पुरुषाचे वय साधारण ३५, तर स्त्रीचे वय साधारण २५ होते.
४५०० वर्षांपूर्वीच्या हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडलेल्या एका स्थळावर, एकत्र पुरल्या गेलेल्या एका पुरुषाच्या व एका स्त्रीच्या मृतदेहांचे सांगाडे सापडले आहेत. पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या एका गटाने हा शोध लावला आहे.
या शोधनिबंधानुसार ‘हडप्पा संस्कृतीतील दफनभूमीमध्ये जोडीने पुरले जाण्याच्या पद्धतीची मानववंशशास्त्रदृष्ट्या पुष्टी करणारे हे पहिले ठोस उदाहरण आहे.’ या शोधनिबंधाचे इतर पुरातत्त्वशास्त्रज्ञांनीही परीक्षण केले आहे.
ही दफनभूमी सध्याच्या राखीगढी (हरियाणा) येथे स्थित होती. हडप्पा संस्कृतीतील १२००हून अधिक वसाहतींपैकी ही सर्वात मोठी वसाहत होती. इथली लोकसंख्या लाखोंच्या घरात होती.
या गटाचे प्रमुख आणि पुण्यातील डेक्कन महाविद्यालय येथे पुरातत्त्वशास्त्रज्ञ असणारे वसंत शिंदे याबाबत बीबीसी शी बोलताना म्हणाले की “हे स्त्री आणि पुरुष एकमेकांकडे ज्या जवळीकेने तोंड करून पुरले होते, ते एकाच वेळी मृत्यू पावले होते, असे वाटते”.
मृत्युच्या वेळी यातील पुरुषाचे वय ३५ तर स्त्रीचे वय २५ होते. या गटाला त्यांच्या मृत्यूचे कारण ओळखता आलेले नाही.
हडप्पा संस्कृतीच्या अवशेषांमध्ये याआधी एकत्र पुरण्यात आलेल्या मृतदेहांचे सांगाडे सापडले आहेत. परंतु ते जोडप्याचे असतीलच, असे नाही. जोडप्याचे सांगाडे सापडण्याचे पुरातत्त्वशास्त्रदृष्ट्या पुष्टी झालेले हे पहिले उदाहरण आहे. त्यांच्या शोधनिबंधामध्ये हे संशोधक लिहितात,
“उदाहरणार्थ, लोथल (गुजरात) येथील हडप्पा संस्कृतीच्या अवशेषांमध्ये सापडलेले सांगाडे, ही पतीच्या मृत्यूच्या शोकामध्ये केलेल्या आत्मबलिदानाची उदाहरणे असू शकतात, असे मानले गेले आहे. याउलट, इतर काही उदाहरणांमध्ये सांगाड्यांच्या लिंगाबद्दल अंदाज बांधणे अवघड होते. त्यामुळे, ती जोडपी नसू शकतात.”
आत्मबलिदानाचा पैलू आजवर सिद्ध झालेला नाही आणि तो एक अनुमान म्हणूनच पुढे आला आहे.
प्रस्तुत शोधनिबंध हा अधिक निर्णायक वाटतो आहे. परंतु ज्या स्त्री व पुरुषाचे सांगाडे सापडले आहेत, ते जोडपे होते का, याबाबत प्रश्नचिन्ह आहेच. म्हणूनच आपला शोधनिबंध ‘अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा’ आहे असे हे संशोधक मानतात.
या संशोधकांनी असे सुद्धा म्हटले आहे की जोडीने पुरणे ही गोष्ट, हडप्पातील लोक सगळ्याच मृतदेहांवर करत असलेल्या संस्कारांची सूचक नाही. या उदाहरणातून इतकेच समोर येते की हे स्त्री-पुरुष एकाच वेळी मृत पावले असल्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांना एकत्र पुरले गेले.
एकत्र पुरण्याची पद्धत ही तत्कालीन कौटुंबिक रचना आणि व्यापकदृष्ट्या सामाजिक रचनेबाबत अनुमान बांधण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. हडप्पा संस्कृतीतील थडग्यांवर आणखी अभ्यासाची गरज आहे.
‘बीबीसी’ने दिलेल्या माहितीनुसार, सापडलेले थडगे हे ५०० सेंटीमीटर खोल होते. पुरुषाची उंची ५ फूट ८ इंच तर स्त्रीची उंची ५ फूट ६ इंच होती. त्यांच्या हाडांच्या तपासणीमध्ये, कुठल्याही इजेची वा तत्सम खूण दिसली नाही.
या थडग्यामध्ये अन्न आणि दागिन्यांनी भरलेली काही मातीची भांडीही सापडली. हडप्पा संस्कृतीचा विचार केल्यास यामध्ये विलक्षण असे काहीही नाही. हडप्पातील लोकांचा मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास होता असे मानले जाते. तसेच या संस्कृतीमध्ये ‘राजेशाही’ पद्धतीचा अंत्यसंस्कार केल्याचे ऐकिवात नाही.
जगभरामध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञांना ‘जोडीने पुरले गेलेल्यां’ची आणखीही उदाहरणे सापडली आहेत. शोधनिबंधामध्ये असे लिहिले आहे की, “वल्दारो या इटलीमधील गावामध्ये नवाश्मयुगामध्ये पुरल्या गेलेल्या दोन व्यक्तींचे असे सांगाडे सापडले आहेत, जे एकमेकांच्या मिठीत आहेत असे वाटत होते. रशियातील नोवोबर्स्क भागातील अंद्रोनोवोमध्ये, दोन सांगाडेएकमेकांकडे बघत असलेल्या व हात धरलेल्या अवस्थेत सापडले. ग्रीसमधील अॅलेपोट्रायपा गुहेमध्ये, ५८०० वर्षांपूर्वीचे, नवाश्मयुगातील उत्तमरित्या जतन केलेले सांगाडे सापडले. हे सांगाडेसुद्धा एकमेकांच्या मिठीमध्ये होते व त्यांचे हात व पाय एकमेकांमध्ये गुंतलेले होते. अशाच आणखी काही ठिकाणांसह मध्याश्मयुगीन गंगा खोरे आणि ताम्रपाषाण युगीन दख्खन या ठिकाणीही जोडप्यांचे पुरातन सांगाडे सापडल्याची माहिती आहे.
COMMENTS