निवडणूक पालिकेची, प्रचारात राष्ट्रीय नेते!

निवडणूक पालिकेची, प्रचारात राष्ट्रीय नेते!

हैद्राबादच्या स्थानिक निवडणुकीत निवडणुकीत चक्क गुपकार टोळी, कलम ३७० काश्मीर, दहशतवादी कारवाया आणि पाकिस्तान, त्यातून प्रखर राष्ट्रवाद, हे असले मुद्दे मोठ्या जोशात मांडले जाऊ लागले आहेत.

३७० कलम रद्द केल्याचे अंतिम साध्य काय?
काश्मीर : जनतेला भ्रमित करणारा प्रचार सुरूच !
‘गोली मारो..’ म्हणणाऱ्या ३ भाजप कार्यकर्त्यांना अटक

भाजप हा विस्तारवादी पक्ष असल्याने तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे सातत्याने प्रचारात स्वमग्न राहण्यात आनंद मानणारे असल्याने केवळ ७५ लाखाच्या आसपास असलेल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीत सर्वच राष्ट्रीय नेते हिरीरीने उतरले आहेत.

मुळातच कोणत्याही महापालिका अथवा नगरपालिकेची निवडणूक ही तेथील स्थानीय प्रश्नावर आणि गट-तट आघाडी यावर अवलंबून असते. त्यामुळे बहुतेक वेळा कोणताही पक्षीय झेंडा बाजूला ठेवून तेथे स्थानिक आघाडी होते. त्यामध्ये परस्पर विरोधी पक्षाच्या लोकांचे मिलन सुद्धा होते. पण याला हैद्राबाद अपवाद ठरला आहे. या निवडणुकीत चक्क गुपकार टोळी, कलम ३७० काश्मीर, दहशतवादी कारवाया आणि पाकिस्तान, त्यातून प्रखर राष्ट्रवाद, हे असले मुद्दे मोठ्या जोशात मांडले जाऊ लागले आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहणारे योगी आदित्यनाथ यांचा नूरच काही और होता. हिंदू आणि केवळ हिंदुत्व याचाच गजर योगी यांनी शहरातील सर्वच भागातील अगदी गल्ली बोळात झालेल्या सभांमधून केला. त्यामुळेच जवळपास सर्वच ठिकाणी जसे पंतप्रधान मोदी यांच्यासमोर मोदी. मोदी.. चा जयघोष होतो तसा हैद्राबादेत योगी.. योगी..चा जयघोष अखंड सुरू होता. त्यामुळे २०२४ नंतर योगी हे पंतप्रधान होण्यास किती उत्सुक आहेत याची झलक पाहावयास मिळत होती. आपली लोकप्रियता वाढविण्यासाठी योगी हे ज्या प्रकारे पावले टाकत आहेत ते पाहता योगी.. योगी चा नारा बरच काही सांगून जातो.

या निवडणुकीत भाजपने राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील सर्वच दिगग्ज रणांगणात उतरवले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी .नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, खासदार तेजस्वी सूर्या, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नेते प्रचारात सक्रिय झाले आहेत. तर दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी हेही प्रचार सभा घेणार आहेत.

या निवडणुकीत एक मोठी गोष्ट म्हणजे ज्या एमआयएम पक्षाला नेहमीच भाजपची बी टीम म्हणून अप्रत्यक्ष पाहिले जाते त्याच पक्षाच्या ओवेसी यांच्यावर भाजप नेते प्रचारात तुटून पडले आहेत. याचा सरळसरळ अर्थ असा की सामना फिक्स आधीच करून योग्य ती स्क्रिप्ट लिहिली आहे. कारण ओवेसी यांच्यावर टीका करून भाजप एकाचवेळी मतांचे ध्रुवीकरण आणि आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी आपला जम बसविण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अर्थातच या स्क्रिपटेड नाट्यात सर्वच सामील आहेत.

आगामी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी हैद्राबाद महापालिका निवडणुकीच्या रणांगणात सोयीची स्क्रिप्ट लिहिण्याचा भाजपचा हा प्रयत्न किती यशस्वी होतो ते लवकरच समजेल.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0