती, की त्या रानउंदराने सांगूनसुद्धा तुम्हाला ऐकू आले नाही. तो रानउंदीर तुम्हाला म्हणाला होता की, काम झाले की मडकी परत करावयाची आहेत, नाहीतर तुम्हाला त्याची भारी किंमत मोजावी लागेल. तुम्हाला त्या रानउंदराच्या बोलण्यातली मेख समजली नाही. म्हणूनच त्याने तुमचा फायदा करून घेतला. मडकी फुटतील हे तुम्हाला वाटले नाही तुमची मेहनत वाचेल एव्हढेच तुम्हला दिसले. एका महिन्याचे कष्ट व मेहनत वाया गेली. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे मडकी परत करायची होती. तेव्हा आता तुम्हाला तुमच्या म्हणण्यावर मागे जाता येणार नाही. खूप कठीण धडा मिळाला तुम्हाला; पण यातूनच तुम्ही शिकाल. पक्के ज्ञान सहज मिळत नसते. मागचे विसरा. पुढे पाहा. हीच चूक पुन्हा करू नका.’
रानउंदराच्या कथेत कथाकार शेवटी असे विचारतो “…. इथपर्यंत गोष्ट तुम्ही ऐकलीत, तर आता सांगा हा रानउंदीर कुणासारखे वागतो आहे? पारश्यासारखा? सावकारासारखा? वेड्यासारखा? पाटलांसारखा? जमीनदारासारखा? काय, अंबानीसारखा? इंग्रजांसारखा? मारवाड्यासारखा?…. बस! बस! पुरे! पुरे! मी काही उत्तर देणार नाहीये. एव्हढे मात्र सांगतो. रानउंदीर ज्यांच्यासारखा आहे त्यांनी इथे येऊन आपले सर्वस्व लुटले आहे ; आपली जमीन आपली उपजीविका, आपली पिके, आपली गुरे, अगदी आपल्या बायका आणि आपले भविष्यदेखील.’ भांडवलशाही समाजाकडे पाहण्याची आदिवासींची दृष्टी रानउंदराच्या कथेतून प्रकट होते. (वरचे वाक्य इथे घेतले)
३. पर्यावरणासंदर्भातल्या कथा – शिकार व रानमेवा गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या जमाती जसजशा शेती करू लागल्या, तसतशा झालेल्या संक्रमणातून निसर्ग व माणूस, विशेषतः माणूस व प्राणी यांच्या नातेसंबंधात कोणते बदल होत गेले याचा वेध घेतात. तसेच वेगवेगळ्या उत्पादनपद्धती आत्मसात होताना माणूस आणि निसर्ग यांच्यातील निर्माण झालेल्या संबंधाचे पुनरावलोकन करतात. ‘घारीमा’, ‘उंदरांचा वाटा ‘, ‘सुबत्तेची अंगठी’ या कथा या प्रकारात मोडतात.
४. काही कथा पुरुषप्रधान संस्कृतीतील स्त्रियांचे स्थान, तसेच तिला स्त्रियांनी दिलेली टक्कर अधोरेखित करतात. वसाहतवादी ब्रिटिश व्यवस्थापनाने वारली पुरुषांना जमिनीचा मालकी हक्क देऊन वारली समाजातील पुरुषसत्तेला बळकटी आणली. जमीन हे वारल्यांचे मुख्य नैसर्गिक उपजीविकेचे साधन. त्या साधनापासून स्त्रियांना वंचित केले गेले. स्त्रिया दुर्बल बनल्या खऱ्या, पण त्यांनी बलवानांच्या सामर्थ्याला तोंड देण्यासाठी दुर्बलांची साधने वापरली. स्त्रियांच्या पुरुषसत्तेच्या विरोधातील संघर्षामध्ये, लैंगिकतेसारखी पुरुषसत्तेचीच साधने पुरुष सत्तेवर कशी उलटू शकतात याचे वर्णन या कथा करतात. ‘छत्तीस नखरे’, ‘न्हावी आणि मांजर’ आणि ‘चुंबळ’ या कथा या प्रकारात मोडतात.
‘छत्तीस नखरे’ मधील एका आदिवासी तरुणाला एक शहरी जाण असणारा विधुर आदिवासी फितवतो. कथेत म्हटले आहे, ‘आणि मग विधुर त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणाला, “आणखीन एक गोष्ट तुला सांगतो. बायांच्या अंगी छत्तीस नखरे असतात. त्या आपल्याला स्वर्गसुख देऊ शकतात; पण तुम्हाला स्वर्गसुख देऊन त्या तुम्हाला बांधून घेतात. उल्लू बनवतात. आपण त्यांच्याकडून ते सुख घ्यायचे असते. त्या काही ते सहज देत नाहीत. पण त्यांना ताब्यात ठेवून, प्रेमात वाहून न जाता ते घ्यायचे असते. मग तो त्याच्या आणखी जवळ येत त्याला म्हणाला ,”तुला तुझ्या बायकोने कधी स्वर्गसुखाचा अनुभव दिला आहे का?” तरुण म्हणाला, ‘आमचे मिलन खूप खूप सुख देणारे असते.’ विधुर म्हणाला, “अरे त्या रोजरोजच्या सुखाबद्दल मी म्हणत नाही. स्वर्गसुखाबद्दल बोलतोय. बायांच्या नखऱ्यांनी मिळते. ते तुला मिळालेलं दिसत नाही. तू जरा रागाव, तिला तिचे नखरे दाखवायला लाव. मग बघ काय होत ते.”
त्या दिवसापासून त्या तरुणाच्या डोक्यावर बायांच्या नखऱ्याचे व त्यामुळे मिळणाऱ्या स्वर्गसुखाचे भूत स्वार झाले. त्यांच्या रोजच्या मिलनातून मिळणारे समाधान नाहीसे झाले. तो चिडू लागला. जास्त पिऊ लागला……. त्या तरुणाच्या बायकोने नवरा विचित्र का वागतो आहे याचा छडा लावला. नवऱ्याचा पाठलाग केला, त्याचा माग काढला. तेव्हा तिच्या लक्षात आले की विधुर नवऱ्याला नादी लावून अशक्य गोष्टी शिकवत आहे. तिला नवऱ्याची काळजी वाटू लागली.
तिला वाटत होते की नवरा स्वतःहून विषय काढणार नाही. तेव्हा तिने ठरवल्याप्रमाणे सरळ विषयाला हात घातला. ती म्हणाली,”तू सांगणार नसशील तर नको सांगू. पण तू त्या विधुराच्या बोलण्यामुळेच मला मारू लागला आहेस. दूर दूर राहू लागला आहेस. हो ना?” त्याचा चेहरा अचानक उजळला. तो म्हणाला, ‘तुला माहित आहे ना सगळं? तर मग दाखव एखादा नखरा आणि मिळू दे ना मला स्वर्गसुख!’ तरुणीला खूप दुःख झाले. ती म्हणाली, “अरे मला कुटून का तुला स्वर्गसुख मिळणार आहे? हे छत्तीस नखरे, स्वर्गसुख असलं काही नसतं. आपण जेव्हा जवळ येतो, तेव्हा करतो ते सगळे नखरेच असतात ना? आणि तेव्हा मिळणारं सुख काय स्वर्गसुख नसतं?” ती पुढे म्हणाली, “जरा त्या विधुराचं बोलणं बाजूला ठेव आणि विचार कर. त्या दिवशी रात्री जेव्हा म्हणाला होतास की, मला वाटतंय सगळीकडे चांदण्या बरसत आहेत! ते सुख काय स्वर्गसुखाहून कमी होते का? त्या दिवशी मोहाचे झाड फुललेलं होतं आणि पूर्ण चंद्र होता तेव्हा? ते काय स्वर्गसुख नव्हते? “तरुण म्हणाला, “अस कसे म्हणतेस? तो विधुर देश विदेश फिरलेला आहे. त्याचे किती बायकांशी संबंध आहेत. तो कशाला खोट सांगेल?’
तरुणी त्याला म्हणाली, ‘त्या सगळ्या कहंकारकाच्या कथा आहेत. बाईबरोबर एक रात्र झोपला तर बाई कळते का? आणि तो विधुर काय उडता पक्षी आहे! तसं व्ह्यायचेय का तुला? माझ्याबरोबरोबर मिळणाऱ्या सुखापेक्षा ते पळतं सुख तुला जास्त महत्त्वाचं वाटत असेल तर हो बाबा उडता पक्षी!” ती तरुणी पुढे आपल्या नवऱ्याला चांगला धडा शिकवते. आणि त्याच्या डोक्यावरून छत्तीस नखऱ्याचं भूत देखील उतरवते.
५. बालकथा – दुर्बलांच्या बलवानांवर युक्तीने विजय मिळवलेल्याच्या या कथा आहेत.
प्रस्तावनेमध्ये प्रदीप प्रभू आणि शिराझ बलसारा म्हणतात, ‘सत्ताधारी सांस्कृतिक अभिजनांच्या घातक माऱ्यामुळे आदिवासी मौखिक परंपरा मोडकळीस आल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून आदिवासी जमातींची सामाजिकता व संस्कृती कोलमडली आहे आणि त्याचे स्वरूप बदलून ती विद्रुप झाली आहे. वाईट गोष्ट ही आहे की, सामूहिक सहआनंदाच्या भोवती बांधल्या गेलेल्या त्यांच्या प्रगत समतावादी सामाजिक व्यूहांचा नाश करून तथाकथित आधुनिकता एतद्देशीय लोकांना कचरापेटीत नेवून टाकत आहे. सर्व जीवांसोबत जगण्यातून निर्माण झालेल्या सर्व जीवांना मध्यवर्ती स्थान आहे, अशा प्रकारच्या प्रगत संकल्पनांना आदिवासी संस्कृतीमध्ये कळीचे स्थान आहे. आता या प्रगत संकल्पनांचा नाश होत आहे आणि त्याची जागा परस्परविरोधावर आधारलेली मूल्ये घेत आहेत.
शिक्षण आणि विकास यातून आदिवासींना मुख्य प्रवाहात आणताना, ते मुख्य प्रवाहात अगदी तळाला राहतात आणि प्रवाहात येण्याच्या परिणामीच त्याच्या पारंपरिक समाजाचा विध्वंस होतो, हा मोठा उपरोधच. अधिकृत सरकारी दृष्टिकोनावर भारतामध्ये विविध संस्कृती एकत्र येऊन त्यांची देवाणघेवाण सुरू झाली पण हा दृष्टिकोन भारतातील आदिवासींना मात्र एतद्देशीय मानायला तयार नाही. राष्ट्राचे प्राथमिक उद्दिष्ट आदिवासींना मुख्य प्रवाहाचा भाग बनविण्याचे मानल्यामुळे, त्याचे अनिवार्य परिणाम म्हणून आदिवासी संस्कृतीची समृद्धी नष्ट झाली आहे. आणि आदिवासी संस्कृतीचा बौद्धिक वारसा क्षुल्लक व नगण्य ठरविला गेला.’
जंगलांच्या सान्निध्यात उमललेले ज्ञान
आदिवासी बोधकथा – एक पुनर्कथन
इंग्रजी संकलन – प्रदीप प्रभू, शिराझ बलसारा
मराठी पुनर्कथन – सुहास परांजपे, स्वतीजा मनोरमा
मनोविकास प्रकाशन
मूल्य २५० रु.
COMMENTS