पराधीन आहे फेसबुकी पुत्र मानवाचा!

पराधीन आहे फेसबुकी पुत्र मानवाचा!

सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या विविध मीम टेम्प्लेट्समध्ये भिंतीवर आडवं पडून, शांतपणे सिगरेट ओढत समोरच्या मैदानात चाललेला गोंधळ, मारामारी बघणाऱ्या माणसाची एक टेम्प्लेट आहे. स्वतःला त्या माणसाच्या जागी पाहण्याची वेळ सोशल मीडियावर नसताना, सोशल मीडियाला कायमची सोडचिठ्ठी दिल्यानंतर किंवा तिथे असून स्वतः सक्रिय नसताना येऊ शकते.

राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार डळमळीत
जलसंपदा प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री
धोनीच्या निवृत्तीमागचे रहस्य काय?

आपण कुठून आलो, कुठे आहोत, कुठे चाललो असे विचार मनात येणं स्वाभाविकपणे होत असतं. ते बरेचदा होऊ लागलं आणि मुख्य म्हणजे त्याबरोबरीने ‘काय आहे?’ ‘काय चाललंय?’ ‘काय व्हायला हवं?’ हे विचार जास्त प्रबळ होऊ लागले की आपण एका विशिष्ट मुक्कामी पोचलो आहोत असं समजावं. हे मुक्कामाचं ठिकाण तसं चांगलं आहे. रोमांचकता कमी आणि विश्लेषण जास्त असं ठिकाण असल्याने थोडं नीरस वाटू शकतं, पण कालांतराने विश्लेषणात रोमांचकता आहे असंही जाणवू लागतं.

‘सोशल मीडिया’ हे ठिकाण या ठिकाणावरून फार मौजेचं दिसतं. सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या विविध मीम टेम्प्लेट्समध्ये भिंतीवर आडवं पडून, शांतपणे सिगरेट ओढत समोरच्या मैदानात चाललेला गोंधळ, मारामारी बघणाऱ्या माणसाची एक टेम्प्लेट आहे. स्वतःला त्या माणसाच्या जागी पाहण्याची वेळ सोशल मीडियावर नसताना, सोशल मीडियाला कायमची सोडचिठ्ठी दिल्यानंतर किंवा तिथे असून स्वतः सक्रिय नसताना येऊ शकते. पण पुढे जाऊन ‘आपणही या मैदानात होतो, स्वतः मारामारी करत नसलो तरी मारामारीचा परिणाम आपल्यावर होत होता, क्वचित आपल्यामुळेदेखील एखादी छोटी-मोठी मारामारी घडली होती’ ही जाणीव संमिश्र भावना जागवते. अलीकडे मला ही जाणीव झाली याचं कारण म्हणजे ‘श्याम आणि श्यामची आई’ या मीमवरून फेसबुकवर उठलेला गदारोळ.

त्याबाबत बोलण्याआधी सोशल मीडियाबाबत (विशेषतः फेसबुकबाबत, कारण माझा स्वतःचा अनुभव फेसबुकपुरता आहे) आणि मी दीर्घ काळाकरता, कदाचित कायमस्वरूपी, फेसबुक बंद करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल थोडक्यात सांगायला हरकत नाही.

फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब हे मानवी वृत्ती लक्षात घेऊन निर्माण झालेले तांत्रिक आविष्कार आहेत. माणसामधील अंतःस्थ भावनांना, विशेषतः विकारांना हात घालायची ताकद या माध्यमांच्या स्वरूपात आहे. फेसबुक निर्माण होताना मार्क झकरबर्गच्या मनात ‘ऑफलाइन सामाजिक अनुभव ऑनलाइन आणणे’ ही कल्पना होती. परंतु या ऑनलाइन अनुभवामध्ये काही कळीचे फरक पडलेले दिसतात आणि त्याचा संबंध माणसं समोरासमोर बोलत नसल्याशी आहे. फेसबुकवर माणसं आपलं संतुलन हरवतात कारण संतुलन हरवण्याची मुभा इथे पटकन मिळते. माणूस समोर नाही आणि तो समोर यायची शक्यताही नाही हे समजलं की एक प्रकारची सुरक्षितता येते आणि माणूस तीव्रतेने बोलू लागतो. माणसं समोरासमोरदेखील भांडू शकतातच, पण आपल्यासमोर एक माणूस बसला आहे आणि बोलतो आहे हे पाहिल्यावर आपल्यातला तारतम्य बाळगणारा माणूस अधिक जागा राहतो. यात रूढ शिष्टाचारांचाही भाग आहेच. आणि तो ठीकच आहे. शिष्टाचार तोंडदेखले असतात हे खरं, पण ते शांततामय सहअस्तित्वासाठी आवश्यकही असतात. माणसाचं मन, त्याच्या विविध प्रक्रिया हा एक रोचक अभ्यासविषय आहे, माणसाच्या आत एक डोह आहे जो जवळून निरखण्याजोगा आहे. ऑनलाइन जगात हे जमणं फार अवघड आहे. इथे माणसाच्या (आभासी) अतिदर्शनामुळे ही ‘जवळून निरखण्याची स्पेस’च नाहीशी होतेय की काय अशी शंका येते.

जानेवारी २०१२ ते एप्रिल २०२० अशी आठ वर्षं मी फेसबुकवर होतो. यातला काही काळ फेसबुकबाहेर असण्याचा, असून नसल्याचा असाही आहे. कविता लिहिण्यापासून सुरूवात होऊन पुढे ललित, वैचारिक स्वरूपाचं गद्यलेखन, विनोदी स्फुटलेखन, ‘मी आणि गांधीजी’ ही संवादमालिका, शेरलॉक होम्स आणि जॉन वॉटसन या दोन प्रसिद्ध व्यक्तिरेखांना धरून लिहिलेली एक इंग्लिश संवादमालिका, डिजिटल माध्यमावर टिप्पणी करणारी एक डिजिटल विडंबन मालिका, कविता-गाण्यांची विडंबनं असं काय काय लिहीत होतो. यातला अलीकडील एक टप्पा मीम्सचा होता. (हा माझा फेसबुकवरचा शेवटचा टप्पा!) वेगवेगळी टेम्प्लेट्स वापरून मी मीम्स पोस्ट करत होतो. मला असं दिसतं की माध्यमावर पकड येऊ लागल्यावर तुमचं विविध प्रकारे व्यक्त होणं लिहिणं वाढत जातं आणि तुमची जाणीवही विकसित होत जाते – किमान तसं होणं अपेक्षित तरी आहे. आधी मी हिंदुत्ववादाबद्दल, धार्मिक कट्टरतेबद्दल तिरकसपणे लिहायचो. पण जेव्हा असं लक्षात येऊ लागलं की या विचारसरणीचे बरेच लोक इथे आहेत तेव्हा मला वाटू लागलं की केवळ प्रतिक्रियात्मक न लिहिता विश्लेषणात्मक लिहायला हवं. कारण माझ्या अवतीभवती माणसं आहेत आणि ती मला ऐकतायत. जेव्हा त्यांना हे कळेल मी माझं काहीएक विश्लेषण आहे तेव्हा ते माझं उपहासात्मक लिहिणंही समजून घेऊ शकतील. माझ्या म्हणण्याला, विरोधी भूमिकेला बैठक मिळेल. अन्यथा नुसती वादावादीच सुरू राहील आणि माणसांचे तट पडतील. फेसबुकवरचा गलका वाढल्यावर मला जाणवू लागलं की हे प्रकरण हाताबाहेर जाऊ शकतं. आपल्याला लिहायचं वगैरे असलं आणि त्यासाठी हे माध्यम एका बाजूने अनुकूल असलं तरी दुसऱ्या बाजूने धोकादायकही आहे. कारण गर्दीचा, गलक्याचा परिणाम तुमच्या इच्छेची वाट न बघता तुमच्यावर होतो. या माध्यमाच्या स्वरूपातील अंगभूत मर्यादा आपल्यामध्येही हळूहळू येतील ही जाणीव काहीशी भीतीदायक होती. त्यामुळे जाणीवपूर्वक अंतर राखणं सुरु केलं.

एप्रिल २०२० च्या अखेरीस फेसबुकवर माझ्या एका मीमसंदर्भाने घडलेल्या एका अगदी छोट्या प्रसंगाने माझ्यात काहीतरी बदलल्याची जाणीव मला झाली. आपल्या मनात काहीतरी ‘स्विच ऑफ’ झालंय, आपलं कनेक्शन तुटलं आहे असं मला जाणवलं. (बहुधा ती उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी होती!) त्यानंतर चार-एक दिवसांनी मी अकाउंट बंद केलं. फेसबुकपासून लांब राहावं असं वाटलं की मी माझं अकाउंट साधारण दोन-एक महिने बंद करत असे. त्या काळात काही सुचलं तर ते लिहून ठेवणं आणि नंतर पोस्ट करणं असं व्हायचं. मात्र तत्कालीन घडामोडींवर काही मीम्स सुचले तर ते नंतर पोस्ट करून अर्थातच उपयोग नसतो. त्यामुळे मनातून जरी फेसबुक बंद करावं असं वाटत असेल तरी मीम सुचलं किंवा दुसरी एखादी टोप्या उडवणारी टिप्पणी सुचली की अगदीच नाईलाज व्हायचा! वर सांगितलेल्या प्रसंगानंतर मात्र मला विशेष काही सुचलंही नाही आणि क्वचित काही सुचलं तेव्हा फेसबुकवर जावं असं वाटलं नाही.

आता आपण ‘श्याम आणि श्यामची आई’ वरील त्या वादग्रस्त मीमकडे वळू.

काही दिवसांपूर्वी मला हेरंब कुलकर्णी यांनी कुणीतरी श्याम आणि त्याच्या आईचा फोटो वापरून केलेलं एक मीम पाठवला. ते फारच वाईट होतं. त्यांचा त्यावरील आक्षेप मला अगदीच मान्य होता. त्यांनी या मीमबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केल्याचंही त्यांनी कळवलं. त्यानंतर मला काही मित्र-मैत्रिणींनी फोन आणि मेसेज करून फेसबुकवर यासंदर्भात गदारोळ सुरू झाल्याचं कळवलं. बऱ्याच जणांना, विशेषतः तरूण मित्र-मैत्रिणींना हेरंब कुलकर्णींच्या तक्रार करण्यावर आक्षेप होता असं कळलं. त्यानंतर या विषयावरही मीम्स केले गेले. मग चर्चा, शाब्दिक देवाणघेवाण – एकूणात प्रकरण गंभीर झाल्याचं कळलं.

अभिव्यक्तीसंदर्भात अमुक बरोबर, अमुक चूक, अमुक आक्षेपार्ह आहे, अमुक आक्षेपार्ह नाही हे निर्णयन सहसा आत्मनिष्ठ (सब्जेक्टिव्ह) पायावर केलं जातं. (अभिव्यक्तीखेरीज इतरही बाबतीत जे निर्णय होतात ते तरी वस्तुनिष्ठ – ऑब्जेक्टिव्ह – पायावर होतात का? वस्तुनिष्ठ म्हणजे काय? खरं पाहिलं तर सगळंच आत्मनिष्ठ असत नाही का? असे काही प्रश्न इथे पडतात. पण सध्या ते बाजूला ठेवू.) ते होणं अपरिहार्य आहे. त्यामुळे एखादा विनोद, एखादं मीम न आवडणं हे पूर्णपणे समजण्यासारखं आहे. (‘न आवडणं’ या निर्णयामागील विचारप्रक्रिया हा एक वेगळा मुद्दा आहेच. एखादी अभिव्यक्ती ‘आवडली’ किंवा ‘आवडली नाही’ हा आपला निर्णय कसा होतो? त्यामागे कोणतं संचित असतं? तो निर्णय स्वतंत्र, पूर्णपणे व्यक्तिगत असला तरी त्यामागील प्रेरणा कोणत्या? आपल्या निर्णयांमागे राजकीय प्रेरणा – निव्वळ पक्षीय राजकारण या अर्थी नव्हे तर विशिष्ट वैचारिक कल याअर्थीदेखील – कार्यरत असतातच का? बिगर-राजकीय अशा प्रेरणा असतात का? या प्रश्नांचाही आपल्याला स्वतंत्रपणे शोध घेता येईल.) आता एखादा विनोद किंवा मीम मला आवडला नाही तर मी निषेध करून थांबावं की त्यावर काही कारवाई करावी? निषेध व्यक्त करायला हरकत नाहीच, पण तक्रार करायची काहीच गरज नव्हती असा सूर या मीम प्रकरणात दिसला. त्यावर मला असं वाटतं की आवडणं/न आवडणं हा जसा प्रत्येकाचा निर्णय आहे तसंच त्यावर काय करायचं हादेखील प्रत्येकाचा निर्णय असू शकतो. मात्र मी माझी कारवाई व्यवस्थेच्या चौकटीत करावी हे नक्की. म्हणून मी जर तोडफोड न करता माझी तक्रार व्यवस्थेच्या संबंधित विभागाकडे घेऊन जात असेन तर त्यात काही गैर नाही. व्यवस्था मला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देते, माझ्या हातात इंटरनेट देते, फेसबुक देते. (मी इंटरनेटकरता पैसे देतो हे बरोबर आहे. पण तोदेखील व्यवस्थेशी केलेल्या कराराचा भाग आहे.) आता मी जर सोयीस्करपणे व्यवस्थेचे मला हवे ते फायदे घेत दुसऱ्या बाजूने त्याच व्यवस्थेने निर्माण केलेल्या ‘तक्रार सुनावणी व निवारण’ यंत्रणेच्या स्थानाला नाकारलं तर ते योग्य होणार नाही. व्यवस्था कायमच न्याय्य असते, व्यवस्थेशी झगडू नये असं इथे अभिप्रेत नाहीच. ‘माणूस आणि व्यवस्था’ या संदर्भात आणि आत्ताचा चर्चाविषय असलेल्या अभिव्यक्तीच्या व तक्रारीच्या विशिष्ट संदर्भात हा मुद्दा मी तात्त्विक अंगाने मांडतो आहे इतकंच. योग्य ती अंमलबजावणी व्हावी म्हणून, व्यवस्थेकडून होणाऱ्या चुका दुरूस्त व्हाव्यात म्हणून, व्यवस्थेत सुधारणा व्हावी म्हणून सतत झगडावं लागतं – आणि ते अत्यंत, अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा हा झगडा शारीरिक हिंसेचा आधार घेत नाही (मानसिक हिंसा कुठलाच संघर्ष टाळू शकत नाही), व्यवस्थेनेच आखून  दिलेल्या चौकटीत तो उभा राहतो तेव्हा त्याला व्यवस्था-विरोधी असं म्हणणंही चुकीचं ठरेल. तो व्यवस्था सुधारण्यासाठीचा संघर्ष असतो. व्यवस्था मोडण्याकरताचा नाही. माणूस आणि व्यवस्था यांच्यातील देवाण-घेवाण, संघर्ष त्या त्या संदर्भचौकटीत पाहावे लागतात.

प्रस्तुत तक्रारीनंतर या विषयावरील चर्चेला वेगवेगळी अनावश्यक वळणं लागली असं कळलं. हे आपल्या ‘सामाजिक डीएनए’ला साजेसंच झालं. ते दुःखदायक होतंच, पण अशा गोष्टींचं आश्चर्य वाटणं कधीच बंद झालंय. जातीय वळण लागणं, साने गुरूजींच्या मृत्यूबाबत उलट-सुलट बोललं जाणं घृणास्पद होतं. कुठलाही समाज परिपूर्ण असत नाही, त्यातील वैगुण्यं वेळोवेळी दिसत असतात हे खरं आहे. पण तरी आपल्या समाजाची वैचारिक पातळीवरील घडण पुन्हा पुन्हा हताश करणारी आहे. फेसबुकच्या उदयानंतर ही सदोष वैचारिक घडण वारंवार समोर येऊ लागल्याने ही हताशा वाढत गेली आहे. फेसबुकबाबत कृतज्ञ असण्याची अनेक कारणं आहेत. फेसबुकने माझ्यासारख्या अनेकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, समविचारी मित्र मिळवून दिले, चांगलं वाचायला दिलं, रंजनही केलं. परंतु या दुधारी तलवारीची दुसरी बाजू इतकी तीक्ष्ण आहे आणि ती इतकी सतत वापरली जाते आहे की त्यामुळे पहिली झाकोळून गेलीय.

या मीमबद्दलचा वाद माझ्यापर्यंत येण्याचं कारण म्हणजे या मीम कल्पनेचं पालकत्व माझ्याकडे जातं. (अर्थात माझी टेम्प्लेट वेगळी होती. वादग्रस्त मीमची टेम्प्लेट थोडी वेगळी होती. शिवाय माझ्या माहितीनुसार ते मीम कुणी केलं याचा शोध अद्याप लागला  नाही.) मी डिसेंबर २०१९ मध्ये श्याम, श्यामची आई आणि श्यामचा मित्र असं एक टेम्प्लेट वापरून एक मीम केलं होतं. पुढील तीन-चार महिन्यात सामाजिक-राजकीय आशयाची बरीच मीम्स केली. एक-दोन मीम्समुळे काही हिंदुत्ववादी मंडळी चिडलीही होती. पण एकूणात त्या मीम्सचं सोशल मीडियावर चांगलं स्वागत झालं. एकदा एका समविचारी परिचित आयडीने (आयडी परिचित, पण व्यक्ती अपरिचित) या मीमबाबत नाराजी दर्शवली तेव्हा त्यांची नाराजी समजून घेऊन मी त्यांची माफी मागितली होती. ही मालिका पुढे सुरू ठेवावी की नाही याचा विचार करतो आहे असंही त्यांना म्हटलं. मी खरंच विचारात पडलो होतो, पण मी मालिका बंद केली नाही. हिंदुत्ववादी मित्रांचा राग असलेल्या मीमबाबत मी एक सविस्तर लेखही लिहिला होता. ‘संघ-भाजपचा विरोधक’ या राजकीय आणि ‘विचारसरणी समजून घ्यायचा प्रयत्न करणारा मनुष्य’ या मानवीय अशा दोन्ही भूमिकांमधून हिंदुत्ववाद-उदारमतवाद यावर मी लिहीत होतोच. विनोदी अंगाने आणि जोडीने वैचारिक अंगानेही.

उजव्या विचारधारेकडून आजवर गांधी-नेहरूंची, विशेषतः नेहरूंची, पद्धतशीरपणे बदनामी केली गेली आहे. त्यांच्याबद्दल द्वेष पसरवला गेला आहे. हे करताना त्यांच्या फोटोचं विकृतीकरण करून ते राजकीय उद्दिष्टपूर्तीचं साधन म्हणून वापरले गेले आहेत. हे आपण होऊ दिलं, त्यावर वेळीच आक्षेप घेतला नाही. या पार्श्वभूमीवर साने गुरूजींचं विकृतीकरण होऊ नये याची खबरदारी आपण घ्यायला हवी असा मुद्दा हेरंब कुलकर्णी यांनी मांडला होता. हा मुद्दा नक्कीच विचार करण्यासारखा आहे. (या दोन्हीतला एक फरक असा की गांधी-नेहरूंचे फोटो वापरून केलं गेलेलं विकृतीकरण हे स्पष्टपणे गांधी-नेहरूंना बदनाम करण्यासाठीच केलं जातं. श्यामच्या वादग्रस्त मीममागे साने गुरूजींची बदनामी हा हेतू नव्हता. त्यातला विनोद हीन पातळीवरचा असला तरी. अर्थात भविष्यात तसं होणार नाही याची खात्री देता येत नाहीच.) गांधी-नेहरूंचं विकृतीकरण आपण कायदेशीर मार्गाने थांबवू शकलो असतो का हा खरंच एक प्रश्न आहे. कायदेशीर मार्ग अवलंबला गेला असता तर बहुधा गांधी-नेहरू विनोद करण्याच्या पलीकडे आहेत, ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी आहे असं म्हटलं गेलं असतं. विनोद करणं आणि खोटं पसरवणं, विकृतीकरण करणं यात फरक आहे हे सरळ आहे. पण उजव्या विचारधारेकडून त्याला अर्थातच सोयीस्कर वळण दिलं गेलं असतं. विषय भरकटवला गेला असता. शिवाय उजव्या विचारधारेचे असंख्य ‘फूट सोल्जर्स’ असल्याने या विचारधारेच्या धुरिणांना जबाबदारी झटकणं नेहमीच सोपं असतं आणि ते तसं करतातही. कायदेशीर मार्ग न अवलंबल्याने आणखी एक झालं. उजव्या विचारधारेतील एक मोठा दुर्गुण, मनोवृत्तीतील कोतेपणा लोकांसमोर आणण्याची आपल्याला संधी मिळाली. परंतु एकूणात हा थोडा ‘ट्रिकी पॉइंट’ आहे असं मला वाटतं. एखादी गोष्ट करण्याचा किंवा न करण्याचा एकच परिणाम होत नाही. अनेक परिणाम होऊ शकतात. इथेही तेच झालं असतं. त्यामुळे कायदेशीर मार्ग घेणं आणि न घेणं – दोन्हीचे बरे-वाईट परिणाम झाले असते. दुसरा मुद्दा असा की कायद्याचा धाक मनोवृत्ती बदलवू शकत नाही. त्यातून तात्पुरतं नियंत्रण येतं हे खरं, पण प्रश्न कायमचा सुटत नाही. वैचारिक परिवर्तनाचा मुद्दा अधिक व्यापक आहे, आणि म्हणूनच तो अवघड आणि पुष्कळ वेळ मागणाराही आहे.

मीमच्या संदर्भाने एक मुद्दा मात्र मांडावासा वाटतो. सोशल मीडिया आपल्याला सोसत नाहीये हे खरं आहे, शक्य असेल तर तिथून बाहेर पडावं किंवा त्याचा वापर करताना काही पथ्यं पाळावीत हे खरं आहे. पण हे व्यासपीठ आता तयार झालं आहे आणि ते राहणार आहे हेही खरंच. इथे तुमच्या अभिव्यक्तीला स्पेस मिळते, आपली ओळख निर्माण करायला वाव मिळतो. विशीतल्या तरूण मुला-मुलींमध्ये ही ऊर्मी असणारच. मी सुरूवात केली तेव्हा माझ्यातही हीच ऊर्मी होती. (अर्थात मी फेसबुकवर आलो तेव्हा ऑलरेडी पस्तीसचा होतो ही एक आणि माझी वृत्ती मुळात तशी शांत होती/आहे ही दुसरी – अशा दोन गोष्टी माझ्या पथ्यावर पडल्या!) त्यामुळे आपण त्यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर संवाद ठेवायची फार गरज आहे. ‘विरोध’ ही गोष्ट वैचारिक परिवर्तनासाठी फारशी मदत करत नाही. त्यासाठी सततच्या ‘रीझनिंग’ची गरज असते. आपण आपल्या परिचित तरूण मित्रांबाबत तर हे नक्कीच करायला हवं. आपलं स्वतःचं स्वतःशी, दुसऱ्यांशी, संकल्पनांशी असलेलं नातं कायमच द्वंद्वात्मक राहणार आहे. त्यामुळे आपल्याला सर्वच बाबतीत ‘निगेट’ करण्यापेक्षा ‘निगोशिएट’ करण्याचं धोरण ठेवावं लागेल.

वरील मांडणीत वादग्रस्त मीमसंदर्भाने काही मुद्दे आले आहेत. शेवटी ते आणि इतर काही मुद्दे साररूपात मांडतो –

  • ते मीम चांगलं नव्हतं. त्याचा निषेध होणं योग्य आहे.
  • त्या मीमबाबत गुन्ह्याची तक्रार दाखल करण्याची आवश्यकता होती असं मला वाटत नाही. मात्र तक्रार करणं चुकीचं अजिबात ठरत नाही.
  • तक्रार दाखल करणं पटलं नाही हे म्हणायला काहीच हरकत नाही. पण म्हणून हेरंब कुलकर्णी यांच्यावर जी अश्लाघ्य टीका-टिप्पणी केली गेली ती निषेधार्ह आहे.
  • मीम हा एक अभिव्यक्तीचा नवीन प्रकार आहे. जर एखादं मीम आक्षेपार्ह वाटलं तर ते तयार करणाऱ्या मनुष्याशी संवाद करण्याचा प्रयत्न जरूर करावा.
  • ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ आणि ‘अभिव्यक्तीवरील नियंत्रण’ हे दोन्हीही मूल्यमापनाच्या पलीकडे नाही.
  • आपला समाज एकूणच भावना दुखावून घेणारा समाज आहे. त्याने बदलायला हवं हे खरं आहे. पण ‘भावना दुखावून’ तो बदलणार नाही. हा एक मोठा, अवघड, वेळ घेणारा प्रकल्प असणार आहे.
  • समाजमाध्यमं व्यक्तींचं मनःस्वास्थ्य आणि परिणामी समाजस्वास्थ्य बिघडवत आहेत हे लक्षात घेतलं तर तिथे वावरताना कोणती काळजी घ्यावी हे आपल्या लक्षात येऊ शकेल.

आज आता फेसबुकवरचा हा वाद शांत झाला असेल. कदाचित दुसरा एखादा सुरूही झाला असेल. वाद -चर्चा होणं हे चांगलंच आहे, पण वाद आणि चर्चेची पद्धत माहीत असेल, ती पाळली जात असेल तरच ते चांगलं आहे. दुसरं म्हणजे एखादं वाईट मीम करणारा ‘भटका हुआ नौजवान’ असो किंवा दीर्घ लेख लिहिणारा एखादा अभ्यासक असो –  फेसबुक दोघांमधला ‘माणूस’ पृष्ठभागावर आणतं. अनेक लहान-मोठ्या विकारांचं प्राबल्य असणारा माणूस म्हणजे अत्यंत व्हल्नरेबल प्रजाती आहे. माणसाच्या अचाट तांत्रिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवर त्याची टिकून राहिलेली व्हल्नरॅबिलिटी अधिकच उठून दिसते. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ याची आजची आवृत्ती ‘पराधीन आहे फेसबुकी पुत्र मानवाचा’ अशी आहे! ‘हो-नाही’, ‘चूक-बरोबर’ या द्वैतामध्येच उत्तर देण्याची, सर्व काही बायनरीमध्येच समजून घेण्याची आपली वृत्ती/आपल्याला लागलेली सवय आता फार गंभीर वळणं घेते आहे. याचा आपण सगळे मिळून विचार करूया आणि एकमेकांशी बोलत राहूया.
सध्या इतकंच सांगावंसं वाटतं.

उत्पल व. बा., हे लेखक आणि संपादक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: