शेती कायद्याला विरोध; पोलिस उपमहानिरीक्षकांचा राजीनामा

शेती कायद्याला विरोध; पोलिस उपमहानिरीक्षकांचा राजीनामा

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या वादग्रस्त तीन शेती कायद्यांना विरोध व शेतकर्यांना पाठिंबा जाहीर करत पंजाब पोलिस उपमहानिरीक्षक (तुरुंग) लक्षमिंदर सिंह जाखड यांनी शनिवारी आपला पोलिस दलाचा राजीनामा दिला. मी शेतकर्याचा मुलगा पहिला असून नंतर पोलिस अधिकारी आहे. आज मला जे पद मिळाले आहे त्यामागे माझ्या व़डिलांनी शेतात केलेल्या श्रमाचे मोल आहे. शेतीसाठी मी सर्व काही सोडायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया जाखड यांनी दिली आहे.

१९८९-९४ या काळात जाखड शॉर्ट सर्विस कमिशनतंर्गत पंजाब रेजिमेंटमध्ये कार्यरत होते नंतर ते पंजाब पोलिसांमध्ये भरती झाले. त्यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणात निलंबनाची कारवाई झाली होती. पण दोन महिन्यानंतर त्यांना परत पदावर नियुक्त करण्यात आले होते.

राजीनाम्याबाबत जाखड म्हणाले, की त्यांची आई ८१ वर्षांची असून ती शेती करत आहे. तिने मला दिल्लीच्या रस्त्यांवर उतरलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाबाबत तुला काय वाटते असा प्रश्न विचारला. त्यावेळी आईच्या डोळ्यातले मी भाव ओळखू शकलो. तिने मला राजीनामा देण्यास प्रोत्साहित केले व शेतकर्यांसोबतच्या आंदोलनात सामील होण्यास सांगितले. म्हणून मी राजीनाम्याच्या निर्णयापर्यंत आलो.

गेल्या सप्टेंबर महिन्यात जाख़ड यांनी आपल्या शेतामध्ये हातात फलक घेऊन आपण शेतकर्याचा मुलगा असून आपले आंदोलनाला समर्थन असल्याची घोषणा केली होती.

मूळ बातमी

COMMENTS