दि मद्रास कब !

दि मद्रास कब !

वयाच्या सातव्या वर्षी आठ वर्षांखालच्या स्पर्धेचा जागतिक विजेता, नंतर १० वर्षांखालच्या स्पर्धेचा जागतिक विजेता, जेमतेम ११ वर्षांचा असताना इंटरनॅशनल मास्टर आणि बाराव्या वर्षी ग्रँडमास्टर अशा नेत्रदीपक यशांची मालिका उभी करणारा प्रज्ञानंद भारतीय बुद्धिबळाची उमेद आहे यात शंकाच नाही!

‘इंडिया गेट’वर नेताजींचा भव्य पुतळा होणार
संरक्षणावर सर्वाधिक खर्च पण भाषणात उल्लेख नाही
साथींचा इतिहास – फ्ल्यू

बुद्धिबळप्रेमी जनता सोडून कदाचित फार थोड्या लोकांना माहीत असेल की २२ फेब्रुवारी २०२२ रोजी बुद्धिबळाच्या जगात एक इतिहास घडला. सध्याचा विश्वविजेता ग्रॅण्डमास्टर मॅग्नस कार्लसन ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत पराभूत झाला आणि त्याला पराभवाचे खडे चारणारा, ‘प्राग’ या टोपणनावाने ओळखला जाणारा, प्रज्ञानंद रमेशबाबू हा जगातला सर्वात लहान खेळाडू ठरला! वय वर्षे उणीपुरी १६! एवढ्यावरच हे थांबले नाही तर तीन महिन्यात २० मे २०२२ रोजी दुसऱ्यांदा त्याने कार्लसनला हरवले आणि मग मात्र जाणकारांच्या भुवया उंचावल्या, पहिला विजय हा योगायोग नव्हता हे सिद्ध झाले!

तमिळनाडू स्टेट बँकेत अधिकारी असलेले रमेशबाबू आणि गृहिणी असलेली आई नागलक्ष्मी यांचे प्रज्ञानंद दुसरे अपत्य. त्याची थोरली बहीण वैशाली ही देखील ‘वूमन ग्रँडमास्टर’ आहे. वयाच्या सातव्या वर्षी आठ वर्षांखालच्या स्पर्धेचा जागतिक विजेता, नंतर १० वर्षांखालच्या स्पर्धेचा जागतिक विजेता, जेमतेम ११ वर्षांचा असताना इंटरनॅशनल मास्टर आणि १२ व्या वर्षी ग्रँडमास्टर अशा नेत्रदीपक यशांची मालिका उभी करणारा प्रज्ञानंद भारतीय बुद्धिबळाची उमेद आहे यात शंकाच नाही!

भारतीय बुद्धिबळाला जगाच्या नकाशावर घेऊन जाणारा आणि जगज्जेतेपदाच्या सर्वोच्च स्थानावर तब्बल पाच वेळा विराजमान होणारा विश्वनाथन आनंद ज्या राज्यातला आहे त्याच तमिळनाडूमधून प्रज्ञानंद नावाचं हे वादळ आलेलं आहे! खरंतर त्याला वादळ म्हणणं तितकंसं बरोबर नाही असं वाटू शकतं, कारण केवळ १६ वर्षांचा, किरकोळ शरीरयष्टीचा, कपाळावर भस्माचा पट्टा ओढलेला आणि बराचसा अबोल प्रज्ञानंद जेव्हा समोर येतो तेव्हा त्याची दखल घेतली जावी असं वाटायची शक्यता फार कमी असते. पण एकदा का हा पठ्ठ्या ६४ घरांच्या पटासमोर बसला की ज्याप्रकारे भल्याभल्यांना डाव सोडायला लावतो ते बघितले की हे वादळच आहे याची खात्री पटते!

२०२० सालच्या कोविड साथीच्या तडाख्यात समोरासमोर बसून खेळायचे बुद्धिबळ सामनेदेखील दुर्दैवाने ऑनलाइन झाले. सध्या २०२२ मेल्टवॉटर चॅम्पिअनशिप टूर सुरू आहे. मॅग्नस कार्लसन, अनीश गिरी, डिंग लिरेन, शाखरीयर मामेद्यरोव्ह अशा १६ खेळाडूंच्या मांदियाळीत एक नाव प्रज्ञानंदाचे आहे. या टूर अंतर्गत १९ फेब्रुवारी ते ११ नोव्हेंबर अशी चालणारी ९ टूर्नामेंट्सची मालिका आहे. त्यातली चौथी टूर्नामेंट चेसेबल मास्टर्स गेल्या गुरुवारी २६ मे रोजी संपली. अंतिम फेरीत धडक मारताना प्रज्ञानंदने सेमी फायनलला अनीश गिरीला हरवले, जो त्या फेरीपर्यंत अपराजित होता. तिथेच अनेकांना धक्का बसला होता! त्याचा प्रतिस्पर्धी डिंग लिरेनने मॅग्नसला अस्मान दाखवले होते! अशा रीतीने दोन महारथींना पराभूत करून प्राग आणि डिंग अंतिम फेरीत समोरासमोर (किंवा स्क्रीनसमोर) आले!

अंतिम सामना २५ आणि २६ मे असा दोन दिवस खेळला गेला. पहिल्या दिवशी १५ मिनिटे प्रत्येकी अशी चार डावांची रॅपिड स्पर्धा झाली त्यात पहिला डाव काळ्या मोहोऱ्यांनी खेळूनही जिंकून डिंगने बाजी मारली. मग दुसऱ्या डावात काळ्या मोहोऱ्यांनी खेळून किंचित अडखळत का होईना प्रज्ञानंद जिंकला. तिसरा डाव पुन्हा डिंगने जिंकला आणि चौथ्यात बरोबरी झाली. अशा रीतीने पहिल्या दिवसाचा सामना डिंगने ओढून नेला! सामना टायब्रेकरमध्ये न्यायचा झाल्यास दुसऱ्या दिवशी प्रागने जिंकणे अनिवार्य होते. ज्याला विनिंग ऑन डिमांड म्हणता येईल अशा प्रकारचा विजय मिळवणे अजिबात सोपे नसते ते देखील जगातल्या दोन नंबरच्या खेळाडूसमोर जो मॅग्नसला हरवून तुमच्यासमोर आलेला आहे!

गुरुवारी २६ मे रोजी एकमेकांच्या तयारीचा अंदाज घेत चार डावांपैकी पहिला डाव बरोबरीत सुटला. प्रज्ञानंदने दुसरा डाव ए पट्टीतल्या एकमेव जास्तीच्या प्याद्याचा आणि हत्तीचा अप्रतिम वापर करत खिशात घातला. या डावातल्या त्याच्या राजाच्या खेळ्यासुद्धा अभ्यासण्यासारख्या आहेत. जिज्ञासूंना इथे त्या डावातल्या चाली आणि पट बघता येऊ शकेल.

डिंग इरेला पेटल्याने तिसरा डाव फारच अटीतटीचा झाला. डावाच्या मध्यात डिंगची ए, बी आणि सी तिन्ही स्तंभातली प्यादी पुढे सरसावली त्यांना रोखून धरताना प्रागचा खेळ बघण्यासारखा होता. डावाच्या शेवटात डिंगचा वजीर विरुद्ध प्रागचा हत्ती, उंट आणि घोडा अशी चकमक झाली. अखेर सामना बरोबरीत सुटला. दोघांनीही लाजवाब खेळ केला!

पुढचा चौथा डाव देखील डाव बरोबरीत सोडवून प्रागने २.५-१.५ गुणफरकाने दुसरी रॅपिड फेरी जिंकली आणि एकदाचा सामना टायब्रेकरमध्ये नेला! ही फार मोठी गोष्ट होती. जगभरातल्या असंख्य चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या की प्रज्ञानंद अंतिम सामना जिंकू देखील शकेल!

आता प्रत्येकी पाच मिनिटांचे ब्लिट्झचे दोन डाव खेळले जाणार होते आणि तरीही बरोबरी झाली तर सामना अर्मागेडन प्रकाराने निकाली निघाला असता. (जाताजाता – अर्मागेडनमध्ये टॉस झाल्यावर पांढऱ्या मोहऱ्या घेऊन खेळणाऱ्याला पाच मिनिटे मिळतात आणि सामना जिंकण्यासाठी डाव जिंकणे बंधनकारक असते. तर काळ्या मोहऱ्यांना चारच मिनिटे मिळतात परंतु डाव बरोबरीत सुटला तरी काळ्याला विजयी घोषित केले जाते)

ब्लिट्झचा पहिला डाव प्रज्ञानंदने पुन्हा एकदा ए पट्टीतल्या बढत मिळालेल्या प्याद्याच्या जोरावर जिंकत आणला होता. परंतु ५३व्या खेळीला हत्तीची Rd1 ऐवजी Rb1 अशी किंचित चुकीची खेळी तो खेळला तिथून डाव बरोबरीत सुटला आणि डिंगने सुटकेचा निश्वास टाकला! दुसऱ्या डावात दोघेही अटीतटीने खेळले. या डावात देखील विसाव्या खेळीला प्रज्ञानंदला चांगली आघाडी मिळाली होती परंतु त्यानंतर अत्यंत अचूक चालींची मालिका कायम न ठेवू शकल्याने त्याचा डाव हळूहळू विस्कळीत होत गेला. शिवाय दुसऱ्या डावात वेळेचा परिणामकारक वापर करून घेण्यात प्रज्ञानंद थोडा कमी पडला. एकदा वेळेच्या दबावात आल्यानंतर तिसाव्या खेळीपासून त्याची डावावरची पकड ढिली पडत गेली आणि ३८ व्या खेळीला त्याने चुकीने हत्ती देखील गमावला, मग मात्र हार अटळ होती! अशा रीतीने टायब्रेकरचा दुसरा डाव जिंकून डिंगने चौथ्या टूर्नामेंटचं विजेतेपद पटकावले.

अतिशय तणावपूर्ण मानसिक अवस्थेत अंतिम सामने खेळायचा अनुभव आणि वय (२९) हे दोन्ही डिंगच्या बाजूने प्रभावी ठरले आणि कमालीचा आक्रमक आणि वैशिष्ट्यपूर्ण चालींचा खेळ करूनही प्रज्ञानंदाला पराभव पत्करावा लागला, अक्षरशः जिंकता जिंकता हरल्याने प्रज्ञानंदाच्या चाहत्यांना अपार दु:ख झाले यात शंकाच नाही, परंतु ज्या दर्जाचा खेळ त्याने दाखवला त्यावर डिंगने देखील सामन्यानंतरच्या मुलाखतीत कौतुकोद्गार काढले. तो म्हणाला “एवढ्या लहान वयात ज्या मॅच्युरिटीने प्राग खेळला ते मला अतिशय महत्त्वाचे वाटते. मला चांगल्या खेळ्या खेळायला फार अवघड गेले. तो लवकरच मोठा खेळाडू होणार!” आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करणे अनिवार्य आहे की सामने भारतीय वेळेनुसार मध्यरात्रीला खेळले गेले आणि गुरुवार, शुक्रवार या दोन्ही दिवशी सकाळी प्रज्ञानंद अकरावीचे परीक्षेचे पेपर्स लिहून खेळायला आला होता! आहे की नाही कमाल!

मेल्टवॉटर टूरच्या पुढच्या सगळ्या टूर्नामेंट्समध्ये प्रज्ञानंदला भरघोस यश मिळावे अशा शुभेच्छा देऊयात!

सचिन नंतर कोण? विशी आनंद नंतर कोण? असे प्रश्न पडणाऱ्या आपल्या कोट्यवधी लोकसंख्येच्या देशात प्रज्ञानंदाने त्याच्या परीने उत्तर दिले आहे. येत्या दोनेक वर्षात तो विश्वविजेतेपदाच्या शर्यतीत दिसला तर नवल वाटायला नको. त्याचा आदर्श असलेल्या विशीने देखील नेहेमीच्या नर्म विनोदी शैलीत त्याचे कौतुक केले आहे!

आज भारतात जे बुद्धिबळाचे लोण पसरलेले दिसते आणि प्राग, निहाल सरीन, अर्जुन ऐरिगासी, रौनक साधवानी, डी. गुकेश अशा चमकत्या ताऱ्यांची मालिका दिसते त्या प्रगतीतील वजिराचा वाटा निर्विवाद आनंदचा आहे! वयाच्या ५२ व्या वर्षी देखील ज्या तडफेने आणि तयारीने तो खेळतो, आणि नुसता खेळत नाही तर जलद बुद्धिबळासारख्या खेळात त्याच्या वयाच्या निम्म्याहून कमी वयातल्या लोकांना हरवून स्पर्धा जिंकतो त्याला तोड नाही! एखाद्या दीपस्तंभासारखा तो पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करतो आहे.

आनंदच्या मार्गदर्शनात प्रज्ञानंदाचं आणि भारताच्या बुद्धिबळाचं भविष्य उज्ज्वल आहे यात शंका नाही!

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0