आनंद तेलतुंबडेंचा जामीन अर्ज फेटाळला

आनंद तेलतुंबडेंचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबईः ज्येष्ठ सामाजिक-राजकीय विचारवंत व एल्गार परिषद प्रकरणातील एक आरोपी आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. गेल्या महिन्यात आनंद तेलतुंबडे यांचे भाऊ मिलिंद तेलतुंबडे गडचिरोली जिल्ह्यात निमलष्करी दल व पोलिसांच्या चकमकीत ठार झाले होते. या घटनेनंतर २३ नोव्हेंबरला आपल्या ९० वर्षाच्या आईची भेट घेण्यासाठी आपल्याला जामीन द्यावा अशी विनंती आनंद तेलतुंबडे यांनी केली होती. आनंद तेलतुंबडे यांनी आपल्या जामीन अर्जात शोकग्रस्त आईची भेट व्हावी, या दुःखाच्या काळात आपल्या उपस्थितीने कुटुंबियांना आधार मिळावा म्हणून १५ दिवसांचा जामीन मिळावा अशी न्यायालयाला विनंती केली होती. पण एनआयएच्या न्यायालयाने तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज फेटाळला.

आनंद तेलतुंबडे सध्या नवी मुंबईनजीक तळोजा कारागृहात आहेत. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी आत्मसमर्पण केले होते. त्यांच्यावर एल्गार परिषद प्रकरणात गंभीर गुन्हे लावण्यात आले आहेत. पण एनआयएने ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल केले नसल्याने आपल्याला जामीन मिळावा असा अर्ज तेलतुंबडे यांनी गेल्या १३ जुलैला केला होता. पण तो ही अर्ज फेटाळला होता.

दरम्यान एल्गार परिषदेतील अन्य एक आरोपी सुरेंद्र गडलिंग यांनी आपल्याला प्लास्टिकची खुर्ची व मेज उपलब्ध करून द्यावे अशी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. त्यांनी दाढीचे सामानही आपल्याला ठेवू द्यावे अशी विनंती केली आहे. गडलिंग यांच्या या विनंतीवरून न्यायालयाने तुरुंग प्रशासनाकडून अहवाल मागितला असून या अर्जाची सुनावणी ८ डिसेंबरला होणार आहे.

मूळ बातमी  

COMMENTS