फॅरनहाईट ४५१ : अतियांत्रिकतेच्या आहारी गेलेल्या जगाचे भयावह चित्र

फॅरनहाईट ४५१ : अतियांत्रिकतेच्या आहारी गेलेल्या जगाचे भयावह चित्र

टेलिव्हिजन सेट, समाज माध्यमं आणि अति-तंत्रज्ञानाच्या आहारी जात असलेला समाज वास्तव जगापासून कसा तुटत चालला आहे. पुस्तक आणि वाचनसंस्कृतीवर इलेक्ट्रॉनिक मीडियाने पुरते आक्रमण केले आहे. यंत्रवत बनलेल्या जगाची भयावहता रे ब्रेडबेरी यांनी फॅरनहाईट (‘Fahrenheit 451’) या कादंबरीत मांडली आहे.

इन्शाअल्लाह
वाचनसंस्कृती आणि आपण सारे
राज्यघटनेच्या निर्मितीची व्यापक चर्चा

भविष्यकालीन अमेरिका. असं भविष्य जिथे अतिप्रगत तंत्रज्ञानाने मानवी जीवनावर अतिक्रमण केले आहे. इतकं की, पाळीव प्राणी सुद्धा धातूंचे बनवलेले आणि इंधनावर जगणारे आहेत. लोक एअरबसमधून प्रवास करतात. सुखोपभोगांची अद्ययावत साधने हाताशी आहेत आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि त्यांचा गोंगाट ही संस्कृती बनली आहे. लोक सुखी आहेत आणि ते तसे राहावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लोकांना दुःखी करणाऱ्या साऱ्या गोष्टींचा समूळ नायनाट करण्याचं काम सरकार प्रामुख्याने करत आहे. समूहापेक्षा निराळं वर्तन करणाऱ्या व्यक्तींना आणि कुटुंबांना सरकार ताब्यात घेत आहे. कदाचित मारूनही टाकत आहे. मुख्य म्हणजे, लोकांच्या दुःखाला कारण ठरणारी पुस्तक नष्ट केली जात आहेत. ग्रंथालयं आगीत भस्मसात करून टाकली जात आहेत. या नव्या जगात पुस्तकांना काहीच स्थान नाहीये. कारण पुस्तकं माणसाला भ्रमिष्ट करतात. अशक्यप्राय आणि धादांत खोट्या घटना कथा-कादंबऱ्यांतून लिहिली जातात. इतिहासातील आणि समकालीन जगातील अटळ दुःखाची वाचकांना आठवण करून देत त्यांच्या सुखाला गालबोट लावतात. आणि महत्त्वाचं म्हणजे पुस्तक वाचणाऱ्या मनुष्याला अनेक अस्तित्ववाचक प्रश्न उभे करायला बाध्य करतात. पुस्तकं असंबद्ध आहेत. माणसाच्या सुखी जीवनात अडसर निर्माण करतात. जनतेला त्यांच्यापासून वाचविण्याचा एकच मार्ग आहे. पुस्तकं नष्ट करणं आणि विलक्षण कार्यकुशलतेने ती नष्ट केली जात आहेत. सगळी ग्रंथालयं नष्ट केली आहेत. नव्या पुस्तकांच्या प्रकाशनावर कायद्याने बंदी घातली आहे. कुणाही व्यक्तीच्या घरात एक जरी पुस्तक आढळलं तरी ते नष्ट तात्काळ नष्ट केलं जात आहे. प्रसंगी ज्या घरात पुस्तकं सापडली ती घरेच आगीत जाळून टाकली जात आहेत. त्यासाठी फायर ब्रिगेड कार्यरत आहे. या नव्या जगात फायर ब्रिगेड आग विझविण्याचं काम करत नाही तर पुस्तकांना आग लावण्याचं काम करते. आग विझविण्याची गरज उरलेली आहे. कारण प्रगत तंत्रज्ञानाने अमेरिकेतील साऱ्या वास्तू फायरप्रूफ आहेत.

पुस्तकं जाळण्यासाठी गाय मोंटॅगसारखे फायरमन सरकारने नियुक्त केले आहेत. त्यांना पुस्तकं जळताना पाहून विलक्षण आनंद होतोय. जळणारं पुस्तक पाहून मोंटॅगला फुलपाखराची आठवण होत्येय. रॉकेलचा वास त्याला अत्तरासारखा वाटतो.

मोंटॅगची पत्नी मिल्ड्रेडसुद्धा इतर लोकांसारखेच इलेक्ट्रॉनिक मीडियाची शिकार बनली आहे. मिल्ड्रेड दिवसभर तिच्या खोलीतल्या भिंतीवर बसवलेल्या भव्य स्क्रीनवर मालिका पाहत राहते. या मालिकेलाच ती आपलं कुटुंब मानते. या मालिकांत फारसे कथानक, नाट्य नाही पण मिल्ड्रेड क्षणभरही त्याशिवाय राहू शकत नाही. झोप येण्यासाठी तिला झोपेच्या गोळ्यांची गरज भासते. केवळ मिल्ड्रेडच अशी आहे असे नव्हे मिल्ड्रेड केवळ या जगाचं प्रतिनिधित्व करणारी एक महिला आहे. साऱ्याच स्त्री पुरुषांची स्थिती याहून फारशी भिन्न नाही.

एक दिवस मोंटॅग मिल्ड्रेडला विचारतो, आपण पहिल्यांदा कधी भेटलो होतो? मिल्ड्रेडला आठवत नाही. मोंटॅगलाही आठवत नाही. मोंटॅग त्याची नोकरी कधीपासून करतोय हेही त्याला आठवत नाही. लोकांची स्मृती हळूहळू लयाला जात आहे. केवळ क्षणिक सुख हेच त्यांचे विश्व बनले आहे.

मात्र समाज सुखाची कितीही काळजी करत असाल तरी माणसं सुखी नाहीत हे उघड आहे. माणसं एकमेकांचा खून करत आहेत. आत्महत्येचं प्रमाण भयंकर म्हणावं इतपत वाढलेलं आहे. मिल्ड्रेड एका रात्री झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेते. मोंटॅग डॉक्टरांना बोलावतो. हॉस्पिटलमधून दोन माणसं येऊन तिच्या पोटातलं विष पंपाने बाहेर काढतात. दुसऱ्या दिवशी मिल्ड्रेडला आधल्या रात्रीचं काहीच आठवत नाही. काहीच न झाल्यासारखं ती आनंदाने वावरू लागते.

अशात मोंटॅगला क्लरिस भेटते. त्याच्या शेजारीच ती राहायला आली आहे. क्लरिस एक विलक्षण तरुणी आहे. आजच्या जगात तिला फिट्ट करता येत नाही. जुन्या जगाची, संस्कृतीची एक सहज झाक तिच्या बोलण्यात, वावरण्यात आहे. तिच्याशी बोलणं मोंटॅगला आवडू लागतं. पुस्तकं जाळण्याचं काम तुला आवडतं का? असं ती मोंटॅगला विचारते. आणि कधीकाळी फायर ब्रिगेड आग लावण्याऐवजी आग विझविण्याचं काम करत होते, ते खरंय का असंही विचारते. मोंटॅगला या गोष्टीची कल्पना नसते. आग विझविण्यासाठी माणसं नियुक्त केली असावीत ही कल्पनाच त्याला असंबद्ध वाटते.

एक दिवस क्लरिस अचानक या कुटुंबासह गायब होते. क्लरिसच्या कुटुंबाला पोलीस घेऊन जातात. कदाचित मारून टाकण्यासाठी. कारण ते सारेच विचित्र लोक आहेत. कुटुंबातील सारे सदस्य एकत्र बसून पत्ते खेळत असतात. झुलत्या खुर्चीवर आरामात आणि काहीच न करता बसलेले दिसतात. घरातून मोठमोठ्याने हसण्याचे आवाज येतात. त्यांच्या घरी टेलिव्हिजन सेटही नाही. असं समाजबाह्य वर्तन करणारं कुटुंब समाजासाठी घातक आहे. त्यांना नष्टचं करायला हवं. आणि त्याची अंमलबजावणी केली जाते. क्लरिस मात्र त्यातून आपली सुटका करून घेते आणि एका गुप्त संघाला जॉईन करते. या संघातील लोक जनलोकांपासून दूर अरण्यात राहतात. हे सारे लोक पुस्तकप्रेमी आहेत. पुस्तकं बाळगणे कायद्याने गुन्हा आहे हे त्यांना ठाऊक आहे. आणि पुस्तकं नष्ट होण्यापासून वाचवणं हाच या संघाचा उद्देश आहे. त्यासाठी संघाच्या प्रत्येक सदस्याने एक पुस्तक तोंडपाठ केलेलं आहे. त्या पुस्तकाची ओळख हीच त्यांची ओळख आहे.

क्लरिसच्या भेटीनंतर मात्र मोंटॅगमध्ये विलक्षण बदल होतो. स्वतःच्या भूतकाळाविषयी तो प्रश्न विचारू लागतो. आणि मुख्य म्हणजे पुस्तकं नष्ट करण्याविषयी साशंक होतो. आता पुस्तकं जाळताना एखादं पुस्तक त्याच्या सहकाऱ्याची नजर चुकवून चोरून घरी आणू लागतो.

एक दिवस मात्र एक विलक्षण घटना घडते. एका घरात पुस्तकं ठेवली आहेत असा निरोप फायर ब्रिगेडला मिळतो. फायर ब्रिगेड तात्काळ त्या संशयास्पद घरात पोहचते. त्यांना घरात केवळ काही पुस्तकं गवसत नाहीत तर एक भलं मोठं ग्रंथालय आढळून येतं. ही पुस्तकं स्वतंत्रपणे जाळणं अजिबात शक्य नसल्याने पूर्ण घरालाच आग लावण्याचं ठरवलं जातं. घरात राहणाऱ्या महिलेला बाहेर येण्याची सूचना दिली जाते. मात्र ती महिला त्याला नकार देते. मी माझ्या पुस्तकांसोबत जगले आहे आणि त्यांच्यासोबतच मरेन असं सांगते. त्या महिलेसह संपूर्ण घराला आग लावण्यात येते. मोंटॅग अवाक होऊन गे दृश्य पाहत राहतो. हादरून जातो. आणि विलक्षण भारावलेल्या मनस्थितीत घरी येतो. येताना त्याने घरातून एक पुस्तक चोरून आणलेलं असतं. मिल्ड्रेडला तो सांगतो, “पुस्तकांत नक्कीच काहीतरी विलक्षण असलं पाहिजे. असं काहीतरी ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. आग लावलेल्या घरात पुस्तकांसोबत जळत राहण्यासाठी एका महिलेला प्रवृत्त करणारी पुस्तकं नक्कीच खास असली पाहिजेत.”

या घटनेमुळे मोंटॅग एका निराळ्याच दृष्टीने जगाकडे पाहू लागतो. नात्यातील तुटत चाललेल्या संवादाची त्याला खंत वाटते. अत्याधुनिक यंत्रांच्या स्वाधीन होऊन आपणही जणू यंत्रच बनलो आहोत, कोमल मानवी भावभावना जणू विसरून गेलो आहोत, चेहऱ्यावरचं हसू गायब झालं आहे, आपले फारसे मित्र उरलेले नाहीत, आजूबाजूला केवळ यंत्र आहेत, जीवन कृत्रिम बनलेलं आहे. या कृत्रिम जगाचा त्याला उबग येतो. त्याचं नैराश्य त्याच्या कौटुंबिक जीवनातही उमटू लागतं.

मिल्ड्रेडला मात्र हे सारं अनाकलनीय वाटतं. पुस्तकांसोबत राहण्यात तिला असुरक्षितता वाटते. मोंटॅगला ती सारी पुस्तकं नष्ट करण्यास सांगते. आणि त्याचा नकार ऐकून स्वतःच फायर ब्रिगेडला मोंटॅगच्या घरी पुस्तकं असल्याची माहिती देते.

फायर ब्रिगेडची गाडी मोंटॅगसह त्याच्या घरी दाखल होते. मोंटॅगचा बॉस मोंटॅगलाच त्याच्या पुस्तकांना आग लावायला सांगतो. उद्विग्न झालेला मोंटॅग बॉसलाच जाळून टाकतो. आणि पळून जातो. मीडिया मोंटॅगच्या मागावर येते आणि पोलीस मोंटॅग समजून दुसऱ्याच माणसाला मारून टाकतात. मोंटॅग मेला असल्याची न्यूज नागरिकांना समजते.

दरम्यान मोंटॅग क्लरिसच्या संघात जाऊन सामील होतो. तेथील साऱ्या सदस्यांसारखे स्वतःही एक पुस्तक पाठ करू लागतो. यानंतर मोंटॅग म्हणून त्याची ओळख संपलेली असते. तो पाठ करत असलेलं पुस्तक हीच त्याची ओळख बनते.

वरवर पाहता भविष्यातील अमेरिकेत घडणारी ही विज्ञानकादंबरी आहे. पण तिचा संबंध आजच्या काळाशीही आहे. टेलिव्हिजन सेट, समाज माध्यमं आणि अति-तंत्रज्ञानाच्या आहारी जात असलेला समाज वास्तव जगापासून कसा तुटत चालला आहे. पुस्तक आणि वाचनसंस्कृतीवर इलेक्ट्रॉनिक मीडियाने पुरते आक्रमण केले आहे. यंत्रवत बनलेल्या जगाची भयावहता रे ब्रेडबेरी यांनी या कादंबरीत मांडली आहे. या कादंबरीला अर्थाचे अनेक पदर आहेत. पुस्तकांवर येऊ पाहणाऱ्या सेन्सॉरशिपवर ही कादंबरी अस्पष्ट पण जोरदार भाष्य करते. त्यामुळेच सात दशके पुरी होत आली तरी कादंबरीचा ताजेपणा अजिबात उणावलेला नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0