साने गुरुजी खरंच इतके महत्वाचे आहेत का?

साने गुरुजी खरंच इतके महत्वाचे आहेत का?

सानेगुरुजींमध्ये जे शोधाल ते सापडतं मात्र गेली अनेक वर्षं महाराष्ट्राला सानेगुरुजी नीटसे सापडले आहेत असं काही खात्रीलायक म्हणता येणार नाही.

राज्यातल्या ३६ लाख विद्यार्थ्यांचेही लसीकरण होणार
मेवानी यांना जामीन मंजूर पण दुसऱ्या गुन्ह्याखाली अटक
येडियुरप्पा सरकार विधानसभेत उत्तीर्ण

साने गुरुजी महत्वाचे आहेत? त्यांना नव्याने समजून घेण्याची, त्यांच्याकडे थोडं थबकून बघण्याची गरज आहे का? कोणी त्यांना पूजावं, मात्र त्यांच्या धर्माविषयीच्या भूमिकेपेक्षा बुद्धीप्रामाण्यवादाचा पुरस्कार करावा. कोणी त्यांचं ‘मला हिंदू धर्मातील उदारता प्रकट करायची आहे’ हे विधान सोयीस्कर विसरून जावं. त्यांच्या ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो’ या काव्यातील बलाचा गांधीवादी आशय डावलून कोणी त्या गाण्याला अखंड भारताचे विस्तारवादी दिवास्वप्न पूर्ण करण्यासाठीचं अँथम बनवावं. कोणी मुंजीत ‘श्यामची आई’ मुंज्या मुलाला भेट द्यावं आणि नंतर ‘श्यामसारखा बायल्या होऊ नकोस’ म्हणत आक्रमक कठोर पुरुषत्वाची महती सांगावी. कोणी त्यांच्या जाणीवे-नेणिवेतील छुपे ब्राह्मण्य शोधावे आणि त्यांना प्रति-क्रांतीकारी ठरवावं. सानेगुरुजींमध्ये जे शोधाल ते सापडतं मात्र गेली अनेक वर्षं महाराष्ट्राला सानेगुरुजी नीटसे सापडले आहेत असं काही खात्रीलायक म्हणता येणार नाही.

मराठी मातीत सानेगुरुजी लोकप्रिय आहेत खरे, पण त्यांनी रेखाटलेला संवेदनशील, सामाजिक बांधीलकी मानून आपले जन्मजात प्रिव्हीलेजेस नाकारणारा पुरुष मराठी माणसाला कधी फारसा हवाहवासा वाटला नाही हेही तेवढंच खरं आहे. सानेगुरुजींच्या रुपात मराठी माणसाला त्याचं स्वतःचं चांगुलपण दिसतं, सचोटी दिसते, संवेदनशीलता दिसते; आणि मग त्याला आठवतं, ‘जग तर असं नाही, ते लबाड आहे. स्वार्थी आहे. क्रूर आहे. धूर्त आहे. राजकारणाने भरलेलं आहे.’ मग त्याला आपलं सानेगुरुजीपण नकोसं वाटायला लागतं. जगात टिकून रहाण्यासाठी, दोन हात करण्यासाठी त्याला सानेगुरुजींना दूर लोटणं शहाणपणाचं वाटू लागतं. सानेगुरुजींपेक्षा घट्ट मनाचा, कठोर, खंबीर, व्यवहारी पुरुष त्याला हवाहवासा वाटू लागतो. आपण काय आहोत आणि आपण कसं असायला हवं याविषयीच्या धारणा वास्तवाला धरून असतातच असं नाही. मात्र या धारणा अनेकदा पेचात टाकतात. सानेगुरुजींच्या आकलनाविषयीचे आपले गोंधळ या पेचांनी रंगलेले आहेत. हे गोंधळ दूर सारत सानेगुरुजींकडे पहाण्याच्या प्रवासाची माझी सुरुवात सानेगुरुजींच्या ‘इस्लामी संस्कृती’ या पुस्तकामुळे झाली.

महाराष्ट्रातील इतर अनेक मुला-मुलींसारखंच मीही लहानपणी ‘श्यामची आई’ वाचलं होतं. साने गुरुजी म्हणजे ‘श्यामची आई’ ही प्रतिमा माझ्याही मनात रुजली होती. पंचवीसेक वर्षांपूर्वी एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयात अचानकपणे सानेगुरुजींचे ‘इस्लामी संस्कृती’ हे पुस्तक माझ्या हाती लागलं. ते पुस्तक एका झटक्यात वाचून झालं, इतकं ओघवत्या शैलीत लिहिलं होतं. ते वाचून नवल वाटलं. कारण १९८०च्या दशकात मॉंटगोमरी वॅट या अभ्यासकाने लिहिलेले इस्लामसंबंधी लिहिलेल्या पुस्तकात आणि १९४५मध्ये सानेगुरुजींनी लिहिलेल्या ‘इस्लामी संस्कृती’ मध्ये मला मोठं साधर्म्य जाणवलं. ही दोन्ही पुस्तकं इस्लामचा उदय आणि विकास याचा ऐतिहासिक संदर्भ उलगडून दाखवत होती. इस्लामी संस्कृतीमध्ये मुहम्मद पैगंबर यांचं चरित्रही सानेगुरुजींनी मांडलं होतं. त्यांच्या शिकवणीचा सामाजिक आशय सांगितला होता. ते पुस्तक ‘श्यामची आई’वाल्या सानेगुरुजींनी लिहिलं आहे याचं वारंवार नवल वाटत राहिलं. मग ‘श्यामची आई’ पुन्हा वाचून काढलं. सानेगुरुजींनी लिहिलेली आणखी काही पुस्तकं मिळतायत का ते शोधलं, पण तेव्हा ‘गोड गोड गोष्टी’ आणि एक दोन इतर पुस्तकांव्यतिरिक्त सानेगुरुजींचं सर्व साहित्य सहजी उपलब्ध होत नव्हतं. सानेगुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षात झालेल्या व्याख्यान आणि परिसंवादातही सानेगुरुजींची अपरिचित प्रतिमा पुढे येत होती. पण त्यांचं बरंच साहित्य तेव्हा ‘आउट ऑफ प्रिंट’ होतं. ते सगळं शोधून वाचण्याची संधी मला पुढे काही वर्षांनी गंधर्ववेद प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या चरित्र ग्रंथमालेसाठी सानेगुरुजी चरित्र लिहिण्यासाठी विचारण्यात आल्यावर मिळाली.

या चरित्र लेखनासाठी वेगवेगळ्या ग्रंथालयातून सानेगुरुजींचं साहित्य गोळा करायला सुरुवात केली. ‘साप्ताहिक साधना’ची स्थापना सानेगुरुजींनी केली होती. तिथे काही मिळेल का अशी विचारणा केल्यावर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी साधना ऑफिसमध्ये असलेली सानेगुरुजींची कागदपत्रं उपलब्ध करून दिली. पुढे सानेगुरुजींच्या पुतणी सुधाताई बोडा (ज्यांना संबोधित करणारी ‘सुंदर पत्रे’ सानेगुरुजींनी लिहिली आहेत) यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे, आणि पत्रव्यवहार उपलब्ध करून दिला. सानेगुरुजींच्या काळातील काही वर्तमानपत्रे पहायला मिळाली. दिल्ली येथील नेहरू मेमोरियल ग्रंथालयातून सानेगुरुजींच्या समकालीनांचे पत्रव्यवहार व इतर कागदपत्रे बघायला मिळाली. यातून कधी न दिसलेले सानेगुरुजी उलगडत गेले. त्यातून साने गुरुजींचे राजकीय चरित्र ‘सानेगुरुजी: व्यक्ती आणि विचार’ आकाराला आले. नुकतीच साधना प्रकाशनाने या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे.

इतिहासातील एखाद्या व्यक्तीवर अशाप्रकारे संशोधन करण्याला अकादामिक महत्व असू शकतं, पण या लेखाच्या सुरुवातीला जो प्रश्न उपस्थित केला आहे, तो म्हणजे सामान्य माणसाच्या दृष्टीनं, अकादामिक वर्तुळाच्या बाहेर सानेगुरुजी पुन्हा नव्याने समजून घ्यावेत एवढे खरंच महत्वाचे आहेत का?

राजकीय संघटना आणि राजकीय विचारप्रणाली यांच्या भूमिका आणि दृष्टीकोन यातील साचेबद्धपणा ओलांडून समाज समजून घेण्याची सानेगुरुजी आठवण आहेत. राजकीय संघटनेचा कार्यकर्ता होणे म्हणजे आपल्या सत्सदविवेकबुद्धीशी फारकत घेणं नव्हे, आपल्या प्रश्न विचारण्याच्या अधिकारावर पाणी सोडणं नव्हे, आपल्याला उमगलेल्या सत्याला बाजूला सारणं नव्हे ही आठवण सानेगुरुजींची राजकीय कारकीर्द करून देते. राजकीय निष्ठा किंवा बांधीलकी सर्वंकष असू शकत नाही, असता कामा नये याचा परिपाठ सानेगुरुजींच्या आयुष्यात दिसतो. सानेगुरुजी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होते, कॉंग्रेसचे सदस्य होते मात्र १९३६मध्ये स्थापन झालेल्या प्रांतिक स्तरावरील कॉंग्रेस सरकारच्या शेतकरी आणि कामगारविषयक धोरणांची कठोर समीक्षा करताना त्यांनी कच खाल्ली नाही. राष्ट्रीय प्रश्नांवर एकमत व्हावं यासाठी सामाजिक समता आणि सामाजिक न्याय यांना दुय्यमत्व देणं त्यांना मान्य नव्हतं. शेतकरी कामगारांच्या लढ्यात ते कम्युनिस्टांच्या सोबत होते मात्र भारताच्या स्वातंत्र्यासाठी पूरक भूमिकेपेक्षा रशियाधार्जिणी भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी भारतीय कम्युनिस्टांवर जोरदार टीका केली. ते समाजवाद्यांचे साथी होते मात्र धर्माविषयीच्या त्यांच्या जाणीवांवर रामकृष्ण परमहंस यांच्या दृष्टीचा प्रभाव होता. धर्म म्हणजे काय हे समजून न घेता तो नाकारणं त्यांना मान्य नव्हतं. ते भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म यांच्या जीवनदृष्टीचे निस्सीम चाहते होते मात्र हिंदू म्हणून जन्माला आल्याने आपोआप ती दृष्टी आत्मसात होते आणि आपोआप आपण महान होतो हा भ्रम ते नाकारत होते. हिंदू धर्मातली उदारता प्रकट करण्यासाठी आपल्याला आपला व्यवहार आमूलाग्र बदलावा लागेल याची ते वारंवार आठवण करून देत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल त्यांना आदर होता आणि त्याचवेळी या कार्याला पूरक आणि तरीही वेगळ्या भूमिका घेताना त्यांनी संकोच बाळगला नाही. महात्मा गांधींच्या विचारांचे ते पाईक होते मात्र महात्मा गांधींच्या राजकीय निर्णयांचे आज्ञापालन करण्याऐवजी स्वतःचा ‘आतला आवाज’ ऐकत गांधींच्या सूचनांचा आज्ञाभंग करणे त्यांनी अधिक रास्त मानले. विचारप्रणालीने आखून दिलेल्या शिस्तीच्या बाहेर विचार करण्याचं धारिष्ट्य सानेगुरुजींनी वारंवार दाखवलं. आजच्या भाषेत सांगायचं तर ‘आऊट ऑफ बॉक्स’ ‘इनोव्हेटिव्ह’ थिंकिंग करण्याची प्रचंड उर्जा सानेगुरुजींकडे होती. अशा प्रकारच्या चिंतनातून निर्माण होणारे प्रश्न विचारण्याची निर्भयताही त्यांच्याकडे होती. असे अडचणीचे प्रश्न विचारणारे सानेगुरुजी आणि त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न त्यांच्या समकालीनांना भाबडे वाटले. सानेगुरुजींना राजकारणातलं काही कळत नाही असं त्यांनी ठरवलं आणि सानेगुरुजींनीही ते मान्य केलं. त्यांच्या आयुष्याच्या शेवटी शेवटी त्यांनी लिहिलेल्या पत्रात ‘पॉलिसी, थिअरी, लाईन काय आहे माझ्याकडे?’ हा विषादाचा स्वर सातत्याने उमटताना दिसतो. यातला दुःखाचा भाग असा की आजही आपल्याला सानेगुरुजींचे मूल्यमापन करताना आपण स्वीकारलेल्या चौकटीला तपासून पहावंसं वाटत नाही. आपली विचारांची चौकट, आपली राजकीय विचारधारा, आपल्याला समजलेलं सत्य परिपूर्ण आहे यावर आपल्या सर्वांचा आत्यंतिक आणि ठाम विश्वास आहे. त्यामुळे सानेगुरुजींच्या नेणीवेत आपल्याला ब्राह्मण्य दिसतं, त्यांच्या धर्मविषयक जाणिवांत आपल्याला छुपं हिंदुत्व दिसतात. सत्यापेक्षा विचारप्रणालीशी प्रामाणिक रहाण्याचा आपला अट्टाहास एवढा आहे की सानेगुरुजी किंवा त्यांच्यासारख्या ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करणाऱ्या व्यक्तीचे मुद्दे गांभीर्याने घेण्यापेक्षा ‘तिचे वैचारिक गोंधळ आहेत’ असा निवाडा करणं आपल्याला अधिक प्रशस्त वाटतं. अशा प्रकारची शेरेबाजी न करता आणि त्याचवेळी स्वतःच्या भावना दुखावून न घेता चिकित्सकपणे सानेगुरुजींकडे आणि खरंतर आपल्या सगळ्याच भूतकाळाकडे बघण्याची गरज आहे.

सानेगुरुजी आपल्याला आज नव्याने समजून घ्यायला हवेत कारण आपण आपल्याला स्वतःलाच नव्यानं समजून घेण्याची गरज आहे. आपण कोण आहोत? आपला वारसा महान आहे म्हणून आपण आपोआप महान आहोत का? आपण महाव असूनही ‘कोणीही यावं आणि टपली मारून जावं’ इतके असहाय्य आहोत किंवा होतो का? आपण साधे सज्जन, सोज्वळ, सहिष्णू आणि म्हणून दुबळे आहोत का? आपण खूप खूप चांगले म्हणून या जगात टिकायला सक्षम नसणाऱ्यांपैकी आहोत का? आपल्यासारखे नसलेले सगळे आपले शत्रू आहेत का? स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या शत्रूंसारखंच बनणं भाग आहे का? सानेगुरुजींकडे या सर्व प्रश्नांची उत्तरे नाहीत पण हे प्रश्न विचारणे किती आवश्यक आहे याची एक अत्यंत खोल जाण आहे आणि उत्तरे शोधण्याची प्रामाणिक आस मात्र निश्चित आहे. सानेगुरुजींचे नव्याने वाचन करून आपल्याला आपल्याबद्दल कदाचित काही नव्यानं उमगेल.

डॉ. चैत्रा रेडकर, गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांच्या अभ्यासक असून, ‘आयसर’ पुणे येथे मानव्य व सामाजिक शास्त्रांच्या सहयोगी प्राध्यापिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0