४२.२ किमी १ तास ५९ मिनिटांत पूर्ण; इलियूड किपोगेचा इतिहास

४२.२ किमी १ तास ५९ मिनिटांत पूर्ण; इलियूड किपोगेचा इतिहास

व्हिएन्ना : केनियाचा मॅरेथॉनपटू इलियूड किपोगेने दोन तासाच्या आत व्हिएन्ना प्रॅटर पार्क मॅरेथॉन शर्यत पुरी करून शनिवारी इतिहास रचला. दोन तासाच्या आत मॅरेथॉन पुरी करणे हे मानवी शरीराच्या मर्यादांमुळे अशक्य असल्याचा समज आजपर्यंत होता. तो समज किपोगेने दूर केला.

किपोगेने ४२.२ किमी अंतराची ही मॅरेथॉन स्पर्धा १ तास ५९ मिनिटे व ४० सेकंदात पूर्ण करून इतिहास नोंदवत दोन वर्षांपूर्वी स्वत:चीच कामगिरी त्याने मोडीत काढली. दोन वर्षांपूर्वी इटलीत दोन तासात मॅरेथॉन पूर्ण करण्याचे त्याचे स्वप्न केवळ २५ सेकंदाने भंग झाले होते.

शनिवारची व्हिएन्नातील किपोगेची कामगिरी अथलेटिक्सच्या क्षेत्रात अद्वितीय मानली गेली आहे. पण या स्पर्धेत ३६ अन्य धावपटूंनी किपोगेला मदत केली असल्याने व या स्पर्धेची नोंद आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स महासंघाकडे केली नसल्याने किपोगेचा हा विश्वविक्रम मानला जाणार नाही.

पण आपल्या कामगिरीबाबत बोलताना किपोगेने, ‘मी सर्वात आनंदी असून मानवापुढे कोणतीही मर्यादा नसते. माझ्या कामगिरीने अनेकांना प्रोत्साहन मिळेल. प्रत्येकाचे विचार समांतर असतात, प्रत्येकाच्या विचारांचा मी आदर करतो. अशी प्रतिक्रिया दिली.

किपोगे हा केनियाचा धावपटू असून त्याने या अगोदर ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धांमध्येही त्याने सुवर्ण पदक पटकावले आहे. त्याच्या या अविश्वसनीय  कामगिरीबद्दल केनियामध्ये जल्लोष सुरू आहे.

COMMENTS