ऐतद्देशीय व्यवस्थेशी एकरुपता

ऐतद्देशीय व्यवस्थेशी एकरुपता

परक्या मुसलमानांनी इथे मिसळून गेल्यावर भारतात कुठली तरी परकीय किंवा नवीन राजकीय व्यवस्था अजिबात दिली नाही! सर्वसाधारणपणे एतद्देशीय राजकीय व्यवस्थेशी जुळवून घेतले. त्यांनी वेळोवेळी केलेल्या वैध आणि अवैध मार्गांनी केलेल्या धर्मांतरांचा इतिहास हा आज जरी हिंदूंना काळाकुट्ट वाटत असला तरी तो तसा का आहे? हा एक आत्मपरीक्षणाचा प्रश्न विचारणेही गरजेचे आहे.

न्यू यॉर्कपेक्षा मुंबईत पेट्रोल महाग
मेट्रो चाचणी आरेच्या हद्दीबाहेर होणार
अघोषित आणीबाणीची ७ वर्षे

आपण संगीत या कलेतील मुसलमानांच्या आगमनानंतर झालेला संवाद या आधीच्या दोन लेखांमध्ये बघितला. त्या संबंधित संदर्भ वाचत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे जरी पहिली मुसलमानी आक्रमणे ११व्या शतकात सुरू झालेली असली तरी भारताच्या मुख्य भूमीवर पहिले मुसलमान राज्य स्थापन व्हायला १३वे शतक उजाडावे लागले.

राज्य स्थापन होण्यासाठी काहीतरी राजकीय व्यवस्था लागते. सत्ता आणि सत्तेचा समतोल, सत्तेचे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण, राज्यप्रमुख, राज्याचे मंत्रीमंडळ, कायदेव्यवस्था, नोकरशाही, महसूल व्यवस्था या विषयी निश्चित काही मूल्यव्यवस्था आणि नियम लागतात. त्या शिवाय राज्ये अस्तित्वात येत नाहीत. भारताच्या इतिहासातील इ. स. सहावे/सातवे शतक ते इ. स. १८वे शतक हा काळ मध्ययुगीन समजला जातो. काही जण याचे मुघलपूर्व आणि मुघलांनंतर ब्रिटिश सत्तेपर्यंत असे दोन भाग करतात. तर काही जण मुसलमानपूर्व, मुसलमानी आक्रमण ते मुघल राज्य स्थापनेपर्यंत आणि नंतर ब्रिटिश पूर्व असे तीन भाग करतात. या लेखमालेचा विचार करता आपण तीन भाग करणार आहोत. मुसलमान आक्रमण या देशात सुरू व्हायच्या आधी इथे नेमकी कुठली राजकीय व्यवस्था होती? हे बघण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण करणार आहोत.

इतिहासातील घटनांकडे बघत असताना आपण तटस्थ आणि निरपेक्ष राहायला हवे. हे एक आदर्श वाक्य झाले. तरीही वारंवार याची पुनरुक्ती अशासाठी आवश्यक असते की, आपण आपले पूर्वग्रह (biases) सहज बाजूला करू शकत नाही. मौर्यकालीन भव्योदात्त भारतवर्ष जरी नंतर लयाला गेले तरी भारतीय उपखंड निरनिराळ्या राजवटींकडून नंतरची हजार वर्षे चालवले गेले. याच सुमारास भारतात कधीतरी जातव्यवस्था अस्तित्वात आली. या जातीव्यवस्थेला जरी चातुर्वर्ण्याचे पाठबळ असले तरीही निरनिराळ्या जातींचा चार वर्णांमध्ये होणारा समावेश हा भारतभर एकसारखा कधीही नव्हता. आणि भारतीय उपखंडाच्या विस्तृत भूमीवर हे जातनिष्ठ सामाजिक चलनवलन कसे सुरू होते? याचा अभ्यास समाजशास्त्रज्ञांच्या मागील साताठ पिढ्या तरी आपापल्या आकलनानुसार करीत आहेत. आणि आजही हा अभ्यास सुरूच आहे.

भारतीय राज्यशास्त्रात चक्रवर्ती राजा ज्याला म्हणतात असा राजा हर्षानंतर एकही झाला नाही. भारतीय मध्ययुग नेमके इथे सुरू होते. युरोपातल्या सरंजामशाहीशी तुलना करताना भारतीय सामंतशाही असा शब्दप्रयोग करण्याची एक पद्धत आहे. सहाव्या शतकापासून पुढचे जर पुरातत्त्वीय पुरावे बघितले तर भारतात स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या वंशावळी सापडायला सुरुवात होते. ११व्या शतकाच्या सुरुवातीला संपूर्ण भारतात आपल्याला अशी निदान ४० राजघराणी सापडू लागतात.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी मौर्य काळापासून जर आपण राज्याच्या सीमा तपासायला सुरूवात केली तर असे लक्षात येते की, भारतीय राज्यसीमा या स्थिर कधीच नव्हत्या. त्या सातत्याने बदलणाऱ्या असत. चालुक्य ते राष्ट्रकूट आणि परत एकदा चालुक्य असे चक्र जर आपण बघितले तर या राज्यातील प्रजेला राजघराणी आणि त्यांच्या वंशावळी यांची कल्पना असे. आणि मनोमन त्यांनी या राज्यकर्त्यांचा स्वकार केलेला असे. संपूर्ण भारतात जरी मध्ययुगीन काळात हिंदू धर्म हा प्रजेचा प्रमुख धर्म असला तरीही स्थानिक लोकमत स्थानिक धर्ममतातील प्रभावांच्या बाजूने असे. यात हळूहळू संपत गेलेले बौद्ध होते. जैन होते. शैव होते तसेच वैष्णव होते. या व्यतिरिक्त स्थानिक मतमतांतरे असत ती वेगळी. प्रचलित राजव्यवस्था जरी कुठल्या तरी एका स्थानिक धर्ममताची असली तरी अशा व्यवस्थेला इतर धर्ममतांविषयी काही भूमिका घ्यावी लागे. नव्या वसाहतींना प्रोत्साहन देणे हा स्वतःचे राज्य वाढविण्याचा एक सर्वोत्तम मार्ग असे.

स्थानिक सरंजामदार आणि मंदिर स्थळे यांना खूप मोठ्या जमिनीची मालकी देणे हा या मध्ययुगातील सरंजामशाहीचा व्यवच्छेदक घटक होय. मौर्यकाळात नोकरशाहीचे सर्व व्यवहार रोकडीने होत असत. अशी जमीनमालकी कायमची बहाल करण्यामुळे राज्याचे स्वतःचे सार्वभौम अधिकार या व्यक्ती किंवा व्यवस्थांकडे हस्तांतरित होत असत. कुठलेही राजकीय छोटेमोठे बदल घडत असताना हे स्थानिक सरंजामदार काय भूमिका घेतात? या वरही त्या काळचे राजकारण अवलंबून असे. (दुर्दैवाचा भाग म्हणजे आज २१व्या शतकातही भारताच्या राजकारणात हे ऐतिहासिक अवशेष शाबूत आहेत.) असे म्हणतात की, स्थानिक धर्ममतांनी आपसातील वैरामुळे परस्परांची जेवढी नासधूस केली, मंदिर स्थापत्यांची तोडफोड केली, ती मुसलमानांनी केलेल्या तोडफोडीहूनही जास्त आहे. गंमतीचा भाग म्हणजे आज उध्वस्त झालेले धर्मस्थळ नंतर पुनरुज्जीवित झाले. अशीही कित्येक उदाहरणे आहेत. भारतात ज्यांनी सर्वात जास्त काळ राज्य केले आणि इतिहासात ज्यांचे नाव घेतले जाते अशा प्रत्येक राजघराण्याने स्वतःच्या धर्ममताला उदार आश्रय देत असताना इतर धर्ममतांचाही राज्यव्यवस्था म्हणून आदर केलेला आहे.

भारतात सर्वत्र पसरलेली जैन मंदिरे या साठी आपण मुद्दाम बघायला हवीत. स्वतःचा महसूल वाढावा म्हणून अनैसर्गिक प्रयत्न केले की, प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे जनतेचे शोषण सुरू होते. आठव्यानवव्या शतकापासून पुढची सुमारे दोनतीनशे वर्षे भारतातले असे शोषण गंभीर स्वरूप धारण करू लागले आणि यातूनच संपूर्ण भारतात भक्ती संप्रदायाचा उदय झाला. असे समजले जाते.

या भक्तीसंप्रदायाचे स्थानिक उपपंथ जरी सद्य भारताच्या राज्यांमधून वेगवेगळे दाखवावे लागत असले तरी, या भक्ती संप्रदायांचा मूलभूत ढाचा हा लवचिक आणि सर्वसमावेशक होता. सनातनी धर्ममते जरी जरी कठीण आणि सर्वसमावेशक नसली तरी भक्तीचा स्वकार करताना एखाद्याची जात किंवा सामाजिक स्थान बघितले जात नव्हते. हा भाग या संप्रदायांच्या यशात खूप मोठा आणि महत्त्वाचा होता. महाराष्ट्राचा विचार करायचा तर इथल्या तांत्रिकांना प्रबळ आव्हान देणारा गोरक्षप्रणित नाथ संप्रदाय हा पहिला. ऐतिहासिक कालक्रमानुसार चक्रधरांचा महानुभाव, बसवेश्वरांचा लिंगायत धर्म आणि तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात निर्माण झालेला भागवत किंवा वारकरी संप्रदाय हे तीन महत्त्वाचे धर्मसंप्रदाय होत. अनुयायी मिळवत असताना असणाऱ्या अटी, अनुयायाने आचरणात आणण्याची मूलतत्त्वे, आचार, विचार, परिधान आणि आहार अशा मानवी जीवनाच्या सामाजिक अंगांचाही विचार हे पंथ करीत असत. 

मुसलमान भारतात येण्याआधी भारतात सर्वत्र नेमकी काय राज्यव्यवस्था असावी? याचे हे एक चित्र आहे. आज १९व्या आणि २०व्या शतकातील भारतीय सामाजिक चढउतारांमुळे सद्य भारतात जे मुसलमानविरोधी चित्र रंगवले जाते आहे तसे ते नाही. हे इतिहास तपासून बघणे आवश्यक आहे. मुसलमान ११व्या शतकापासून लाटा याव्यात तसे भारतात येत राहिले. आणि लढायांमागून लढाया आणि नंतर युद्धांमागून युद्धे जिंकू लागले. या मागे असणारे मुसलमानांचा तांत्रिक वरचढपणा आणि एतद्देशीय छोट्या मोठ्या राजांचे मर्यादित राजकीय आकलन ही या मुसलमानी विजयांची प्रमुख कारणे आहेत. असे असूनही भारतात पहिली मुसलमान राजवट स्थापन करण्यासाठी मुसलमानांच्या येणाऱ्या लाटांना दहाबारा पिढ्या वाट बघायला लागली.

इ. स. १८०० ते इ. स. २००० या दोनशे वर्षांत जेवढी राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे भारतात घडली तशी ती इ. स. १००० ते इ. स. १२०० या काळात का घडली नसावीत? या प्रश्नाचा राजकीय विचार करणेही गरजेचे आहे.

येणाऱ्या परक्या मुसलमानांनी इथे मिसळून गेल्यावर भारतात कुठली तरी परकीय किंवा नवीन राजकीय व्यवस्था अजिबात दिली नाही! सर्वसाधारणपणे एतद्देशीय राजकीय व्यवस्थेशी जुळवून घेतले. त्यांनी वेळोवेळी केलेल्या वैध आणि अवैध मार्गांनी केलेल्या धर्मांतरांचा इतिहास हा आज जरी हिंदूंना काळाकुट्ट वाटत असला तरी तो तसा का आहे? हा एक आत्मपरीक्षणाचा प्रश्न विचारणेही गरजेचे आहे. भारताला नवीन काही राज्यशास्त्रीय मूल्ये बहाल करण्यासाठी मुळात ती तशी त्यांच्याकडेच नव्हती. बगदादमधील सुलतानशाहीने इस्लामच्या मूलभूत राजकीय ढाच्याला स्वतःच्या सोयीनुसार आधीच बदलले होते! त्यामुळे आज २१व्या शतकातले मुसलमान कितीही इस्लामचे गुणगान करोत. भारतात मात्र त्यांनी भारतातील जीवनाच्या प्रत्येक व्यवस्थेसाठी सातत्याने संवाद केला आणि राजकीय व्यवस्थेतही स्वतःला सोयिस्कर असे बदल करून स्वतःसाठी कशी राजकीय व्यवस्था केली ते आपण पुढे बघूयात.

भारतात असे राजकीय बदल अगदी अॅलेक्झँडर द ग्रेट आणि कुशाण काळापासून दाखवता येतात. भारतीय व्यवस्था असे सर्व बदल गिळून टाकते. पचवते. आणि स्वतःचे समकालीन रूप सातत्याने निर्माण करते. 

राजन साने, हिंदू-मुस्लिम संवादाचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0