अभिव्यक्ती स्वातंत्र्य व पक्ष

अभिव्यक्ती स्वातंत्र्य व पक्ष

सुरेश सावंत यांच्या लेखांचे ‘गुंता आणि उकल’ हे पुस्तक अक्षर प्रकाशनाने अलिकडेच प्रकाशित केले आहे. या पुस्तकातील एक लेख ‘द वायर मराठी’च्या वाचकांसाठी..

सातव्या वेतन आयोगातील दरापेक्षा किमान वेतन खूपच कमी
महासाथ कराराला विरोध आवश्यक का आहे?
श्रीलंकाः आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेने

अभिव्यक्त होणारे लेखक, पत्रकार, कार्यकर्ते यांना भूमिका असायला हवी, भूमिका नको म्हणणाऱ्यांनाही भूमिका असते, त्यांच्या सापळ्यात अडकता कामा नये…इथवर मी मांडले होते. त्यातून लेखक, कलावंत आदिंना भूमिका असणे यात काही गैर नाही, हे समजते.

पण या मंडळींनी राजकीय पक्षाशी संबंध ठेवला तर..?

तर मात्र अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहते. विशिष्ट विचारसरणीशी बांधिलकी मान्य असणाऱ्यांनाही पक्षाशी बांधिलकी म्हणजे आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावणे असे वाटते. हे मत केवळ सर्वसाधारण विचारी माणसेच नव्हे, तर मला आदरणीय असलेले व भूमिका घेण्याच्या बाजूने असलेले रामचंद्र गुहांसारखे पुरोगामी इतिहासकारही मांडत असतात. मी त्यांचे हे मत ऐकले ते या वर्षाच्या प्रारंभी मुंबई विद्यापीठात विजय तेंडुलकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजिलेल्या त्यांच्या व्याख्यानावेळी. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याला असलेले ८ धोके’ या विषयावर ते बोलत होते. बोलताना ‘लेखक किंवा कलावंताने पक्षाशी संबंध ठेवला तर त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम होतो. हे होऊ द्यायचे नसेल, तर त्याने कोणत्याही पक्षाशी संबंध ठेवता कामा नये,’ असे ते म्हणाले. पक्षाशी संबंध हा त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याला असलेला एक धोका वाटतो. हे मत त्यांनी या विषयावरील अन्य ठिकाणी दिलेल्या व्याख्यानांतूनही मांडलेले आहे. याचा अर्थ, एखाद्या व्याख्यानावेळी तात्कालिक संदर्भातील तो शेरा नव्हता; ती त्यांची धारणा आहे.

गुहांच्या या मताने त्यावेळी माझ्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले. काही मित्रमंडळींना पत्र लिहून ते व्यक्तही केले. या मित्रांशी झालेल्या संवादानंतर व आता अधिक विचार केल्यावरही माझ्या मनातील ते प्रश्नचिन्ह दूर झालेले नाही. ते आता तुमच्यासमोरही ठेवतो.

राजकीय पक्षांचा (भांडवली तसेच डाव्या) आजचा व्यवहार पाहिला, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर असे बंधन येते ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पण तो व्यवहार झाला. गुहा व्यवहाराविषयी बोलत असते तर प्रश्न नव्हता. ते तत्त्व, सूत्र म्हणून मांडतात. जे कलाकार, लेखक राजकीय पक्षात सामील होतात, त्यांच्याविषयी त्यांना अनादर नाही. ती त्यांची निवड आहे. ते त्यांचे स्वातंत्र्य आहे, म्हणून त्यांच्या या निर्णयाचा ते आदरच करतात. पण तरीही तत्त्व म्हणून कलाकाराने-लेखकाने स्वतंत्रच राहिले पाहिजे, असे ते मानतात. कलाकार-लेखकाने व्यापक राजकीय भूमिका घेऊ नयेत, यालाही त्यांचा विरोध नाही. ही भूमिका पक्षीय नको, असे त्यांचे म्हणणे आहे.

ज्याच्या गझलांचे गारुड उतरता उतरत नाही, ज्याचे शेर अनेकांच्या भाषणांत पेरलेले असतात तो महान प्रतिभावंत शायर फैज अहमद फैज पाकिस्तानी कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य होता. डाव्या कट्टरतेला विरोध असलेल्या या शांतताप्रेमी मार्क्सवादी क्रांतिकारकाने पक्षकार्य करताना तुरुंगवासही भोगला. ज्यांनी आपल्या अभिव्यक्तीने साहित्यात नवे मापदंड, शैली, प्रवाह तयार केले असे बर्टोल्ट ब्रेख्त, पाब्लो नेरुदा हे जागतिक कीर्तीचे साहित्यकार राजकीय नेते होते. भारतातील कैफी आझमी, बलराज सहानी, भीष्म सहानी,ए. के. हंगल हे कलावंत कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. महाराष्ट्रात अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, नारायण सुर्वे असे आणखी कितीतरी प्रतिभावान साहित्यिक कलावंत डाव्या पक्षांशी बांधिलकी ठेवून होते. या सगळ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ते पक्षाशी बांधील होते म्हणून मर्यादा पडल्या असे दिसत नाही. ही मंडळी पक्षव्यवहाराविषयी किंतुपरंतु व्यक्त करतच नसत असे नाही. पण त्यामुळे त्यांच्या आविष्कारातील कलात्मक मूल्यांवर त्याचा परिणाम झाला, असे मला वाटत नाही.

मी इथे पक्षांच्या व्यवहाराला सर्टिफिकेट देत नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. व्यवहारात गडबडी झाल्या आहेत. होऊ शकतात. तत्त्व म्हणून पाहायचे तर वरील मंडळींच्या अभिव्यक्तीवर त्यांच्या पक्षसान्निध्यामुळे बंधन आले नाही, एवढेच मला सांगायचे आहे. कोणी रशिया-चीनमधील कम्युनिस्ट पक्षांच्या व्यवहाराविषयी बोलेल. जरुर बोलावे. ‘The Fountainhead’ या अतिशय गाजलेल्या (मला खूप आवडलेल्या) कादंबरीची लेखिका अॅन रँड (Ayn Rand) सोव्हिएट रशिया सोडून अमेरिकेत गेल्याने तिचे आविष्कार स्वातंत्र्य बहरले; याबाबत तिने व इतरांनी जे म्हटले आहे, त्याविषयीही मला काही म्हणायचे नाही. ती चर्चा जरुर व्हावी.

पक्षाशी जोडले गेले की प्रतिभेच्या आविष्काराचे स्वातंत्र्य गडबडते, त्याला तडजोड करावी लागते, या तत्त्वाबाबत मला प्रश्न आहे.

कलाकाराचे स्वातंत्र्य आणि विचारवंताचे स्वातंत्र्य यांच्या आविष्कारात फरक आहे. कलाकृती रुपकात्मक, सांकेतिक बोलते. तिचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावला जाऊ शकतो. विचारवंताला ती मुभा नसते. त्याचे म्हणणे शब्दशः असते. समजा विचारवंताची भूमिका व तो ज्या पक्षाचा असेल त्याची भूमिका यात विरोध, फरक असेल तर? …असू शकतो. व्यक्तिगत भूमिका व अशा अनेक व्यक्तींचा गट असलेल्या पक्षाची भूमिका यात फरक असू शकतो. राजकीय जाणतेपणाच्या मार्गदर्शनाखालील अनेकांच्या मतांची ती सामायिक सहमती असते. म्हणजेच तडजोड असते. ती अपरिहार्य असते. पक्षातच कशाला, संघटनेत, गटात, कुटुंबातही असा व्यवहार करावा लागतो. तो आवश्यक असतो. कोणताही सामुदायिक व्यवहार हा व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा तसे पाहिले तर संकोचच करतो. समाज चालण्यासाठी तो आवश्यकच असतो. मुद्दा आहे, मला एकाच वेळी व्यक्ती म्हणून व पक्ष, गट, समूह म्हणून म्हणणे मांडता येते का? …यायला हवे. माझे वैयक्तिक म्हणणे हे आहे व माझ्या गटाचे सहमतीचे म्हणणे अमूक आहे, असे मांडता आले पाहिजे. पण ते कोठे, कधी याचे तारतम्य मात्र हवे.

विशिष्ट पक्षाचा, संघटनेचा प्रवक्ता म्हणून मी बोलत असेन तर तिथे त्या पक्षाची, संघटनेची सामुदायिक सहमतीची भूमिकाच मी मांडेन. तिथे कोणी तुमची वैयक्तिक भूमिका काय, असे विचारले तर आताचा हा मंच वैयक्तिक भूमिका मांडण्यासाठी नाही वा ते आता इथे अप्रस्तुत आहे, असे मी म्हणेन. हे म्हणताना मी माझ्या स्वातंत्र्याचा संकोच करत नाही, तर अधिक जबाबदारीने सामुदायिक निर्णयप्रक्रियेची शिस्त पाळतो.

अशा दोन भूमिका ठेवता येताहेत न कळणारे लोक पक्षात असले, तर ते वैयक्तिक मत व सामुदायिक सहमती यात फरक करत नाहीत व आक्षेप घेतात. तो त्या पक्षाच्या धुरिणांच्या-कार्यकर्त्यांच्या समजाचा प्रश्न झाला. त्यामुळे काही वैयक्तिक भूमिका ही सामुदायिक भूमिकेत विसर्जित व्हायला हवी, असे तत्त्व तयार होत नाही.

माझ्या एक जवळच्या सहकारी सध्या एका मोठ्या राजकीय पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. माध्यमांसमोर भूमिका मांडताना अनेकदा त्यांना कसरत करावी लागते, हे मी पाहतो. वास्तविक, पक्षनेतृत्व, अन्य कार्यकर्ते व समाज याबाबतीत प्रगल्भ असता तर त्यांची ही कसरत टळली असती. पण या कसरतीच्या तडजोडीमुळे प्राप्त परिस्थितीत त्यांना अभिप्रेत समाजहित साधण्याच्या दिशेने पुढे सरकण्याचा अवकाश त्यांना मिळतो, असेही दिसते. एरवी, वैयक्तिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपून त्यांना तो मिळण्याचा संभव कमी होता.

समाजाची त्या विशिष्ट काळातली, त्या विशिष्ट संदर्भातली समजाची पातळी व विरोधकांचे डावपेच लक्षात घेणे गरजेचे असते. ‘सत्य ते कोठेही, कधीही वदणारच’ असे करून चालत नसते. बाबासाहेब आंबेडकर म्हणत त्याप्रमाणे समोर खांब आला तरी मी सरळच जाणार व त्याला धडकणार, असे करून चालत नसते. वळसा घेणे हे शहाणपणाचे असते. त्याप्रमाणे मनातले सगळे, जसेच्या तसे, कोठेही बोलून चालत नाही. ‘इष्ट समयी, इष्ट स्थळी, इष्ट तेवढेच बोलणार’ हेच योग्य ठरते.

(या मुद्द्याचे अधिक विवेचन पुस्तकातील ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पूर्वअट’ या लेखात केले आहे.)

पक्षाशी, संघटनेशी कोणताही संबंध न ठेवणारा व स्वमत निधडेपणाने कधीही, कोठेही व्यक्त करणारा लेखक-कलावंत बाणेदार असू शकतो; पण योग्य-अयोग्य वेळेचा, समाजाच्या समजाचा, कोणत्या शक्तींना बळ द्यायचे याचा अंदाज घेत समाजाला पुढे न्यायची प्रगल्भता त्यात असेलच असे नाही. अस्थानी बाणेदारपणाऐवजी योग्य वेळेची, योग्य भाषेची निवड करणारी प्रगल्भता मला महत्त्वाची वाटते.

सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवून अथवा दबाव आणून धोरणात बदल घडविण्याचे वा त्याची अंमलबजावणी करण्याचे बिगरपक्षीय मार्ग निश्चित आहेत. पण सत्ता हाती घेण्याचे वा संसदीय निर्णय प्रक्रियेत थेट सहभागी होण्याचे आज तरी पक्ष हेच साधन आहे. त्यादृष्टीने त्याचे महत्व अन्य संघटनात्मक रचनांच्या तुलनेत खूपच कळीचे आहे. पक्ष व निवडणुका यांपासून फटकून राहणारे कार्यकर्ते अलिकडे पक्षीय राजकारणात उतरु लागले आहेत, निवडणुका लढवू लागले आहेत ही आश्वासक बाब आहे.जनआंदोलनातून पुढे आलेल्या केजरीवालांच्या नेतृत्वाखाली ‘आप’ या पक्षाची स्थापना, निवडणुकीच्या माध्यमातून भरघोस मताधिक्याने त्यांनी ‘दिल्ली’ राज्याची सत्ता घेणे, मतभेदांमुळे ‘आप’पासून अलग होऊन ‘स्वराज अभियान’ चालवणारे योगेंद्र यादव व त्यांच्या सहकाऱ्यांची स्वतंत्र पक्ष काढण्याची घोषणा तसेच नुकतेच आपले १६ वर्षांचे प्रदीर्घ उपोषण समाप्त करणाऱ्या मणिपुरी लोहकन्या इरोम शर्मिला यांचा निवडणूक लढवण्याचा मनोदय…या स्वागतार्ह घटना आहेत.

पक्षाशी संबंध म्हणजे अधःपतन व स्वतंत्र बाण्याने एकटे राहणे हेच श्रेष्ठ असे गुहांना नक्की म्हणायचे नाही. पण फार पाचपोच नसणाऱ्यांना वा नवागतांना त्याचा अर्थ तोच लागू शकतो. तसा अर्थ लागणे हे नुकसानकारक आहे, असे मला वाटते.

गांधी, आंबेडकर, नेहरु, डांगे, मंडेला, एस. एम. जोशी या भल्या व आदरणीय मंडळींना पक्ष होते, हेही लक्षात ठेवूया.

‘गुंता आणि उकल’
सुरेश सावंत
अक्षर प्रकाशन
पृष्ठे २४३
किंमत २८० रु.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0