रामलीला मैदानावरच आंदोलन, शेतकऱ्यांचा निर्धार

रामलीला मैदानावरच आंदोलन, शेतकऱ्यांचा निर्धार

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या शेती कायद्यांना विरोध करणाऱ्या देशातल्या सर्व शेतकरी संघटनांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सादर केलेला एक प्रस्ताव बहुमताने फेटाळला. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार शेतकऱ्यांनी हरयाणा-पंजाब सीमेवर थंडीत न थांबता बुराडी येथील निरंकारी मैदानावर एकत्र जमावे व त्यांच्यासोबत ३ डिसेंबरला चर्चा करण्यात येईल, असा प्रस्तावाचा व्हीडिओ अमित शहा यांनी आंदोलकांपुढे ठेवला. हा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी फेटाळला. बुराडी हे आंदोलनाचे केंद्र होऊच शकत नाही, आम्ही अगोदर रामलीला मैदान निश्चित केले होते, व हेच मैदान आंदोलनाचे मुख्य स्थान होते, असे प्रत्युत्तर पंजाब किसान युनियनचे अध्यक्ष रुल्दू सिंह यांनी दिले.

त्याच बरोबर भारतीय शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनीही निरंकारी मैदानावर आम्ही जाणार नाही, रामलीला येथेच निदर्शने केली जातील. आमचे आंदोलन गेले तीन महिने सुरू आहे. आमच्या मागण्या सरकारने लक्षात घेतल्या नाहीत. ते सतत दुर्लक्ष करत होते, असा आरोप केला.

दरम्यान, हजारोच्या संख्येने शेतकरी आपले ट्रॅक्टर, ट्राल्यांसह सिंधु बॉर्डरपाशी जमा झाले असून काही हजारो शेतकरी बुराडी मैदानात पोहचले आहेत. पण बहुसंख्य शेतकर्यांना बुराडी मैदानात जायचे नाही, त्यांचे मार्ग पोलिसांनी रोखल्याने प्रचंड कोंडी झाली आहे.

रविवारी शेतकर्यांचे आंदोलन तीव्र झालेले पाहून हरियाणा व पंजाबचे राजकारण घुसळून निघाले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांच्याकडून शेतकर्यांच्या आंदोलनाला हवा दिली जात असल्याचा आरोप केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमरिंदर यांनी खट्टर यांचा फोन आपण उचलणार नाही अशी घोषणा केली आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टीने शेतकर्यांचे आंदोलन हे पंजाब सरकार व भाजपने मिळून उभे केल्याचा आरोप केला आहे.

COMMENTS