गांधी का मरत नाही : गांधींवरची कोळीष्टकं दूर करण्याचा प्रयत्न

गांधी का मरत नाही : गांधींवरची कोळीष्टकं दूर करण्याचा प्रयत्न

भारतीय समाजातील कलकत्ता, मुंबई, मद्रासच्या परिसरातील उच्च्भू लोकांच्या आशा आकांक्षांभोवती पिंगा घालणा·या स्वातंत्र्य आंदोलनास म. गांधीनी द. आफ्रिकेतून भारतात आल्या आल्या बिहारच्या चंपारण्य सारख्या मागास भागातील अन्न्यायपिडित भू - कंगाल अवस्थेतील शेतक·यांच्या प्रश्नांशी थेट भिडविले.

भाजपचे काही कट्टर हिंदुत्ववादी उमेदवार पराभूत
क्रौर्याचा अहवाल
शैलीदार आद्यनायक

आत्यंतिक प्रेम, भक्ती आणि तेवढाच टोकाचा व्देष, असा परस्पर विरोधी भावनातिरेक गेल्या शतकभर भारतात जर कोणाच्या वाट्याला आला असेल, तर ते दोन महापुरूष! म्हणजे एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे महात्मा गांधी हे होत. दोघांच्या संघर्षरेषा भिनअसल्या तरी संघर्षकाळ मात्र एकच. एकाच्या व्यक्तिमत्त्वात संतत्वाच्या आड विद्रोहाच्या ठिणग्यांनी प्रकाशाचा खेळ मांडला. तर दुसऱ्याचे व्यक्तिमत्व म्हणजे विद्रोहाचा धगधगता ज्वालामुखी.

महात्मा गांधी यांना भारतीय जनमानसाचे अत्यंतिक प्रेम आणि भक्ती वाट्याला यावी यात फारसे नवल नाहे. येथील वृत्तीच मुळात आध्यात्मशरण! म. गांधींमध्ये भारतातील सर्वसामान्य जनतेला अपरिग्रह वृत्तीच्या संताची लक्षणे ओतप्रेत भरलेली दिसत असावीत. अशा  व्यक्तिमत्त्वाच्या संतत्वाच्या चुंबकत्वात ओढल्या गेलेल्या लोकांची संख्या भारतात सर्वकाळ मोठीच राहिली आहे. परंतु म. गांधींतील संतच खरा असेल, त्यांच्या हृदयातील माणसाविषयीचा कळवळा निर्मळ असेल, तर मग त्याच व्यक्तिमत्त्वाच्या वाट्याला समाजातील काही घटकांकडून का असेना, पण तेवढाचं धारदार व्देष का यावा? कुत्सित कुजबुजीने या लखलखित महात्म्याचे महात्म्य काळवंडून टाकण्याचा प्रयत्न का केला जावा?

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे शेवटचे पर्व आपल्या कार्यकर्तृत्वाने भारून टाकणारा हा महात्मा कोणाच्या हित संबंधाआड आला असेल? ज्यामुळे या महानायकाचा अंत छातीवर गोळ्यांचा वर्षाव झेलून व्हावा. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक यशस्वी प्रयत्न म्हणजे नुकतेच मनोविकास प्रकाशन, यांनी प्रकाशित केलेले चंद्रकांत वानखडे लिखित ‘गांधी का मरत नाही’, हे पुस्तक होय.
महाराष्ट्रांच्या सामाजिक जीवनात चंद्रकांत वानखडे, हे अभ्यासू शेतकरी आंदोलक, संपादक, लेखक म्हणून ओळखले जातात. गांधी, आंबेडकर व्हाया जयप्रकाश नारायण, असा प्रवास करणाऱ्या या लेखकाने, सामाजिक चळवळींत झोकून देऊन काम करणाऱ्या अनेक संवेदनशील कार्यकर्त्यांचे जाळे महाराष्ट्रभर उभे केले आहे. गांधी हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. गांधी हा डोक्यावर घेऊन नाचायचा नव्हे, तर डोक्यात ठेऊन तो आपल्या जगण्याला जोडण्याचा विषय असल्याची त्यांची भूमिका. गेल्या दशकभरात त्यांनी महाराष्ट्रभर विविध वृत्ती-प्रवृत्ती आणि वयोगटाच्या लोकांसमोर गांधींवर शेकडा व्याख्यानं दिली आहेत. गांधी हा प्रेस केलेल्या चेहऱ्याने मट्ठ निर्विकार मनाने ऐकण्याचा विषय नसून, गांधींच्या जगण्यातील विद्रोहाच्या ठिणग्या आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील रसरशितपणा समजून घेण्याचा विषय असल्याचे त्यांनी आपल्या अनेक व्याख्यानांच्याव्दारे ध्यानात आणून दिले. गांधी ऐकताना  एरवी कंटाळणारा वर्ग चंद्रकांत वानखडेंच्या या व्याख्यानानंतर गांधी खरंच वेगळ्या पद्धतीने समजावून घ्यायला हवा, अशी भावना व्यक्त करत आहे. खरे तर,  ‘गांधी का मरत नाही’, हे पुस्तक म्हणजे त्यांच्या अशाच भारावून टाकणाऱ्या मांडणीचे दस्तऐवजीकरण आहे.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखक लिहितात, गांधींचा तिरस्कार करणारी मंडळी जगात कमी असली तरी त्यांनी भारतीय जनमानसात हे तिरस्काराचं विष पसरविण्यात बऱ्यापैकी यश मिळविलं आहे. हे विष पसरविण्याचे सातत्याने कार्य करणारी मंडळी कोण होती? त्यांनी हे का केलं? ज्यांनी हे काम सातत्याने केलं, गांधी त्यांना वारंवार कसा आडवा येत गेला? त्यांच्या आंतरिक स्वप्नांच्या आशा आकांशांचा कसा चुराडा होत गेला? आणि गांधींना थांबविण्यासाठी त्यांचा वध कसा केला गेला, या सर्व प्रश्नांची सहज -सरळ-सोपी मांडणी म्हणजे, ‘गांधी का मरत नाही’, हे पुस्तक होय.
इ.स. १८१८ मध्ये ब्रिटीशांनी पेशव्यांच्या हातून महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत केली. खरे तर ही सत्ता चित्पावन ब्राम्हणांच्या हातातुन निसटल्याने चित्पावन ब्राम्हणांनीच ती सत्ता पुन्हा हस्तगत केली पाहिजे आणि भोगली पाहिजे, असा स्वातंत्र्याचा मर्यादित अर्थ घेणा·या महाराष्ट्रातील तत्कालीन नेतृत्वाने जो अहंकार जोपासला होता, त्या अहंकार गंडाला नख लावण्याचे कार्य म. गांधीनी केले. म्हणूनच ते त्यांच्या द्वेषाचे धनी ठरले असावेत, अशी मांडणी अनेक उदाहरणे देऊन लेखकाने केली आहे. महाराष्ट्रातील या वर्गाला म. गांधीचे नेतृत्व कधीच मान्य होऊ शकले नाही, अशी नोंदही लेखक ठिकठिकाणी अधोरेखित करतात.
भारतीय समाजातील कलकत्ता, मुंबई, मद्रासच्या परिसरातील उच्च्भू लोकांच्या आशा आकांक्षांभोवती पिंगा घालणा·या स्वातंत्र्य आंदोलनास म. गांधीनी द. आफ्रिकेतून भारतात आल्या आल्या बिहारच्या चंपारण्य सारख्या मागास भागातील अन्न्यायपिडित भू – कंगाल अवस्थेतील शेतक·यांच्या प्रश्नांशी थेट भिडविले. १९१६ च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौच्या अधिवेशनात राजकुमार शुक्ल यांना चंपारण्यातील शेतकऱ्यांचेचे दु:ख मांडण्याची संधी मिळवून देण्यासाठी म. गांधीनीच पुढाकार घेतला. आतापर्यंत समाजातील केवळ उच्च्भ्र लोकांच्या प्रश्नांची  चर्चा ज्या मंचावर होत होती,  म. गांधींच्या प्रयत्नांमुळे प्रथमच या देशातील श्रम करून जगणाऱ्या माणसाचे प्रश्न त्या मंचावर आले. लोकशाहीत शेतकरी हा राज्यकर्ता असला पाहिजे, चांभार वा भंग्याची मुलगी भारताच्या सर्वोच्चपदी बसत नाही, तोपर्यंत मला समाधान नाही आणि तोच माझ्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे. असा पवित्रा स्वातंत्र्य आंदोलनात म. गांधी घेत असतील आणि त्याचा पाठपुरावा करीत असतील तर निश्चितपणे येथील उच्चभ्रू समाजाला हा माणूस आपल्यापासून बरंच काही हिसकावून घेणार आहे, याची खात्री आणि दहशत त्यांच्या मनात निर्माण झाल्यावाचून राहणे अशक्य नाही. खरं तर हा भयकंपित झालेला वर्गच गांधीचा मोठ्या प्रमाणात दुस्वास करीत राहिला आणि पुढे त्याची परिणती म. गांधींच्या खूनापर्यंत गेली, हे सूत्र अधोरेखित करण्याचा प्रयत्न लेखकाने आपल्या संपूर्ण मांडणीतून केल्याचे दिसून येते.
म. गांधी यांना अगतिक, असाह्य, केविलवाणा सिद्ध करण्यासाठी येथील कुजबुज मोहिमेने, मजबुरी का नाम म. गांधी, गांधीची बकरी, काजू-बदाम शिवाय काही खात नव्हती, एका गालावर मारली, तर दुसरा गाल पुढे करावा, असे अनेक गौरसमज समाजात पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वीही झाले. अशा अनेक लांच्छनांचा उहापोह लेखकाने या पुस्तकात केला असून, त्यांचा सोदाहरण समाचार घेतला आहे. एका गालावरचा संदर्भ देताना लेखक लिहितात, ‘हरिजन यात्रेदरम्यान गांधींनी ते वाक्य वापरले होते. हरिजनांवर सर्वजनांनी  आतापर्यंत इतका अन्याय अत्याचार केला आहे, की हरिजनांनी माझ्या एका गालावर जरी थापड मारली तरी मी दुसरा गाल समोर करेल आणि तरी देखील त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन होणार नाही. महात्म्याचे महात्म्य समजून घेतांना त्यांची सुटी वाक्य समाजात पसरवून गैरसमज निर्माण करण्यापेक्षा त्यातील संदर्भ लक्षात घेतल्यास, त्या महात्म्याची ऊंची अधिकच वाढलेली जाणवते. अशा अनेक संदर्भांची पेरणी चंद्रकांत वानखडे यांनी, ‘गांधी का मरत नाही’,मध्ये केलेली आहे. भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीत कसे वौर होते? हे ठळकपणे सिद्ध करण्याचा प्रयत्न इथे सतत चाललेला असतो. समकालीन असलेल्या या महामानवांचे आणि म. गांधींचे संबंध कसे सौहार्दपूर्ण होते आणि त्यांच्या कार्याविषयीचा कळवळा म. गांधींच्या मनात कसा वसत होता, याची अनेक अदाहरणे या पुस्तकात दिली आहेत.

गांधी जातीयवादी, वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते, सनातनी हिंदू होते, असे अनेक आरोप त्यांचेच सुटे सुटे संदर्भ देऊन अनेकदा केले जातात. एकीकडे गांधी, आपल्याला वर्णव्यवस्था मान्य असल्याचे म्हणतात, स्वत:ला सनातनी हिंदू असल्याचे सांगतात, हे खरे असले तरी, तेच गांधी १९२० च्या नागपूरच्या अधिवेशनात अस्पृष्यता निवारण्याचा ठराव मांडतात. श्रम न करता खातो, तो चोर आहे, असे म्हणतात. शुद्रांना वेद शिकण्याबाबत मनाई करणे मला स्वत:ला कधीच मान्य हाणार नाही, असे म्हणतात. आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करतात, आपल्या कोणत्याच आश्रमात कोणत्याही देवाचे मंदिर स्थापन होऊ देत नाहीत. कोणत्याही देवाच्या मुर्त्या आणि कसल्याही धार्मिक पूजेत स्वत:ला अडकवून घेत नाहीत. ईश्वर हेच सत्य मानणाऱ्या समाजात, सत्य हेच ईश्वर, हे तत्त्व बिंबविण्याचा प्रयत्न करतांना, अनेक उच्चवर्णीय सहकार्यांना मृत जनावरांची चामडी सोलणे, संडास साफ करणे , यांसारख्या कामासाठी प्रेरणा देतात. कोणता सनातनी हिंदू व्यक्ती ज्याच्या मनात वर्ण वस्थेची चौकट तशीच टिकावी अशी अभिलाषा आहे, त्यांना वरील विचार आणि वर्तन पटेल? गांधी ते सहज करतात. लेखकाने या पुस्तकात अनेक उदाहरणे देऊन धर्माचा वापर धर्मसुधारणेसाठी करणे, हाच गांधीच्या मनातील उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे. धर्माचा आधार सोडला तर आपले म्हणणे येथील जनमानस गंभीरतेने घेणार नाही, याची त्यांना पुरेपुर जाणीव होती,  हेही लेखक लक्षात आणून देतात.
गांधी – आंबेडकर संबंधांचे काही पदर यात उलगडून दाखविण्याचा प्रयास लेखकाने केला आहे. पुणे-करार या अत्यंत संवेदनशील विषयावर लेखकाने दिलेली माहिती निश्चितच दुर्लक्षित करण्यासारखी नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत, गांधी आणि येथील सामाजिक व्यवस्थेवर अत्यंत कठोरात कठोर टीका केली. आंबेडकरांच्या टीकेला हजारो वर्षे दलितांच्या जगण्याला तुच्छ, प्राणीवत बनविणाऱ्या येथील सामाजिक व्यवस्थेबद्दलची चीड होती. डॉ. आंबेडकरांनी केलेल्या घणाघाती टीकेला उत्तर देतांना म.गांधी म्हणतात, आमच्या देशातील उच्चवर्णीयांनी अस्पृष्यांवर पिढ्यानपिढ्या एवढा अन्न्याय केला आहे, की तो पाहता बाबासाहेब काहीच बोलेल नाहीत. आमच्या तोंडावर थुंकण्याचा अधिकार त्यांना आहे. मी त्यास पात्र आहे. म गांधीचे हे बालणं तोंड देखलं नव्हतं, हे पुणे करार आणि त्या काळात म.गांधींनी केलेल्या आंदोलनाच्या पवित्र्यावरून स्पष्ट होते. पुणे कराराबाबत लेखकाने सविस्तर माहीती आणि म.गाधींची नेमकी भुमिका यावर सविस्तर भाष्य करायला हवे होते असे वाटते. ३० जानेवारी १९४८ला  नथुराम गोडसे याने गांधींची हत्या केली. गांधी हे मुस्लिम धार्जिणे, पाकिस्तानप्रेमी, देशाच्या फाळणीला जबाबदार , पाकिस्तानला पंचावन्न कोटी सरकारला द्यायला भाग पाडणारे, म्हणजेच देशद्रोही होत आणि या देशद्रोहाची शिक्षा म्हणजेच गांधी वध होय, असे नथुरामवंशीय लोक सतत सांगून, ती हत्या न्याय्य असल्याचे ठसविण्याचा प्रयत्न करतात. खरे तर पाकिस्तान निर्मितीच्या आणि पंचावन्न कोटीच्या अगोरही १९३४ मध्ये पुण्यात गांधी हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यावेळी त्यांची हरीजनयात्रा सुरू होती. तो प्रयत्न यशस्वी झाला असता, तर मग, गांधी भंगी, न्हावी व वकीलाला एका स्तरावर आणू इच्छितात आणि आमच्या ब्राम्हणी महत्त्वाकांक्षेच्या आड येतात म्हणून ही हत्या केली, असे ते म्हणू शकले असते काय? यांसारखे बिनतोड प्रश्न लेखकाने उपस्थित करून गांधी हत्येसाठी, गांधींचा वर्णव्यवस्थाधारीत समाज व्यवस्थेतील उच्च निचतेच्या संकल्पनेला उद्धवस्त करण्याचा मनसुबा इथल्या उच्चवर्णीय लाभार्थी व्यवस्थेला भयंकपित करीत होता, यातूनच ही हत्या झाली असे अधोरेखित करतात.
मोहनदास करमचंद गांधी, या व्यक्तिमत्त्वाचा महात्म्यापर्यंतचा प्रवास चंद्रकांत वानखडे आपल्या सहज सोप्या आणि रसाळ शैलीत, ‘गांधी का मरत नाही’, या पुस्तकात मांडतात. जोपर्यंत समाजाला चांगुलपणाचे आकर्षण आहे, तोपर्यंत गांधींना मृत्यू नाही, कारण मानवी जीवनातील चांगुलपणाचे प्रतिबिंब लोक गांधींत पाहतात, नथुरामात नाही. म्हणूनच अजूनही कोणी आपल्या मुलाचे नाव नथुराम ठेवण्याचे धारिष्ट्य करीत नाही. असे सांगून गांधीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल समाजात निर्माण केल्या गेलेल्या भ्रमाला दूर सारण्याचे महत्वाचे कार्य हे पुस्तक करते. हे पुस्तक म्हणजे काही सांगोपांग गांधी नव्हे. पण गांधी समजून घेण्याची मनिषा असणाऱ्या प्रत्येकाला, गांधी नावाचं मधाचं बोट लावण्यात, लेखक यशस्वी झाले आहेत, हे निश्चित!

प्रा.प्रसेनजित तेलंग, हे लेखक आणि सामाजिक चळवळींचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत.

गांधी का मरत नाही
चंद्रकांत वानखडे
मनोविकास प्रकाशन

किंमत १८० रू.   

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0