जादुई वास्तववादाला मार्केझने आपल्या भाषेच्या आणि शैलीच्या बळावर जगभर लोकप्रिय केलं. तो जादुई वास्तववाद (magical realism) तेवढ्याच ताकदीने पडद्यावर आणण्याचे कठीण आव्हान निर्माते आणि दिग्दर्शकांसमोर आहे.
नेटफ्लिक्सने काही दिवसांपूर्वीच ‘गॅब्रिएल गार्सिया मार्केझ’ या थोर लेखकाच्या ‘वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड’ (१९६७ साली प्रसिध्द झालेल्या) या जगप्रसिद्ध कादंबरीवर मालिका करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. खुद्द मार्केझची दोन्ही मुलं यासाठी कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहणार आहेत. अनेक मोठ्या साहित्यकृतींवर आधारित चित्रपट नेमाने बनत असतातच. यांत नवे असे काही नाही. नेटफ्लिक्सच्या या घोषणेनंतर जगभर विखुरलेल्या मार्केझच्या चाहत्यांच्या मात्र भुवया उंचावल्या आहेत. त्याला अर्थात कारणही तसेच आहे.
मार्केझने त्याच्या हयातीत ‘वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड’च्या चित्रीकरणाला कधीच परवानगी दिली नाही. अनेक लेख आणि मुलाखतींमधून त्याने तसे उघड बोलूनही दाखवले. मार्केझ काही सिनेमाचा विरोधी नव्हता. उलट सिनेमाविषयी त्याला अतोनात प्रेम होते. त्याच्या इतर कथा आणि कादंबऱ्यावरील चित्रपटांसाठी त्याने आनंदाने परवानगीही दिली. मात्र ‘वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड’ या कादंबरीवर कधीही सिनेमा बनणार नाही हे त्याने स्पष्ट केले होते.
एकतर सात पिढ्यांची कथा सांगणाऱ्या या महाकादंबरीला एक अथवा दोन सिनेमांत प्रस्तुत करणे अगदीच अशक्य होते. शिवाय, हॉलिवूडला यावर सिनेमा करू दिलं की कादंबरीतील पात्रांना आपसूक गोरे चेहरे येणार आणि स्पॅनिशशिवाय इंग्रजीसकट इतर कुठलीही भाषा कादंबरीला न्याय देऊ शकणार नाही असे त्याला वाटत होते.
मार्केझच्या नकारामागे केवळ असा तांत्रिक विचार नव्हता तर त्याच्या वाचकांच्या मनोभूमिकेचाही त्याने विचार केला होता. कादंबरी वाचत असताना वाचक त्याच्या कल्पनेत कथानकाशी सुसंगत असे प्रतिविश्व निर्माण करतो. कादंबरीतील पात्रांना त्याच्या जीवनातील आणि स्मृतींमधील चेहरे देतो आणि त्याने कल्पिलेल्या जगातच कादंबरीचे कथानक घडत जाते. कादंबरी वाचत असतानाच वाचक त्याच्या कल्पनेत एक चित्रपट पाहात असतो. वाचकाच्या डोक्यातील या चित्रपटाला धक्का लागू नये, असे मार्केझला वाटत होते. त्यामुळेच चित्रपटासाठी अनेक प्रस्ताव त्याच्याकडे येऊनही मार्केझ आपल्या भूमिकेवर ठाम राहून कादंबरीचे हक्क द्यायला नकार देत राहिला.
मार्केझच्या मृत्यूपश्चात ही कादंबरी पडद्यावर आणण्यासाठी परवानगीचा प्रश्न नेटफ्लिक्सने सहज सोडवला आहे. मात्र मूळ कादंबरीचा बाज, त्याचे महाकाव्य सदृश्य कथानक आणि खास मार्केझची शैली पडद्यावर टिकवण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलावे लागणार आहे. मार्केझच्या कुठल्याही कथा आणि कादंबऱ्यांचे स्वरूप केवळ एक चांगले कथानक इतपत मर्यादित नाही. मार्केझच्या कथा-कादंबरीत कथनाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व मार्केझची जादुई भाषा आणि निवेदनशैलीला आहे.
मार्केझच्या कादंबऱ्यांमधून त्याची विशिष्ट भाषाशैली दुर्लक्षित करून केवळ कथानक पडद्यावर आणणे म्हणजे आत्मा हरवलेल्या मनुष्याला जगासमोर आणण्यासारखे आहे. मार्केझच्या ‘लव्ह इन द टाईम ऑफ कॉलरा’ या कादंबरीच्या वाचकांना त्यावर आधारीत चित्रपट पाहून असेच काहीसे वाटले होते.
कादंबरीविषयी :
‘वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड’ ही बुएंदा कुटुंबाच्या सात पिढ्यांची कथा सांगणारी महाकादंबरी आहे. कादंबरीची सुरूवात एका मोहिमेने होते. या कादंबरीतील सर्वात विलक्षण पात्र जोझ अर्काडीयो बुएंदा एका दुर्दैवी घटनेनंतर त्याची पत्नी आणि गावातील मोजक्या कुटुंबांचा ताफा घेऊन अधिक चांगले जीवन नव्या ठिकाणी सुरू करण्यासाठी गावाबाहेर निघतात. शेकडो मैलांच्या या प्रवासात जोझला एक स्वप्न पडते. त्या स्वप्नात त्याला काचेचे गांव दिसते. त्याच्या स्वप्नात दिसलेल्या गावसदृष्य जागा त्याला अनेक दिवसांच्या खडतर प्रवासानंतर मिळते. त्या ठिकाणी गाव वसविले जाते. मकोंडो असं नाव जोझ त्या गावाला देतो.
गाव वसल्यानंतर मकोंडोमध्ये विलक्षण अशा घटनांची एक मालिकाच सुरू होते. दशकानुदशके मकोंडोवासी आणि बुएंदा कुटुंबीय भल्या बुऱ्या प्रसंगांना तोंड देत जगत असताना एकामागून एक नशिबाचे दणके बसत राहतात. साडेचारशे पृष्ठे व्यापणाऱ्या या कादंबरीत काय घडत नाही? प्रेम, अनुराग, जन्म, मृत्यू, युद्ध आणि शांती, विवाह, खून, हिंसाचार, नरसंहार! जगाच्या पाठीवर कुठल्याही गावांत, शहरात, राष्ट्रांत, खंडात जेवढ्या म्हणून विलक्षण घटनांना माणूस आजवर सामोरा गेला आहे, त्याहून विलक्षण घटीते मकोंडोमध्ये घडत राहतात.
कादंबरीच्या शेवटी बुएंदा कुटुंबाच्या एका वारसाला आजवर कुणालाही न सुटलेले कोडे सुटते. बुएंदा कुटुंबाच्या आणि मकोंडो गावच्या विनाशाचे ते भाकीत असते. त्या विनाशातून स्वत: कोडे सोडविणाऱ्यालाही आपला बचाव करता येत नाही.
मार्केझने ही कादंबरी लिहिली त्याआधी तो मिळेल ती किरकोळ कामं करत आपला चरितार्थ चालवत होता. जाहिरातीसाठी कॉप्या, वर्तमानपत्रासाठी लेख तर कधी पटकथा लिही अशी कामं तो करायचा. मार्केझने कादंबरी लिहायला सुरवात केली त्यानंतर मात्र हे सगळच थांबलं. पैसे येणंही बंद झालं. कादंबरी लेखनाच्या दीड वर्षांच्या काळात मार्केझच्या पत्नीने घरातील एक-एक सामान विकून घर, घराचा खर्च चालविला होता. कादंबरी प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र मार्केझने स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती असे यश त्याला मिळाले. १९८२ साली मार्केझला नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हाही याच कादंबरीचा प्रामुख्याने विचार केला गेला होता.
जादुई वास्तववादाला पडद्यावर आणण्याचे आव्हान
मार्केझच्या लेखनाचे सर्वाधिक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘जादुई वास्तववाद’ (magical realism) होय. जादुई वास्तववादाची काहीशी ढोबळ व्याख्या अशी करता येईल. “कथनाच्या ओघात लेखक, विलक्षण आणि अशक्यप्राय अशा एखाद्या घटनेचे इतक्या तपशीलवार आणि सूक्ष्म असे वास्तववादी वर्णन निवेदनाचा रोख किंचितही न बदलता करतो की, एरवी अशक्यप्राय वाटू शकणाऱ्या असामान्य/अतीवास्तववादी (surreal) घटनाही अगदीच वास्तववादी आणि सामान्य वाटतात.”
वानगीदाखल कादंबरीतील एक वर्णन पाहा. “रक्ताचा एक ओघळ दाराखालून बाहेर आला, दिवाणखाना पार करून रस्त्यावर आला आणि खडबडीत जमिनीवरून सरळ रेषेत पुढे जात राहिला, तिथून काही पायऱ्या खाली आणि काही पायऱ्या वर असे करत तुर्कांच्या रस्त्यावरून पुढे आधी उजवीकडे आणि नंतर डावीकडे वळून काटकोनात बुएंदाच्या घराकडे वळला, बंद दाराच्या फटीतून आत गेला, व्हरांडा पार करून, गालिचा खराब होऊ नये म्हणून भिंतीला लगडून दुसऱ्या बैठकीच्या खोलीत गेला, तिथे जेवणाचं टेबल चुकवण्यासाठी त्याला वळसा घालून बिगोनियाची झाडं असलेल्या पोर्चमधून पुढे जात जिथं अमारांता ऑरलियानो जोझला गणित शिकवत होती तिच्या खर्चीखालून नकळत पार झाला आणि किचनमधून मुद्पाकखान्यात बाहेर आला, जिथं उर्सुला ब्रेड बनवण्यासाठी छत्तीस अंडी फोडण्याच्या तयारीत होती.”
जादुई वास्तववादाचे आकलन होण्यासाठी वरील ओळींचे लक्षपूर्वक वाचन करणे फायद्याचे ठरेल. रक्ताचा एक ओघळ असा प्रवास करेल ही खरेच अशक्यप्राय अशी गोष्ट आहे. मात्र मार्केझने ती इतक्या तपशिलवार आणि आत्मविश्वासाने रेखाटली आहे की ती दैनंदिन जीवनातील एक सामान्य घटना वाटावी.
जादुई वास्तववादासारखेच आणखी एक आव्हान निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यासमोर असणार आहे. ते म्हणजे, मार्केझच्या लिखाणातील काळाची चक्राकार गती मांडणे. यासाठी आपण कादंबरीच्या सुरवातीच्या ओळी पाहू.
“अनेक वर्षांनंतर, बंदुकांच्या ताफ्याचा सामना करताना कर्नल ऑरलियानो बुएंदाला ती दुपार आठवणार होती, जेव्हा त्याचे वडील त्याला बर्फ दाखवायला घेऊन गेले होते.” या वाक्यातील पहिला भाग भविष्यातील एका घटनेचा दाखला देणारा आहे तर त्याच्या पुढचा भाग भूतकाळात घडून गेलेल्या एका घटनेला पहिल्या भागासमवेत जोडणारा आहे. या ओळीत काळाच्या एकरेषीय गतीला संपूर्णपणे बाजूला सारून काळाची चक्राकार गती अधोरेखित केली आहे. ‘वन हंड्रेड इअर्स ऑफ सॉलिट्यूड’ या कादंबरीतून अशा अनेक ओळी दाखविता येतील जिथे शब्दाशब्दांत भूतकाळ साचून राहिलेला असतो तर भविष्यकाळ आधीच घडून गेलेला असतो.
या त्याच्या काळखुणा पेरण्याच्या हातोटीमुळे त्याला त्याची स्वतःची विचारप्रणाली कादंबरीमध्ये गुंफणे सोपे जात असे. उदाहरणार्थ – त्यानी कादंबरीत अमेरिकन फळ कंपनीने संपावरील कामगारांच्या केलेल्या संहाराचे वर्णन अत्यंत प्रभावी पद्धतीने पेरले आणि वास्तवात घडलेल्या १९२८च्या केळी उत्पादकांच्या ऐतिहासिक हत्याकांडावर भाष्य केले.
जादुई वास्तववादाला मार्केझने आपल्या भाषेच्या आणि शैलीच्या बळावर जगभर लोकप्रिय केलं. तो जादुई वास्तववाद तेवढ्याच ताकदीने पडद्यावर आणण्याचे कठीण आव्हान निर्माते आणि दिग्दर्शकांसमोर आहे. अर्थात सिनेमा या माध्यमाची सुद्धा स्वत:ची अशी खास बलस्थानं आहेत. या माध्यमावर हुकुमत असणारा दिग्दर्शक, कादंबरीहून अधिक विलक्षण आणि जादुई अशा स्वरूपात कथानकाची मांडणी करू शकेल. मात्र त्याच्या बुडाशी असणारे सुप्त वास्तव मार्केझच्या शब्दांएवढ्या ताकदीने उभे करण्यात या तंत्राला यश येईल काय, याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.
अभिषेक धनगर, पी.व्ही.पी.आय.टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बुधगांव येथे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
COMMENTS