लढवय्यी लोव्हलिना बोर्गोहेन

लढवय्यी लोव्हलिना बोर्गोहेन

आसामच्या बारमुखिया या एका छोट्याशा खेडेगावातून- ज्या गावात आजही रस्ताही नाही अशा गावातून- आलेल्या मुलीने अल्पावधीत ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालावी हे खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल.

आसाम, मणिपूर, हिमाचल अशा डोंगराळ, दुर्गम भागातूनच काटक क्रीडापटू पुढे येत आहेत. बॉक्सिंग सारख्या खेळात, मणिपूरच्या मेरी कोमने नाव कमाविले. तिच्याच इम्फाळमधून वेटलिफ्टिंग या खेळात यंदा भारताला रौप्यपक मिळवून देणारी मिराबाई चानू आली. त्या पूर्वीही कुंजूरानी देवीसारखी वेटलिफ्टर निर्माण झाली. याच लढवय्या, झुंजार आणि जिद्दी वृत्तीतून लोव्हलिना बोर्गोहेन ही मुष्ठीयुद्धातील भारताची नवोदित रणरागिणी पुढे आली. विश्वविजेत्या तुर्कीच्या बुसेनाझ सुरमेनेलीने भारताच्या या उत्साहमूर्तीचा प्रवास बुधवारी उपांत्य फेरीतच संपविला. परंतु लोव्हलिना बोर्गोहेन या नवोदित महिला बॉक्सरने भारताला पहिल्याच प्रयत्नात ऑलिम्पिक कांस्य पदक मिळवून दिले.

खरं तर लोव्हलिनाचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास बेडर, बिनधास्त आणि तडाखेबाज असा होता. उपांत्य फेरीत मात्र ती विश्वविजेतेपणाच्या दडपणाखाली खेळली. बुसेनाझसमोर ती पहिल्याच फेरीपासून दडपणाखाली खेळत होती. उपांत्य फेरी गाठतानाचे आक्रमक फटके तिने जवळ जवळ म्यान केल्यासारखे होते. त्यामुळे बुसेनाझ तिच्यापेक्षा उंचीने कमी असूनही तिला भारी पडली. खरं तर उंचपुऱ्या लोव्हलिनाचे हात बुसेनाझपेक्षा लांब होते. तिला थोपविणे लोव्हलिनाला सहन शक्य होते.

लोव्हलिनाचा खेळ खरं तर आक्रमक आहे. उपांत्य फेरीत तिने सर्वच फटके म्यान केल्यासारखे वाटले; आणि जेव्हा जेव्हा तिने अर्धवट प्रयत्न केले आणि आक्रमणाचा प्रयत्न केला, तेव्हा तिने मार खाल्ला. बुसेनाझने तिचे फटके चुकविले आणि पूर्ण चेहरा उघडा पडलेल्या लोव्हलिनाच्या नाकावर, चेहऱ्यावर ठोसे लगावले. पहिल्याच गेममधील या हल्ल्यानंतर लोव्हलिनाने गमाविलेला आत्मविश्वास संपूर्ण सामन्यात परत आला नाही. नंतरचे दोन राऊंड तर ती अधिकच वाईट पद्धतीने खेळली.

भारताचे सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचे स्वप्न आधीच संपुष्टात आले. मात्र लोव्हलिनाच्या पहिल्याच ऑलिम्पिक सहभागात भारताच्या हाती कांस्यपदक गवसले, हेही नसे थोडके. आसामच्या बारमुखिया या एका छोट्याशा खेडेगावातून- ज्या गावात आजही रस्ताही नाही अशा गावातून- आलेल्या मुलीने अल्पावधीत ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालावी हे खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल.

लोव्हलिनाला मोठ्या दोन बहिणी आहे. घरात तीन मुली असल्याने आसपासचे लोक त्यांच्या वडिलांची चेष्टा करायचे. पण लोव्हलिनाच्या वडिलांना आपल्या मुलींवर गाढ विश्वास होता. आपल्या मुली देशाचे नाव उज्ज्वल करतील याचा आत्मविश्वास त्यांच्याकडे पहिल्यापासून होता.

लोव्हलिनाच्या मोठ्या बहिणी लिचा व लिमा किक बॉक्सिंग खेळायच्या. त्यांच्या पावलावर पावले टाकून लोव्हलिनाही किंग बॉक्सिंग खेळायला लागली. थाई किक बॉक्सिंग म्हणजे “मो थाय” देखील शिकली. बॉक्सिंगमध्ये आजही त्यातले एक-दोन फटके मारते.

पण हे किक बॉक्सिंग आपल्याला फार पुढे घेऊन जाणार नाही हे लक्षात येताच लोव्हलिना अन्य पर्यायांकडे पाहायला लागली.

एकदा वर्तमानपत्रात जगप्रसिद्ध मुष्ठीयोद्धा महमंद अली यांचा भला मोठा फोटो छापून आलेला तिने पाहिला. त्या फोटोने तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपल्या इच्छापूर्तीचा मार्ग बॉक्सिंग हा खेळ असल्याचे तिला त्या क्षणी जाणवले. त्याचवेळी भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) यांच्या गावागावात चाचण्या सुरू होत्या. बॉक्सिंग कोच पद्म बोरो यांच्या नजरेत, लोव्हलिनाची गुणवत्ता भरली. त्यांनी तिला बॉक्सिंग हा खेळ अंगीकारण्यास सांगितले. प्रारंभी सोपा वाटणारा खेळ किती कठीण आहे, याची जाणीव तिला प्रत्यक्ष सरावाला लागल्यावर झाली. प्रतिस्पर्धी खेळाडूंचे फटके चुकविता चुकविता तिला नाकीनऊ आले. मग ती बॉक्सिंग रिंगमध्ये जायला घाबरायला लागली. पुन्हा एकदा महंमद अली यांचे व्हिडिओ पाहून तिला धीर आला. त्यांचे पदलालित्य, लाँग डिस्टन्स फटके; त्यांचे पंचेस याचा तिच्यावर प्रभाव पडला.

पुन्हा एकदा रिंगमध्ये उतरण्याचे धाडस तिच्या अंगी आले.

मेरी कोम हिची लंडन ऑलिम्पिकचे कांस्य पदकापर्यंतची कामगिरी तिला प्रेरणा देणारी ठरली. मनाच्या एकाग्रतेसाठीही ती ध्यानधारणा करायला शिकली. जेव्हा कॅम्पमध्ये दस्तुरखुद्द मेरी कोम सोबत राहायला, सराव करायला मिळाल्यावर तिच्या करिअरला नवे वळण मिळाले. करोनामुळे ऐन ऑलिम्पिक पूर्वतयारीच्या स्पर्धा आणि परदेश दौऱ्यांवर तिला पाणी सोडावे लागले. पण साईचे कोचेस, पदाधिकारी, बॉक्सिंग संघटनेचे पदाधिकारी व अन्य घटकांनी, झूमद्वारा तसेच व्हिडियो टेप्स द्वारा सरावाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळेच करोना काळातील विश्रांती तिला सुसह्य झाली. कांस्यपदकापर्यंत ती म्हणूनच पोहचू शकली.

विनायक दळवी, हे ज्येष्ठ क्रीडापत्रकार असून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे त्यांनी वार्तांकन केले आहे.

COMMENTS