मान्सून केरळमध्ये, राज्यात आठवडाभरात पावसाची शक्यता

मान्सून केरळमध्ये, राज्यात आठवडाभरात पावसाची शक्यता

नवी दिल्लीः केरळच्या किनारपट्टीवर रविवारी मान्सूनचे आगमन झाले. केरळच्या किनाऱ्यावर मान्सून येण्याची हवामान परिस्थिती पूर्ण झाल्याचे शनिवारीच भारतीय हवामान खात्याने म्हटले होते. हवामान खात्याने येत्या दोनेक दिवसांत पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवला होता. तो अंदाज रविवारी खरा ठरला.

यंदाचा मान्सून तीन दिवस आधी केरळला पोहोचला आहे हे विशेष. दरवर्षी १ जूनला मान्सून केरळच्या किनारपट्टीवर थडकत असतो. आता तीन दिवस अगोदर येत मान्सूनने आपली वेगळी नोंद करून दिली आहे.

महाराष्ट्रातही ३० मे पासून पुढील ४ दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लगतच्या काही भागात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्या मान्सूनचे वारे बंगालच्या उपसागरापासून ईशान्य भारताकडे वाहत असून परिणामी ईशान्य भारत, प. बंगालमधील उत्तर हिमालय प्रदेश, सिक्कीम येथे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर बिहार, झारखंड, ओदिशा व प. बंगाल राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने पुढील ५ दिवसांचे अंदाजही व्यक्त केले आहेत.

त्यानुसार

३० मे व ३१ मे रोजी उपहिमालय प्रदेश, प. बंगाल, सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

२९ मे चे १ जून दरम्यान आसाम-मेघालय, मणिपूर, मिझोराम व त्रिपुरा येथे पाऊस पडण्याची शक्यता.

केरळ व लक्षद्विप येथे ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता.

येत्या ५ दिवसांत आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू, पुड्डूचेरी व काराईकल येथे तुरळक पावसाची शक्यता.

काश्मीर व हिमाचल प्रदेशात येत्या ५ दिवसांत तुरळक व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर येत्या दोन दिवसांत उ. प्रदेश, पूर्व राजस्थानच्या भागात पावसाची शक्यता आहे.

येत्या ५ दिवसांत देशात कोठेही उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही.

२७ मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर मान्सून धडकेल असा अंदाज १३ मे रोजी हवामान खात्याने वर्तवला होता. हा मान्सून गेल्या वर्षाच्या तुलनेत ७ दिवस आधी येईल असेही हवामान खात्याचे म्हणणे होते. हा अंदाज खरा ठरला आहे.

मूळ वृत्त

COMMENTS