एन. डी. – एक धगधगते अग्निकुंड

एन. डी. – एक धगधगते अग्निकुंड

प्रा. एन. डी. पाटील म्हटलं की शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनतेच्या चळवळीचं नेतृत्व असाच सर्वसामान्यपणे समज आहे. साहेबांची संपूर्ण हयात रस्त्यावरच्या लढाय

मोल नसलेले जीवन आणि वाहून गेलेले प्रशासन
‘कोल्हापूरच्या पुराला मुख्यमंत्री जबाबदार’
‘पुरामुळे नुकसान रोखण्यासाठी कठोर निर्णय हवेत’

प्रा. एन. डी. पाटील म्हटलं की शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनतेच्या चळवळीचं नेतृत्व असाच सर्वसामान्यपणे समज आहे. साहेबांची संपूर्ण हयात रस्त्यावरच्या लढाया करण्यात गेली. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणाच्या विरोधातले अनेक लढे यशस्वी झाले. त्यात संयुक्त महाराष्ट्राचा लढा, कर्नाटक सीमाप्रश्न लढा, शेतमालाला किफायतशीर दर मिळवून देण्याचा लढा, भूमिहीन शेतमजुरांच्या व्यथांकडे लक्ष वेधणारा लढा, ऊस उत्पादक कपाती विरुद्धचा लढा, कृषी पंपावरील वीज दरवाढीचा लढा, दाभोळच्या एन्रॉन वीज कंपनी विरुद्धचा संघर्ष, वीज भारनियमन विरुद्धचा लढा, साखर निर्यात बंदी विरुद्धचा लढा, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांचा लढा, अलिकडील आय. आर. बी. कंपनीच्या टोल विरोधातला लढा, तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा लढा असे कितीतरी लढे एनडींच्या नेतृत्वाखाली शांततेने निघून ते यशस्वी झालेत. किंवा आपण असं म्हणू, त्यांच्या लढ्याच्या नेतृत्वाची दखल घेऊन मोर्चाच्या मागण्या शासनाला मान्य कराव्या लागल्यात.

एन. डी. पाटील यांचं जीवन सामाजिक संघर्षाचं एक धगधगतं अग्नीकुंड होते. या संघर्षमय अग्नीकुंडाचं एकमात्र वैशिष्ट्य म्हणजे सरांच्या नेतृत्वाखालील लढा म्हणजे कार्यकर्त्यांसाठी हत्तीचं बळ. वयाची नव्वदी ओलांडलेली असताना, बरेच आजार असतानासुद्धा डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी या सामाजिक विचारवंताच्या मारेकर्‍यांना अटक करण्यासाठी ते लाँग मार्च, तसंच वेगवेगळ्या आंदोलनात सक्रिय होते.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत खूपशा शिक्षण तज्ज्ञांचं तत्त्वज्ञान समाजाला दिशादर्शक ठरलेलं आहे. महात्मा फुले, राजर्षी शहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बापूजी साळुंखे यासारख्या थोर विभूतींच्या विचारातून आजचा पुरोगामी महाराष्ट्र उभा राहिलाय. प्रा. एन. डी. पाटील यांचं शिक्षणविषयक तत्त्वज्ञान थोडं वेगळं आहे.
समाजाच्या आर्थिक मागासलेपणातच सर्व प्रकारच्या शिक्षणाचं मूळ आहे, असं ते मानतात. १९९२ मधे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी’ या पुस्तिकेतून सरकारचे आणि समाजाचे डोळे उघडण्याचं काम केलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका शाळेतल्या १४ मुलांना एस.एस.सी. बोर्डाने १७ नंबर फॉर्मच्या सोबतची भरमसाठ दंडाची रक्कम न भरल्याने त्यांना १० वीच्या परीक्षेला बसण्यास मनाई केली होती. त्यावेळी त्यांनी उद्विग्न होऊन त्या १४ मुलांचा बोर्डाने नाही तर गरिबीने घात केला, अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती.

गोरगरिबांच्या शिक्षणाची तळमळ त्यांना कित्येक दिवस स्वस्थ बसू देत नव्हती. रयत शिक्षण संस्थेला भारत सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला. रयत शिक्षण संस्थेचे एन. डी. सर १८ वर्षं चेअरमन होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रयतची वाटचल राजर्षी शांहूच्या विचाराने आणि कर्मवीर आण्णांच्या चतुःसुत्रीने कार्य करताना दिसून येते. शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रथमिक शाळा, आश्रमशाळा, रयतच्या माध्यमातून सुरू आहेत.
एन. डी. पाटील हे  उपेक्षितांचं शिक्षण या ध्येयाने प्रेरित होवून काम करत होते. म्हणूनच रयतमधे एकही मेडिकल कॉलेज सुरू करू दिलं नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजही रयत शिक्षण संस्थेच्या राखीव जागांचा अनुशेष पूर्णपणे भरला गेला. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणार्‍या या व्यक्तिमत्त्वाने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात असंख्य पदं भूषवलीत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलीत. हे करत असताना त्यांनी एक कवडीही मिळवली नाही. महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेसाठी, कष्टकरी शेतकर्‍यांसाठी राजसत्तेलासुध्दा त्यांनी लाथ मारली. कष्टकरी जनतेला, शेतकरी, कामगार आणि भुमिहीनांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून समाजाला आधार देण्याचं त्यांचं काम अखंडपणे सुरूच होते.
समाजातील कष्टकरी, शेतकरी, भुमिहीन, शेतमजुर, अडलेले, नडलेले, जागतिकीकरणाच्या ओझ्यामुळे वाकलेले, शिक्षणाच्या प्रकाशापासून दूर राहिलेले आणि धर्मांध राजकरणाचा चटका सहन करणारे त्यांच्याविषयी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारं हे असामान्य असंच व्यक्तिमत्त्व . विचारांची निष्ठा अविरतपणे जपणारे निष्ठेशी तडजोड न करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे एनडी सर. ध्येयवाद आणि तत्त्वाशी थोडीशी फारकत घेऊन राजकारणाला साजेशी बाजु घेतली असती तर ते कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही बनले असते. पण तत्त्वाची तडजोड न करणार्‍या एनडी सरांनी आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रावर एक मोठं सामाजिक ऋण करून ठेवले आहे.
औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ या तीन विद्यापीठांनी एनडी पाटील सरांना डी. लीट. पदवी समारंभपूर्वक देवून त्यांचा यथोचित सन्मान केला. एनडी सरांसारखं कार्य आणि कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तिमत्वालाच तीन तीन विद्यापीठाची डी. लिट. पदवी देऊन गौरवतात. त्यांचा ज्यावेळी समाजाने गौरव केला, पुरस्कार दिला त्यावेळी त्यांनी समाजाकडून काही अपेक्षाही बाळगल्यात. त्यामधे विशेष करून शाहू पुरस्कार वितरणप्रसंगी शाहुंचा पुरोगामीत्वाचा विचार त्यांच्याच कर्मभुमीत रूजला नाही. मराठ्यांनी मराठेपण सोडून व्यापकता स्वीकारावी, जातीवंताचा लढा ताकदीने लढण्याची गरज, प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणातील वाटचाल निराशाजनक, गरीबांच्या शिक्षणाची परवड यागोष्टी त्यांनी जाणूनबूजन, रोखठोकपणे मांडल्या.

त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवाजी विद्यापीठामधे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन केंद्र, कॉम्रेड गोविंदराव पानसरे अध्यासन केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेतला. वयाच्या नव्वदीतही शरीर साथ देत नसतानाही परवाच त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कोल्हापूर येथील कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. कष्टकर्‍यांना चार घास सुखाचे मिळावेत म्हणून एनडी सर या आंदोलनात सहभागी झाले. पुरोगामी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी निरपेक्ष आणि निस्वार्थीपणाने ही चळवळ पूढे चालू ठेवण्याचं ध्येय ठरवलं तर त्यांनी केलेल्या कार्याला ही एक मानवंदना ठरेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0