गांधी – जगण्याचा मार्ग

गांधी – जगण्याचा मार्ग

महात्मा गांधींनी जगाला केवळ राजकीय तत्त्वज्ञान दिलं नाही, तर जगण्याचा मार्ग दाखवला. स्वातंत्र्यलढ्यात सारा देश भारून टाकण्याची क्षमता असलेले गांधीजींचे विचार सात दशकांनंतर आजच्या तरुण पिढीला कितपत कालसुसंगत वाटतात, गांधी त्यांना आपले वाटतात की प्रॅक्टिकल असलेली आजची पिढी त्यांनाही पारखून, निवडून घेते, यावर आजच्या तरुणांच्या दोन टोकाच्या संमिश्र भावना दिसतात.

देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात महात्मा गांधींनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत स्वातंत्र्याचे एक वातावरण तयार केले. हातात शस्त्र न घेता आपल्या स्वातंत्र्याची मागणी रस्त्यावर येऊन अत्यंत शांततामय मार्गाने करायची आणि सत्ताधाऱ्यांनी लाठी मारली तर लाठी खायची, गोळी मारली तर गोळी झेलायची; पण आपली मागणी ठामपणे मांडत राहायची. असे एक जगाच्या पाठीवरचे अद्भूत तत्त्वज्ञान महात्मा गांधींनी आपल्या कृतीतून या देशातल्या लोकांसमोर ठेवले. त्याचा परिणाम असा झाला की, गांधीजींच्या या अहिंसक तत्त्वज्ञानाने साऱ्या देशात एक अहिंसक पर्व तयार झाले. आत्मिक आवाजाचे सामर्थ्य किती मोठे आहे आणि ‘सत्य’ शब्दाला किती मोठी प्रतिष्ठा आहे, याचे दर्शन घडवणारा तो काळ होता.

महात्माजींना न पाहिलेले, महात्माजींना न भेटलेले, महात्माजींचे भाषण न ऐकलेले असे या देशातील कोटय़वधी लोक ‘बापू सांगतात म्हणून’ सत्याचे प्रयोग करीत राहिले, अहिंसेचे प्रयोग करीत राहिले आणि स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, लाठी, गोळी खायला, रस्त्यावर उतरायला सिद्ध झाले. हे वातावरण महात्माजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानातून निर्माण झाले होते. ‘करेंगे या मरेंगे’ या दोन शब्दांमध्ये, क्रांतीचा वणवा पेटवण्याची शक्ती आहे त्याच्यापेक्षा अधिक शक्ती होती. कोण बाबू गेनू? कुठे महात्मा गांधीजींना भेटला? महात्मा गांधी त्याच्या घरी कुठे गेले? पण गांधीजींच्या नेतृत्वाचा परिणाम स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तरुणांच्या मनावर इतका जबरदस्त झाला होता, की परदेशी कपडय़ाच्या गाडीपुढे या तरुणाने उडी घेतली. रक्ताच्या चिळकांडय़ा उडाल्या… बाबू गेनू अमर झाला. नंदूरबारचा शिरीषकुमार मेहता… एवढासा कोवळा जीव, पण गांधीजींच्या स्वातंत्र्यलढय़ाच्या अहिंसक संदेशाने भारलेल्या त्या तरुणाने भारतीय स्वातंत्र्याच्या बलवेदीवर आपल्या जीवाचे फूल समर्पण केले. सगळा देश या भावनेने भारलेला होता. १९३० ते १९४७ या १७ वर्षाच्या काळात महात्माजींनी देशाला नवी प्रेरणा दिली, नवी दृष्टी दिली आणि अवघ्या दोन शब्दांमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची फार मोठी शक्तीही दिली. जगात कोणताही देश असा नाही जो फक्त दोन शब्दांनी स्वतंत्र झालेला आहे आणि ते शब्द आहेत… ‘चले जाव’, छोडो भारत’… अशा दोन शब्दातून साधने नसताना अख्ख्या देशाला जागे करण्याची आणि गदगदा हलवण्याची ताकद गांधीजींच्या नेतृत्वात होती.

राम-कृष्ण-महंमद पैगंबर-येशू ख्रिस्त-बुद्ध यांच्याप्रमाणेच गांधीजी तत्त्वज्ञ आणि महाकर्मयोगी होते. ते त्या काळच्या प्रत्येक प्रश्नाला भिडले. म्हणून हा महात्मा केवळ ‘पारायणा’चा विषय होऊ शकत नाही. त्याचे सारतत्त्व केवळ बुद्धी आणि तर्काने पकडणे हे पाऱ्याला हातात घेण्यापेक्षाही कठीण. परिणामत: ‘जो अवयव ज्याच्या हाती लागला त्या त्या आंधळ्याने त्याला संपूर्ण हत्ती मानले’ या कथेसारखी आपली अवस्था महात्मा गांधी यांच्याबाबतीत होऊ शकते.

महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे. असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली.

‘गांधी नावाची हाडामांसांची व्यक्ती अस्तित्वात होती, यावर नवीन पिढीला विश्वासच बसणार नाही. कारण असा आदर्श पुरुष पुन्हा होणे नाही’ असे सुप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईन्सस्टाईन, म्हणाले होते. त्या काळात एका वैज्ञानिकाच्यादृष्टीने गांधींचे महत्त्व विषद केले होते. आजच्या काळातही अमेरिकेसारख्या बलाढय़ राष्ट्राचे माजी प्रमुख बराक ओबामा हे सुद्धा गांधींना त्यांचे आदर्श मानतात. यातूनच गांधी विचाराची व्याप्ती स्पष्ट होते. ग्रामस्वराज्य असो की ग्रामोद्योग, व्यक्तिगत आचरण असो की राहणीमान, पर्यावरण, आरोग्य, सर्वधर्म समभाव, एक नव्हे तर अनेक विषयांवर त्यांनी मांडलेली मते आजच्या बदलत्या काळात सुसंगत असल्याचे दिसून येते.

अनेक विद्यापीठात गांधी विचाराचा अभ्यास नव्याने सुरू झाला आहे. त्याचे महत्त्व नवीन पिढीत रुजेल आणि समजेल अशा पद्धतीने मांडून त्याची वर्तमानातील समस्यांशी सांगड घालून उपयुक्तता तपासली जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेतही वेळोवेळी गांधी विचाराला महत्त्व देण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेच निश्चित केलेले ‘सस्टेनेबल डेव्हलपमेन्ट गोल्स’चा आधारही गांधी विचारातच दडला आहे.

गांधीजींचा शिक्षण विचार मन, मस्तिष्क आणि कर म्हणजेच मन, मेंदू आणि हात यांना जोडणारा होता. माणसाच्या बुद्धिमत्तेचा संपूर्ण विकास व्हावा, त्याच्या हाती निर्माणाचे सामर्थ्य यावे, श्रमप्रतिष्ठा प्राप्त व्हावी, त्याचे अंतःकरण स्वच्छ व्हावे, त्याच्या हृदयातून येणारा हुंकार आणि आतला आवाज हा त्याला स्वाभिमान आणि अस्मिता प्रदान करणारा असावा, असे गांधीजींना वाटत होते. त्यांच्या मते, हाताने श्रमदान करावे. मनाने समाजातील दुर्बलाचा विचार करावा आणि बुद्धीच्या विवेकाने संबंध राष्ट्रजीवन उजळवून टाकावे. असे स्वावलंबी शिक्षण, ओजस्वी शिक्षण गांधीजींना अभिप्रेत होते. त्यांच्या या शिक्षणामुळे व्यक्ती आणि सभोवतीचा निर्सग, शिक्षण संस्था आणि समाज, शिक्षण आणि राष्ट्रजीवन यांना एकत्रित जोडणे शक्य होणार होते. त्यामुळे गांधीजींनी मूल्याधारित शिक्षणावर भर दिला. भारतीय प्रश्‍नांना भारतीय उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ‘नयी तालीम’ या संकल्पनेतून केला आहे.

गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन  म्हणून साजरा केला जातो. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणतात. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले. एवढे सगळे स्पष्ट असूनही या देशातला गांधीवाद हा गेल्या काही दिवसांत पराभूत होताना दिसत आहे. दुर्दैवाने आज त्यांची खिल्ली उडवणाऱ्या सुमारांची बेसुमार वाढ झालेली दिसतेय. तोंडाने त्यांना प्रात:स्मर्णीय म्हणायचे, बाहेरच्या देशात त्यांचे गोडवे गायचे पण अंतःस्थ हेतू गांधींची टिंगलटवाळी करण्याचा ठेवायचा! मूह में गांधींचा ‘राम’ आणि बगल में ‘नथुराम’ अशी गांधी द्वेष्ट्यांची पाताळयंत्री चाल आहे.

गांधी विचाराचे एक तत्त्वज्ञान आहे. परदेशातल्या अनेक देशांनी या गांधीवादाच्या तत्त्वज्ञानाने अचंबित होऊन गांधींना विश्वपुरुष मानले. त्या महात्माजींना आपल्या देशातील जनता मात्र फार झपाटय़ाने विसरलेली दिसते आहे. गांधीजींना ज्याने मारले, त्या प्रवृत्तीचा गौरव होताना दिसतो आहे. त्या मारेकऱ्याची स्मारके करण्याची चर्चा होते. त्यावर नाटके येतात आणि एका खलनायकाची प्रतिमा नायकामध्ये परावर्तीत करण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न होतो. दुर्दैवाने आजचे सरकार हेसुद्धा गांधीवादी विचारांना संपवण्याच्या मागे आहेत. या सरकारला आणि या प्रवृत्तीला ही गोष्ट स्पष्टपणे सांगायची गरज आहे की, असा प्रयत्न करणारे संपतील; पण गांधीवाद नावाचा विचार कधीही संपू शकणार नाही. गांधींना मारणारे मेले; पण गांधींजी विचारांच्या रूपाने जिवंत आहेत. गांधीजींनी देशाला जो महामंत्र दिलेला आहे, त्या महामंत्रातून या देशाला मिळणारी स्फूर्ती आणि ऊर्जा ही देशाची शाश्वत ऊर्जा आहे.

म्हणूनच आजही समाजमाध्यमावर ‘Knowing Gandhism’ या नावाने तरुणांचा मोठ्याप्रमाणात सहभाग असलेला ग्रुप कार्यरत आहे. ह्या तरुणांनी गांधीजींना प्रत्यक्ष पाहीले नसले तरी त्यांच्या चित्रफितीतून, पुस्तकातून त्यांची भेट घडली आहे. त्यामुळे या तरुणांच्या जीवनात समाजकारणाची एक नवी उर्मी संचारली आहे. त्यांनी गांधी पचवल्यामुळे ते गांधीजींचा द्वेष करणाऱ्यांशीही प्रेमाने आणि करुणेनेच बोलतात, पण त्याचवेळेस गांधी विचार ठामपणे मांडतात. यावरून गांधी विचार किती शाश्वत आहेत हेच सिद्ध होते.

COMMENTS