शेतकऱ्यांचा आवाजः ‘ट्रॉली टाइम्स’

शेतकऱ्यांचा आवाजः ‘ट्रॉली टाइम्स’

अवघ्या २९ वर्षाची असलेली नवकिरण ‘ट्रॉली टाइम्स’च्या निर्मितीची जनक आहे. मोदी सरकारने वादग्रस्त तीन शेती कायदे मागे घ्यावेत म्हणून दिल्लीच्या वेशीवर गेली ४५ दिवस ठाण मांडून बसलेल्या शेतकर्यांच्या वेदनेचा आवाज ती जनता व सरकारपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.

एखाद्या वृत्तपत्राच्या पानांची जुळणी कधी ट्रॅक्टर ट्रॉलीमधून झाल्याचे वृत्तपत्र इतिहासात बहुदा झालेले नाही. ट्रॉलीत बसून बातम्यांचे संपादन, पानांची रचना करणे आणि मग त्यातून एक वृत्तपत्र तयार करणे सगळच अजब. पण २०२०च्या वर्षात हा अनोखा प्रकार घडून आला आणि त्याला निमित्त झाले आहे ते शेतकरी आंदोलनाचे.
नवी दिल्लीच्या टिकरी सीमेवर ही एक वेगळी वृत्तपत्र क्रांती उदयास आली. तो दिवस होता १८ डिसेंबर २०२०. एका ट्रॉलीमधून छपाई होऊन आलेला हा चार पानांचा अनोखा पेपर.

दंतवैद्यक शिक्षण घेऊन नंतर असलेली नवकिरण सिंह हिने माध्यमातून पदव्युत्तर पदवी घेतली. हीच नवकिरण या ‘ट्रॉली टाइम्स’च्या निर्मितीची जनक आहे. अवघ्या २९ वर्षाची असलेली नवकिरण ही या अनोख्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जगासमोर आली आहे. तिच्या सोबत दोन छायाचित्रकार, एक संगणक तज्ज्ञ, तसेच बातमी लिहिण्यासाठी दोघे अशी पाच जणांची टीम आहे. आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणाऱ्या या चार पानाच्या वृत्तपत्राला ‘ट्रॉली टाइम्स’ हे नाव का देण्यात आले याबद्दल बोलताना नवकिरण हिने सांगितले की, कोणतेही न्याय आंदोलन ही क्रांती असते. या क्रांतीमधूनच मग परिवर्तन आणि विकासाची बीजे रोवली जातात. नवीन कृषी कायदे हे देशातील शेती आणि शेतकरी यांना संपूर्णपणे संपविणे ही व्यवस्था आहे. शेतकऱ्यांना पुन्हा गुलामगिरीमध्ये घेऊन जाणाऱ्या या काळ्या कायद्याला संपूर्ण मूठमाती देणे गरजेचे आहे. एक युवा आणि शेतकरी कुटुंबातील प्रतिनिधी म्हणूनच मी या क्रांतीमध्ये सहभागी झाले आहे असे स्पष्ट करून नवकिरण म्हणाली की माझे आई-वडील सुद्धा यात सहभागी झाले आहेत.

ज्यावेळी आंदोलन सुरू झाले त्यानंतर काही दिवसांनी एक ठराविक मीडिया या ठिकाणी येऊन आमच्या बाबतीत चुकीचे चित्रण अथवा बातमी करून समाजात आणि देशात वेगळे चित्र निर्माण करत होता, असे काहीसे संतापून नवकिरण म्हणाली की, हो आम्ही त्यांना गोदी मीडिया म्हणतो. त्यावेळी ठरवले की आंदोलन स्थळी नेमके काय होते याची खरी माहिती जनतेला आणि सहभागी आंदोलनकर्त्यांना व्हावी म्हणून एक वृत्तपत्र सुरू करावे. आणि त्या दृष्टीने तयारी सुरू केली. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसूनच बातम्या लिहिणे, त्याचे संपादन करणे, पाने लावणे सुरू केले आणि त्यातूनच मग ‘ट्रॉली टाइम्स’ या नावाचा उदय झाला.

१८ डिसेंबर रोजी पहिला अंक या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक आंदोलनातून बाहेर आला. दोन हजार प्रती त्यावेळी काढण्यात आल्या. सिंघू आणि टिकरी सीमेवर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हे अंक देण्यात आले आणि त्याला न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळाला असे नवकिरणने सांगितले. त्यानंतर २३ डिसेंबर रोजी ५ हजार प्रती छापण्यात आल्या. आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून निघालेले हे जगातील पहिले वृत्तपत्र ‘ट्रॉली टाइम्स’ भारतासह जगभरात पोहचले.

हे वृत्तपत्र दर आठवड्याला प्रकाशित होत असून ते गुरुमुखी आणि हिंदी या दोन भाषेत काढण्यात येत आहे. या आंदोलनामुळे आयुष्यात नवीन अनुभव मिळाल्याचे नवकिरण म्हणाली. वृत्तपत्र ४ पानांचे असून पहिल्या पानावर त्या आठवड्यात झालेल्या आणि प्रस्तावित आंदोलनाची विस्तृत माहिती देण्यात येते. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या पानावर काही वेगळ्या घडामोडी आणि घटना ज्यामुळे आंदोलनकर्त्यांना बळ मिळेल असे देण्यात येते. या वृत्तपत्राचे चौथे पान हे संपूर्णपणे आंदोलनात सहभागी झालेल्या लहान थोर ते अगदी वृद्ध यांनी लिहिलेल्या कविता, काढलेली चित्र यासाठी असते. ४ पानांची ही रचना पाहिली तर असे लक्षात येते की या वृत्तपत्रात आंदोलन तसेच आंदोलन करणारे शेतकरी यांचा पूर्णपणे सहभाग करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे नवकिरण हिचा भाऊ अजय हा सुद्धा या वृत्तपत्रासाठी विविध फोटो सिंघू तसेच टिकरी सीमेवर जाऊन काढतो. तसेच तेथील शेतकऱ्यांशी बोलून काही वेगळ्या बातम्या करतो.

काही ठराविक मीडिया आमच्या आंदोलनाची ठरवून बदनामी करत होते त्याला अटकाव करण्यासाठी ‘ट्रॉली टाइम्स’ उदयास आला असे अजय याने सांगितले. पहिला अंक इंग्रजीमधून निघाला पण त्यानंतर सर्व अंक हे हिंदी आणि गुरुमुखी भाषेतून काढण्यात येत आहेत. देश विदेशातून सुमारे पाच हजाराहून अधिक इ मेल आम्हास आल्या आहेत. दर आठवड्याला प्रकाशित होणारा अंक हा आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली असल्याने कोणाच्याही मनात शंका राहत नाही. या अंकात स्वतः लिहिलेली कविता अथवा स्लोगन किंवा अनुभव वाचून कडाक्याच्या थंडीत सुद्धा शेतकरी मनोमन सुखावतो. काही घोषणा तसेच नवीन संकल्पना या माध्यमातून सुचतात आणि त्याला या वृत्तपत्रात योग्य जागा देण्यात येते.

ज्याने कधीही घरातील स्वयंपाक घरात प्रवेश करून एकही पदार्थ केलेला नसतो असा एखादा शेतकरी येथे मात्र दररोज रोटी आणि भाजी बनविण्याचे काम करतो. त्याला मिळालेला हा अनोखा अनुभव त्याच्याच शब्दात या अंकात प्रसिद्ध करण्यात येत असल्याने एक वेगळा हुरूप आणि सकारात्मक वातावरण तयार होते. मी कधीही रोटी केली नव्हती पण इथे दररोज रोटी करायला शिकलो आणि त्याची माहिती ‘ट्रॉली टाइम्स’मध्ये आली. यामुळे पत्नी खूप खूश झाल्याचे या आंदोलनात सहभागी झालेला मनजीत सिंह सांगतो. तर आम्ही सुद्धा लेख किंवा बातमी लिहू शकतो असे सुखविंदर अभिमानाने सांगतो. ही एक ऐतिहासिक क्रांती आहे आणि ‘ट्रॉली टाइम्स’ हा या क्रांतीचा एक अविभाज्य भाग असून येथील प्रत्येक जण आज पत्रकार झाला आहे . आमच्या बाबतीत काही खोट्या बातम्या लोकांच्यात प्रसारित करण्याचे काम सुरू होते त्याला या वृत्तपत्राच्या माध्यमातून चोख उत्तर देण्यात येत आहे. प्रत्येक आठवड्यात कधी एकदा हा अंक हातात पडतो, असे होते असेही मनजीत म्हणाला.

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून निघणारा हा आगळावेगळा आणि नाविन्यपूर्ण ‘ट्रॉली टाइम्स’ दर आठवड्याला प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आणि नसानसात चेतना जागवून आणखी खंबीरपणे आणि न डगमगता ही ऐतिहासिक क्रांती अखंड ठेवण्यासाठी पथदर्शक ठरत आहे.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS