गांधी – आंबेडकर संवादाच्या वाटा

गांधी – आंबेडकर संवादाच्या वाटा

गांधी-आंबेडकर परस्परपूरकतेच्या भूमिकेएवढीच महाराष्ट्रात गांधी-आंबेडकर विरोधाचीही परंपरा प्रदीर्घ आहे. किंबहुना परस्परपूरकतेच्या भूमिकेपेक्षाही विरोधाची भूमिका अधिक प्रखरपणे मांडली गेली आहे. पुणे करार धिक्कार परिषदा नियमाने घडल्याचा इतिहास काही जुना नाही. त्यामुळे आज परस्परपूरकतेचा मुद्दा अनेक अभ्यासक, कार्यकर्ते आणि संघटना यांना महत्वाचा वाटत आहे ही बाब स्वागतार्ह असली तरी गांधी-आंबेडकर परस्परपूरकता कशासाठी आणि परस्पर पूरकतेच्या भूमिकेचा आशय काय हे विचारणेही आवश्यक आहे.

गेल्या पन्नासेक वर्षात महाराष्ट्रात पूरकता आणि विसंगती या दोन्हीप्रकारच्या ज्या भूमिका उदयाला आल्या त्यांचा साक्षेपी आढावा घेतल्यास महात्मा गांधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधांकडे अधिक प्रगल्भपणे पहाता येईल व आजच्या संदर्भात गांधी-आंबेडकर परस्परपूरकतेचा आशय काय असावा याचा विचार करता येईल.
प्रस्तुत लेखाच्या सुरुवातीला गांधी-आंबेडकर विरोध आणि पूरकता या दोन्ही संदर्भातील काही महत्वाच्या भूमिकांचा आढावा  घेतला आहे व शेवटी त्या पार्श्वभूमीवर आणि आजच्या संदर्भात गांधी-आंबेडकर परस्परपुरकतेचा आशय काय असावा याची चर्चा केली आहे.
गांधी-आंबेडकर यांच्यातील शत्रुभाव:
गांधी आणि आंबेडकर यांच्या नेतृत्वाच्या स्वरूपातील फरक स्पष्ट करणारा लेख जेष्ठ अमेरिकन अभ्यासक एलिअनॉर झेलीयट १९७२मध्ये लिहिला.[१] गांधी – आंबेडकर वादाची सविस्तर चर्चा करणारा लेख प्रा. एस. एम. दहिवले यांनी १९७९मध्ये समाज प्रबोधन पत्रिकेत लिहिला.[२] अस्पृश्यता निर्मुलनाच्या संदर्भात गांधींच्या भूमिकेत त्यांना काही ठळक मर्यादा जाणवत असल्याचे ते या लेखात नोंदवतात. ही भूमिका पुढे गेल ऑम्वेद्त[३] आणि प्रतिमा परदेशी[४] यांच्या लेखनातही पहायला मिळते. जातीनिर्मूलानासाठी गांधींच्या सुधारणावादाला काही अंगभूत मर्यादा होत्या अशी भूमिका त्या मांडतात. या अभ्यासपूर्ण लेखांव्यतिरिक्त इतरही अनेक पुस्तिका लेख आणि भाषणातून गांधी आणि आंबेडकर यांचे नाते परस्परपूरक असणे अमान्य केले गेले आहे. पुढे जाऊन हे नाते शत्रुभावीच आहे असाही सूर यापैकी अनेकांच्या लेखनात आहे. विरोधाची भूमिका घेणाऱ्या या लेखनाचा साधारण गोषवारा मांडायचा तर तो पुढील मुद्द्यांच्या आधारे सांगता येईल.
१. गांधी वर्णाश्रम धर्माचे समर्थक होते त्यांना अस्पृश्यता निवारण करून हिंदू धर्मावरील कलंक घालवायचा होता. या उलट आंबेडकरांची भूमिका ही जातीनिर्मूलनाची होती. निव्वळ अस्पृश्यता निर्मूलन करून जाती व्यवस्था नष्ट होणार नाही हे त्यांचे मत होते. जातीभेद आणि अस्पृश्यतेला हिंदू धर्म अधिमान्यता पुरवतो हे डॉ. आंबेडकरांचे म्हणणे होते.
२. गांधी भूतदयावादी होते. त्यांनी वापरलेला हरिजन हा शब्द हा याच भूतदयावादाचा आणि त्याद्वारे त्यांनी आखलेल्या राजकीय रणनीतीचा निदेशक आहे. याउलट आंबेडकरांना दया नव्हे हक्क हवे होते. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांसाठी हरिजन किंवा तत्सम काही दयानिदर्शक शब्द वापरणे त्यांना नामंजूर होते.
३. गांधींच्या दृष्टीने जातीचा प्रश्न हा धार्मिक / धर्मसुधारणेचा प्रश्न होता तर आंबेडकरांसाठी हा राजकीय प्रश्न होता. केवळ मंदिर खुले करून किंवा सहभोजनातून हा प्रश्न सुटेल अशी त्यांना वाटत नव्हते. पूर्वाश्रमीचे अस्पृश्य हे राज्यकर्ते व्हायला हवेत ही त्यांची भूमिका होती.
४. गांधी स्वतःला सनातनी हिंदू म्हणत असत तर बाबासाहेबांनी ‘हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही’ अशी प्रतिज्ञा केली होती व  ‘सारा भारत बुद्धमय करेन’ असा संदेश दिला होता.
५. गांधी खेड्याकडे चला म्हणत तर आंबेडकर शहराकडे चला म्हणत. गांधींना ग्रामोद्योगप्रधान विकेंद्रित अर्थरचना अपेक्षित होती तर आंबेडकरांना आधुनिक यंत्रोद्योगप्रधान शहरी राज्य समाजवादाची रचना अभिप्रेत होती.
६. आंबेडकरांना पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हवे होते गांधींनी ते नाकारले. गोलमेज परिषदेसाठी डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व असताना आपण सर्वांचे प्रतिनिधी आहोत हा दावा गांधींनी केला. राष्ट्र बांधणीसाठी गांधींनी सर्व शोषित वर्गाप्रमाणे दलितांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात समतेपेक्षा वासाहतिक शक्तींच्या विरोधात व्यापक गटबंधन उभारण्याची निकड अधिक होती.
या आणि यासारख्या इतर काही कारणांमुळे गांधी-आंबेडकर यांचे विचार, नेतृत्व आणि राजकारण परस्पर विरोध असल्याची भूमिका वर उल्लेख केलेल्या अभ्यासकांनी घेतल्याचे दिसते. अर्थात या भूमिकेएवढीच गांधी-आंबेडकर परस्परपूरकतेची अतिशय ताकदीने मांडणाऱ्या विचारवंतांची फळीदेखील महाराष्ट्रात आहे.
गांधी-आंबेडकर परस्परपूरकता:
मराठीत गांधी-आंबेडकर संवादाची गरज सर्व प्रथम प्रा. गं. बा. सरदार[५] यांनी मांडली. पुढे प्रा. नरहर कुरुंदकरही आपल्या भाषणातून ही भूमिका मांडत असत. गांधी-आंबेडकर संघर्ष संपविण्याची गरज मुद्देसूदपणे १९९५मध्ये प्रा. यशवंत सुमंत[६] आणि प्रा. सुहास पळशीकर[७] यांनी मांडल्याचे दिसते. अलीकडच्या काळात पन्नालाल सुराणा, किशोर बेडकीहाळ, डॉ. रावसाहेब कसबे आदी अभ्यासक-कार्यकर्ते परस्पर पूरकतेची  भूमिका आग्रहाने मांडत आहेत. गांधी-आंबेडकर परस्परपूरकतेची भूमिका जनमानसात पोहोचविण्यासाठी प्रा. यशवंत सुमंत यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. २००१ पासून सर्वोदयवाद्यांची वैचारिक शिबिरे घेऊन त्यांना आंबेडकरांचे विचार समजावून सांगण्याचे काम त्यांनी अथकपणे केले याचे निष्पत्ती २००९मध्ये ‘महात्मा ते महात्मा समता पदयात्रेत’ झाली. समतेच्या प्रश्नावर महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार एकत्रितपणे झाला पाहिजे ही भूमिका घेत प्रा. सुमंत यांच्या वैचारिक मार्गदर्शनाखाली व आबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा महात्मा फुले जयंतीच्या दिवशी फुले वाड्यातून निघाली. यात महडच्या चवदार तळ्यातील पाणी आणि फुले वाड्यातील हौदातील पाणी असलेली कावड होती. सुमारे ८५० कि.मी. अंतर पायी चालत सर्वोदयी कार्यकर्ते २८ फेब्रुवारी रोजी वर्धेतील बापू कुटीत पोहोचले. तिथे या पाण्याने सिंचन करत त्यांनी समता वृक्ष लावला आणि विषमता निर्मूलनाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ४४ समतावादी संघटना या मोहिमेत सहभागी होत्या. गांधी-आंबेडकर परस्परपूरकतेच्या संदर्भात विचार मंथन घडवून आणण्यात या अभियानाने भरीव कामगिरी केल्याचे दिसते.
वर उल्लेख केलेल्या अभ्यासकांच्या लेखनातून तसेच या महात्मा ते महात्मा समता पदयात्रेतून गांधी-आंबेडकर परस्परपूरकतेविषयी जी भूमिका पुढे आली तिचा गोषवारा खालीलप्रमाणे मांडता येईल.
१) गांधी-आंबेडकर परस्पर संबंधांचा विचार केवळ पुणे कराराच्या संदर्भात करून चालणार नाही. पुणे करार हा वासाहतिक राजकारणातील रणनीतीचा एक भाग होता. त्यासंदर्भात घेतलेल्या भूमिका हा गांधी विचाराचाही गाभा नाही आणि आंबेडकरी विचाराचाही गाभा नाही. गांधींनी स्वतंत्र मतदार संघाला विरोध केला असला तरी दलितांना प्रतिनिधित्व मिळण्याला विरोध केला नव्हता. स्वतंत्र मतदारसंघामुळे दलित समाज  मुख्य प्रवाहापासून तुटला गेला असता, अलग पडला असता. त्यांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे आणि ते इतर समाजापासून अलग ही पडू नयेत ही गांधींची भूमिका होती. आंबेडकरांनीही १९३०च्या दशकात स्वतंत्र मतदारसंघाची भूमिका घेतली असली तरी  पुढे संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत स्वतंत्र मतदारसंघाच्या भूमिकेचा आग्रह धरला नाही. राखीव जागांचा पर्याय मान्य होता व तिच १९३२ पासून गांधींचीही भूमिका होती.
२) गांधी हृदयपरिवर्तनाचा आग्रह धरत होते हे खरे असले तरी जातीचा प्रश्न केवळ सवर्णांच्या  भूतदयेच्या आधारे सोडवावा अशी त्यांची भूमिका नव्हती. जातीनिमूर्लनाची प्रक्रिया हे केवळ एका दिशेने प्रयत्न करून पूर्ण होणार नाही अशी त्यांचे म्हणणे होते. हक्कांना केवळ कायद्याचा आधार पुरेसा नसतो तर त्याविषयीची व्यापक सहमती आवश्यक असते तरच हक्कांचा उपभोग सहजतेने घेता येतो. सवर्णांच्या सतसदविवेकबुद्धीला आवाहन करून गांधी दलित-शोषित वर्गाच्या हक्कांविषयी व्यापक सहमती निर्माण करू पाहत होते. त्याचबरोबर शोषणमुक्तीची गरज ही केवळ शोषितालाच नसते, शोषणाला कारणीभूत ठरणाऱ्या प्रस्थापिताची मुक्तीची शक्यता  शोषण करण्यास नकार देण्यातून निर्माण होते. मुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी शोषिताला हक्काची आठवण आणि प्रस्थापिताला कर्तव्याची आठवण करून देणे गरजेचे असते. बाबासाहेब दलित-शोषित-अवर्ण समाजाला आत्मसन्मान आणि हक्काची दीक्षा देत होते तर गांधी प्रस्थापित सवर्ण समाजाल त्याच्या चुकांची जाणीव करून देऊन माणूस म्हणून असलेल्या कर्तव्याची आठवण  करून देत होते. दोघेही वेगेवेगळ्या सामाजिक स्थानावरून शोषण मुक्तीची प्रक्रिया दृढ करू पहात होते.
३) गांधींची ‘खेड्याकडे चला’ ही  हाक आहे त्या खेड्यांच्या पुनरुज्जीवनासाठी दिलेली हाक नव्हती तर सर्वांना खात्रीशीर रोजगार, सन्मान आणि समानता पुरवणाऱ्या त्यांच्या कल्पनेतील आदर्श गावाच्या निर्मितीमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेली हाक होती. गांधींची ग्रामीण अर्थव्यवस्था ही पाश्चात्य भांडवली यंत्रकेंद्री अर्थव्यवस्थेतून होणारे शोषण नाकारू पहाणारी अभिनव कल्पना होती. तिचा आशय निव्वळ नैतिक नसून भौतिक होता. ती पूर्वगौरवात रममाण होणारी नव्हती तर ते एक नवे सर्जन होते. भांडवली यंत्रकेंद्री अर्थव्यवस्थेतून येणारी परात्मता, कामगारांच्या वाट्याला येणारे शोषण, यांत्रिकता, असुरक्षितता आणि  शहरातील बकाल जीवन यासर्वावर मात करू पहाणारी अशी ती एक व्यवस्था होती. त्यात सर्व श्रमजीवींना साधनसामुग्रीवर समान अधिकार होता. त्यामुळे गावातील बंदिस्तपणा व त्याद्वारे जातीव्यवस्था जपण्याचा तो काही छुपा कावा नव्हता.
४) जातीव्यवस्थेविषयीचे गांधींचे आकलन आंबेडकरांमुळे बदलले. जातीनिमूर्लन म्हणजे फक्त अस्पृश्यता निवारण अशी भूमिका त्यांनी कधीही घेतली नाही. जातीनिर्मूलनासाठी मंदिर प्रवेशाचा मार्ग गांधींनी सुचवला नव्हता. ज्या गांधीवाद्यांनी मंदिर  प्रवेशाचे मार्ग स्वीकारले त्यांना गांधींनी विरोध केला नाही हे खरे असले तरी जातिनिर्मूलनासाठी अधिक गंभीर पावले उचलायला हवीत याची त्यांना जाण होती. जातीवर आधारित अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल करणे, जातींना बंदिस्त करणाऱ्या विवाह संस्थेत बदल घडवून आणणे, श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या भावनेचे मुळापासून उच्चाटन करणे यासाठी त्यांनी काही अभिनव मार्ग स्वीकारले. उदाहरणार्थ, ग्रामसफाईचे काम हाती  घेण्यामागे शरीर श्रमाला प्रतिष्ठा देण्याची भूमिका तर होतीच त्याच बरोबर  सफाई कामगाराने सफाईचेच काम करावे किंवा इतर जातीनिहाय व्यवसाय त्याच जातीला करायला लावण्याला विरोधही होता. त्यामुळे सफाई, सूतकताई, बुनाई, मेलेल्या जनावराचे चामडे काढणे, कमावणे व त्यापासून वस्तू बनवणे, तेल घाणी चालवणे अशी अनेक कामे करणे हे गांधींच्या आश्रामजीवनाचे सूत्र होते. पिढ्यानपिढ्या एकच व्यवसाय केल्याने निर्माण झालेले कौशल्य काळाच्या ओघात विशेषतः यांत्रिकीकरणात नष्ट होऊ नये यासाठी ते जतन करणेही त्यांना आवश्यक वाटले. कौशल्य जपण्यासाठी जात टिकविण्याचा आग्रह त्यांनी धरला नाही. अखिल भारतीय ग्रामोद्योग संघाच्या माध्यमातून गांधींनी पारंपारिक कौशल्ये जतन करण्याचे व त्या कौशल्याचे प्रशिक्षण सर्वांना उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले. सवर्णांनी शरीरश्रमाची आणि घाण समजली गेलेली कामे केले पाहिजेत हा त्यांचा आग्रह होता व गांधीच्या आश्रम जीवनाचा तो अविभाज्य भाग होता. आयुष्याच्या उत्तरकाळात विवाह जर आंतरजातीय नसेल आणि जोडप्यातील एकजण जर दलित नसेल तर गांधी त्या विवाह समारंभाला उपस्थितच रहात नसत. यासारख्या बाबी लक्षात घेतल्या तर गांधींचा जतिनिर्मूलनाचा मार्ग आंबेडकरांपेक्षा वेगळा असला तरी पूरक होता हे ध्यानात येते.
५) बाबासाहेब संविधान समितीत आणि मुख्य म्हणजे मसुदा समितीत हवेत हा गांधींचा आग्रह होता. त्यामुळे बाबासाहेबांचे नेतृत्व नाकारण्याचा त्यांनी प्रयत्न केला असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल.  पुणे कराराच्या वेळी घेतलेली गांधींची भूमिका ब्रिटीश वसाहतवाद्यांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीला शह देण्यासाठी उचलावे लागलेले पाउल होते. याचा अर्थ त्यांना आंबेडकरांचे नेतृत्व सदासर्वकाळ अमान्य होते असे नव्हे.  डॉ. आंबेडकर यांनीही गांधी आणि कॉंग्रेस यांच्या नीतीचा विरोध करणारे लेखन केले असले तरी देश स्वतंत्र झाल्यानंतर नव्या राष्ट्राची उभारणीच्या समता, न्याय, बंधुभाव आणि स्वातंत्र्याच्या पायावर व्हावी यासाठी अलगाववादापेक्षा सहकार्याची भूमिका स्वीकारली. राजकारणाच्या ओघात घ्याव्या लागलेल्या भूमिका आणि व्यापक मूल्यात्मक भूमिका यात फरक केला तर गांधी – आंबेडकर परस्पर पूरकता स्पष्ट होऊ शकते.
समकालीन आव्हानांच्या संदर्भात गांधी आणि आंबेडकर:
आज गांधी आणि आंबेडकर दोघांनाही हिंदूत्व विचाराचे सुप्तावस्थेतील समर्थक म्हणून पेश केले जात आहे. गांधींचे ‘मी  सनातनी हिंदू आहे’ म्हणणे, वर्णाश्रम धर्माचे समर्थन करणे, आपला धर्म सोडून कोणत्याही दुसऱ्या धर्माचा स्वीकार करण्याविषयी आक्षेप घेणे,  गोरक्षणाचा आग्रह धरणे यासारख्या बाबींचा संदर्भ डावलून आणि त्याविषयीची समग्र भूमिका बाजूला ठेवून गांधींना हिंदू समर्थक म्हणून पेश केले जात आहे. दुसरीकडे डॉ. आंबेडकर यांनी इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्माचा स्वीकार न करता याच मातीतील बौद्ध धर्माचा स्वीकार केला याची वारंवार आठवण देऊन, बुद्धाला विष्णूचा दहावा अवतार ठरवून आणि आंबेडकरांची पाकिस्तानविषयीची मते अर्धवट उद्धृत करून आंबेडकरांनाही हिंदू हितचिंतक म्हणून सादर केले जात आहे. अशा टप्प्यावर गांधी-आंबेडकर परस्पर पूरकतेचा आशय काय असू शकतो?
रूढीपरंपरांनी ग्रासलेल्या माणसाचे माणूसपण नाकारणाऱ्या प्रचलित हिंदू धर्माविषयी गांधी आणि आंबेडकर दोघेही असमाधानी आहेत. गांधींचा हिंदू धर्म हा प्रचलित हिंदू धर्म नव्हे. गांधींचा राम हा कोदंडधारी राम नाही तर तो मर्यादापुरुषोत्तम राम आहे. गांधी प्रार्थनेला महत्व देत परंतू त्यांच्या एकाही आश्रमात त्यांनी मंदिर उभारले नाही आणि आश्रमातील प्रार्थना ही सर्वधर्म प्रार्थना असे. गांधी गीतेला आदर्श मानत मात्र गीतेचा आशय अनासक्ती आहे हे त्यांचे म्हणणे होते. गीतेचा संदेश हिंसा नाही व  जर गीता हिंसा शिकवत असेल तर मी गीता नाकारतो असेही त्यांनी अनासक्ती योग या पुस्तकात लिहून ठेवले आहे. गांधी गोरक्षणाचे समर्थक होते मात्र त्याची सक्ती करणे किंबहुना त्यासाठी कायदा करणेही त्यांना मान्य नव्हते. ज्या दिवशी गोरक्षणाचा कायदा करावा लागेल तो मी माझा पराभव समजेन असे त्यांनी हरिजन पत्रात लिहिले आहे. गोरक्षणापेक्षा गो-सेवेला गांधींनी महत्व दिले व मेलेल्या गोवंशाचे कातडे कमावणे हा त्यांच्या गो-सेवेचा अंगभूत भाग होता. त्यामुळे आहे त्या स्वरूपात हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे असे गांधी मानत नव्हते हे ध्यानात घ्यायला हवे. देव चराचरात भरला आहे, तो झाडावेलीत, पशुपक्ष्यात आणि प्रत्येक जिवंत माणसात आहे हा मानणारा, विश्वाची एकता सांगणारा हिंदू धर्म गांधींना अभिप्रेत  होता. हिंदू धर्माचे हे उन्नत रूप प्रकट करण्यासाठी हिंदू धर्माचे पाईक असणाऱ्यांनी आपल्या चालीरीती, जीवनपद्धती आणि मनोधारणा बदलण्याची नितांत गरज गांधींना वाटत होती. त्यासाठी धर्मपंडित किंवा पुरोहित वर्ग सांगत असलेल्या आशयापेक्षा स्वतःच्या सतसदविवेकबुद्धीला स्मरून धर्माचरण करण्याचा आग्रह त्यांनी वारंवार धरला.
डॉ. आंबेडकरांनीही ‘रिडल्स इन हिंदूइझम’ मध्ये हिंदू धर्माचे तत्वज्ञान आणि व्यवहार यात अंतर असल्याचे नोंदवले आहे. ब्राह्मणी धर्माचा उदय त्यांच्या मते हे अंतर निर्माण होण्याचे कारण होते. ब्राह्मणी धर्माने श्रेणीबद्धतेचे समर्थन केले. कर्मविपाकाचा सिद्धांत सांगून आहे ही श्रेणीबद्ध व्यवस्था विनातक्रार स्वीकारणे बंधनकारक केले. त्यामुळे हिंदू धर्माचे तत्वज्ञान आणि व्यवहार यात कायमच फारकत राहिली. तत्वज्ञान आणि व्यवहार यातील अंतर कमी करण्याला हिंदू धर्माच्या अनुयायांची तयारी नाही हा महडच्या सत्याग्रहापासून ते काळाराम मंदिर सत्याग्रहापर्यंत त्यांचा अनुभव होता. त्यामुळे शोषण नाकारण्यासाठी आणि समतेचा हक्क बजाविण्यासाठी हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी अपरिहार्य ठरले. प्रज्ञा, करुणा आणि मैत्री या मुल्यांवर आधारलेला बौद्ध धम्म स्वीकारणे, नवयानाची स्थापना करणे हा वर्षानुवर्षे प्रतिष्ठा नाकारलेल्या समाजाच्या आकांक्षांना नैतिक अधिष्ठान पुरविण्यासाठी त्यांनी उचलेले पाउल होते. हा हिंदू धर्म सुधारणेचा प्रयत्न नव्हता.
आजच्या काळात गांधी-आंबेडकर एकत्र आणताना हिंदू धर्मासंबंधीच्या या भूमिकांचे वेगळेपण आणि त्राएही त्यात असलेली अनुरूपता ध्यानात घ्यायला हवी. हिंदू धर्म सुधारणेचा किंवा ‘विवेकाचा आवाज बुलंद करण्याचा’ आग्रह धरला की ‘तुम्ही फक्त हिंदूंवरच टीका करता, मुसलमानांतील कुप्रथांविषयी बोलत नाही, त्यामुळे इथल्या हिंदू-ओबीसी समाजाच्या आकांक्षांना न्याय देत नाही’ अशा प्रकारचा कांगावा जे करतात त्यांना गांधी आणि आंबेडकर दोघांच्याही हिंदू धर्माविषयीच्या  या भूमिकेचे स्मरण करून देणे गरजेचे आहे व इथे गांधी आणि आंबेडकर यांचे एकत्रित वाचनही आवश्यक आहे. गांधींच्या दृष्टीनुसार जर हिंदू धर्म आपले उन्नत रूप प्रकट करणार नसेल तर आंबेडकरांच्या विचारानुसार त्याचा त्याग करून अधिक विवेकशील, न्याय्य धर्माचा स्वीकार अपरिहार्यच ठरणार. हिंदू धर्माची पाठराखण म्हणजे त्यातील कुप्रथांचे, अंधश्रद्धेचे आणि ब्राह्मणी व्यवस्थेचे समर्थन नव्हे किंवा हिंदू धर्मात सुधारणेला काहीच वाव नाही, तो मुळातच महान आहे अशी भलावण करणे नव्हे.  हिंदू धर्माविषयी प्रेम असणाऱ्यांनी हिंदू धर्म अधिकाधिक उन्नत बनविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यातील कुप्रथांचे आणि ब्राह्मण्याचे समर्थन करणाऱ्यांना हिंदू विरोधी मानणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्यांना हिंदू धर्मात राहायचे आहे व त्याला अधिक उन्नत बनवायचे आहे त्यांचा तो अधिकार मान्य करणे हे आंबेडकरी विचाराचे पाईक असणाऱ्यांसाठी गरजेचे आहे. हिंदू धर्मसुधारणेची भूमिका घेणारा प्रत्येकजण हा आपला छुपा किंवा उघड शत्रूच आहे असे मानणे म्हणजे भारतीय समाजातील बहुसंख्याकांच्या धर्मात सुधारणा होण्याची शक्यता नाकारणे ठरेल. ‘सारा भारत बुद्धमय करेन’ याचा अर्थ बुद्ध धम्माच्या मूल्यांचा अंगीकार की केवळ कागदोपत्री धर्मांतर याचाही गंभीरपणे विचार व्हायला हवा.
गांधी-आंबेडकर परस्पर पूरकतेचा आग्रह धरताना परिवर्तनाच्या प्रक्रियेत प्रस्थापिताच्या भूमिकेचाही नव्याने विचार करायला हवा. ‘सामाजिक परिवर्तनाची निकड ही फक्त व्यवस्थेचे बळी ठरलेल्या शोषितांनाच असते, व्यवस्थेचा फायदा मिळालेली  प्रत्येक  व्यक्ती ही व्यवस्थेची छुपी समर्थकच असते’ या भूमिकेचा पुनर्विचार व्हायला हवा. आपल्याला मिळणारा व्यवस्थेचा लाभ हा शोषणाचा परिणाम आहे आणि जरी हा लाभ तात्कालिक सुख देत असला तरी त्यात आपण आपले माणूसपण गमावत आहोत याची जाणीव माणसाला आपले परंपरागत लाभ सोडून द्यायला तयार करू शकते ही गांधीवादी धारणा आणि अनुभूती आहे. मात्र प्रस्थापिताच्या नेणिवेत केवळ छुपे ब्राहमण्य किंवा व्यवस्था समर्थनच असते असे गृहीत धरून त्याच्या प्रत्येक कृतीकडे संशयाने बघणे हे एकूण समतेच्या प्रस्थापनेसाठी मारक ठरते याची जाण गांधी-आंबेडकरांना एकत्र आणताना ठेवायला हवी. गांधी हे जातीव्यवस्थेचे लाभार्थी होते तर आंबेडकर हे जातीव्यवस्थेचे बळी होते. आंबेडकर व्यवस्थेला बाहेरून प्रश्न विचारत होते, गांधी व्यवस्थेला आतून हादरे देऊ पहात होते. आपापल्या सामाजिक स्थानानुसार संघर्षाचे आयाम बदलतात व बदलणार याचे भान ठेवले तरच या दोन्ही विचार परंपरा एकत्र आणणे उपकारक ठरेल. गांधींनी सुचविलेले मार्ग व्यवस्थेचे बळी ठरलेल्यांना स्वीकारायला लावणे त्यांना स्वतःलाच अभिप्रेत नव्हते, आता तसा आग्रह धरणे हे गांधी आणि विषमता निर्मूलन दोन्हीसाठी अन्यायकारक ठरेल याची आठवण येथे गरजेची आहे. गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांचे वाचन त्यांच्या काळाच्या संदर्भात आणि इतिहासाने त्यांना ज्या सामाजिक स्थानावर बद्ध केले होते त्या स्थानाच्या संदर्भात केले तर समताधिष्टीत समाजाच्या निर्मितीसाठी त्यांच्या भूमिका पूरक ठरू शकतात.

संदर्भ:

[१] Zelliot, Elenor. (1972) “Gandhi and Ambedkar: A Study in Leadership” in J Michale Mahar. The Untouchables in Contmporary Intdia. Tuscon: University of Arizona.

[२] दहिवले, एस. एम. (१९७९) “गांधी-आंबेडकर वाद: अस्पृश्यता-निर्मूलनविषयक भूमिकांचे मूल्यमापन” समाज प्रबोधन पत्रिका वर्ष १६ अंक ३० मे-जून १९७२ पृ. १७५-१९७

[३] Omvedt, Gail. (1994) Dalits and Democratic Revolution: Dr Ambedkar and Dalit Movement in Colonial India. New Delhi: Sage

[४] परदेशी, प्रतिमा. (१९९६) डॉ. आंबेडकर आणि स्त्री-मुक्ती. स्त्री अभ्यास केंद्र, पुणे विद्यापीठ, पुणे.

[५] सरदार, गं. बा. (१९८७) गांधी आणि आंबेडकर. सुगावा प्रकाशन, पुणे.

[६] सुमंत, यशवंत. (१९९५) “गांधी-आंबेडकर: ‘कृतकसंघर्ष’ संपविण्याच्या दिशा” समाज प्रबोधन पत्रिका क्र. १३०. जाने-मार्च १९९५.

[७] पळशीकर, सुहास. (१९९५) “गांधी आणि आंबेडकर यांची चर्चाविश्वे: शत्रुभावी की मित्रभावी” समाज प्रबोधन पत्रिका क्र. १३०. जाने-मार्च १९९५.

डॉ. चैत्रा रेडकर श्री. ना.दा.ठा. महिला विद्यापीठ, मुंबई येथे राज्यशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापिका आहेत.

COMMENTS