जनसामान्यांचा आधारवड

जनसामान्यांचा आधारवड

आजवर दोन अपवाद सोडून अकरा वेळा सांगोल्यातून निवडून आलेल्या गणपतराव देशमुख यांनी संसदीय वाटचालीत एक इतिहास निर्माण केला आहे. नावापुरतेच गणपतराव देशमुख.

एन. डी. – एक धगधगते अग्निकुंड
पक्षांतर आणि सामान्य मतदार
कामगार संघटनांचा कोहिनूर हिरा

आजवर दोन अपवाद सोडून अकरा वेळा सांगोल्यातून निवडून आलेल्या गणपतराव देशमुख यांनी संसदीय वाटचालीत एक इतिहास निर्माण केला आहे. नावापुरतेच गणपतराव देशमुख. वाड्याचा व गढीचा तसा अर्थाअर्थी संबंध नाही. सांगोल्यातील जातव्यवहाराचे गणितही फारसे राजकारणासाठी जुळत नाही. मग सातत्याने हाच नेता विधानसभेत जावा, असे जनता जनार्दनाला का वाटत असावे? शेतकरी कामगार पक्षात निष्ठापूर्वक वास्तव्य ठेवताना अनेक जण विचाराला, आचाराला रामराम ठोकून पक्ष खिळखिळा करत होते. गणपतराव देशमुख मात्र कार्यप्रणालीतून एक एक माणूस जोडत होते.

कष्टकर्‍यांच्या झोपडीपासून कार्यप्रवण कार्यकर्त्यांपर्यंत कडीतून कडी निर्माण करत तयार केलेली शृंखला म्हणजे त्यांचे पाठबळ. वास्तवाकडे पाठ करून चालणार्‍यांशी त्यांचे कधी जमले नाही. कधीही अन् कुठेही भेटा. बोलताना पाल्हाळ नाही. जे बोलायचे ते खात्रीचे. वावटळ होण्यासाठी नाही. काम एके काम. कामाचे महत्त्व पटले की जिवाचे रान करणार. दुष्काळी तालुक्यातील माणसांच्या समस्या कायम वेगळ्याच असतात. मडक्याच्या उतरंडीसारख्याच त्या असतात. सुटतही नाहीत अन् संपतही नाहीत. शेतकर्‍यांत, कष्टकर्‍यांत मिसळणारा, किंबहुना आयुष्य केवळ त्यांच्यासाठीच आहे, असे समजून चालणारा जाणता नेता म्हणूनच महाराष्ट्र त्यांच्याकडे बघतो. शांत, विचारी व्यक्तिमत्त्वाच्या राजकारण्यांच्या यादीत गणपतराव हे कायम अग्रभागी असलेले नाव आहे. दिमाखदार रूपासाठी वरवर काही करणे नाही. जे करायचे ते कृतीतून! ज्या कृतीचा जनसामान्याला उपयोग झाला पाहिजे. गणपतराव देशमुखांचा जन्म उपेक्षित, वंचित समाजातील. त्याचे भांडवल न करता ‘लोकराजा’ होण्यात काय आनंद असतो, हे सांगोलाच नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेले आहे. सदासर्वदा चेहर्‍यावर तरतरी. आबासाहेबांच्या उदंड उत्साहाचे गमक कोणते, याचा विचार आपल्यासारख्याच्या मनात येतो.

केलेल्या कामाचा डांगोरा पिटत राहणे त्यांना जमले नाही. सहकाराचा गाडा हाकताना भागभांडवलदार हाच विकासाचा खरा आधारवड आहे, हे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. मग आधारवडाच्या मुळ्यांना भक्कमपणा प्राप्त करून देण्याची जबाबदारी ते घेतात. अर्थकारणातून अनेक जण मने सांभाळतात. पण गणपतरावांचे तसे नाही. ‘जवळचा’ ‘लांबचा’ हे दोन्ही शब्द त्यांच्या कोशात नाहीत. जे घाम गाळतात; त्यांची पूजा बांधणारा हा रयतेचा माणूस आहे. आपण फक्त बोलघेवडे नाही आहोत, हे त्यांनी सांगोल्यातील जनतेला दाखवून दिले आहे. सहकार क्षेत्रातील शेतकर्‍यांचा उडत चाललेला विश्वास वाढीस लागू नये म्हणून गणपतराव देशमुख यांनी जे जे उपक्रम हाती घेतले ते ते तडीस नेले, त्याचा कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला पाहिजे. कार्यानुभवाची जोड पदव्यांना मिळाली, तर सांगोल्यातील त्यांचे-आबासाहेबांचे कार्य एक नुमना म्हणून सरकारलाही स्वीकारता येईल.

राजकारणातला प्रत्येक काळ हा गोड, कडवट अनुभवांचा असतो. समाजजीवनात वावरत असताना काही गोष्टींची अपरिहार्यताही असते; म्हणून ‘तत्त्वांशी तडजोड कधीच नाही’ हा व्यक्तिविशेष क्वचितच कुण्या राजकारण्याला लागू पडतो. गणपतराव देशमुखांनी समाजजीवनाची तत्त्वं उराशी निष्ठेने बाळगली. नाकर्ती आणि कर्ती माणसं यांच्यातला पडदा सारून पाहताना कर्त्या माणसाचं मोठेपण लख्खपणे उठून दिसतंच! त्याला चमकवण्याची किंवा कल्हई करण्याची गरजच नसते. त्यामागे मोठा त्याग-भाव असतो. लोकप्रतिनिधींची प्रत्येकाच्या मनात वेगळी प्रतिमा असते. ही प्रतिमा निर्माण करायला व्रतस्थपणाचं मूल्य सांभाळावं लागतं. तेही आयुष्यभर सांभाळायचं म्हणजे डोंगर उचलण्यासारखी गोष्ट आहे. असा नैतिकमूल्यांचा डोंगर उचलण्याचं काम व्रतस्थपणानं गणपतराव देशमुख यांनी केलं आहे. त्यासाठी त्यांच्या उभ्या आयुष्याकडे समाजशास्त्राच्या दृष्टीने पाहावे लागेल. शोधक वृत्तीने त्यांचे चरित्र समजावून घ्यावे लागेल. आदर्श उदाहरणं बोटावर मोजण्याइतकीच असतात. अशा आदर्शांकडे पाहणे म्हणजेसुद्धा आपली उंची अधिक वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण बाब असते. माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणार्‍या माणसांचा नेता म्हणून आबासाहेब अस्सल देशीपणाचे सत्त्व घेऊन उभे राहिले. त्यांच्या सत्त्वशील वृत्तीकडे श्रद्धेने आणि आदराने पाहणे, हा या मातीचा खरा लौकिक आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0