मध्य प्रदेशः बलात्काराची तक्रार दाखल करणाऱ्या दलित तरुणीला पोलिस ठाण्यात मारहाण

मध्य प्रदेशः बलात्काराची तक्रार दाखल करणाऱ्या दलित तरुणीला पोलिस ठाण्यात मारहाण

मध्य प्रदेशातील छत्तरपूर शहरातील प्रकरण. १३ वर्षीय दलित मुलीच्या आईने आरोप केला आहे, की ३० ऑगस्ट रोजी त्यांची मुलगी बलात्काराची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली असता दोन पोलिसांनी मुलीला तिचे म्हणणे बदलण्यास भाग पाडले आणि तिला संपूर्ण रात्र मारहाण करण्यासह पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले.

कोरोनासाठी क्लोरोक्विन घेण्याची घाई नको
जेएनयुवरून बॉलीवूडमध्ये वादळ
कोरोना व भारताचे बदलले जाणारे अर्थकारण : भाग २

छत्तरपूर : मध्य प्रदेशातील छत्तरपूर शहरात बलात्काराची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या १३ वर्षीय दलित मुलीला ठाण्यात ठेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

३० ऑगस्ट रोजी घडलेल्या कथित घटनेच्या संदर्भात बुधवारी (७ सप्टेंबर) तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी सांगितले, की बाबू खान याला भारतीय दंड संहिता, अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक कायदा) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉस्को) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ३ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. छत्तरपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सचिन शर्मा यांनी गुरुवारी सांगितले की, शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी (एसएचओ) अनूप यादव, उपनिरीक्षक मोहिनी शर्मा आणि सहायक उपनिरीक्षक गुरुदत्त शेषा यांना बलात्कार पीडितेला पोलिस ठाण्यात ठेवल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.

सह जिल्हाधिकारी प्रताप सिंह चौहान यांनी सांगितले, की जिल्हा बाल कल्याण समितीकडून (सीडब्ल्यूसी) बलात्काराची तक्रार प्राप्त झाली होती, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, मुलगी २७ ऑगस्ट रोजी घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती, मात्र ती परतली नाही. दुसऱ्या दिवशी कोतवाली पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.

पीडितेच्या आईने सांगितले की, ३० ऑगस्ट रोजी घरी परतल्यावर तिने सांगितले की बाबू खानने तिला जबरदस्तीने आपल्या घरी नेले, तिला कोंडून ठेवले आणि तीन दिवस तिच्यावर बलात्कार केला.

मुलीच्या आईचा आरोप आहे की, “आम्ही पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो होतो. दोन पोलिसांनी माझ्या मुलीवर तिचे म्हणणे बदलण्यासाठी दबाव आणला. त्यांनी माझ्या मुलीला मारहाण केली. दुसरा पोलीस अधिकारी मला बाहेर घेऊन गेला आणि आत माझ्या मुलीला लाथा मारुन आणि बेल्टने मारहाण करण्यात आली.

मुलीला रात्रभर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते, तर तिचे पालक बाहेर थांबले होते.

मुलीच्या आईने आरोप केला आहे की, ३१ ऑगस्ट रोजी ती पुन्हा पोलीस ठाण्यात गेली आणि इन्स्पेक्टर यादव यांना गुन्हा नोंदवण्यास सांगितल्यावरही तिला हाकलून देण्यात आले.

त्या म्हणाल्या, की अखेर १ सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलिसांनी आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला, परंतु त्यात अपहरणाचा आरोप समाविष्ट केला नाही. एफआयआरमध्ये मुलीचे वय १७ वर्षे असे लिहिले असून त्यात अपहरणाचा उल्लेख नाही.

जिल्हा बाल कल्याण समिती सदस्य अधिकारी अफसर जहाँ यांनी सांगितले की, गुन्हेगाराला वाचवण्यासाठी आणि तिचे म्हणणे बदलण्यासाठी पोलीस पीडितेवर दबाव आणत आहेत.

समितीचे आणखी एक सदस्य सौरभ भटनागर यांनी सांगितले की, मुलीचे वय १३ ऐवजी १७ वर्षे लिहिल्याचा अहवाल पोलिसांकडून मागवण्यात आला आहे.

भटनागर म्हणाले, की समितीच्या एका पथकाने मुलीच्या घरी भेट दिली तेव्हा निरीक्षक यादव हातकडी घातलेल्या आरोपीसोबत होते.

भटनागर म्हणाले की, कायद्यानुसार बलात्काराच्या आरोपीला पीडितेच्या उपस्थितीत हजर करता येत नाही. याशिवाय कायद्याने पुरुष अधिकाऱ्यांना बलात्कार पीडित महिलेचे जबाब नोंदवण्यासही मनाई केली आहे, असे ते म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0