फेसबुकच्या आँखी दास यांच्याकडून मोदींना थेट मदत

फेसबुकच्या आँखी दास यांच्याकडून मोदींना थेट मदत

ऑक्टोबर २०१२ मध्ये आँखी दास यांनी "गुजरात प्रचारातील आमचे यश” अशा शीर्षकाखाली मोदींच्या भाजप टीमला प्रशिक्षण देण्याचा अनुभव मांडला होता. या मोहिमेला फेसबुकवर १० लाख चाहते मिळाल्याचेही दास यांनी यात नमूद केले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने २०१४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजय मिळवला, त्यावेळी फेसबुकच्या भारतातील पब्लिक पॉलिसी विभागाच्या प्रमुख आँखी दास यांनी लिहिले होते- “आम्ही त्यांच्या सोशल मीडिया अभियानात चेतना फुंकली आणि नंतर जे घडले तो तर इतिहासच आहे.” फेसबुकच्या भारतातील कर्मचाऱ्यांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या एका ग्रुपवर दास यांनी हे लिहिले होते.

नरेंद्र मोदी यांच्याबरोबर आंखी दास (२०१४ )

नरेंद्र मोदी यांच्याबरोबर आंखी दास (२०१४ )

या मेसेजसह २०१२ ते २०१४ या काळातील अनेक मेसेजेसचा उल्लेख वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या एका बातमीत केला आहे आणि जगभरातील निवडणुकांच्या काळात त्रयस्थ राहण्याच्या कंपनीच्या प्रतिज्ञेचे या मेसेजेसमुळे उल्लंघन होत आहे, असे संकेत दिले आहेत.

दास यांनी अंतर्गत वाचनापुरत्या मर्यादित असलेल्या संभाषणात प्रसिद्ध केलेल्या पोस्ट्सचा भाजपला, विशेषत: मोदी यांना, निवडणुकीत फायदा झाला, असे वॉल स्ट्रीट जर्नलने ३० ऑगस्ट २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या एका लेखात नमूद केले आहे. ऑक्टोबर २०१२ मध्ये दास यांनी “गुजरात प्रचारातील आमचे यश” अशा शीर्षकाखाली मोदींच्या भाजप टीमला प्रशिक्षण देण्याचा अनुभव मांडला होता. या मोहिमेला फेसबुकवर १० लाख चाहते मिळाल्याचेही दास यांनी यात नमूद केले आहे.

या यशानंतर लगेचच मोदी यांना राष्ट्रीय नेते म्हणून मान्यता प्राप्त झाली आणि राष्ट्रीय स्तरावरील पदासाठी प्रचार जोरात सुरू झाला.

फेसबुकने मोदी आणि भाजपला पुन्हा प्रशिक्षण आणि सहाय्य देऊ केेले, असे वॉल स्ट्रीज जर्नलने नमूद केले आहे. दास यांच्या फेसबुकमधील सहकारी केटी हर्बाथ यांनी लिहिले होते की, दास यांनी मोदी यांचे व्यक्तिमत्व भारतातील जॉर्ज डब्ल्यू. बुश म्हणून उभे केले. हर्बाथ यांनी २०१३ मध्ये एका इंटर्नल पोस्टमध्ये असे म्हटले होते. दास आणि हर्बाथ यांचा मोदी यांच्यासोबतचा फोटोही यासोबत पोस्ट केला होता. हर्बाथ रिपब्लिकन विचारांच्या आहेत आणि फेसबुकच्या जागतिक निवडणूक विभागातील अधिकारी आहेत.

आणखी एका मेसेजमध्ये दास यांनी काँग्रेसची सद्दी संपवणारे ‘स्ट्राँगमन’ अशा शब्दात मोदी यांची प्रशंसा केली आहे. कंपनीच्या उच्च प्राधान्यांमध्ये भाजपच्या प्रचाराचा समावेश करण्यासाठी फेसबुकला अनेक महिने लॉबिंग करावे लागले, असे २०१४ सालच्या निवडणुकांपूर्वी दास यांनी लिहिले होते.

दास २०११ सालापासून फेसबुकसोबत आहेत. या काळात फेसबुक राजकारणातील आपली उपयुक्तता दाखवण्यासाठी उत्सुक होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर कार्यकर्त्यांना एकत्र जमवण्यासाठी कसा करायचा याविषयीचे प्रशिक्षण फेसबुकने अनेक भारतीय राजकीय पक्षांनी दिले. २०१२ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळवून देऊन मोदी यांची मुख्यमंत्रिपदी फेरनियुक्ती करून देण्यात मदत या याचाच भाग होता.

फेसबुकवरील एका द्वेषपूर्ण भाषणाच्या हाताळणीवरून भारतात सध्या दास या टीकेच्या केंद्रस्थानी असताना हा नवीन वृत्तांत निर्णायक स्वरूपाचा आहे. भाजपचे तेलंगणमधील आमदार टी. राजा सिंग आणि अन्य काही ‘हिंदू राष्ट्रवादी व्यक्ती व समूहां’ना फेसबुकवरून काढून टाकण्यास दास यांनी प्रचंड विरोध केल्याची बातमी वॉल स्ट्रीट जर्नलने १४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली होती. भाजप नेत्यांवर बंदी आणल्यास कंपनीचे सत्ताधाऱ्यांसोबतचे संबंध बिघडतील, असा पवित्रा दास यांनी घेतला आहे. टी. राजा सिंग यांनी मुस्लिमांना लक्ष्य करून अनेक पोस्ट्स आणि कमेंट्स केल्या होत्या. रोहिंग्या मुस्लिमांना ‘गोळ्या घातल्या पाहिजेत’, भारतीय मुस्लिमांना गद्दार  म्हटले आहे, मशिदी उखडून टाकण्याची धमकी दिली होती. या कमेंट्स सरळसरळ फेसबुकच्या नियमांचे उल्लंघटन करणाऱ्या असल्या तरीही प्रथम काढून टाकण्यात आल्या नाहीत. डब्ल्यूएसजेने हा मुद्दा कंपनीच्या लक्षात आणून दिल्यानंतर या पोस्ट्स डिलीट करण्यात आल्या.

विरोधी पक्षांना तुच्छ लेखणे

दास यांनी इंटर्नल मेसेजेसमध्ये विरोधी पक्षांना तुच्छ लेखणाऱ्या टिप्पण्या केल्याचेही जर्नलच्या बातमीत म्हटले आहे. एका पोस्टमध्ये त्या म्हणतात, “आयएनसीशी तुलना करून त्यांचा अपमान करू नका. असूदे- माझा पूर्वग्रह दिसायला नको.” इंडियन नॅशनल काँग्रेसच्या फेसबुकवरील ऑफिशिअल पेजच्या फॉलोअर्सची संख्या मोदी यांच्या व्यक्तिगत पेजच्या फॉलोअर्सहून अधिक आहे हे एका व्यक्तीने दाखवून दिल्यानंतर दास यांनी ही टिप्पणी केली होती.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी घनिष्ट संबंध असल्याचे संकेतही दास यांनी अनेकदा दिल्याचे जर्नलच्या बातमीत म्हटले आहे. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले, त्याच्या एक दिवस आधी त्यांनी मोदी यांच्या विजयाचा अंदाज सहकाऱ्यांमध्ये व्यक्त केला होता. आपले जवळचे मित्र असलेल्या भाजपमधील ज्येष्ठ नेत्याने ही माहिती दिल्याचेही त्यांनी म्हटले होते.

माहिती प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याबरोबर फेसबुकच्या मुख्य संचलन अधिकारी मेरील सॅंडबर्ग आणि आंखी दास.

माहिती प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याबरोबर फेसबुकच्या मुख्य संचलन अधिकारी मेरील सॅंडबर्ग आणि आंखी दास.

अर्थात या सगळ्यात फेसबुकने दास यांची बाजू घेतली आहे. या पोस्ट्समध्ये कोणत्याही प्रकारचा अयोग्य पूर्वग्रह दिसत नाही, असा पवित्रा फेसबुकने घेतल्याचे जर्नलच्या बातमीत नमूद करण्यात आले आहे.

“या पोस्ट्स पुढील-मागील संदर्भ गाळून निवडण्यात आल्या आहेत आणि भारतीय राजकीय क्षीतिजावरील सर्व पक्षांनी  आमचा प्लॅटफॉर्म वापरावा म्हणून आम्ही करत असलेल्या प्रयत्नांचे संपूर्ण प्रतिनिधित्व या पोस्ट्स करत नाहीत,” असे प्रवक्ते अँडी स्टोन म्हणाले.

वॉल स्ट्रीट जर्नलवरील पहिल्या लेखानंतर दास यांनी दक्षिण दिल्ली पोलिस ठाण्यात धाव घेऊन सोशल मीडियाद्वारे आपल्याला धमक्या आल्याची तक्रार केली. तक्रारीत काही ट्विटर अकाउंट्सचे तपशील देत, आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

भारतीय मुस्लिमांना ‘अधम समुदाय’ म्हणणारी एक पोस्ट फेसबुकवर सहकाऱ्यांमध्ये शेअर केल्याबद्दल त्यांनी माफीही मागितली होती.

दरम्यान, पूर्वग्रहाबाबतच्या आरोपांच्या चौकशीसाठी फेसबुकच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्याबाबत माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय समिती विचार करत आहे. दिल्लीमध्ये फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जातीय दंगलींमध्ये फेसबुक किंवा त्याच्या अधिकाऱ्यांनी भूमिका बजावली का, याची चौकशी करण्यासाठी, दिल्ली विधानसभेतील समितीने प्रक्रिया सुरूही केली आहे.

COMMENTS