३० वर्षांपूर्वी सत्यजित रे यांचा ‘गणशत्रू’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. आज समाजात वाढत असलेली धर्मांधता व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव पाहता या चित्रपटाचे मोल अधिक जाणवते.
झोपेच सोंग घेतलेल्या अप्पूला जाग करतांना, मिश्किल चेहऱ्याने दुर्गा पांघरुणाला असलेल्या छिद्रातून अप्पूचा डोळा शोधते आणि मग आपल्या हाताने तो उघडते..
आपल्याला दिसतो तो छिद्रातून उघडलेला अप्पूचा डोळा.. सत्यजित राय यांच्या सर्वश्रुत असलेल्या ‘पथेर पांचाली’ या सिनेमातील दृश्य. सत्यजित राय हे झोपेचे सोंग घेतलेल्या समाज व्यवस्थेचा डोळा उघडण्याचे काम आपल्या कलाकृतीतून सतत करत आले आहेत. त्यांचा अजरामर चित्रपटांच्या यादीत थोडा दुर्लक्षित झालेला चित्रपट म्हणजे ‘गणशत्रू’ (१९८९). इब्सेन यांच्या ‘An Enemy of The People’ या नाटकावर आधारित हा चित्रपट आहे.
गणशत्रूचे कथानक : चंडीपूर नावाचं एक लहानसे गाव. गावातले शिवमंदिर हे जागृतस्थान म्हणून प्रसिद्ध असते. लांब -लांबून लोक दर्शनाला आणि झऱ्याचे पवित्र तीर्थ घ्यायला येत असतात. या मंदिराच्या ट्रस्टचा कारभार भार्गव नावाच्या मारवाडी आणि निशिथ या व्यक्तींकडे असतो. या ट्रस्टचे इतरही व्यवसाय असतात, त्यातील एक म्हणजे हॉस्पिटल. निशिथने आपल्या मोठ्या भावाला डॉ. अशोक गुप्ता यांना हॉस्पिटलचे प्रमुख केलं असतं. डॉक्टर अशोक हा अतिशय सज्जन.
देवमाणूस म्हणून पंचक्रोशीत त्यांना मान मिळत असे.
एक दिवस डॉ. अशोक यांच्या लक्षात येत मागील काही दिवसांत काविळीच्या रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. ते अस्वस्थ होतात. ते झऱ्याच्या पाण्याचा नमुना कलकत्त्याला पाठवतात. काविळीच्या साथीची बातमी एका संपादक मित्रामार्फत छापतात. आपल्या लहान भावाबद्दल डॉ. अशोक यांना खात्री असते की तो या गोष्टीत लक्ष घालेल. मार्ग काढेल. पण होतं उलटंच. भाऊ त्यांना समजावतो अशी बातमी बाहेर येणं किती घातक आहे. लोकांच मंदिरात येणं बंद होईल. आर्थिक नुकसान होईल. थोडंफार पाणी दूषित झालं असेल, पण त्यासाठी पाईपलाईन दुरुस्त करावी लागेल. त्यासाठी मंदिर बंद ठेवावे लागेल. दोन महिन्यांनी मोठा शिवउत्सव आहे. मंदिराची बदनामी होईल. ती परवडण्यासारखी नाही. तेव्हा गप्प बसा.. अशी ‘विनंती’ करतो.
‘माझं गावावर प्रेम आहे. इथल्या लोकांचं स्वास्थ्य महत्त्वाचे. पण अशा जीवघेण्या असत्यावर आधारलेल्या लाभापेक्षा गावाचं आर्थिक नुकसान झालं तरी चालेल..’, अशी ठाम भूमिका डॉक्टर घेतात.
सर्व धनिक, राजकारणी एकत्र येतात. वृत्तपत्र मालकही त्यात सामील होतो. त्याच दरम्यान पाणी दूषित असल्याचे चाचणीचे रिपोर्ट हातात आलेले असतात. डॉक्टर ठरवतात की गांवकऱ्यांना सगळं समजावून सांगू. ते निश्चित आपलं ऐकतील. आपली मुलगी, तिचा मित्र यांच्या साह्याने गावांत पत्रकं वाटली जातात. गावसभा होते. डॉक्टर बोलायला उभे राहतात..पण भाऊ मध्येच येऊन प्रश्न विचारतो. भाषणकौशल्य अवगत नसल्या डॉक्टरांचा, त्याच्या राजकारणी मनोवृत्तीपुढे पराभव होतो.
“तुम्ही कधी मंदिरात जात नाही, हे खरं आहे का?”
“हो.”
“मग तुम्ही कसले हिंदू? तुम्हांला श्रद्धेचं सामर्थ कसं कळणार? तीर्थाचं माहात्म्य आणि पावित्र्य प्रत्येक हिंदू जाणतो. त्या तीर्थात बेलपत्र, तुळशीपत्र आहे, त्या इतकं शुद्ध जगात दुसरं काहीच नाही. मंदिराच्या पाण्याला जल म्हणू नका. ते शिव चरणतीर्थ आहे..तुमची मत ठेवा तुमच्याकडेच…किमान आमच्या श्रद्धेच्या आड येऊ नका..”
शब्दच्छल काम करून जातं..
गावगुंड सभा उधळून टाकतात. सभेचं उद्दिष्टं संपवून टाकलेलं असतं.
डॉ. अशोक कोर्टात जायचं ठरवतात. तेव्हा त्यांना मारवाडी भार्गव सुनावतो, “काही उपयोग होणार नाही. न्यायाधीश नंदी दिवसातून दोन वेळा मंदिरात येऊन पूजा करणारे धार्मिक गृहस्थ आहेत. त्यामुळे तुमचं काहीही चालणार नाही.”
मुलाला कॉलेजमधून तर मुलीला नोकरीवरून काढून टाकलं जात. गांवकरी कालच्या देवदूताच्या विरुद्ध गेले असतात.. तो देवदूत आता शत्रू झालेला असतो..
शेवट आशादायक आहे. मुलगी, एक मुक्त पत्रकार, मुलीचा मित्र आणि त्याचं कलापथक हे जनजागृतीचं काम हाती घेतात..डॉक्टर अशोक जिंदाबाद! याच्या घोषणा ऐकायला येतात…
मूळ नाटककार इब्सेन हा अस्तिववादी लेखक म्हणून युरोपमधील लोकप्रिय व नावाजलेला. राजकीय मनसुबे आणि समाजाला धर्माच्या नावाखाली वेठीस धरणारी मानसिकता यावर कडाडून हल्ले चढवणारा विचारवंत लेखक. तत्त्वनिष्ठ, समाजाचं हित बघणाऱ्या डॉक्टरची कळकळ त्याने अत्यंत प्रभावी मांडली आहे. त्याचं वाटेवर सत्यजित राय आपल्याला घेऊन जातात. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून जगणारी माणसं म्हणजे धर्म बुडवायला निघालेली असतात, असा सोयीचा समज लोक करून घेतात.
डॉक्टर अशोक याचा लढा सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी असतो पण त्याचं मंदिरात न जाणं विरोधकांच्या पथ्यावर पडत. खरं तर श्रद्धा ही वैयक्तिक बाब आहे. त्याचं रूपांतर समूहात झालं की श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची सरमिसळ होते. लोकांच्या श्रद्धेचा वापर हत्यार म्हणून, सत्यतेच्या विरुद्ध करायचा आणि मानवतेवरील आलेल्या संकटाचं खापर विरोधकांच्या विचारांवर फोडायचं. विवेकबुद्धीशी फारकत घ्यायला भाग पाडायचं, हा तर राजकारणी लोकांचा, धर्माच्या ठेकेदारांचा पूर्वापार सुरू असलेला खेळ. धार्मिक उन्मादाचा वापर राजकारणी लोकांना उत्तमरीत्या करून घेता येतो.
अच्युत गोडबोले यांनी मास हिस्टेरियाचे एक वेगळे गंमतीदार उदाहरण दिले आहे. १९७४ साली संपूर्ण लेनिनग्राडमध्ये एका अफवेने खळबळ उडाली होती. तिथल्या प्रसिद्ध बागेतल्या कारंज्यांमधून व्होडकाचे फवारे उडत आहेत, अशी बातमी सर्वत्र हा हां म्हणता पसरली. मग ही चकटफू व्होडका पिण्यासाठी मोठी रांग लागली की ती रांग ११५ कि.मी. झाली होती! या कारंजातून येणाऱ्या पाण्यात व्होडकाच काय कुठल्याच मद्याचा लवलेशही नसल्याचं जाहीर करूनही लाखो रशियन पुरुष, महिला, मुलं त्या व्होडकाच्या बागेकडे मोठ्या आशेने धाव घेत होते. इतकंच नाही तर ते पाणी प्यायलेले लोक दारूच्या नशेत असल्यासारखंच झोकांड्या देत फिरत होते..
अशा मास हिस्टेरियाला परिस्थितीला ताळ्यावर आणणं किती कठीण असेल यांचीं फक्त कल्पनाचं करावी. मग आठवत गणपती दूध पितो ते, किंवा
येशूच्या डोळ्यातून येणारे अश्रू, कुंभमेळ्यात आशीर्वाद म्हणून पैसे उधळल्याने झालेली चेंगराचेंगरी.. मोहर्रममधील मातम करताना स्वतःला केलेल्या जखमा.. स्वाइन फ्ल्यूच्या साथीत कायद्याला न जुमानता रामराज्यातील दहीहंडी तसेच दुष्काळात आसाराम बापूंची पाण्याची नासाडी करणारी रंगपंचमी, आणि थाळ्या बदडवून ‘गो करोना गो’ म्हणत नाचत सुटलेली मंडळी ही सर्व मास हिस्टेरियाची उदाहरणे. सामाजिक समस्येच्या बाबतीत आळस, उदासीनता दाखवणारी लोक, धार्मिक गोष्टींच्या वेळी एका वेगळ्या उत्साहाने एकत्र येतात.
‘देऊळ’ हा सिनेमा ‘गणशत्रू’तील विषयाला पुढे नेणारा. देवाच्या नावाखाली चालणारा व्यवसाय, राजकारण, गांवकऱ्यांची मानसिकता याचं मार्मिक चित्रीकरण केलं आहे. त्यातील एक संवाद बघा. समाज कसा बनत चाललेला आहे, याचा नमुना.
अण्णा ( दिलीप प्रभावळकर) : भाऊ, अडचणी येतील तेव्हा देवाकडून बळ घ्यावं, उत्साह घ्यावा हे ठीक आहे. पण नुसत देव, देव करून त्याच एका व्यवसायात रूपांतर करणं आणि नवे प्रश्न निर्माण करणं हे ठीक नाही. आता तुम्ही म्हणता की विकास झाला पण तो कोणत्या पद्धतीचा झाला? सरसकट बेकायदेशीर गोष्टी करता आहात तुम्ही ! एक ना एक दिवस कायदा तुमच्यापर्यंत पोहचेल.
भाऊ (नाना पाटेकर) : अण्णा ! अल्याड आम्ही, पल्याड कायदा मध्ये भक्तांची मोठी रांग.. आमच्यापर्यंत पोहचायचं तर ती रांग ओलांडून यावं लागणार. ती ओलांडताना भक्तांच्या भावनेला धक्का नाही का लागणार?
आता सांगा जनतेचा शत्रू कोण?
राजकारणी? की धर्माची अफूची गोळी घेतलेली जनता?
डॉक्टर अशोक ही केवळ चित्रपटातील व्यक्तिरेखा नाहीये. अशी ध्येयनिष्ठ माणसं आहेत या जगात. त्यांनी गर्दीतलं एक होणं नाकारलं…काहींचा जीव अन्यायाशी लढतांना गेला तर काहींना विचारांचं उत्तर धर्मांध गोळीने दिलं..
डॉक्टर अशोक हे आपल्या विचारांवर ठाम राहातात. त्यासाठी द्यावी लागणारी किंमत मोजायला तयार असतात.
“मन सुद्ध तुझं गोस्ट हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची..”
अशाच ‘मन सुद्ध’ असलेल्या माणूसाची खरी गोष्ट, के. ए. रहमानची. १९९८ रोजी ग्रासीम उद्योगामुळे केरळमधील चलियार नदी प्रदूषित झाली होती. हजारो लोक जे त्या नदीचं पाणी पीत होते, त्यांना अनेक प्रकारचे त्वचा रोग, कॅन्सर, फुफ्फुसाचे रोग होऊन मरत होते. के.ए.रहमान यांनी त्याबाबत आवाज उठवला. ‘देशाच्या विकासाचा प्रश्न’ सांगून नेत्यांनी गावकऱ्यांना फितवलं. पण पुढे ‘रेयॉन’ कंपनीने सुद्धा नदीत सल्फर डाय ऑक्साईड आणि इतर विषारी वायू नदीत सोडले. टीबी, ब्रॉंकायटीस, कॅन्सर याचे प्रमाण वाढलं. लोकांचे अतोनात हाल व्हायला लागले. तेव्हा त्यांनी अथक मेहनतीने उग्र जनआंदोलन उभं केलं.. कंपनीला टाळं लागलं पण दूषित पाण्यामुळे रेहमान यांना आजारी पडले, हजारो लोकांसारखा रेहमान यांचाही बळी गेला.
असं का? हा प्रश्न विचारायची हिंमत किती जण दाखवतात?
यासाठी सत्यजित रे यांचा ‘गणशत्रू’ बनवण्यामागच्या तगमगीला सलाम करायला हवा.
सत्यजित रे यांना हृदयविकाराचा मोठा झटका येऊन गेलेला असतांना, वयाच्या ६८ वर्षी ‘गणशत्रू’ हा चित्रपट काढायची गरज वाटली? ३०-४० वर्षांपूर्वी वाचलेल्या नाटकाचं भारतीयीकरण करून लोकांपर्यंत का न्यावसं वाटलं? वाढती धर्मांधता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव यावर या संवेदनशील माणसाला का भाष्य करावंसं वाटलं? वयामुळे आलेल्या मर्यादा मान्य करून काढलेला हा चित्रपट तसा ‘दि ग्रेट सत्यजित राय’ फिल्म नाहीये. एखाद्या नाटकाचे चित्रीकरण वाटावं इतकं प्राथमिक आहे. पण तरी त्याचं महत्त्व कमी होत नाही. आपल्या आजोबाने थरथरत्या हाताने आपल्यासाठी काढलेलं चित्र हे पिकासो, व्हान गॉगच्या चित्रापेक्षा अनमोल वाटेल ना आपल्याला? आपण त्या चित्रातल्या चुका शोधत बसणार नाही! त्या मागील भाव लक्षात घेऊन आजोबांबद्दल ऊर भरून येईल ना!!
अगदी तसाच आहे हा चित्रपट!!
सत्यजित राय यांनी आपल्या आतल्या आवाजाला कायम प्राधान्य दिलं.
आपल्या कलाकृतीतुन निर्माण केलेल्या मानसपुत्र आणि मानसकन्या यांच्यात तो आवाज ओतला. म्हणून राय याचं व्यक्त होणं सुद्ध ..सुद्ध असतं..
एका ठिकाणी डॉक्टर अशोक आपल्या बायकोला विचारतात, “खरं सांग. तू तरी माझ्या बाजूने आहेस ना?”
त्यावेळी ती उत्तर देते, “तुम्ही मंदिरात येत नाही म्हणून मला पूर्वी खूप राग येत असे, पण आता समजतंय की या गोष्टींवर विश्वास नसलेला माणूसही सच्चा असतो..”
“कर्म करी जो अहेतू, त्याला वेद कळों ना कळों
ओळख पटली ज्याला स्वतःची, त्याला देव मिळो अथवा ना मिळो..”
देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म लेखिका व दिग्दर्शिका आहेत.
COMMENTS