नवी दिल्लीः सिंधु सीमेवर ‘गोदी मीडिया, गो बॅक’, ‘गोदी मीडिया नॉट अलाऊड’, असे फलक शेतकर्यांच्या हातात दिसतात. एखाद्या पत्रकाराने कुणा शेतकर्याची मुलाखत
नवी दिल्लीः सिंधु सीमेवर ‘गोदी मीडिया, गो बॅक’, ‘गोदी मीडिया नॉट अलाऊड’, असे फलक शेतकर्यांच्या हातात दिसतात. एखाद्या पत्रकाराने कुणा शेतकर्याची मुलाखत किंवा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केल्यास लगेच थेटपणे पत्रकाराला विचारले जाते, तुम्ही गोदी मीडियाचे तर नाहीत ना?
‘गोदी मीडिया’ हा शब्द रुढ झाला तो प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांच्याकडून. नरेंद्र मोदी सरकारच्या कोणत्याही निर्णयाची चिकित्सा न करता सतत त्याचे समर्थन करणार्या न्यूज चॅनेल, वर्तमानपत्राला उद्देशून रवीश कुमार यांनी ही शब्द रुढ केला आणि तो लोकप्रिय झाला.
काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओत शेतकरी संघटनाचे कार्यकर्ते मुख्य प्रवाहातील एका न्यूज चॅनेल्सशी बोलताना तयार झाले होते. बोलताना त्यांनी त्या चॅनेलला ‘गोदी मीडिया’ असे संबोधत आपली बाजू मांडली. नंतर त्यांनी त्या चॅनेलच्या वार्ताहराला एक कप चहाही दिला.
शेतकर्यांच्या संताप हा सर्वच वृत्तसंस्थांच्या विरोधात नाही. पण ‘आज तक’, ‘झी न्यूज’ व ‘रिपब्लिक टीव्ही’ या चॅनेलना ते कॅमेर्यासमोर ‘गोदी मीडिया’ असे संबोधतात. आमच्या मागण्या, आमचे हक्क व अधिकार, आमची बाजू ही न्यूज चॅनेल जनतेपर्यंत पोहचवत नाहीत, असे या आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
‘द वायर’ला एका आंदोलकाने सांगितले, ‘या न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी काही वृद्ध शेतकर्यांना गाठतात आणि त्यांना नव्या शेती कायद्यातील काही ठराविक प्रश्न विचारून या शेतकर्यांना या शेती कायद्यातले काहीच कळत नाही असे दर्शवतात. ते आमच्या चळवळीला खलिस्तानी म्हणूनही हिणवतात.’
न्यूज अँकरमुळे आम्हाला लोकांचा राग सहन करावा लागतो
एका मुख्य प्रवाहातील न्यूज चॅनेलचा वार्ताहर शकीर (नाव बदलले आहे) याचे म्हणणे आहे की, ‘मी शेतकर्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला गेलो की मला त्यांचा संताप सहन करावा लागतो. त्याचे कारण की स्टुडिओत बसलेले अँकर शेतकरी आंदोलनाच्या विरोधात मते व्यक्त करत असल्याने हीच त्या चॅनेलमध्ये काम करणार्या सर्वांची भूमिका आहे, असा समज लोकांचा होता. त्याचा सामना प्रत्यक्ष काम करणार्या आमच्यासारख्या पत्रकारांना होतो. २०१४ नंतर अनेक न्यूज चॅनेल, ज्यात माझे चॅनेल आहे, यांनी सरकारच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि सरकारविरोधी पत्रकारिता संपुष्टात आली. याचा फटका रस्त्यावर प्रत्यक्ष काम करणार्या आमच्यासारख्या पत्रकारांना बसतो. आमच्या भूमिका स्टुडिओतल्या अँकरपेक्षा भिन्न व विरोधी असतात ते सांगण्याची संधी आम्हाला अशा अँकरमुळे मिळत नाही. स्टुडिओत किंचाळणार्या अँकरचे भविष्य सुरक्षित असते, त्यांच्याकडे मुबलक पैसा असतो, त्यांना चिंता नसते पण आमच्यासारख्या ग्राउंड काम करणार्या पत्रकारांना यांच्यामुळे त्रास होतो, आमचे भविष्य त्यांच्या इतके सुरक्षित नाही.’
जेएनयूतील विद्यार्थी आंदोलन व सीएएसंदर्भातील आंदोलनाचे वृत्तांकन करताना शकीरला फटका बसला होता.
न्यूज चॅनेल्स जनतेविरोधी व सरकारधार्जिणी असल्यास लोक अशा चॅनेल्सवर प्रतिक्रिया देण्यास तयार नसतात. अशा आंदोलकांना कॅमेर्यासमोर बोलण्यास बरेच प्रयत्न करावे लागतात. न्यूज चॅनेलच्या प्राइम टाइम डिबेटमध्ये जे काही घडतं त्याचे आम्ही समर्थन करत नाही, असे लोकांना समजावे लागते, असे शकीर सांगतो. आताच्या शेतकरी आंदोलनात काही आंदोलकांनी माझे व्हीडिओ माझ्या संमतीविना काढून ते सोशल मीडियाद्वारे पसरवले आहेत, व या पत्रकाराशी कोणी बोलू नये, वा त्याला प्रतिक्रिया देऊ नये असे अन्य आंदोलकांना सांगितले आहे.
शकीरच्या जीवाला अद्याप धोका पोहचलेला नाही पण वार्तांकन करताना त्याला पोलिस किंवा जवानांच्या जवळ राहून लोकांशी बोलावे लागते.
सीएए विरोधी आंदोलनात शकीरला स्वतःचे आयकार्ड व न्यूज चॅनेलचा लोगो काढून वार्तांकन करावे लागले होते.
अन्य एका न्यूज चॅनेलची प्रतिनिधी मीरा (नाव बदलले आहे) सांगते, सीएए व आताचे शेतकरी आंदोलनाचे वृत्तांकन करताना मला अनेक आंदोलकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. कारण माझे चॅनेल हिंदी असून ते शेतकरी आंदोलनाच्या विरोधात प्राइम टाइमचे कार्यक्रम करत असते. सीएए आंदोलनात लोकांमध्ये आमच्या चॅनेलविषयी खदखद होती पण आता शेतकरी आंदोलनात लोकांचा संताप थेट कळून येतो.
मीरा सांगते, आमच्या चॅनेलमधील अँकर हे पूर्णपणे उजव्या विचारसरणीचे समर्थन करणारे असून त्यांच्या भूमिका या प्रत्यक्ष रस्त्यावर वृत्तांकन करणार्या वार्ताहराच्याही असतात असे लोकांना वाटते. लोकांचा संताप अँकरपर्यंत पोहचू शकत नाही, तो राग आमच्यावर काढला जातो. मला या शेतकरी आंदोलनात अनेक आंदोलकांकडून तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया झेलाव्या लागल्या आहेत, आंदोलक माझ्या चॅनेलच्या कॅमेर्यावर प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. पण काही प्रादेशिक व स्थानिक चॅनेलबाबत तसे वातावरण नाही, सामान्य माणसाला अशा चॅनेलविषयी अजूनही विश्वास वाटतो आहे.
महत्त्वाचा घटक, कॅमेरा
विशाल गेली २० वर्षे कॅमेरामन म्हणून एका बड्या न्यूज चॅनेलमध्ये काम करत आहे. तो म्हणतो, आमच्या चॅनेलच्या विरोधात लोकांचा संताप दिसतो तेव्हा मला कॅमेरा व अन्य महागड्या वस्तू सांभाळाव्या लागतात. न्यूज चॅनेलना लागणारे वृत्तांकन कॅमेर्याशिवाय अशक्य आहे, कॅमेर्यात चित्रित होणारी दृश्ये ही बातमी असते. आम्हा कॅमेरामनचा न्यूज चॅनेलकडून चाललेल्या प्रचाराशी काही संबंध नसतो, पण आम्हाला लोकांच्या संतापाचा सामना मात्र करावा लागतो.
मूळ लेख
COMMENTS