नवी दिल्लीः महात्मा गांधी यांना समर्पित असणाऱ्या राष्ट्रीय मेमोरियल व संग्रहालयाने आपला एक विशेष मासिक अंक हिंदुत्ववादी नेते विनायक दामोदर सावरकर यांच्यावर प्रसिद्ध केला आहे. या मासिकाचे नाव ‘अंतिम जन’ असे असून ते गांधी स्मृती व दर्शन समितीकडून हिंदी भाषेत प्रकाशित होत असते. या मासिकाच्या पृष्ठभागावरचा लेख सावरकरांनी हिंदुत्वावर लिहिलेला असून एक लेख म. गांधींचा धार्मिक असहिष्णुतेवर व एक लेख दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सावरकर यांच्यावर लिहिलेला आहे, हे लेख पुनर्प्रकाशित करण्यात आले आहेत.
या मासिकातील अन्य लेख ‘देशभक्त सावरकर’, ‘वीर सावरकर और महात्मा गांधी’ या शीर्षकाखाली अन्य लेखकांचे आहेत. तर या मासिकाचे संपादक प्रवीण दत्त शर्मा यांनी ‘गांधी का गुस्सा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला आहे. हे लेख प्रसिद्ध झाल्याने तमाम गांधीवादी व विरोधी पक्षांनी आक्षेप घेतले आहेत.
सावरकर यांचे लेख प्रसिद्ध केल्या प्रकरणात गांधी स्मृती व दर्शन समितीचे उपाध्यक्ष विजय गोयल यांनी ‘द हिंदू’ला सांगितले की, २८ मे रोजी सावरकर जयंती झाली असल्याने त्यांना हा अंक समर्पित केला आहे. वीर सावरकर म. गांधी, सरदार पटेल यांच्यासारखे महान व्यक्तिमत्व होते. त्यांच्या बलिदानातून शिकण्याची गरज आहे. ब्रिटिश राजवटीत तुरुंगात जितका काळ सावरकरांनी व्यतित केला तितका काळ कोणत्याही नेत्याने व्यतित केला नव्हता. असे गोयल यांचे म्हणणे आहे.
अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून सावरकरांच्या माफीनाम्याबद्दल गोयल यांना विचारले असता, ज्यांनी कोणी बलिदान दिले नाहीत, ते लोक असले प्रश्न उपस्थित करतात, असे उत्तर दिले.
गोयल यांनी आगामी अंक स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पनेवर असेल व त्यात स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांवर लेख असतील असे सांगितले.
गांधी स्मृती व दर्शन समितीचे अध्यक्ष हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.
दरम्यान गांधी स्मृती दर्शन समितीच्या अंकात सावरकरांवर लेख प्रसिद्ध झाल्या संदर्भात म. गांधी यांचे पणतू व गांधीवादी कार्यकर्ते तुषार गांधी यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, गांधी विचारसणीवर राजकीय विचारसरणीचे आक्रमण केले जात असून सावरकरांची तुलना गांधींशी करणे यात समितीचे असहाय्यपण दिसून येते. गांधी विचारसरणीला भ्रष्ट करण्यासाठी वर्तमान सत्ताधाऱ्यांची ही सुनियोजित रणनीती असल्याचा आरोप तुषार गांधी यांनी केला.
मूळ वृत्त
COMMENTS