मराठी ‘दुर्मीळ’  होऊ नये यासाठी….

मराठी ‘दुर्मीळ’ होऊ नये यासाठी….

मराठीला ‘शुद्धी’च्या संकल्पनेची लागण झाली, ती मुळात संस्कृतच्या प्रभावामुळे! संस्कृत व्याकरणाची सुरुवातच संस्कृत या भाषेची ‘शुद्धता’ टिकविण्याच्या हेतूने झालेली होती.

राज्यपाल नियुक्त सदस्य निवडः पवारांचा मोदींशी संवाद?
दिशा रवी टूलकिट : पोलिसांकडे एकही पुरावा नाही
गुजरातमध्ये कोविड मृतांबाबत लपवाछपवी

मराठीचे एक अभ्यासक अरूण फडके यांचे दु:खद निधन झाले. त्यांना भावपूर्ण आदरांजली!

चुकीच्या का होईना; परंतु एखाद्या ध्येयवादाने भारीत झालेले असणे ही बाब अलीकडच्या काळात दुर्मिळ झालेली आहे.

हो, दुर्मिळ शब्दावरून आठवले!

काही दिवसांपूर्वी आम्ही एक व्हाट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपचे प्रयोजन होते मराठीतील दुर्मिळ साधनांची मुक्तपणे देवाणघेवाण करणे आणि परस्परांचा ज्ञानसंग्रह समृद्ध करणे. ग्रुपला नाव देण्यात आले : “दुर्मिळ मराठी साधने”! या ग्रुपमधील एका मराठीप्रेमीने दुरुस्ती सुचविली: “दुर्मिळ”ऐवजी “दुर्मीळ”! आम्ही मराठीचे अध्यापन करीत नसलो तरी थोडीबहुत मायमराठीची सेवा आम्हीही करतो. थोडीबहुत मराठी आम्हालाही आकळते. त्यामुळे “दुर्मिळ”ऐवजी “दुर्मीळ” असे जेव्हा आम्हाला सूचविण्यात आले तेव्हा आम्ही चक्रावून गेलो! यासाठी दाखला देण्यात आला अरूण फडके यांचे कुठलेतरी पुस्तक!

आम्ही अरूण फडके यांचे कोणतेही पुस्तक वाचलेले नाही. वाचूही इच्छित नाही. मुळात, ‘शुध्दलेखन’ ही संकल्पनाच आम्हाला मान्य नाही. कोणतीही भाषा ही अनेक पद्धतींनी बोलता-लिहिता येते, यावर आमचा अढळ विश्वास आहे. भाषेत ‘शुध्दाशुद्धविवेक’ जोपासणे आणि समाजात स्पृश्यास्पृश्यभेद जोपासणे यात तत्त्वत: कोणताही फरक नाही, असे आम्हाला वाटते.

“दुर्मिळ” हा शब्द कसा लिहितात हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमच्याकडील तमाम शब्द्कोश उघडून बसलो. त्यांमध्ये वा. गो. आपटे (“शब्दरत्नाकर”), वसंत आबाजी डहाके (“शालेय मराठी शब्दकोश”), यास्मिन शेख (“मराठी लेखन मार्गदर्शिका”) आणि ह. अ. भावे (“वरदा मराठी शब्दकोश”) या शब्दकोशांमध्ये हा शब्द “दुर्मिळ” असा लिहिलेला आहे!

अरूण फडके यांनी मात्र संस्कृतचा दाखला देत “दुर्मिळ” अयोग्य आणि “दुर्मीळ” योग्य असा निर्वाळा दिला.

भाषा ही नियमानुचारी असावी की लोकानुचारी? अगदी संस्कृतचा अभिमान बाळगणार्‍या कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांनाही भाषेच्या वापरात लोकरूढी टाळता येणार नाही, असेच म्हणावे लागले.

भाषा ही वैविध्याने भारलेली आणि नटलेली असते तिच्या वापरात काहीही वैध अथवा अवैध असे नसते, यावरही आमचा विश्वास आहे. किंबहुना, सामाजिक भाषाविज्ञान याच तत्त्वावर आधारलेले आहे. पारंपरिक भाषाविज्ञानातील एककल्ली भाषाविचार बाजूला सारून विकास पावलेल्या सामाजिक भाषाविज्ञानाचे प्रयोजनच भाषेतील या वैविध्याचा अभ्यास करणे आणि भाषिक वैविध्य जोपासणे, हे राहिलेले आहे.

मराठीला ‘शुद्धी’च्या संकल्पनेची लागण झाली, ती मुळात संस्कृतच्या प्रभावामुळे! संस्कृत व्याकरणाची सुरुवातच संस्कृत या भाषेची ‘शुद्धता’ टिकविण्याच्या हेतूने झालेली होती.

प्राचीन भारतातील संस्कृत व्याकरणकारांपुढे इतर व्याकरण लिहिण्यामागील इतर अनेक प्रयोजनांव्यतिरिक्त एक प्रयोजन हे होते, की व्याकरणाद्वारे या व्याकरणकारांना संस्कृतमधील बारीक तपशीलांचे जतन करायचे होते. उदाहरणार्थ, पतंजलीने संस्कृत व्याकरणाच्या प्रयोजनाची चर्चा केली आहे. त्यांच्या मते, व्याकरणाच्या अध्ययनाची पाच कारणे आहेत. त्यांमध्ये वेदांचे संगोपन, वैदिक कर्मकांडांच्या सूत्रांचे भाषिक पुनर्संदर्भीकरण, धर्मग्रंथांमधील आज्ञांच्या आधारे धर्मनिष्ठेचे जतन करणे, भाषेचे अध्ययन सुलभ करणे आणि विश्लेषणातून उद्भवणार्‍या शंकांचे निरसण करणे.

सामाजिक भाषा वैज्ञानिक माधव देशपांडे यांनी असे मत व्यक्त केले आहे, की बल /आघात (accent), प्लुत स्वर (prolated vowel) आणि जुन्या शब्दांची अर्थपूर्णता ही संस्कृतची वैशिष्ट्ये ही पतंजलीच्या काळातच अरिष्टात सापडली होती. व्याकरणकारांनी असे मत मांडले होते, की संस्कृत व्याकरणाच्या अध्ययनातूनच ही वैशिष्ट्ये संस्कृतला प्राप्त करून दिली जाऊ शकतात.

प्राचीन भारतात भाषा ही ज्याप्रमाणे भाषिकाच्या सामाजिक दर्जाची निदर्शक होती, त्याचप्रमाणे ती भाषिकाचा सामाजिक दर्जा निश्चित करणारी व्यवस्थादेखील होती. पाणिनिने त्याच्या व्याकरणात भाषा – “बोलीची व्यवस्था” आणि छंद – “वैदिक संहितांची भाषा” यांमध्ये फरक केला. पाणिनिचा अष्टध्यायी हा ग्रंथ आर्य भाषेच्या वर्णनाचा प्रयत्न आहे. पाणिनिसाठी भाषा या संकल्पनेचा अर्थ हा उच्चवर्गीयांची भाषा असा होता; त्याने सामाजिक उतरंडीत कनिष्ठ स्तरावरील समूह बोलत असलेल्या इंडो-आर्यन व अनार्य भाषा यांना खालचा दर्जा दिला.

भाषाविज्ञानाच्या संदर्भात भारतातील एकोणिसावे शतक हे बव्हंशी प्राधिकारवादाचे (authoritarianism) आणि आदेशात्मकतेचे (prescription) शतक होते. या शतकात प्रमाण मराठीचे संकेतन (codify) करण्याचे कार्य हे व्याकरणाची पुस्तके, शब्दकोश, गद्यलेखन, पाठ्यपुस्तके आणि वाड.मयीन नियतकालिके यांच्या मुबलक निर्मितीतून साधले गेले. या सर्वांचा सूर हा प्राय: नियामक स्वरूपाचा होता. ज्याद्वारे सर्वसामान्य लोक भाषा कशी वापरतात याचे वस्तुनिष्ठपणे वर्णन करण्यापेक्षा भाषा कशी वापरली जावी, या संदर्भात मार्गदर्शन करण्याकडे अधिक होता.

एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात मराठी व्याकरण व्यवस्थितपणे व्याख्यांकित करण्याची गरज मराठी अभिजनांना भासण्याऐवजी वासाहतिक सत्ताधिशांना आधी भासली. आधुनिक मराठीची जी जडणघडण व्हायला या काळात सुरुवात होत होती, त्या जडणघडणीच्या प्रक्रियेबाबत जसे भाषिक नियोजनात गुंतलेले ब्रिटिश प्रशासक अनभिज्ञ होते तसेच एतद्देशीय आंग्ल-शिक्षित मराठी अभिजनही काहीसे अनभिज्ञ होते. तथापि, वासाहतिक राज्यसंस्थेला प्रमाणीकरण न झालेल्या देशीभाषा परवडणार्‍या नव्हत्या. कारण याच देशीभाषा पुढे चालून लवकरच वासाहतिक विचारप्रणालीच्या व्यापक प्रसाराच्या वाहकभाषा बनायच्या होत्या. म्हणून, या भाषांच्या प्रमाणीकरणाच्या प्रयत्नांना राजकीय दातृत्व बहाल करण्याची भूमिका वासाहतिक सत्ताधिशांनी घेऊन या प्रक्रियेत पुढाकार घेतला. भारतीय अभिजनांनी या प्रकल्पात भागिदारी केली.

भाषाशुद्धी व प्रमाण भाषांची चर्चा मराठीमध्ये रा. भि. गुंजीकर (?) यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘विविधज्ञानविस्तार’मधून सुरू केली. ‘विविधज्ञानविस्तारा’च्या पहिल्याच अंकात मराठी व्याकरणावर निबंध लिहून त्यांनी मराठीच्या व्याकरणाचे परीक्षण करण्यास सुरुवात केली. गुंजीकर एका बाजूला भाषेच्या स्वायत्ततेच्या तत्त्वाचा स्वीकार करतात; तर दुसर्‍या बाजूला भाषेतील वैविध्याकडे दुर्लक्ष करीत असेही प्रतिपादन करतात, की पुण्याची मराठी ही सर्वाधिक शुद्ध आहे. एखाद्या विशिष्ट प्रांतात राहणारा समूह हा स्तरीकृत नसून एकजिनसी आहे, असे गृहीतक अशा प्रकारच्या आकलनात आहे. म्हणजे, उदाहरणार्थ, पुण्यामध्ये राहणारे लोक हे सामाजिक / सांस्कृतिक / आर्थिक भेदांपासून मुक्त होते असे गृहीतक इथे अध्या­ऱ्हुत आहे. अशा आकलनात याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे, की विविध प्रदेशांमध्ये राहणार्‍या अभिजनांमध्ये एक प्रकारचे भाषिक साम्य असते. तथापि, आपल्या या भूमिकेशी विसंगत भूमिका घेवून गुंजीकर पुढे असेही प्रतिपादित करतात, की पुण्यामध्ये असेही लोक आहेत, की जे अशुद्ध मराठी बोलतात; तर मुंबई, सातारा, रत्नागिरी किंवा नाशिक इथे असेही लोक आहेत, की ज्यांच्या भाषेत कमालीचे साम्य आहे. अप्रत्यक्षपणे, ते असे सूचवितात, की विविध प्रदेशांमधील अभिजनांमध्ये भाषिक वैशिष्ट्ये ही सामायिक आहेत. अभिजनांच्या भाषिक विनीयोगातील हे सामायिकत्व, हे भाषेच्या प्रमाणीकरणासाठी उपयुक्त राहते. अशी प्रमाण भाषा ही या विविध प्रदेशांमधील अभिजनांसाठी एक प्रकारची संपर्कभाषा (lingua franca) बनते. अशाप्रकारे, प्रमाण भाषेच्या निश्चितीकरणामध्ये सामाजिक वर्गाची महत्त्वाची भूमिका असते, असेही ते सूचवितात.

संस्कृत विचारवंतांनी व्याकरणाला वेदांगांमध्ये स्थान देऊन भाषाशुद्धी हे या व्याकरणाचे प्रयोजन म्हणून निश्चित केले होते. मराठीच्या बहुतेक एतद्देशीय पंडितांनी मराठीच्या व्याकरणाचे प्रयोजन हे भाषाशुद्धी असे दिले आहे. उदाहरणार्थ, जगन्नाथशास्त्री क्रमवंत, गंगाधरशास्त्री फडके आणि बाळशास्त्री घगवे यांनी लिहिलेले पंडिती व्याकरण. या हस्तलिखीत ग्रंथात, “व्याकरण म्हणजे अर्थानुसंधानानें श्रुध्द आणि चांगले बोलायची विद्या होय,” असे व्याकरणाचे प्रयोजन सांगितले आहे. जगन्नाथ शास्त्री फडके यांनी ‘महाराष्ट्र भाषेचे व्याकरण’ (१८३६) या शीर्षकाने एक संहिता प्रसिद्ध केली. व्याकरणाच्या प्रयोजनाविषयी फडके लिहीतात, “व्याकरण म्हणजे अर्थाचे अनुसंधानाने शुद्ध बोलण्याची विद्या आहे…”. मराठी व्याकरणातील या ‘शुद्धाधुद्ध’विवेकाचे गारुड हे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत मराठी व्याकरणकारांवर होते.

अठराव्या शतकातील अनेक पौर्वात्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि भारतीय भाषांमधील संबंध कल्पिला. उदाहरणार्थ, बंगाली शिकलेला पहिला युरोपीयन असलेल्या नॅथॅनिएल हॅल्हेडने फार कटाक्षाने संस्कृत आणि बंगाली भाषांमधील संबंधांविषयी लिहिले. तो लिहितो, “पुढील काम हे संस्कृतातून बंगाली अशी निपजली हे स्पष्ट करते.” अनेक पौर्वात्यवादी भाषावैज्ञानिकांच्या प्रभावात अनेक युरोपीय व्याकरणकारांनी असे गृहीत धरले, की भारतीय देशीभाषा ह्या संस्कृतपासून उगम पावल्या. उदाहरणार्थ, मराठीचे पहिले महत्त्वाचे व्याकरण लिहिणाऱ्या विल्यम केरी यांनी संस्कृत भाषेच्या व्याकरणाच्या प्रस्तावनेत आणि पुढे चालून लिहिलेल्या तेलुगु व्याकरणाच्या प्रस्तावनेत हे स्पष्टपणे लिहिले, की हिंदी, तमीळ, तेलुगु, मलयाळम, गुजराती, मराठी वगैरी भाषांचे मूळ हे संस्कृत भाषेमध्ये आहे.

अनेक भारतीय भाषांसाठी जडणघडणीचा काळ असलेल्या या कालखंडात संस्कृत ही इतर भाषांसाठी एक प्रकारचे आदर्श प्रारूप बनली. दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८१४-८२) यांच्यासारखे इतर अनेक व्याकरणकार आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर (१८२४-७८) यांच्यासारख्या भाषावैज्ञानिकांप्रमाणे गुंजीकरदेखील (?) हे गृहीत धरतात की, मराठी ही संस्कृतोत्पन्न आहे. मराठी ही संस्कृतोत्पन्न आहे, या धारणेचा प्रभावापासून मुक्त असलेले अभ्यासक मराठीत अभावानेच आढळतात. भाऊसाहेब कुशारे आणि सुभाष कदम यांच्यासारख्या आजच्या पीढीच्या अभ्यासकांच्या विद्यापीठीय प्रबंधांमध्येदेखील ही धारणा बलवत्तर राहिली आहे. या धारणेपासून मराठी जेव्हा मुक्त होईल, तेंव्हाच मराठीचे भवितव्य उज्ज्वल असल्याची हमी आपल्याला देता येईल.

व्याकरणाचे व्यापक अध्यापन ही बाब आधुनिक काळाची उपज आहे. आधुनिक काळात शिक्षणाचा हक्क प्रस्थापित होत असताना व्याकरणाच्या अध्यापनातून वरच्या वर्गाच्या भाषाप्रकाराला अधिमान्यता दिली जाते आणि या भाषेच्या सक्तीच्या वापरातून मोठ्या वर्गाला ज्ञानवंचित ठेवले जाते. इंग्रजीचा इतिहास याची साक्ष देतो.

इंग्लंडमधील सामाजिक भाषा वैज्ञानिक ऑलिविया स्मिथ यांनी तपशीलवार अशी चर्चा केली आहे, की अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात भाषेविषयीच्या धारणा या मुख्यत: अभिजनवादी होत्या. या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा अभिजनेतर लेखक, हे लेखक म्हणून जेव्हा नव्या कारकिर्दीवर आपला दावा करू लागले तेंव्हा भाषा, शब्दकोश आणि व्याकरणांविषयीच्या सिद्धातांमध्ये प्रसंकेतन केलेल्या (encoded) संकल्पनांना संपूर्ण शक्तीनिशी पुढे आणल्या गेल्या. या काळात, ‘संस्कृती’ ही मुख्यत: अशी भाषिक संकल्पना होती, ज्यामध्ये शब्दसंग्रह (vocabulary) आणि वाक्यविचार (syntax) हे तथाकथित सुसंस्कृत आणि असंस्कृत यांच्यामधील भेद अधोरेखीत करणारे आकृतिबंध म्हणून पुढे आले.

या काळात इंग्लंडमध्ये व्याकरण शिकवणे, हा कोणत्याही अर्थाने लोकशाहीधिष्ठित व्यवहार नव्हता. व्याकरण अवगत असणे आणि ते अवगत नसणे हे वर्गविभाजनाचे प्राथमिक साधन बनले. व्याकरणाचे ज्ञान अशा ‘बोरोमॉंगर्स’ (सामंती/उमराव वर्ग) यांची मिरासदारी बनली होती, ज्यांनी हे ज्ञान हे केवळ व्याकरण शाळा (grammar schools) आणि विद्यापीठांपर्यंतच सीमित ठेवून गरीब विद्यार्थ्यांना व्याकरणापासून आणि पर्यायाने आधुनिक शिक्षणापासून वंचित ठेवले.

अठराव्या शतकात प्रमाण इंग्रजीची पायाभरणी करणारे रॉबर्ट लोवेथ यांचे इंग्रजीचे व्याकरण आणि डॉ. सॅम्युअल जॉन्सन यांचा इंग्रजीचा शब्दकोश हे याच अभिजनवादाचे नमूने होते. त्यांनी इंग्रजी भाषेतील वैविध्याकडे दुर्लक्ष करीत सुशिक्षित वर्गाच्या इंग्रजी भाषेच्या आधारे व्याकरण आणि कोश रचले.

मराठीलादेखील ही लागण आहेच. या भाषेला या शुद्धाशुध्दविवेकापासून वाचविले पाहिजे. त्यामुळे ज्यांना प्रमाण भाषा कौटुंबिक वारसा म्हणून मिळाली नाही आणि ही भाषा आवर्जून शिकावी लागली आणि तशी ती शिकूनही, जे केवळ आणि केवळ औपचारिक प्रसंगीच या भाषेचा जेमतेम वापर करू शकतात, त्यांनी भाषेतील शुध्दाशुध्दविवेकाला फशी पडू नये आणि आपली तुक्याची आणि जोतिबाची कास सोडू नये!

डॉ. दिलीप चव्हाण हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0