लहरी ईलॉन मस्क आणि ट्विटर

लहरी ईलॉन मस्क आणि ट्विटर

ट्विटर ताब्यात घेऊन मस्क काय करणार? त्यांचं मत आहे की ट्विटर सभ्य आहे, ते अधीक अशिष्ट करायला हवं.

गुजरातमध्ये बजरंग दलाकडून ‘कामसूत्र’ची होळी
केविलवाणा भाजप आणि राष्ट्रवादीची हवा
आत्ता गप्प रहाणे म्हणजे अपराधात सामील असणे

ईलॉन मस्कनं ट्विटर या कंपनीचे ९.२ टक्के शेअर्स ३ अब्ज डॉलर खर्च करून ताब्यात घेतले. म्हणजे तो लवकरच आणखीही शेअर्स घेऊन कंपनीत धिंगाणा घालणार हे उघड होतं. म्हणूनच कंपनीनं त्यानं १४.९ टक्के शेअर्स घेऊन निर्णायक मालक होऊ नये असं बंधन घातलं. बहुदा ते बंधन त्यानं मान्य केल्यामुळंच कंपनीनं त्याला शेअर्स देऊ केले. आता मस्क म्हणतोय की शेअर घेताना त्यांनं मान्य केलेली ती अट तो धुडकावू शकेल. म्हणजेच तो अधिक शेअर्स घेऊन कंपनीवर ताबा मिळवू शकेल.

निर्णायक भांडवल ताब्यात घेणं ही गोष्ट काही नवी नाही. कंपनी ताब्यात घ्यायची, व्यवस्थापनात बदल करायचे, नवे प्रॅाडक्ट काढायचे, नफा वाढवायचा ही चाल बिझनेसमन नेहमीच खेळतात. शेअर होल्डर्स ते मान्य करतात कारण त्यात त्यांचे हित असतं. पण मस्क हे प्रकरण वांध्याचं आहे, तो माणूस लहरी आहे, लहरीखातर काहीही करू शकतो.

एकदा मस्क ॲाफिसमधे जात असतांना ट्राफिकमधे अडकले. वैतागले. सेल फोन काढला. लगेच ट्वीट केलं की ते आता भुयारी रस्ते करणार आहेत, कल्पना अशी की भुयारात गाड्या नियंत्रीत करता येतील, ट्राफिक जाम होणार नाही.

त्यांनी एक कंपनी काढली. एक किलो मीटरचा भुयारी रस्ता केला, खास गाड्या तयार केल्या. करोडो डॅालर खर्ची पडल्यावर कळलं की ते वेडेपणा होता कारण वाहतूक वेगानं सरकू शकत नव्हती, बाहेरचा जाम परवडला अशी स्थिती होती. गंमत अशी की हा रस्ता त्यांच्या मालकीचा, गाड्या त्यांच्या मालकीच्या, म्हणजे यातून चहू बाजूंनी पैसे गोळा होणार ते मस्क यांच्या खात्यात. पण प्रयोग उभारण्यासाठी, संशोधनासाठी लागणारा पैसा मात्र सार्वजनिक, सरकार आणि पालिकांकडून.

भुयार प्रकल्प कोसळला,  करोडो डॅालर पाण्यात.

टेस्लाच्या विजेवर चालणाऱ्या गाड्या महाग. सामान्य माणूस वापरू शकणार नाही. मग पर्यावरण शुद्ध कसं होणार? पण प्रसिद्धीच्या आवाज आणि प्रकाशामुळं माणसं येडावली, बधीर झाली. पर्यावरण स्वच्छ करणाऱ्या स्वस्त, व्यवहार्य गोष्टी मस्कांनी दडपून टाकल्या.

शेअर्सचे भाव चढवणं, त्या वाटेनं आपली संपत्ती वाढवत रहाणं एव्हढाच धंदा. स्पेसेक्स नावाची कंपनी काढून चंद्रमंगळावर माणसं न्यायचा प्लॅन. एकेक फेरी करोडो रुपयांची. घनिकांची मस्ती आणि जनता मुंगेरीलालची स्वप्न पाहण्यात गुंग. येडावलेले करोडो डोळे टीव्हीवर उड्डाणं पहाणार, त्या डोळ्यांवर जाहिरातीचा मारा होणार, ते पैसे कमवणार. साऱ्या जगानं चिंता करायला हवी ती वाढत्या गरीबीची आणि विषमतेची. हे लोक येडावलेल्यांना स्वप्नं दाखवणार चंद्राची.

जेम्स लवलॅाक यांना मस्कांच्या चांद्रवारीबद्दल विचारलं तर ते हसले. म्हणाले, पृथ्वीची वाट लावून झाली आता चंद्राची वाट लावायला निघालेत.

ट्विटर ताब्यात घेऊन मस्क काय करणार? त्यांचं मत आहे की ट्विटर सभ्य आहे, ते अधीक अशिष्ट करायला हवं. Twitter मधला w त्याना काढून टाकायचा आहे. अमेरिकन बोली भाषेत tit चा अर्थ होतो स्तन. कुप्रसिद्ध डोनल्ड ट्रंप अभिमानानं म्हणाले होते की स्त्रियांचे स्तन पकडून आपण त्यांना खेचत असू.

ट्विटरचं मस्क काय करतील? ते म्हणाले की ट्विटरच्या इमारती आपण बेघरांना रहायला देऊ. ट्विटर कोणाचं? एका परीनं सार्वजनीक, शेअर होल्डरांचं. मस्क हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणार. मस्कांची संपत्ती आहे २७० अब्ज डॅालरची. त्यातला अंश खर्च केला तर दुनियाभरच्या बेघरांची सोय होऊ शकते.

लहरी लोकं जे करतील त्यातून समाजाचं भलं होईल याची खात्री देता येत नाही. एव्हढंच.

मस्क कायदे पाळतील याचीही खात्री नसते. आजवर किमान दोन वेळा त्यांनी नियम तुडवल्यानं त्यांना दंडाची शिक्षा झाली आहे.

ट्विटर हे फार धारदार शस्त्र आहे. ते विधायक कामासाठी वापरता येतं, विध्वंसासाठीही वापरता येतं, धादांत असत्य ठसवण्यासाठीही वापरता येतं. युक्रेनमधे युक्रेनी लोकांनी स्वत:हून इमारती उध्वस्थ केल्या, आपल्याच आयाबहिणीवर बलात्कार केले असं ट्विटरवर दडपून सांगता येतं. ट्रंप तर संसद आणि सरकारला टांग मारून ट्विटरवरूनच कारभार करत. ते टीव्हीसमोर बसून ट्विटरवरून  आदेश जाहीर करत, त्यांचे आदेश कोणाला तपासताही येत नसत. एकदा त्यांचे परदेशमंत्री दौऱ्यावर होते, इकडे ट्रपांनी परस्पर दुसऱ्या देशाशी संबंधीत धोरण जाहीर करून टाकलं. ट्विटर राज्य.

सोशल मिडीया किंवा एकूणच माध्यमं स्वतंत्र असायला हवीत. ती लहरी आणि झोटिंगाच्या हाती पडणं धोक्याचं आहे.

ट्विटरची मालकी मस्क, ट्रंप, पुतीन, किम जांग उन याच्या हाती पडणं म्हणजे काही खरं नाही हेच खरं.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0