गांधीजींची धर्मभावना

गांधीजींची धर्मभावना

‘गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणायचे.’ पण त्यांचा ‘सनातन' याचा अर्थ आपल्या समजूती प्रमाणे नव्हता. ‘सनातनी ब्राह्मण' या शब्दात जो अर्थ आपल्याला बहुधा दिसतो तो फार वेगळा व चुकीचा असतो. खरे तर ‘सनातन'चा शब्दकोशातील अर्थ ‘शाश्वत', ‘चिरंतन' असा आहे. जी मूल्ये चिरंतन आहेत, शाश्वत आहेत ज्यांना काळसुद्धा किंचितही धक्का लावू शकणार नाही "अशी मूल्ये म्हणजे ‘सनातन’ मूल्य. हिंदू धर्मातील अशाच मूल्यांचे आणि तत्त्वांचे गांधीजी खंदे पुरस्कर्ते होते.

मी आणि गांधीजी – ३
गांधी, थोरो आणि सविनय प्रतिकार
चंपारण चळवळीचे सामर्थ्य

गांधीजी ही व्यक्ती मुळातच धार्मिक होती व ते निश्चितपणे स्वतःला हिंदू म्हणायचे. त्यांनी कितीतरी प्रमुख धर्माच्या प्रसारकांना धर्मांतरासाठीच्या प्रयत्नात नम्र पण स्पष्ट नकार दिला होता. अशी अनेक ठळक उदाहरणे आहेत.
गांधीजींच्या धर्म संकल्पनेत नीती व नीतियुक्त आचरणास फार-फार मोठे स्थान आहे. ते म्हणत की धर्म आणि नीती जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नीतिशिवाय धर्माचे अस्तित्व असू शकत नाही आणि धर्माशिवाय नीती-विकास;  महाकठीण.
गांधीजींनी ‘धर्म नीती’ असे एक पुस्तकच दक्षिण आफ्रिकेत प्रसिद्ध केले. भारतामध्ये त्यांचे यावरील विचारांच्या संकलनाचे ‘नीतिधर्म’ हेही एक महत्त्वाचे पुस्तक मानले जाते.
‘गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणायचे.’ पण त्यांचा ‘सनातन’ याचा अर्थ आपल्या समजूती प्रमाणे नव्हता. ‘सनातनी ब्राह्मण’ या शब्दात जो अर्थ आपल्याला बहुधा दिसतो तो फार वेगळा व चुकीचा असतो.
खरे तर ‘सनातन’चा शब्दकोशातील अर्थ ‘शाश्वत’, ‘चिरंतन’ असा आहे. जी मूल्ये चिरंतन आहेत, शाश्वत आहेत ज्यांना काळसुद्धा किंचितही धक्का लावू शकणार नाही “अशी मूल्ये म्हणजे ‘सनातन’ मूल्य. हिंदू धर्मातील अशाच मूल्यांचे आणि तत्त्वांचे गांधीजी खंदे पुरस्कर्ते होते.

ती अशी मूल्य म्हणजे अहिंसा, सत्य, अपरिग्रह -म्हणजे किमान वस्तू धारण(posses) करणे, अस्तेय (चोरी मनानेसुद्धा न करणे, ब्रह्मचर्य,   अभय (ईश्वराशिवाय कोणालाही न भिणे) अशी आहेत. याही शिवाय  शरीर-श्रम, आस्वाद, सर्वधर्मसमभाव, स्वदेशी, अस्पृश्यतानिवारण या मूल्यांवर त्यांनी अजून भर दिला.
अशाप्रकारची गांधीजींची एकंदरपणे ‘सनातन’ मूल्यांची मांडणी आहे. (एकादश व्रते ; पुस्तक-मंगलप्रभात).

आश्चर्याची बाब अशी की यातील प्रत्येक मूल्यावर गांधीजींनी आयुष्यभर कसोशीने आचरण केले. आणि याच अर्थाने ते स्वतःला सनातनी हिंदू असे अधिकारवाणीने म्हणत असत.
त्यात “स्वदेशी’ हे एक पुरातन सत्य व मूल्य गांधीजींना सापडले. तरीपण गांधीजींनी त्याची इतक्या ताकतीने मांडणी केली की स्वदेशी हे मूल्य जणूकाही जणू काही गांधीजींचे ओरिजनल क्रिएशन वाटावे. गांधीजींची स्वदेशीची व्याख्या म्हणजे केवळ आपल्या देशात तयार झालेली वस्तू  अशी नव्हे. तर गांधीजींची स्वदेशी म्हणजे आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरात “स्थानिक-घरगुती-कॉटेज- साध्या ग्रामीण पद्धतीने तयार होणारी उत्पादने असा होय. आपल्या सर्व दैनंदिन गरजांसाठी अशा प्रकारच्या स्वदेशी उत्पादनांचाच आग्रहाने उपयोग करणे याला गांधीजींनी स्वदेशी व्रताच्या स्वरूपात सादर केले.

स्वदेशीवरील आचरण आणि स्वदेशी वस्तूंच्या उत्पादन क्षेत्रात गांधीजींनी आपल्या कमालीच्या व्यस्त जीवनातही आश्चर्यकारक इतके कार्य जगासमोर ठेवले. अशा “स्वदेशी-आचरणा’चे धर्मातील महत्त्व दाखवण्याचा त्यांनी जीवनभर कसोशीने प्रयत्न केला.
कालप्रवाहाच्या वाटचालीदरम्यान हिंदू धर्मामध्ये घुसून स्थान मिळवलेल्या अनेक हीन दर्जाच्या बाबींना गांधीजी जाहीरपणे पायदळी तुडवत. उदाहरणार्थ उच्चनीचभाव, स्पृश्यास्पृश्य भाव, ऐषाराम, सोयीसुविधांची  लालसा , स्त्रियांना केवळ भोग्य वस्तू म्हणून दिली जाणारी कनिष्ठ दर्जाची वागणूक, व्यसनाधिनता, सतीप्रथा, बालविवाह, विधवा स्त्रियांचा छळ, असे कितीतरी सांगता येतील. गांधीजी हे सर्व फक्त बोलून दाखवत नव्हते तर त्यांनी यातील कितीतरी अनेकानेक बाबीवर – त्यांच्या आपल्या पद्धतीने –  प्रचंड चळवळी , मोहिमा, जाहीर आचरणाची उदाहरणे – यामार्फत ते समाज जागा करत होते. यासाठी त्यांनी कित्येक अहंकारी पाखंडी (तथाकथित सनातनी) धर्ममार्तंडांचा रोष व दुश्मनी ओढवून घेतली होती. या मंडळींनी अशाच कारणामुळे याआधीसुद्धा त्यांच्या खुनाचे प्रयत्न केले होते. व ती दुश्मनी आजतागायत ही चालू आहेच.
अहंकारी ब्राह्मणांच्या संदर्भाने तर ते बोलत असत की कुण्या ब्राह्मणाच्या मनाला “उच्च’तेचा भाव स्पर्श जरी झाला तरी तो ब्राह्मण पायदळी तुडवण्याचे लायकीचा झाला!

मात्र गांधीजी नेहमी म्हणायचे की ही सर्व ‘sanatan’ काळासाठी टिकणारी तत्त्वे, “मी’ सांगतोय असे अजिबात नव्हे. आमचे जे दृष्ट पूर्वसूरीं होते त्यांनी ही सनातन मूल्ये शोधली व विकसितही केली. ही सर्व तत्त्वे शाश्वत आहेत, सनातन आहेत व ती “As old as  hills’ आहेत, असे ते म्हणायचे. आणि ‘निश्चितपणे याच अर्थाने ते स्वतःला सनातनी हिंदू म्हणायचे’.
गांधीजी असेही म्हणायचे की सत्य, अहिंसा, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, अस्तेय या शाश्‍वत मूल्यांवर हिंदू धर्मात हिंदू समाजात व्यापक आणि प्रदीर्घ प्रयोग व प्रयत्न झाले आहेत. हिंदू धर्माच्या परिक्षेत्रात त्याही काळी अनेक ढोंगी स्वार्थी आणि भोंदू धर्ममार्तंड होतेच. त्यांनी सनातनी हा महान शब्द आधीपासूनच स्वतःला चिकटवून घेतला. ते भरपूर गवगवा करत असायचे. पण आचरण मात्र स्वार्थी दांभिक आणि कर्मकांडी करत राहिले.
आणि म्हणूनच सनातनी म्हटले की आपल्या डोक्यात तशा प्रकारचे कर्मठ, ढोंगी कर्मकांडी म्हणजे “सनातनी’ असा चुकीचा अर्थ बसला आहे. हा चुकीचा अर्थ शंभर वर्षाच्या आधीच्या काळातील अनेक साहित्यिकांनीही बसवून दिला आहे. म्हणून आपण सनातनी या शब्दाबद्दल गैरसमजात आहोत.
भारतीय भूमीने अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह अशा सनातन मूल्यांवर प्रदीर्घ आणि व्यापक प्रयत्न व प्रयोग केलेले आहेत. असे गांधीजी ठामपणे म्हणत.

षडरिपू( काम-क्रोध-मद-मोह-दंभ-मत्सर) हे शत्रू असतात. शाश्‍वत मूल्यांवरचा विकास म्हणजे खरा विकास. तो माणसाने स्वप्रयत्नाने कमावलेला असतो. हे षड्रिपु माणसाने स्वप्रयत्नाने कमावलेल्या विकसित अवस्थेतून अधोगतीकडे नेणारे असतात. याविरुद्ध संघर्ष करून समाजाला ज्या प्रमाणात यश मिळेल त्याप्रमाणात समाजाचा खरा विकास झाला, असे असते. षडरिपू विरुद्ध संघर्ष करण्यासाठी आपली शास्त्रे-पुराणे खचाखच भरले आहेत.
याही शिवाय षड्रिपू विरुद्ध संघर्ष करण्यासाठी – आपल्या कठोर आचरणाने दीपस्तंभासारखे समाजाला मार्गदर्शन करणारे – संतांचे तर जणू काही उभे पीकच या भूमीत उगवत राहिले. सर्व जातीत उगवत राहिले. फार मोठ्या प्रमाणाने ब्राह्मणेतर जातींमधून ते निर्माण होत गेले.

सर्व संतांनी चामडी सोलल्यागत संसारात त्रास सहन केला पण – मूल्यांवर निर्धाराने कसे चालावे; षडरिपूविरुद्धचा संघर्ष कसा पुढे न्यावा याचे समाजाला त्यांनी विश्वासाचे धडे दिले.
..अशा आत्मविश्वासाच्या भक्कम आधारावर गांधीजी म्हणायचे की हिंदू धर्माकडे आणि भारताच्या भूमीकडे जगाला देण्यासारखे भरपूर आहे. जगाला या उपखंडातून शिकण्यासारखे भरपूर आहे. आणि म्हणूनच ब्रिटिश सत्तेविरूद्ध संघर्ष करताना राजकारणात शाश्वत मूल्यांना आपण फारकत घेऊ नये यासाठी त्यांची फार फार तळमळ असायची. राजकारणासाठी व समाजकारणासाठी त्यांनी मांडलेली सात पापे  (seven sins) जगप्रसिद्ध आहेत.

***

अशा रीतीने सनातन मूल्यांवरील विकासाला हिंदू धर्म तर खूपच वाव देतोच पण जगातले सर्वच धर्मही  वाव देतात . म्हणून  गांधीजी म्हणायचे की धर्मांतर/कन्वर्जन ही नीती-मूल्यांपासून , नीति-तत्वापासून अंतर दूर  वाढवणारी बाब आहे. आणि ते  स्पष्टपणे धर्मांतर या संकल्पनेच्याच विरोधात होते.
गांधीजींच्या इतर धर्मीय अनुयायांपैकी काहींनी; स्वतःला हिंदू धर्मात घेण्यासाठी आग्रहाने विनंती केली. गांधीजींनी त्यांच्यातील प्रत्येकाला ठाम विरोध केला व हिंदू धर्मात धर्मांतरित होण्यासाठी यशस्वीरीत्या परावृत्त केले. गांधीजी आग्रहाने म्हणायचे की जो जिथे जन्मला त्याने तेथेच श्रद्धेने आपल्या नीतीयुक्त आचरणाने आपापला धर्म उन्नत करावा, विकसित करावा. त्यातील दोष काढण्यासाठी आपले योगदान द्यावे. फक्त हेच उचित आहे.
कारण ग्रंथात, पुस्तकात धर्म कितीही श्रेष्ठ असू द्या. शेवटी इतर लोक तर कोणत्याही धर्माची पारख तेथील अनुयायांच्या वागणुकी वरूनच करणार. कारण एखाद्या धर्माच्या समुदायातील बहुतेक लोक जर अमानवीय वागतात, हिंसक वागतात. अनितीनेने वागतात, असे असेल तर इतर लोक त्या अनुयायांच्या वागण्यावरूनच त्यांच्या धर्माची पारख करणार. अशा धर्मातील पुस्तके ग्रंथ पुराण कितीही सर्वोच्च तत्त्वांची विचारांनी खचाखच भरलेले असू द्या! काय फायदा? दुसऱ्या धर्मातील करोडो लोक ते सर्वच्या सर्व धर्मग्रंथ वाचणार थोडेच आहेत?
कुठल्याही धर्मात पाहा बहुसंख्य लोक आपल्याच स्वतःच्याच धर्मातले तत्व-ग्रंथ यांचेच तर वाचन करीत नाहीत. मग इतर दुसऱ्या धर्माचे कोण वाचत बसणार! तेव्हा धर्माची पारख खऱ्या अर्थाने समाजाच्या आचरणामार्फत होत होत असते यात शंका नाही.
अशा परिस्थितीत कोणीही धर्माचा अनुयायी आपल्या धर्मातच जर नीट वागत नसेल, बाह्य कारणे सांगत असेल तर तो इतर दुसऱ्या धर्मात जाऊन कोणते दिवे लावणार आहे? किंवा इतर धर्मातून इकडे येऊन तरी माझ्या धर्माला कोणता उजाळा देणार आहे! उलट नवीन ठिकाणी तो नुकसान करण्याचीच जास्त शक्यता आहे. नेमके हे धर्माचे नुकसान आध्यात्मिक दृष्टीने असेल नीतिमत्तेच्या दृष्टीने असेल.
कन्व्हर्जन म्हणजे केवळ संख्याबळ वाढविणे आणि ताणतणावाला आमंत्रण याखेरीज दुसरे काही नाही. याची जाण गांधीजी करून देत असत. आज समाज आणि जग याचा अनुभव घेतच आहे. म्हणूनच हिंदू धर्मात कन्वर्जन/धर्मांतर हा कन्सेप्टच नाही हे गांधीजी ठळकपणे दाखवून देत असत. व असा कन्सेप्ट हिंदू धर्मात नाही हे खरेही आहे.

धर्मांतर/कन्वर्जन असल्या बाबीऐवजी “सर्वधर्मसमभाव’ हेच तत्त्व शाश्वत व सनातन असू शकते. या सर्वधर्मसमभावाच्या मूल्यामुळेच सहिष्णुता सारखे गुण वाढीला लागतात. जगात शांती गरज लक्षात येऊ शकते हे ही आपण पाहात आहोत.
जगासाठी मानवासाठी अशा सनातन मूल्यांवरील विकास हाच खरा विकास आहे.

संदर्भ : मंगल प्रभात, नीतिधर्म, धर्म नीती, माझा हिंदू धर्म : नॅशनल बुक ट्रस्ट ( मराठी हिंदी इंग्रजी या भाषांत उपलब्ध), धर्मविचार भाग-१ गांधी स्मारक, धर्मविचार भाग २- निधी पुणे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0